Showing posts with label niteshpatil. Show all posts
Showing posts with label niteshpatil. Show all posts

Saturday, June 27, 2015

माझा पहीला परदेश प्रवास दुबई

सस्नेह जय शिवराय...
     
 सामान्य व्यक्तीने दुबई फिरायला जाणं म्हणजे भाग्यच म्हटले पाहीजे. पण मित्राच्या सहकार्याने आणि परमेश्वर कृपेने दुबई जाण्याचा योग आला.
एक ईच्छा होती की परदेशी जाऊन यायचं तिथली लोकं, तिथली वस्ती संस्कृती, तिथली न्याय व्यवस्था आणि आपली भारतीय व्यवस्था यात काय साम्य असतं ते अनुभ
              आणि पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई...

बाॅंबेला मुंबई आणि मुंबईच्या विमानतळाला छत्रपति शिवाजी नाव देऊन महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेउन बाळासाहेबांनी शिवभक्त असल्याची खरी ओळख दिली.. प्रत्येकाला छत्रपति शिवाजी हे नाव आदराने घ्यावच लागत..! नुसतं शिवाजी नाही..छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ!!!! आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारुढ पुतळा व प्रदर्शन व्हावे, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच केलेली आहे.  मा. शिवसेनाप्रमुख तसेच मा.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्रीमती चित्रलेखा देशमुख (वास्तु रचनाकार), प्रसिद्ध चित्रकार मा.अविनाश सुतार व अन्य जाणकारांकडून आलेल्या सूचना अनुसरून छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळा व त्यांचा गौरवशाली इतिहास, ऐतिहासिक साहित्य, त्यांनी बांधलेले गडकिल्यांचे चित्ररुप भिंती शिल्पांतून साकार करावे अशी मागनी केली होती पण ते आतापर्यंत पुर्ण झालेलं नाहीये.

पाहता पाहता जाण्याचा दिवस ऊजाडला.पाहटे साडेतीन वाजता घरुन निघालो. विमानतळावर साडेपाचला पोहचन गरजेचं होतं.कारण फ्लाईट साडेआठचं होतं. विमाणात पहिल्यांदाच बसनार म्हणुन कमालीची ऊत्सुकता मला होती.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे नावच ईतकं दमदार की तिथे पोहचल्यावर भरुन आलं. आतमधे प्रवेश घेऊन जाणवलं की आधुनिक सुविधांचे जागतिक दर्जाचे टी २ टर्मिनल आणि त्याला महाराजांचं नाव.कीती अभिमानाची गोष्ट. पण ते कार्यान्वित झाल्याला आता वर्ष दिड वर्ष उलटले. टर्मिनलने अनेक पुरस्कार मिळविले. परंतु, नावात दिमाखाने महाराजांचे नाव असलेल्या विमानतळावर स्वतः महाराजांचे अस्तित्व मात्र अजूनही उपेक्षितच आहे. शिवरायांच्या अर्धपुतळ्यासह टी२च्या नव्या प्रवेशरस्त्यापाशी बांधण्यात येणारे दालन अजूनही पूर्ण नाही. विमानतळावर तर सात हजार कलावस्तूंमध्ये शिवरायांचे दर्शन नाही.
                         आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागची भूमिका परदेशातून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकाला हा महाराष्ट्र कोणाचा आहे याची जाण व्हावी व महाराजांना सलाम करूनच महाराष्ट्रात पाऊल टाकावे, ही होती. पण...........
हा पण फार महत्वाचा आहे. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच....
           
जेंव्हा विमान उड्डान घेतं तेंव्हा एवढ मोठे धुड आकाशात कसं झेप घेत ह्याचे राहून राहून आश्चर्य वाटतं. उड्डानानंतर लगेच आपल्या ओळखिच्या जागा शोधून काढण्याचा खेळ खेळला जातो.
विमानाच्या खिडकीतून बाहेर बघणेही मी खूप एन्जोय केलं. जाताना खिडकीजवळ जागा नाही मिळाली पण येताना मात्र मीळाली होती. ढगांच्या मधून जाताना अजूनही मन ढग पकडून ठेवायचा प्रयत्न करते. कधीतरी दुरवर नुसता ढगांचा समुद्र असतो, निळ आकाश, ढग आणि आपण एवढच. नदीची वळण दिसतात. रात्रिच्या वेळी सुंदर तारका दिसतात. मिणमिणारे दिवे दिसतात.
    विमानातून उतरले की एक पासपोर्टवर शिक्का लागला की थेट गमन बग्गेज क्लेम कडे. तिकडेही बरेचवेळा तात्कळत रहावे लागते. बेल्ट वरून बॅग उचलण्याची धड्पड चालू असते. एकदा ती हातात आली की मग प्रवास संपला. प्रवास संपला की पुन्हा एक उदासिनता निर्माण होते.
             आणि पोहचलो दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ


दुबई ची ओळख म्हणजे  ग्लोबल शहर, प्रवासी शहर, उंच उंच इमारतींचे,  सोन्याचा धुर निघणारे शहर, बॉलीवूड लोकांचे आवडते शहर, अंडर-वल्ड लोकांचे शहरही असे ऐकिवात आहे.
गाडीतून फोटो घेतल्याने तेवढी सुस्पष्टता  नसावी. प्रत्येक इमारतीची रचना किती वेगळी आहे. पत्त्यातल्या गगनचुंबी  इमारतीच  जणू.  बिल्डींग  आर्की टेक्चर चे अदभुत नमुने.
विमानतळावरुन बाहेर निघालो आणि जसं कुणी गरम भट्टीपाशी आणुन सोडलय असं वाटलं. ४८° ते ५१° सेल्सीअस तापमान होतं ते परतेपर्यंत तसचं राहीलं. तसा सर्व प्रवास राहणं फीरणं AC तच झालं म्हणा. तिथे बस स्टॅाप पण AC च आहेत तुम्ही जीथे जाल तीथे AC.बाकी पर्यायच नाहीये.
संयुक्त अरब अमिराती (युनायटेड अरब एमिरेट्स).
दुबई हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब शहर ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाच शहर आहे. दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती. त्यामध्ये स्थानीक अमीराती वंशाचे १६ ते १७ % भारतीय ६० ते ६४ % बाकी ईतर .....
दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.
      आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे. २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते आणि त्याचा प्रत्ययही आला. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो. पण जोवर होतो तोवर तसं काही निदर्शनास आलं नाही.ते चार पाच दिवसात माहीत पडनं तितकं सोपही नाही म्हणा ..

जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे.

माझा पहीला विमानप्रवास तसा छानच होता. विमानतळावर मला जाणवणारा माझा सर्व उत्साह जेंव्हा मी विमानाच्या गेटपाशी पोचलो तेंव्हा निघून गेला. बोअर्डींगच्या आधी सर्व लोकं बाहेर बसली होती. आम्ही सोडले तर बाकी इतकी निरुत्साही, मरगळलेली लोकं मी आयुष्यात पहील्यांदीच पाहीली. फारच निराशाजनक वातावरण होत ते. एकही हायफाय, प्रसन्न चेहर्याचे व्यक्तीमत्व दिसत नव्हते. अश्या लोकांबरोबर दुबईत जाणं मला मानसीकदृषट्या परवडलच नसतं पण आमचा ३१ जणांचा ग्रुप होता.तो ही लय झकास म्हणुन काही वाटलं नाही.
डेजर्ट सफारी……… 


भर वाळवंटात मोठमोठ्या गाड्या उलटसुलट चालवणार…….तुम्ही ती महिंद्रा स्कॉर्पिओ ची जाहिरात पाहिलीये का ज्यात एक ललना वाळवंटात उभी असते आणि तिकडून वाळूवरून उड्या मारत स्कॉर्पिओ येते तोच हा प्रकार…..पण प्रत्यक्षात ती जाहिरात अतिशय सौम्य वाटावी अश्या जोरजोरात दणके बसतात……..आमच्या गाडीत बसलेले म्हणाले की गाडी पलटीही होते म्हणे आणि त्यात ड्रायवरने होकार मिळवला!!!” झालं माझी भिती वाढली पण काय करणार जवळच्या लवंगांच्या भरवश्यावर करू म्हटलं आपण वाळवंट पार, अर्थात उत्सुकता तर होतीच……..
मधे एका ठिकाणी गाड्या थांबल्या…..ईथे नेहेमी ग्रूप बुकिंग होते, एकाच वेळेस अनेक गाड्या निघतात, मग एकाने एका उंच टेकडीवरून उडी मारली की दुसरा आपली गाडी त्याच्याही वरच्या टेकाडावर नेतो. थांब्यावर गाड्यांच्या टायरमधली हवा काढण्यात आली .जास्त दणके बसायला नको म्हणे नानाची टांग’ म्हटलं तुमच्या . बसायचे तेव्हढे दणके बसलेच सगळ्यांना……..
एकदाचे आम्ही वाळवंटात अवतरलो……रेसकोर्स वरच्या घोड्यांसारख्या गाड्या लावल्या गेल्या……जोरजोरात गाणे लावले………आणि मग झाली ती धुमश्चक्री सुरू………गाडी सुरु झाल्यानंतर पहिल्या ५/१० मिनीटातच मी ओळखले आपले काही खरे नाही आज...पण नंतर हायसं वाटलं
तिथून पुढे होता डेजर्ट कँम्प……….तिथे रात्रीचे जेवण आणि बरोबरच्या पुरूष मंडळाचे मुख्य आकर्षण ’बेले डान्स’ होते…….गप्पा टप्पा, जेवण सुरु झाले आणि मग अवतरली ’नॅनी’ नावाची बेले डान्सर……. तिच्या थिरकणाऱ्या पावलावर ग्रूपमधल्या सर्वानाच उत्साह आला आणि अनेक जण नाचण्याची संधी साधून आले.विसरलोच किरीट सोमैया आणि त्यांच्या सौभाग्यवती ही होत्या तिथे तो आस्वाद घ्यायला....
एक अविश्वसनिय वास्तु...
बुर्ज खलिफा



ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. ही संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत आहे. एकूण 829.84 मी (2,723 फूट) इतकी उंची असणारी बुर्ज खलिफा ही आजच्या घडीला जगातील सर्वात उंच मानवनिर्मित इमारत आहे. ह्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले व ४ जानेवारी २०१० रोजी तिचे उद्घाटन करण्यात आले. ह्या इमारतीत १६३ मजले आहेत. याच्या एकूण मजल्यांपैकी ३८ मजल्यांत हॉटेले व कार्यालये इत्यादी आहेत. प्रति सेकंद १० मीटर वेगाने जाणाऱ्या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत, तर ८ शीघ्र गती एस्कलेटर आहेत. त्यामधे जाण्याचा अनुभव अविस्मरणिय होता.जगातील सर्वात वेगवान लीफ्ट. १२५ मजले आणि फक्त १ मिनिट आणि ४ सेंकंद. विश्वासच बसला नाही.पण आम्ही पोहचलो होतो. वर हवेचा दबाव ईतका होता की कान बंद झाले होते.तशी ईमारत ही हवेमधे थोडी हरकत करते हे जाणवलं. वरुन चहुबाजुनी पुर्ण दुबई दिसत होती रस्ते, ईमारती, बगीचे ,समुद्र सारंकाही..
खाली आल्यानंतर नेत्रदिपक असे संगीताच्या तालावर नाचनारे बागडनारे कारंजे पाहीले.
बुर्ज अल अरब आणि जुमेरा बीच

हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक आलिशान हॉटेल आहे. ३२१ मीटर (१,०५० फूट) उंच असलेली बुर्ज अल अरब ही संपूर्णपणे हॉटेल म्हणुन वापरली जाणारी जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. बुर्ज अल अरब दुबईच्या जुमेराह बीचपासुन २८० मीटर अंतरावर एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आले आहे व त्याचा आकार साधारणपणे जहाजाच्या शिडासारखा आहे. बुर्ज अल अरब हे जगातील सर्वात महागड्या हॉटेलपैकी एक मानले जाते. ह्या हॉटेलमध्ये २०२ खोल्या आहेत.
हॉटेल अटलांटिस 

हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  पाम झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर व्हिलास वसवले आहेत. गोल दिसणारा क्रिसेंट आणि त्याच्या टोकाशी अटलांटिस हॉटेल.  पाम  जुमेराचा हा  वरतून दिसणारा view . यात म्हणे मोठ्या बॉलीवूड स्टार  लोकांचीही घरे आहेत. पाम  जुमेरा हे स्वतःच स्वताला 'जगातील आठवे आश्चर्य' म्हणवतात.
पाम जुमेराच्या   शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या-मोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र.
थोडक्यात काय भरपूर श्रम झालेले असले तरी थकवा न येता सगळे प्रसन्न झाले होते……..
                                                 नितेश पाटील...

Sunday, April 12, 2015

देव श्रद्धा आणि प्रसीद्धी

सस्नेह जय शिवराय
परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी माणुस नाना प्रकारचे प्रयत्न करत असतो,ते स्वभावीक आहे कारण ८४ लाख योनीमधुन मनुष्य ही एकच योनी देवाला माननारी आहेे.कर्ता करविता जरी परमेश्वर असला तरी आपल्या स्वताःमधे परमेश्वर आहे तसा तो ईतरांमधेही आहे हे मानुन चालनं गरजेच आहे.मानव जातीमधे कितीतरी प्रकारच्या रुढी परंपरा आहेत पण त्याचा विचार आपण आजच्या वस्तुस्थीतीशी केला पाहीजे.काय पाप काय पुण्य याचा गांभीर्याने विचार करायला हवा.आता आपण केस,नारळ, हार,सोने,चांदि,अमुक तमुक परमेश्वराला अर्पुन पुण्य मिळते ? भाग्य उजळते ? काय उपयोग अशा या दान धर्माचा ?? हे सर्व जर गरजु व्यक्तीला दान दिलं तर नाही का पुण्य लागनार ?
भगवंताच्या नामाची साधना ही फास्ट गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते
गोरगरिबांची, राज्य किंवा श्रीमंती भोगायची इच्छा नसते. जरी ते पुर्ण दुष्कृतीचे फळ  भोगीत असले, तरी ते भोगता भोगता, पापाचा क्षय होत जाऊन त्यांची स्थिति अशी होऊन जाते की अन्न वस्त्र मिळाले तरी पुरे. अशांना अन्नदान, वस्त्रदान देतेवेळी परमेश्वर बुद्धिने
जो पूज्यभाव ठेवला जातो, त्यायोगे दान देणा-याचे पाप नाहीसे होते व दान घेणा-यालाही पाप लागत नाही. तसेच कोणीही श्रीमंत असून तो जर त्या श्रीमंतीचा उपभोग घेणार नाही, तर त्याचेही पाप  नाहीसे  होते.
पण नाही आपण नेमकं त्याविरुद्ध वागत असतो कारण आपण परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो तो फक्त स्वताःच्या स्वार्थासाठी आणि जगतही असतो स्वताःसाठी आणि फारफार तर आपल्या परीवारासाठी..पण आपण ईतरांसाठीही जगुन पाहीलं पाहीजे. एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून बघायला हव्यात कारण देव श्रद्धेचा भुकेला असतो प्रसिद्धिचा नाही....
एकदा मच्छिंद्रनाथ एका गावात भीक्षा मागायला आले. एका घरासमोर उभे राहून "अल्लख निरंजन" असे म्हणताच घरातून एक बाई चिमूटभर पीठ घेऊन आली. हे पाहताच नाथ म्हणाले "बाई शेरभर तरी पीठ दे ग". त्यावर बाई रागावली व त्यांना निघून जायला सांगीतले. संपूर्ण गाव फिरले परंतु कुणीच त्यांच्याशी सन्मानाने बोलेना. काही मुले त्यांची टवाळी करु लागले. शेवटी वैतागून ते परतले. नाथ आलेत हे पाहून गोरक्षनाथ उभे राहिले. झोळी रिकामी होती. नाथ गोरक्षांना म्हणाले "गोरख आता जगाला आपली गरज राहीलेली नाही. भीक्षा तर मिळत नाही पण टवाळी मात्र होते." नाथांनी झालेला प्रकार सांगितला. त्यावर गोरक्षनाथ
म्हणाले "गुरुदेव, जगाला काय हवे आहे हे मला चांगले ठाऊक आहे. उगाच लोकांना दोष देऊन अर्थ नाही. आपणच बदलायला हवे. मीच त्या गावात जातो. थोडया वेळाने तुम्ही तिथे या आणि मी तुम्हाला दाखवेन लोकांना नेमके काय हवे आहे ते?" ठरल्याप्रमाणे गोरक्षनाथ गावाच्या मोठया
चौकापाशी आले. तिथे बरीच गर्दी होती. ते चौकाच्या
मध्यभागी आले आणि आपल्या काखेतली काठी हवेत
भिरकावली ती तशीच हवेत स्थिर राहीली आणि स्वतः काठीच्याही वर जाऊन हवेत मांडी घालून स्थिर झाले. हे पाहून लोकांनी गर्दी केली. हार, नारळ, फळे घेऊन लोकांनी त्यांना नमस्कार केला. थोडया वेळात मच्छिंद्रनाथ तिथे आले व गोरक्षांनी नाथांना सांगितले की लोकांना हेच हवे आहे. चमत्कार तिथे नमस्कार. सांगायचे तात्पर्य इतकेच की
त्या काळी घडलेली ही घटना आजच्या काळातही तितकीच लागू पडते. चमत्कार तिथे नमस्कार. लोकांनी उगाच गैरसमज करुन घेतला आहे की साधू-संतांचा जन्म हा चमत्काराकरीता
झाला आहे. साधू-संत चमत्कार करत नाही. त्यांचे असणे हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. लोकांची काय विपरीत श्रद्धा असते ते पहा? ज्याचे मन मोठे तो खरा संत, ज्याचे भक्तगण जास्त तो खरा संत. महर्षी व्यास, ज्ञानेश्वर यांसारख्या सत्पुरुषांच्या भारत राष्ट्रात असे अधर्म घडणे म्हणजे खेदकारकच आहे. संत हे चारित्र्यवान असले पाहिजे चमत्कारीक नव्हे. जसे संतांच्या बाबतीत घडले तसेच
देवाच्या बाबतीतही घडले. "प्रतिमेची पूजा करीता करीता. तो स्वतः पाषाण झाला. मानवाचा छंद सारा. देवाचा बाजार झाला." अहो, गणपती दुध काय पीतो? केरळमध्ये मेरीच्या मूर्तीच्या नेत्रांतून अश्रुपात काय होतात? मुंबईच्या समुद्राचे पाणी गोड झाल्यामुळे माहीमच्या दर्ग्यातील गर्दी
वाढते. दर्ग्यातील कबरीवरच्या चादरीचे लोक चुंबन काय घेतात? अरेरे... असल्या विपरीत श्रद्धेच्या माणसांपेक्षा नास्तिक माणूस परवडला. पुराणांत असे वर्णन आहे की कलियुगात भोंदूपणा वाढेल, ज्यांचा अधिकार शून्य त्यांचे महत्व वाढेल. त्यामुळेच प्रसिद्धिच्या नादात अनेक लोक (जे स्वतःला संत म्हणवून घेतात) त्यांनी श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु केली. लोकांच्या श्रद्धेच्या बळावर पैसा कमवला. यात प्रामुख्याने दोष लोकांचाच आहे. हिंदु धर्मात इतके विशाल ग्रंथ असताना भोंदूंच्या नादी लागण्याचे कारणंच काय? याचा अर्थ गुरु करु
नये असे नव्हे. पण गुरु हा परंपरेतला असावा लागतो. तेव्हाच त्याला अनुग्रह देण्याचा अधिकार प्राप्त होतो. आता कुणीही कुणाला अनुग्रह देत असतात. जणू गुरुंचा अनुग्रह म्हणजे निवडणूकीचे तिकीट वाटप आहे. कसला हा भोंदू कारभार आणि कुठे फेडणार ही पापं. आता मूर्तिपूजेचेच पहा ना. ईश्वराकडे जाण्यासाठी "मूर्तिपूजा" हा एक रामबाण
उपाय आहे. निर्गुण निराकार ईश्वराच्या चरणी मनुष्य
सहजासहजी एकरुप होत नाही. माणसाचे मन हे फ़ार चंचल असते. ते क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. मानसपुजेने मन स्थिर होत नाही. मनाची एकाग्रता साधावयाची असेल तर समोर ईश्वराचे प्रतीक हवे म्हणून मूर्तिपूजा. मुर्तिपूजा हे अज्ञान नसून अप्रतिम विज्ञान आहे. प्रतीके केवळ हिंदु धर्मातच नाही अन्य धर्मातही आहेत. ख्रिस्तांचा क्रूस असो, मुसलमानांचा पीर किंवा मंत्रयुक्त तसबीर असो (काही अल्पबुद्धि लोक उगाच हिंदुंना मूर्तिपूजक म्हणून हीणवतात). तात्पर्य मूर्तिपूजा हे साधन आहे साध्य नव्हे. परंतु या कलियुगात झाले काय? लोक
मूर्तिलाच ईश्वर मानू लागले. उपायच अपाय ठरला आणि आपला "आधूनिक देव" प्रसिद्धिचा भूकेला झाला. अहो आज हिंदुंचे कितीतरी अनेक श्रीमंत देवस्थाने आहेत. पण उपयोग शुन्य. ईश्वर नि भक्ताचे पवित्र नाते नाही. केवळ पैशांचा बाजार. काही लोक तर देवस्थानाला "पिकनिक पॉइंट" म्हणून
भेट देतात. खरोखर ईश्वर पैशांचा, प्रसिद्धिचा भूकेला आहे का? नाही मुळीच नाही. ईश्वर अनंत अनादि आहे. हे सबंध विश्व त्यानेच निर्माण केले आहे. ही सगळी दौलत त्याचीच आहे. हा सगळा पसारा त्याचाच आहे. ईश्वराचा पसारा फार मोठा आहे. कधी विचार करुन पहा. एवढं विशाल ब्रह्मांड. त्यात अनेक सुर्यमाला नि ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वी नावाचा एक ग्रह, ७०% पाण्याने व्यापलेल्या या ग्रहात केवळ ३०% भूभाग आहे. त्यात ५ खंड आहेत. त्यात आशिया नावाच्या खंडात भारत हे राष्ट्र.
भारत राष्ट्राच्या कुठल्यातरी राज्याच्या एका जिल्ह्यांत छोट्याश्या शहराच्या एका अगदी लहान विभागात असलेल्या एका इमारतिच्या/चाळीच्या खोलीत आपण राहतो. पाहिलेत ना, ईश्वराच्या या विशाल पसार्यात आपले स्थान किती लहान आहे ते. मग हा ईश्वर प्रसिद्धिचा भूकेला कसा असेल? मग हा ईश्वर आपल्या नवसाला क्षणोक्षणी कसा काय पावेल? संतांनाही ज्याचे दर्शन दुर्लभ होते तो
आपल्या सारख्या अति साधारण लोकांना कसा काय
साक्षात्कार देईल? याचा अर्थ ईश्वर पावत नाही असे
नाही. त्याचे ह्र्दय आईसारखे आहे. म्हणून तर आपण
जगतोय ना? परंतु ईश्वराचा साक्षात्कार होण्यासाठी
योग्यता लागते. त्यासाठी साधना करावी लागते. तो
आपल्याकडे येणार नाही. आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. जसे एखाद्दाला सावली हवी असेल तर तो झाडाखाली जातो. झाड स्वतःहून त्याच्याकडे येत नाही. विहीरीत प्रचंड पाणी आहे. परंतु तहान लागल्यावर आपल्याला विहीरीकडे जावे लागते. विहीर आपल्याकडे येत नाही. तसेच ईश्वर हा
मायाळू आहे. त्याच्या मायेची उब हवी असेल तर आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल. एकदा का आपली योग्यता वाढली तर तो स्वतःच आपल्या भेटीला येतो. जसा पुंडलीकेच्या
भेटीला विठ्ठल आला. देव श्रद्धेचा भूकेला आहे. परंतु श्रद्धा डोळस हवी. नाहीतर वर म्हटल्याप्रमाणे विपरीत श्रद्धा घडली तर ईश्वर प्रसन्न तर होत नाही परंतु त्याचा नकळत अपमान मात्र आपण करीत राहतो. आपल्यावर भगवंताची कृपा होत नसेल तर आपले कुठेतरी काहीतरी चुकते, असे
समजावे. आपल्यातले दोष, मत्सर काढून टाकावे. आपण नेहमी म्हणतो की देवावर माझी नितांत श्रद्धा आहे, मी त्याची मनोभावे पूजा करतो. तरीसुद्धा देवाची कृपा होत नाही. असे का? कारण आपल्या मनात कुठेतरी शंका असते. तांदूळ कितीही निवडले तरी खडा कुठेतरी राहतो व जेवताना कचकन चावला जातो. असेच काहीतरी आपल्या बद्धल होते.
काही लोक ईश्वराचे अस्तित्व नाकारतात. हे लोक इतके विक्षीप्त असतात की तलवार म्यानात ठेऊन तर्क करतात आणि आपला तर्क खरा ठरविण्यासाठी म्यानातली तलवार बाहेर काढतात. म्हणे विज्ञानयुग आहे. खरा वैज्ञानिक ईश्वरावर कधीच शंका घेत नाही. एखादी गोष्ट नाकारणे सोपे असते कारण त्यात टाळकं खांजवावं लागत नाही. असो, ज्याचे त्याचे कर्म. ईश्वराच्या साक्षात्कारासाठी संतांचा आधार मिळतो. संत हे ईश्वराचे दूत असतात. देवाचा संदेश ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. मी वर म्हटले आहे की संत चमत्कार करीत नाही. परंतु ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, साईबाबांपर्यंत संतांची चरीत्रं वाचली तर त्यात चमत्कार वाचावयास मिळतात. मग ते खोटे हे असे समजावे का? नाही मुळीच नाही. योगी अरविंद म्हणतात "परिपुर्ण माणसाच्या दृष्टीने जे
तर्कशुद्ध असते, तेच अपूर्ण माणसाच्या दृष्टीने
चमत्कारिक असते. ज्याने आयुष्यात कधीच विमान पाहिले
नसेल, त्याला विमान दाखवल्यावर तो त्याच्यासाठी
चमत्कारच ठरतो. तसेच आहे संत जे करतात ते त्यांनी
अनुभवले आहे. पण आपण अनानुभवी आहोत. म्हणून
आपल्याला ते चमत्कार वाटतात. चमत्कार चमत्कार म्हणजे
काय हो? ईश्वराने निर्माण केलेले हे विश्व किती चत्कारिक
आहे ते पहा. एवढूसं बीज परंतु ते पेरल्यावर केवढं अवाढव्य
वृक्ष जन्माला येतं. सुर्य उगवतो मावळतो. हा वारा दिसत
नाही परंतु जाणवतो. ही माणसं, झाडे, प्राणी, त्यांना
जगण्यासाठीची केलेली सोय. प्रत्येक गोष्ट चमत्कारिक
आहे. पण आपण त्याचा विचारही करत नाही. ईश्वराच्या
व्यापकतेचा विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल
की तो किती दयाळू आहे. आपण ईश्वरापुढे नम्र होऊन
भक्तिभावाने उभे राहिले पाहिजे
आचारः परमो धर्म.
आचार शुद्ध ठेवावे. त्याची भक्ती करावी पण बुद्धीने. बुद्धी गहाण
टाकून भक्ती करु नये. देवाला बुद्धिवान आणि चारित्र्यवान
भक्त आवडतात. देवाशी वागताना आपले स्थान देवाच्या
चरणापाशी आहे असा भाव मनी ठेवावा. त्याच्यावर नितांत
श्रद्धा ठेवावी. तर तो आपल्याला नक्कीच त्याच्या कुशीत
घेईल. कारण देव श्रद्धेचा
भूकेला आहे, प्रसिद्धिचा नव्हे.
ज्ञानेश्वरांची सुंदर ओवी आहे....
देव देव म्हणोनी व्यर्थ का फिरसी I।
निज देव नेणसी मुळी कोण II१।।
देवा नाही रुप देवा नाही नांव
देवा नाही गाव कोठे काही II२।।
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा I
अखंडित सेवा करा त्याची ।।३।।
                                                                    nitesh patil

Tuesday, March 31, 2015

शिक्षण कि स्पर्धा

जीवन स्पर्धा

सस्नेह जय शिवराय
सर्वच नाही पण बहुतांशी लोकांच हे असचं आहे.
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.आणि आपल्या आयुष्याची सिमाही कमी करत चाललेली आहे पण पुढच्या पिढीचं भविष्य ऊज्वल करण्याची गरज अाहे. हे कळत नाही अशातला भाग नाही पण ते सुधारणार कसं ?
हा प्रश्न कीत्येकांसमोर अनुत्तरीत आहे. पुढील विश्लेशण करणारी सुज्ञ माणसं (unknown त्यांस माझा सलाम) असली आणि त्यातुन बोध घेणारी सुशीक्षीत माणसं असली तरी ह्या स्पर्धेच्या जगात ही जीवनाची विस्कटलेली घडी आपण व्यवस्थीत करु शकतो ?

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.
जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
पण ईतर देशातील शिक्षण पद्धती भारतात का वापरली जात नाही ?
त्या देशातील ( पेहराव ,भाषा,संस्कृती, model,smart city,bulet train,ईतर ) अनावश्यक म्हणता नाही येणार पण शिक्षण पद्धती का नाही ?
नक्की विचार करा......
#नित#
                                                                                                                                 नितेश पाटील

Sunday, March 15, 2015

गुढीपाडवा......एक गाव एक उत्सव

सस्नेह जय शिवराय

  माझा पहिला लेख....भाग पहिला

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

        ज्या परंपरेतून,संस्कृतीतून आपल्याला जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं ती जागृत ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरा या अनाधिकाळापासून चालत आलेल्या आहेत. त्यांना ऐतिहासिक परंपरा आहेत. सध्या वाढती असुरक्षितता आणि सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा यामुळे माणूस स्वतःमध्ये गुंतला आहे. पण तो आपल्या संस्कृती, परंपरेशी आजही वेगळा झालेला नाही. आज समाजात लोकांचा सण, उत्सवांकडे कल वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही सण, उत्सवात सहभाग घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढतेय. 
          पण दुसरी बाजू अशीही आहे कि समाजात फोफावलेल्या राजकारणामुळे परिणामी उद्भवलेल्या वादामुळे सण,उत्सवही त्या त्या पक्षाचे होऊन राहिलेत. परिणामी ठराविक माणसं सोडली तर दर्शनाव्यतिरिक्तN तिथे कुणीही फिरकत नाही. आणि सुज्ञ माणसेही फक्त शिष्टाचार म्हणून त्यात आखडता सहभाग घेतात. सण, उत्सव साजरे जरी होत असले तरी पाहिजे तेवढा प्रतिसाद म्हणजे सर्व समावेशक असा मिळत नाही. हि वास्तुस्तिथी आहे.
         आमच्या गावातील हीच परिस्तिथी बदलण्यासाठी गावातील नवयुवक आणि नवयुवतींनी पुढाकार घेऊन "गुडीपाडवा धनसार एक गाव-एक उत्सव" हि संकल्पना साकार करण्याचे ठरवले. आणि सर्व समावेशक प्रतिसाद मिळवा यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. उत्सव हे मनाला आनंद , उभारी देणारे असतात. त्यामुळे ताणतणावाच्या निरसनासाठी मनस्वास्थासाठी अशा उत्सवांची अधिक गरज वाटू लागली आहे. पण ते निपक्षी आणि पारदर्शक असावं.
(क्रमश:)
नितेश पाटील (पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग दुसरा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

            मराठी महिन्यांतील चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून सुरू होणाऱ्या नववर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. असं सांगतात की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. तसेच प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तोच हा दिवस. त्या दिवशी सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या, तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.
        हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारले गेले आहेत. त्यामुळे ही चंद्र कालगणना आहे. ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. त्यामुळे ती सौर कालगणना आहे. हा दोन्ही कालगणनेत महत्वाचा फरक आहे. सहा ऋतू आणि बारा महिने त्यातील वसंत ऋतूच्या महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा.
           वसंतातील चैत्र महिन्यात जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळती, निष्पर्ण झालेले वृक्ष हे चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकीळ आपल्या कंठातून सु-स्वराने गात असते. निसर्गातल्या परिवर्तनाचे, नव चैतन्याचे, नव सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचं हा हि त्या मागचा एक उद्देश आहे.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग तिसरा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

            एक गाव एक उत्सव हि संकल्पना अतिशय सुंदर आणि साजेशी पण ती प्रत्यक्षात उतरवणं तेवढच शर्थीच काम. कारण त्यासाठी त्या उत्सवात संपूर्ण गावातील ग्रामास्थांनचा  सहभाग असनं अपेक्षित. आणि आताच्या राजकारणमय वातावरणामध्ये ते करणे म्हणजे ..? कारण दूषित वातावरणात श्वास गुदमरत असतो. त्यात संचार करणं सुज्ञ माणूस नेहमी टाळत असतो. आणि हल्ली ती अवकळा साऱ्याच ठिकाणी पसरली आहे. पूर्वी आमच गावं असं नव्हत. सर्व गुण्यागोविंदाने उत्सव साजरे करायचे पण आता गाव एक आणि दुखणं अनेक अशी गत झाली आहे . कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा मीपणा नकळत का होईना येऊ नये. शेवटी व्यक्तिमत्वाचा प्रभाव चांगला अथवा वाईट हा जनमानसात पडतच असतो. परिणामी दुरावा निर्माण होतो. लोकांनीही नजरेआड न करता पारदर्शकता जागृत करायला हवी.पाठीमागे बोलून कोणत्याही गोष्टी साध्य होत नसतात.
       आणि आम्ही साऱ्यांनीच ठरवलं होतं परदर्शकतेला प्रथम प्राधान्य. वारंवार चर्चासत्र घेऊन संपर्कात राहायचं.  गावातील तरुण पिढीनी ते सार्थ करण्याचं धाडस केलं. कारण गाव कितीही भावनिक दृष्ट्या दूषित झालं तरीही आमच्याच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये एक साम्य असते ते म्हणजे गावातील बहुतांशी ग्रामस्थ हे गावातील राजकारणाला म्हणा, त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला म्हणा,परस्परांतील वादाला म्हणा, कंटाळलेले असतात. त्यांना एका निपक्षीय वर्गाची गरज असते, परदर्शकतेची गरज असते.आणि दुसरं म्हणाल तर आजच्या नवीन पिढीला आपली मराठी संस्कृतीचं दर्शन घडवून देनं, आपली मराठी संस्कृती टिकवणं, गावाची एकात्मता वाढीस लावणे ह्यासाठी हे पाऊल मोलाचं ठरणार होतं.
                      आम्ही जसजशी गावातील ग्रामस्थांना आळीआळीमध्ये जाऊन हि संकल्पना सांगू लागलो तसतसा समोरून उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ लागला. आम्ही काही नियमावली तयार केली होती ती हि आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. अर्थातच भव्य शोभायात्रा काढायची म्हणजे खर्चिक बाब आलीच कि ! त्यातही सर्व ग्रामस्थांचा समावेश असावा , कुणीही काश्याप्रकारेही मदत करू शकणार होता. पैशांमार्फात , वस्तुंमार्फत पण तिथे एक अट होती कि कुणीही कितीही मोठी मदत ह्या शोभा यात्रेसाठी केली तरीही त्या व्यक्तीच नाव कुठेही घेतलं जाणार नाही. त्याचा "ग्रामस्थ धनसार" म्हणूनच उल्लेख केला जाईल. हा उत्सव साजरा करताना कुठचीही कमिटी नेमली जाणार नाही. जमा झालेली ऐवज आणि त्याचा जमाखर्च कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ घेऊन शिल्लक रकमेची विल्लेवाट लावण्यात येईल. ह्या अटी आम्ही ग्रामस्थांची सभा घेऊन सर्वसहमतीने मान्य केल्या. आता हा उत्सव आमचा नव्हता तर  गावातील सर्व ग्रामस्थांचा होता आणि त्याच्या शीर्षकावर शिक्कामोर्तब झालं.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग चौथा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

                                 || श्री भवानी माता प्रसन्न ||
                      धनसार एक गाव एक उत्सव
    आयोजक :- ग्रामस्थ धनसार
         युवा पिढीने नव्हे ग्रामस्थ धनासर ने आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ,नवीन पिढीच्या संस्कृती दर्शनासाठी , आपली संस्कृती जपण्यासाठी , गावातील एकात्मतेसाठी गुढीपाडवा भव्य शोभायात्रेने करण्याचे निच्छित झाले . आणि त्यामध्ये पारंपारिक पोशाख, लेझीम, पिरॅमिड चाही आवर्जून समावेश होता. त्याचा सराव एक महिना आधीपासून रोज सायंकाळी ६.०० वाजेपासून गावातील भवानी मातेच्या मंदिरात होऊ लागला .
         नववर्षाच्या आदल्या दिवशीच्या रात्री गावातील ग्रामस्थ उत्साहाने सुशोभिकरणासाठी मग्न झाले होते.विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व रस्ते रांगोळीने सुशोभीत करण्यात आले. जागोजागी कमानी उभारल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताक्यांचा साज चढवला गेला. आणि पाहता पाहता तो हि दिवस उजाडला ......
 चैत्र शु. प्रतिपदा शके १९३६ दि. ३१ मार्च २०१४ नुतन वर्षारंभ, नविन पहाट , नविन सकाळ .....सकाळी  ५.५० वाजता ग्रामस्थ मंदिरात पारंपारिक वस्त्रामध्ये जमा होऊ लागले. ढोल, टाशा, लेझीम, भगवे पेठे, भगवे झेंडे आणि सारं वातावरण प्रफुल्लीत, उत्साही, आनंदमय, भगवामय होऊन गेलं. मंदिरात गुढी उभारून तिचं ब्राम्हणाच्या हस्ते विधिवत पूजन करून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत सहभागी होणारी बैलगाडीही सज्ज झाली होती. तिलाहि संस्कृतीचा साज चढविला होता.आणि तिच्यावर साकारलेल्या चलचित्रात अभंगात तल्लीन झालेले संत तुकाराम हे खास आकर्षण मोहून टाकणारं होतं. पाहता पाहता गावातील बहुतांशी ग्रामस्थांनी ह्या शोभायात्रेची शोभा 
वाडवली .आणि शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा पूर्ण गावामध्ये मोठ्या उत्साहात फिरवन्यात आली.ढोल ताश्यांच्या गजरात (ढोल,ताशा वाजवणारे गावातीलच युवक होते) भवानी मातेकी जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या गजरात आसमंत दणाणून गेला.त्यात विशेषकरून महिलांचा पारंपारिक पेहराव, स्वप्नातील पऱ्या चिमुकल्या रुपाने पारंपरिक पेहरावात जणू खाली उतरल्या होत्या आणि लेझिम पिरॅमीड ह्यांनी शोभायात्रेची मजा आणखीन आकर्षक झाली.
            लेझीम नृत्यातून शिवसृष्टी साकारण्यात आली होती. त्यात शिवरायांच्या जीवनातील विविध पराक्रमाचे दृश्य दाखवण्यात आले होते. खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे बरेच प्रसंग. सरते शेवटी शोभायात्रा पुन्हा मंदिरात येऊन ती संपली असं जाहीर करण्यात आलं.तदनंतर त्याच पारंपरिक पेहरावात आम्ही एका दुचाकीवर एक युवक आणि एक युवती हातात भगवा ध्वज घेऊन सव्वीस जन धनसारहून पालघर , शिरगाव आणि पुन्हा धनसार अशी दुचाकीचीवरची मिरवणूक पार पाडली. खरोखरच तो उत्साह, जल्लोष भन्नाटच... नववर्षाचे स्वागत करावे तर असे. 
       सायंकाळी मंदिरात सत्यनारायणाची पूजा संपन्न करून कार्यक्रमाचा शेवट केला गेला. ह्यावरून माझ्या मते  एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपण जर निस्वार्थी मनाने कोणताही कार्य करण्यास हाती घेतलं तर परमेश्वरा बरोबरच आपल्या सानिध्यातील जनसमुदाय आपाल्या बरोबर राहत असतो.दरवर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आम्ही हा सण साजरा करतो आणि या पुढेही करत राहणार.आणि विशेष म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनीही या कार्यक्रमाची दखल घेतली होती.
एक गाव एक ऊत्सव
जल्लोष नववर्षाचा.....
मराठी अस्मीतेचा.....
हिंदु संस्कृतीचा.....
सण ऊत्साहाचा......
मराठी मनाचा....
(समाप्त)
नितेश पाटील(पालघर,धनसार)
Watch "Gudipadava dhansar 2015" on YouTube - Gudipadava dhansar 2015: https://youtu.be/N84QGzLiwj4
# नित #
                                              सण उत्साहाचा मराठी मनाचा 
                                                          नितेश पाटील (पालघर,धनसार)