Thursday, October 8, 2015

डोंगर यात्री - हरीशचंद्र गड


 सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
हरिशचंद्र गड पदभ्रमण trek    गिर्यारोहण                                                                   १/२/३.१०.२०१५

भिमा शंकर नंतर पुन्हा एकदा यावर्षीचा दुसरा ट्रेक.... 
डोंगरयात्री समुहाबरोबर हरीशचंद्र गड वाया पाचनई भटकंती करण्याचा योग आला....
दिनांक १ /२ /३.१०.१५   ग्रुप लीडर = वृंदावन करावडे(कुर्ला)
बाकी सर्वही होतेच ..सुजाताई, शुभांगीताई, अनिल भाई,  बंड्या भाई,परेश, एकूण २१ जण....
     भीमाशंकरचं वर्णन मी मागे केलेलंच आहे. निसर्गाच्या सानिध्यात पदभ्रमण करीत फिरण्यात वेगळीच मजा...हा मात्र ती अनुभवावी लागते.....तो आस्वाद घ्यावा लागतो....काॅंक्रेटच जग सोडून निसर्गाच्या जगात जावं लागतं.... गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिशचंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे...डोंगरयात्री समुहाचे आभार कि त्यांनी आम्हाला त्यांच्या समूहामध्ये सहभागी करून घेतलं ..आता आम्ही पालघर कर जरी असलो तरी आम्हाला वेगळपण वाटत नाही.ज्या प्रमाणे हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी ४\५ वाटा आहेत .पाचनाइ,साधले घाट,खिरेश्वर,बेलपाडा ,कोतुल,आणि नलीची वाट..... कुठूनही गेलं तरी थोद्याफार फरकाने गडावर पोहचता येते .त्याप्रमाणे मुंबईकर काय,पालघरकर काय किव्हा आणि काय शेवटी समूह महत्वाचा डोंगरयात्री ......
       गडाची ऊँची १४२४मीटर , म्हणजे ४६७१ फुट उंच .पायवाटेवरून जाताना जंगलातील हिरवी गर्द वनस्पती त्यांवर फुललेली रंगबेरंगी टवटवीत फुलं उंच झाडावरून आपलं अस्तित्व दाखवत असतात, तर काही फुलं गवतात लपलेली असतात. गडावर गेल्यानंतर हरिशचंद्राच्या मंदिरावरील अप्रतिम नक्षीकाम, केदारेश्वराच्या गुहेत थंड पाण्याने वेढलेले भव्य शिवलिंग तसेच अन्य गुहा, रौद्रभीषण कोकणकडा व तेथून दिसणारा सूर्यास्त पाहून हरखून जाणार दृष्य. रात्री आकाश निरीक्षणाचा वेगळाच आनंद , आकाशगंगा, ध्रुवतारा, सप्तर्षी यासह विविध तारकामंडले , थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी ,नाच, गाणी म्हणत सर्वांनी रात्र जागवने . दुसर्‍या दिवशी हरिशचंद्रगडावरूनच कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, जीवधन या गडांचे व माळशेज घाटाचे दर्शन (निसर्ग आपल्यावर मेहरबान असेल तर )घेत  गडावरून खाली उतरता  येत .या गडाच्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे, कातळ शिल्पे, खोल द-या, उरात धडकी भरविणारे उभे कडे, समृद्ध वनसंपदा, प्राचीन वास्तू कलेचे दर्शन घडविणारी देखणी मंदिरे, लेणी समूह. येथेच महायोगी चांगदेवांनी 'तत्त्वसार' या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली .असं ऐकण्यात आलं.मंदिर परिसरातील काही शिलालेख हि आहेत. सह्याद्रीत अनेक कोकणकडे आहेत, परंतु हरिशचंद्राचा हा थोरला कडा म्हणजे सृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्नच म्हणाव लागेल....!
  हरिशचंद्र गडाच म्हणाल तर 


निसर्गाने नटलेल्या गडावर खास करुन पावसाळ्यात पदभ्रमण करीत जाणे हा वेगळाच अणुभव. भीमाशंकर परतीच्या वेळी पुढची ट्रेक हरिशचंद्र गडाची असेल हे ठरलं होतं. तारीख मात्र निश्चित नव्हती..काही दिवसांनी ती हि निश्चित झाली . उत्सुकता होतीच, आणि ठरलेही होते दोन दिवसांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे गुरुवार दि. १.१०.२०१५ रात्री पालघरहून आम्ही ५ जन ८.४० च्या  शटलने  रवाना झालो.परेश,सुदेश,अजय,अंकुर तुषार,मी आम्ही
पालघरहून आणी विरेन आणि संदीप भाऊ दहाणुहून.... .११.३१ ला आम्ही दादर ला पोहचलो ..या वेळेस बसने टेम्पो (larvaler) जायायचे ठरले होते. बस काही वेळेवर आली नाही आम्ही अर्धा तास उशिरा जाऊनही. मग काय अनिल भाऊ भेटले ..जाऊन हॉटेल मध्ये नास्ता करायला बसलो तितक्यात वाजला फोन ..तो कधीही वाजू शकतो ...मुळात त्याच कामच ते आहे म्हणा. पण तो वाजल्यानंतर माणूस बाकी नेमकं तेच बोलेल याची शास्वती कुणीही देऊ शकत नाही.....बर बस पोहोचल्याची बातमी कळली आणि घाईघाईने खाऊन निघालो ते थेट बसपाशी..१२ वाजून गेले होते तरी काही मंडळी यायची बाकी होती,ती हि मुंबईची आम्ही पालघरहून पोहचलो होतो बरं .....सारे जमले आणि पुन्हा
यावेळेसही भुवया उंचावल्या ...मागच्या वेळेस आर्या (७ वर्ष )छोटी होती आता तिच्याहून लहान श्रेयांस ( वय ४ वर्ष )   ...बंड्यादाचा छोटा मुलगा ..आणि मोठा आर्यन ११ वर्ष श्रेयांस बद्दल निश्चितच बरच काही सांगत येईल तत्पूर्वी मुलांचं मन फुलपाखरांसारखं चंचल आणि रंगीबेरंगी असतं. आपण फुलपाखराला पकडायचा प्रयत्न केला तर सहजासहजी ते आपल्या हातात येत नाही,तसाच काहीसा तो .... तसंच मुलांना जर अतिशय
कडक पध्दतीने शिस्त लावायचा प्रयत्न केला तर ती मनाने पालकांपासून दूर होत जातात. परंतु
जर त्यांना खेळीमेळीने आणि त्यांना रुचेल अशा पध्दतीने म्हणजेच गोष्टींच्या आणि खेळांच्या
माध्यमातून शिकवले, तर हे संस्कार मुलांकडून लवकर आत्मसात केले जातात, मग हि मुल मुक्त अशा या
निरागस स्वातंत्र्याचा पुरेपुर अनुभव घेतात, स्वतःच्या कला जोपासतात, सामुहिक खेळांद्वारे इतर
मुलांशी मैत्रीचं निखळ नातं निर्माण करतात, मस्ती करतात, त्यांच्यात उपजत असलेल्या खेळकरपणाला आणि खोडकरपणाला अशा वेळी उधाणाच येतं, सुरवातीला अतिशय खोडकर असणारा मुलगा नंतर शांततेची गोडी चाखायला शिकतो, तर कधी अतिशय अंतर्मग्न राहणारा मुलगा शेवटी इतरांसारखाच दंगेखोर बनतो...असो आणि आम्ही एकूण १९ प्लस ३ चिल्ले पिल्ले असे २० जन  बसमध्ये बसलो  रात्री १२.३० वाजता  गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि निघालो...वाटेत आणखीन एकाची भर होऊन २१ जन झालो .प्रवीण हांडे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत पण शुभेच्छा देण्यासाठी ते आले होते...तद्नंतर मुंबई आग्रा महामार्गे थेट कसारा २ .४५ ला खाली उतरलो ते बाबा दा धाबा ...चहा नास्ता काहीजण जेवलेही इतक्या रात्री ते विशेष...सरता सरता वेळ कशी निघून गेली ते काही कळल नाही. ६.०० वाजले होते माझी साखरझोपेची वेळ... डुलकी येणं स्वाभाविकच ....तितक्यात बस थांबली...जाग आली तर थंड हवेने व्यापून टाकलेला परिसर मन मोहून टाकणारा झऱ्याचा आवाज, मधूनच येणारा रातकिड्यांचा किर्रर्र आवाज ...सुखावलो  पण बस थांबण्याच कारण अजयला बस लागली होती .बहुतेक रात्री घेतलेल्या चहामुळे असेल.....


पुढे ३० मिनिटाच्या प्रवासानंतर कळसुबाई कमान मागे टाकून  पुढे जाऊन पाचनई गडाच्या पायथ्याशी पोहचलो. हॉटेल हरी ओम पाशी बस ठेऊन शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत ...राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे.पाचनई ७० एक घरांच गाव आहे .नंतर ८.३० च्या ठोक्याला आमची  रिंगण बनवून ओळख परेड झाली.         वृंदावन करावडे (कुर्ला) दादानी मार्गदर्शन केलं ... सर्वाना सूचित करण्याची  तितकीच गरज भासली नाही .मार्ग सोपा होता आणि डोंगरयात्री ही बहुतांशी नेहमीचेच होते आम्ही तितके नवीन पण मागच्या महिन्यातच पदभ्रमण करून हि दुसरी वेळ म्हणून काहीसे रुळलेले  .तरीही येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये,चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.सर्वात महत्वाच म्हणजे कुणीही चुकीचं वर्तन करताना आढळल तर त्याला लागलीच मागे पाठवलं जाईल वैगरे ..


  पण पाऊस नव्हता म्हणजे चढताना दमछाक निघणार हे निश्चित होतं. ८.४५ ला चढण्यास सुरवात केली .या वेळेस मात्र पाण्यात भिजण्याची फार उत्सुकता होती .सारे जन एकत्रचगड चढण्याचे ठरले होते . उन आता वाढू लागलं होतं .त्यामुळे आणखीनच जीव कासावीस होत होता .कुठे एकदा पाणी मिळते
आणि मनमुराद त्यात चिंब होतो अशी काही साऱ्यांची मानसिकता झाली होती.पाचनई गावातून थोडे वर चढून आले की डोंगराची घळ नजरेत भरते. घळीला  वळसा घालुन पुढे जावे लागते. त्यातच चढण चढताना अंगावर येणा-या उंच कड्याच्या अजस्र कपारीत खडकांचा दोन थरांच्या मध्ये लाल हिरवी
राख सापडते. . यालाच भौगोलिक भाषेत 'रेड बोल' म्हणतात. ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकामुळे भूपृष्ठाला तडे गेले. मोठमोठ्या भेगा पडल्या. भ्रंश झाले. त्यानंतर या दख्खनच्या पठारावर पर्वत, पठारे, टेकड्या तयार झाल्या. त्यातूनच निसर्ग नावाच्या शिल्पकाराने असंख्य शिल्पे निर्माण केली.त्याचा आस्वाद घेत पुढे जात होतो .
    गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर विस्तिर्ण, सपाट, घनदाट सदरहित झाडांनी वाढलेली तीन शिखरे येथे आहेत. पैकी एक शिखर तारामातीच्या पोटाशी आहे. नऊ ब्राम्हणी लेणी आणि इतर दोन शिखरांना हरिश्चंद्र, रोहिदास नावाने ओळखले जाते. हेमाडपंथी बांधणीच्या सप्ततीर्थात असलेल्या मंदिरामध्ये चौदा विष्णुमूर्ती, पश्चिमेकडून मंगळगंगेचा वाहणारा प्रवाह आणि त्यालगतचा सुमारे आठव्या शतकातील प्राचीन शिवमंदिर आहे. येथील निसर्गसुंदर शिवस्थाने, गुंफा प्रेक्षणीय आहेत (गुगल)
    तितक्यात अर्धी चढण पार केल्यावर मंगळगंगा दृष्टीस पडली .१०.१५ वाजले होते. पाऊस नसल्याने त्याचा  वेग कमी होता. पण काचेसमान नितळ पाणी आणि त्यावर तरळणारे तरंग  ते पाहून मनात उठणाऱ्या अगणित लाटा, मन मोहून टाकणारं दृश्य ,थंडगार पाणी , मेजवानीच ....सारे तुटून पडले
.कुणालाही भिजण्याचा मोह आवरता आला नाही. वरून हवे त्या प्रकारचे प्रेक्षक बघण्यासाठी हजर होते. ट्रेकची हीच खासियत असावी .पण काहीही म्हणा (काहीही श्री आता जुनं झालं ) प्रत्येक ट्रेक चा अनुभव वेगळाच असतो . अर्धा पाऊन तास मनसोक्त भिजण्याचा आनंद घेवून पुढे निघालो.... अखेर १२ वाजता आम्ही वर पोहचलो. रातकिड्यांचा आवाज रात्री येण स्वभाविक आहे . पण दिवसा भर दुपारी किर्रर्र आवाजाने त्यांनी आसमंत दनाणून सोडला होता. हाही अनुभव मी पहिल्यांदाच घेत होतो .
       हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा
आहे. तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून
वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत आम्हीही त्यातीलच एका गुहेत राहिलो होतो. तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. ती काही पाहता आली नाही .या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे.
   
         मंदिराच्या पूर्वेला प्रशस्त तीर्थ कुंड आहे .२५ फुट खोल.. तीर्थकुंडात डिसेंबर अखेरपर्यंत पाणी असते. कुंडांच्या दक्षिणेला १४ देवळयांमध्ये १४ विष्णुमूर्ती विराजमान होत्या. त्यातील आता दोनच आहेत .देवालयाची व या बांधीव तीर्थकुंडाची मोठी पडझड झाली आहे  येथील काही विष्णुमूर्ती गायब झाल्या तर उर्वरित विष्णुमूर्ती मंदिरामागील गुहेत अस्ताव्यस्त पडल्या आहेत. तीर्थकुंडासमोर एक छोटेखानी मंदिर असून, काशीतीर्थ नावाने ते ओळखले जाते असं गावकऱ्यांच म्हणनं आहे.
      मुक्कामी तर पोहचलो होतो .वर येवून पूर्ण थकवाही निघून गेला होता. गुहेत सॅग व्यवस्थित ठेऊन ठरल्याप्रमाणे काहीजण रात्रीची जेवणाची सोय करण्यासाठी सरपाण आणायल काहीजण .......आणि आम्हीही कोकण कड्याकडे टोप आणण्यासाठी निघालो. अनिल,सुदेश,अजय,अशितोष,गौतमी आणि मी आम्हाला कुणालाही रस्ता माहीत नव्हता ...टेकडीवर चढुन खाली उतरलं की जवळ जवळ सरळच रस्ता आहे.२० ते २५ मिनिटं लागतात.तिथे भास्कराना आम्हास भेटून स्वयंपाकासाठी लागणारी टोप घ्यायची होती. भास्कर (मो.नं.०८३०८०८१९३९) म्हणजे तिथले स्थानिक . खाली पाचनईला त्याचं घर आहे आणि गडावरही आहे कोकण कड्यापाशी..
                                                             काय ते दृश्य पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरलेला
कोकणकडा निसर्गरम्य आहे. या कड्याची मुंबईच्या पर्यटकांनी १९८५ साली १ वर्ष ३ महिने अथक परिश्रम करून चढाई केली होती. इथे हिरव्यागार रंगाच्या छटा सर्वत्र दिसतात. आमच्या नशिबात मात्र ती मोकळी दरी पाहण्याचा योग नव्हता ...त्या दरीतून ढग च्या ढग वर येताना दृष्टीस पडत होते.धुकं म्हणता येणार नाही ढगच ते ....त्यांचं  साम्राज्य चाहुपाजुला पसरले
होते त्या शीतल मखमली चादरीने अंगावर काटे उभे राहत होते. मन प्रसन्न होते. ते  निसर्गाचे रौद्र पण सुंदर रूप पाहून मन मोहून जात. पश्चिमेकडून (दरीतून) वारा आला तर कड्याखाली टाकलेले कोणतीही वस्तू (उदा. टोपी, रुमाल,पाने फुले ) पुन्हा तेवढ्याच वेगाने दरीतून वर येते. झाडाची छोटी फांदी जरी वर आli तरी अनिल भाऊंनी खाली टाकलेला रुमाल मात्र वर आला नाही . म्हणतात ना शेवटी नशीब.....तेथून आम्ही पुन्हा खाली गुहेकडे परतलो. येताना सरपण हि आणलं .बाकीच्या मंडळीनीही लाकडाची सोय केली होती....तद्नंतर फ्रेश होऊन सर्वांनी आपापले बरोबर आणलेलं जेवण शेअर करून भरपेट झणझणीत जेवलो...कोलंबी,पापलेट,चिकन,ठेचा, पोळी, पुरी,पुलाव,चटणी,काय काय सांगावं आता अगदी पंच पक्वानाचा योग ....पंचतारांकित उपहारगृहाच जणू....हे मस्त असतं ना जितकी माणसं जास्त तितका मेनु जबरदस्त ..काहीही खा ते हि विनामुल्य ...नाही का ? काही वेळ विश्रांती णी मग वृंदा दा ,अनिल भौ ,गौतमी ने फक्कड चहा बनवला होता तो हि चुलीवर ..आहाहाहाहा लाजवाब....ती चुस्की घेतली नी निघालो कोकण कड्यापाशी पुन्हा.........
..आहाहाहा.....सह्याद्री म्हणजे काय याची कल्पना कोकणकडा पहिले की येते...!!!
     

पुन्हा कोकण कड्यावर जाण्यासाठी सारेजण निघालो .वृंदा दादा आणी काहीजण गुहेतच थांबले .वर जिथे जेवणाची सोय होती तिथे काही बैल ,गाई चारत होत्या...त्यातला एक चक्क माझ्या मागे लागला ना ...मी काही त्याला छेडल नव्हत तरीही ....फक्त १००च्या नोट(माझा मोबाईल) ने क्लिक मारत होतो ....पण मला वाटत त्याच्याही मनात आलं असेल.....

बहुतेक नोटीवर भुलन्या इतके आम्ही तरी नेभळट नाहीत...म्हणून मागे लागला असेल ...पुढे काही दिसत तर नव्हतच...त्यातच पुसटसे क्लिक मारले तितक्यात  जल हि तुषार बिंदू रूपाने अंगावर ओघळू लागले होते ....त्याच्या कवेत गुरफटन्याआधी तेथून आम्ही काढता पाय घेतला तो थेट गुहेपाशी...               
आता वेळ होती पंचतारांकित पाथीकाश्रमाच्या आवारात(गुहेच्या)जेवण बनविण्याची ...बाजूलाच हलकेच शीतल तितकंच नितळ झर्याचं पाणी संथ गतीने अलगद पडत होतं. चूल हि मांडून झाली ,सरपणहि तयार होते.माशालीही सज्ज झाल्या होत्या .menuहि तयार होता .अंडाकdi ,भात ,वरण....मदत करणारे आम्ही सारेच होतो पण आचारी म्हणाल तर चविष्ट, रुचकर आणि पोषक झणझणीत तीखट हि म्हणू शकता तुम्ही भोजन बनवण्याची कला शास्त्र पारंगत असलेला मुळचा उनभाटचा वाशीत राहणारा आचारी आशितोष...... जेवण झणझणीतच होतं. झकास.....जेवणाच्या आधी आणि नंतरही गाण्याची सुरेल
मैफिल सजली.... भेंडयांच्या सुरेल शाब्दिक तरंगाणी गुहेलाही पाझर फुटला असेल...इतकी मैफिल रंगत दार झाली .सारे जन झोपी गेले .रात्री गुहेत अंधारच होता  कारण दिवा विझवला होता.अचानक एक जन ओरडला ...पुन्हा भयाण शांतता ...तितक्यात परेश जोरात किंचाळला लागलीच चिंटू हि किंचाळला ..सारेजण एकाच दिशेने आवक झाले.काय झालं ते मात्र कुणालाच कळल नाही. अखेर दिवे लावले आणि निवांत झोपलो......            सकाळी सारे जरा उशीरच उठले ...शरीर शुद्धी
चहा नास्ता,फोडणीचा भात,मुगाची उसळ यातच बरासचा वेळ निघून गेला त्यातच आमची गप्पांची मैफिल जमली होती...मी, सुदेश, अनिल भाऊ,आशितोष,अंकुर,संदीप भाऊ संदीप भाऊंच म्हणाल तर एक अवलियाच ...त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात वेगळीच मजा...एकदम नेमकं आणि मुद्देसूद बोलणार व्यक्तिमत्व...असो  समोरील दृश्य म्हणाल तर अवर्णनीय होत समोर हरिशचंद्रेश्वराच मंदिर .त्यावर उगवलेली पिवळी सोनकीची फुलं...मंदिराला निसर्गाने केलेली अवर्णनीय
सजावटच जणू ....मंदिराच्या मागच्या बाजूस घळीमध्ये मेघ जसे साठवून ठेवले होते....तो निसर्गही त्यांना आकाशी पाठवण्यास उत्सुक नव्हता .... पूर्ण परिसरात जागोजागी तंबू आणि मानसी रिंगण दिसत होते ...सारेजण ती निसर्गाची मुक्त उधळण डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते.....         उशिरा उठल्यामुळे  तारामती वर काही जाता आलं नाही. वेळे अभावी ठरलं कि आता पाचनई च्या दिशेने प्रयाण करायचं तदपुर्वी ठरलं कि मुंबईकर कोकण  कड्याच्या दिशेने गेले आणि ते येईपर्यंत आम्ही पालाघरकर केदारेश्वराच्या मंदिरात.... हरिशचंद्रा पासून खाली
गेले की केदारेश्वरचे गुहेत अर्धा पुरुष उंचीचे अप्रतिम शिव लिंग आहें .पिंडी भोवती कमरे इतके पाणी आहें . हे पाणी इतके थंड आहें की त्यात हात ही घालू शकत नाही पण आम्ही आंघोळ केली आणि त्या थंड पाण्याचा मनमुराद आनंद लुटला.. आम्ही सर्वांनी पिंडीभोवती प्रदक्षिणा मारल्या...या ठिकाणी असलेले चार खांब हे चार युगांचे प्रतिक मानले जातात व त्यातले तीन खांब कोसळले आहेत.एक तेवढा शेष आहे....शंभराची नोट होतीच ..क्लिकही भरपूर मारले ... 
  
तदनंतर आही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि पुन्हा तीर्थ कुंडात मनसोक्त पोहलो...तितक्यात कोकण कड्यावरून बाकीचेही खाली उतरून आले होते.काही वेळ अंघोळ करून आम्ही पाचनई च्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालो. मुंबईकर तेवढे केदारेश्वraचे दर्शन घेण्यासाठी खाली गेले. अवघड वाटा,जंगल, कड़े कपारी, पायाखाली तुडवित खाली पुन्हा मंगळगंगेत पोहण्याचा आनंद लुटत होतो. पाण्यात दिसणारी प्रतीमा याचं तर शब्दात वर्णन अशक्य. स्वतः ला विसरायला लावण्याचं कसब त्या
परिसरात नक्कीच आहे. ...बराच वेळ निघून गेला तरी बाकीचे काही खाली उतरले नव्हते ...एवडा वेळ का लागला असेल या विचारात आम्ही होतोच ....मनात पाल चुकचुकत होती....मागे महिला आणी मुलांची संख्या जास्त होती...तितक्यात वृंदा द, सुजा  ताई आणि आर्या नजरेस पडले  ...मग आम्हीही पुढे निघालो.....तितक्यात खालून वर चढताना एक ४० शितील असतील विकलांग अनवाणी गृहस्त दिसले त्यांना पाहून आपल्या मिरवण्याची लाज वाटू लागली ....मनातच त्यांच्या जिद्दीला सलाम केला..पुढच्या घळीजवळ वृंदा द विचारलं कि का विचारलं म्हणून तर माहित पडल कि शुभांगी ताई यावेळेसही पडल्या ,नुसत्या पडल्या नाहीत तर पडून उठण्यासाठी त्यानी तीन गुलात्या मारल्या होत्या ....डोक्याला जबर मार बसला होता ..रक्ताने डोकं भिजून गेल होत.आर्या हि त्याच्याबरोबर पडली होती परमेश्वर कृपेने ती सुखरूप होती....पण आईची अवस्था पाहून ती ओक्साबोक्सी रडत होती ....तिला सावरताना निश्चितच सर्वांची दमछाक निघाली असेल.तो अनुभव आम्हाला भीमाशंकरला अशा समूहात  अनेक जन समाजातून निरनिराळ्या ठिकानाहून येत असले तरी समूहात एकतेची  भावना निर्माण झालेली असते , कुठच्याही परिस्तिथीला एक दिलाने समोर जाण्याची ताकत त्या समूहामध्ये असते, डोंगरयात्री हि एक परिवाराच आहे.... त्यात काही वाद नाही...आम्हीही त्याचा हिस्सा झालो आमचे भाग्यच....आला होता....म्हणून त्यांcha तिथे वेळ गेला होता....सारे काहीसे नैराश्य मुद्रेने खाली उतरलो.....आर्याचाही
चेहरा पडला होता... नंतर सारं काही सुरळीत झालं म्हणा... हीच तर ताकत असते एका कर्तव्य दक्ष समूहाची,
       खाली २.००च्या आसपास खाली उतरलो....जेवणाची सोय भास्कारांच्या घरी होती ....ज्वारीची भाकरी,पिठलं.भात, वरण, लोणचं.... मस्त पैकी जेवलो तितक्यात डोक्याला पट्टा बांधून शहेनशहा च आगमन हि झालं होतं ....म्हणजे आपल्या शुभांगी ताई....!! तश्या एकदम फिट होत्या... अनुभवी ट्रेकर्स त्या...एकदम बिन्दास्त......ते सारे जेऊन येईपर्यंत आम्ही गाडीपाशी झाडाखाली बसलो मग काय...? पुन्हा गप्पांची मैफिल पालघरकर .डहाणूकर ,मुंबईकर.....अजय ने हि रानात जाऊन रान आवळे आणले होत ते खट मस्त गप्पा मारल्या..आणि बसलो बसमधे....ट्रेक यशस्वीरीत्या संपन्न झाला होता .आता परतीचा प्रवास.......
पण मनात मात्र असंख्य विचार येत होते आज आपल्याकडे असंख्य सोयी सुविधा आहेत तरीही हे रस्ते ओलांडताना ते किती खडतर आहेत याचा  मात्र पावलो पावली अनुभव येत होता .या महाराष्ट्रावर परकियानी कसे काय राज्य केले? इथल्या  जंगलात ते हरवले कसे नाहीत ? इथले दगड धोंडे त्याना कधीच आडवे गेले नाहीत काय? कड़े  कपारयात पडून त्यांचा कपाळमोक्ष कसा नाही झाला ? लेखन्या मोड़ा आणि बंदुका हाती घ्या असे संगनारे इथे जन्मले तरी हा देश पारतंत्र्यात कसा गेला? राकट देशा कणखर देशा दगडां च्याही  देशा म्हणनारे आहेत .पण ते टिकवता का नाही आले ..? छत्रपती शिवरायांनी त्यांच्या निष्ठावंत मावळ्यांनी जे स्वराज्य घडविले ते का टिकवता आले नाही ? का आपलीच माणसं आपल्या माणसाचे पाय ओढत असतील ...? का आपलीच माणसं आपल्या माणसांवर राज्य करत असतील ?  ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांनी डोकं वर्तुळाकार सैरवैर फिरत राहत...असो मी माझ्या परीने निश्चितच काहीतरी प्रामाणिक पाऊल टाकण्याचा नव्हे तर ते स्वराज्य टिकवण्याच प्रयत्न केला पाहिजे ......बाकी श्रींची इच्छा ...या कलयुगात इथे जान्हवीचा श्रीही म्हणायला कमी करणार नाहीत म्हणा...कस आहे ना ...तमोगुणी माणसाची संख्या वाढली कि चांगल्या माणसांना त्रास होणार हे निश्चित ......असो
       पण एक आहे जर तुम्ही सह्याद्री वेडे आहात . तर पाउस म्हणजे काय हे वेगळ्या शब्दात काही सांगायला नको . कारण पाऊस आणि सह्याद्री म्हणजे विहिंगमय मनवेडं रूप....ते अनुभवायला पावसात सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात भटकावं लागतं....ते वेड मला लागायला हवं .....इतकच म्हणेन मी........  डोंगरयात्री समूहाचे आभार.....
                                           जय शिवराय .......
भीमाशंकर-डोंगरयात्री
https://www.blogger.com/blogger.g?blogID=8521127886953468435#editor/target=post;postID=7558874240672262141;onPublishedMenu=allposts;onClosedMenu=allposts;postNum=8;src=postname

        @ नित
                                                                                                  नितेश पाटील 
                                                                                                 ९६३७१३८०३१
                                                                                                GOOGLE :- niteshpatil715

Wednesday, September 30, 2015

कप्प्यांची जीन्स....

पुर्वी शाळेत असताना माझा गणवेश एकच .......त्यामुळे तोच दररोज घालणं दुसरा विकल्प नाही...तोही झिझला होता त्यालाही कप्पे मारले होते जसे माझ्या आंतरमनाला मारले होते.आता तो शब्द आहे बघा काॅम्प्रमाईझ....आपल्याच मनानी आपल्याच मनाशी केलेलं काॅम्प्रमाईझ....पण समाजात कावळ्यासारखी काही लोकं असतात...त्याना चांगलं जनावर आवडत नसतं...त्याना टिचार टाचार पडलेल्या जनावरांची फार आवड...... म्हणजे हे चोच टाकायला मोकळे....असो.... ते गणवेशाला मारलेले कप्पे पाहून  काही मुलं हसत,हिनवतही होती ....त्यांच्या दृष्टिने ती मस्करी असेलही....रुपयांचा माज म्हणता येणार नाही कदाचीत तितके संस्कारही नसतील...समजही नसेल...
पण पाचवी ते नववीची मुलं ईतकी नासमझ तर नक्कीच नसतील...आमची परीस्तीथीच बेताची तर आम्ही काय करणार.....पण हे त्यानाही कसं कळनार ना.......तुम्हाला एकदा सवय झाली ना की जमतं सारं काही...कुठल्याही बाबतीत....सहण करत रहायचं....परमेश्वर तेच दिवस ठेवत नसतो...... जे डिचवत होते त्यांचीही परीस्तिथी आज काही ठीक नाही....काही व्यसनाधीन होऊन भटकतायेत .....तर कोणि हयात नाहीये....असो सांगायचं काय तर आज आपण समाजात पहातोय...नवतरुण मुलांच्या जीन्सना कप्पेच कप्पे....मधेच त्या फाटलेल्याही असतात ......आता काय तर म्हणे ती फॅशन.....मुलींनाही त्यातुन मोह आवरता येत नाही....जमान्याबरोबर चालनंही गरजेचं आहेच म्हणा...
बरं त्यांच्या किमतीही काही कमी नाहीत.....
पुर्वी रुपये नव्हते म्हणून गरीबीमुळे फाटके कपडे घालायची वेळ यायची....आज रुपये आहेत म्हणुन आणि फॅशन म्हणून फाटके कपडे घालतात.....
शेवटी कोणी कसले कपडे घालावेत हा जरी ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी गरीबाना त्या बाबतीत हिनवू नये......हिनवत नसतलही पण काही टगे असतात...हे ही नाकारता येणार नाही... आजही गरीबी कमी झालय असं मला वाटत नाही....आजही काही मुलांची तीच परीस्तिथी आहे जी कधीकाळी माझीही होती.....आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या युगात आपण कुणाला कोणाशी कसं वागावं हे सांगु शकत नाही.....ते ज्याच त्याला कळायला हवं.....शेवटी तुम्ही जे पेरालं तेच ऊगवतं हे लक्षात असलं पाहीजे...ते जमिनीवर अवलंबून असतं.....किती दिवसात बाहेर येतं ते.....आपण नेमकं ते लक्षात ठेवत नाही आणि बोंबलत सुटतो....पिढी बिघडली...पिढी बिघडली....अरे पण पिढी बिघडुू नये म्हणून आपलंही काही कर्तव्य आहेच की....मुलं मोठ्यांच अणुकरन करत असतात.....त्यानी चुकीचं काही केलं तरी आपण त्यांच कौतुक करत असतो......लहान मुलांच बघा तुम्ही....बाकी काही नाही जमलं तरी त्याना माणसानी माणसाशी माणसा सारखं वागावं... ईतकं शिकवल तरी पुरे.....
बाकी म्हंटलयच.....
जगीं जीवनाचे सार
घ्यावे जाणूनि सत्वर ।
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ‘इश्वर’ ।।

........नितेश पाटील

Thursday, September 3, 2015

देव भेटतो का...?

........नितेश पाटील.....

माणसात जरी परमेश्वर असला...
तरी तो मिळणे सोपं नसते...
आता हेच बघा ना सारे ग्रंथ, वेद, पुराणांच म्हणनं आहे परमेश्वर आपल्यात आहे आणि आपण त्याला शोधतो कुठे ? देव्हारयात,मंदिरात. हे काही साधन नसेल तर वर बधुन...
विषेश म्हणजे आपण आपलच समाधान करत असतो....देव पुजला म्हणुन..पण मी निच्छीत सांगु शकतो...देव देव्हारयात मिळत नसतो.. गाईच्या कासेत असनारया गोचिडाला जशी दुधाची चव नसते त्यातला हा प्रकार.... आपल्या आचरणामधे ताकत असते त्याला मिळवण्याची,आपल्यात जागृत करण्याची....आज देव लोकांनी कुठेही बसवला...देवाच्या नावावर आपला स्वार्थ साधु लागला माणुस...काहि ठिकाणि इतक्या  घाणेरड्या जागेत असतो कि किव येते.आणि ते पाहुन आपण माणुस आहोत ह्याची लाज वाटायला लागते.....पण सर्व ठायी परमेश्वर असतो हे आठवल की मन खिन्न होउन जाते...आठवत ते गीत...कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी काशी, ह्रुदयातील भगवंत राहीला.. ह्रुदयात ऊपाशी...मी देवाला मनातच पुजलं पाहिजे अन्यत्र नाही.माझं इतरांप्रती आचरण चांगल असलं पाहिजे.खर सांगायच तर ...आज तुम्हि बघाल तर अब्जावधी रुपयाच्या प्राॅपट्या ह्या मंदिरांच्या,संस्थानाच्या नावे...त्याचा समाजाला फायदा काय? असेलही पण तो किती प्रमाणात ? आणि सामान्य माणुस मात्र अंधश्रद्धेपोटी आपल्या कमाईतला काही भाग (रुपये) देव देव करत यांना दान करतो(दिलाच पाहिजे पण तो गरजुना..देवाला काय गरज?)...अपेक्षा सुखाची ..मिळतं काय ? ...मृगजळ ते त्याच्या मागे लागून ते मिळनार आहे का....नाही ...माणुस म्हणुन जगल म्हणजे सार काही साध्य होते.माणसाची साधी व्याख्या आहे...दुसरयाचा आत्मा न दुखवनं त्याला जाणनं म्हणजे माणुस....बस
हे जर आपण केलं तर परमेश्वराची ताकत नाही आपल्याला दुखी ठेवायची... शेवटी जैसे ज्याचे कर्म...हा माझा अनुभव आहे..

........नितेश पाटील......
         ३.९.२०१५

Thursday, August 27, 2015

भिमाशंकर - डोंगरयात्री

 सस्नेह जय शिवराय                                                                               नितेश पाटील  ९६३७१३८०३१
भिमाशंकर पदभ्रमण trek                                                                       २१/२२/२३.०८.२०१५
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’.निसर्ग सौंदर्याने नटलेलं...
सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले . . निसर्गातील डोंगराच्या जाळ्यात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच डोंगरयात्री ग्रुप मुंबई च्या सहयोगाने योग आला त्या विषयी......

निसर्गाने नटलेल्या महाकाय अश्या अरण्यातुन खास करुन पावसाळ्यात पदभ्रमण करीत जाणे हा वेगळाच अणुभव. चहुबाजुनी जर्द झाडांची दाटी,पक्षांचा तो सुमघुर आवाज, झाडांच्या पाणांचा सळसळनारा आवाज,झाडांवर पडनारया पावसाचा आवाज,मघुनच अदृष्य झर्याचा आवाज, उत्सुकता होतीच, आणि ठरलेही होते दोन दिवसांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. २१.०८.२०१५ रात्री पालघरहून आम्ही ५ जन ९.२० च्या  विरार लोकलने रवाना झालो.आम्ही सारे नविन होतो परेश तितका त्या समुहाबरोबर भ्रमंती साठी जात असे.विरार वरुन १०.०८ च्या लोकलने आम्ही दादरला गेलो दादर हुन ११.३१ च्या छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकलने तिथे पोहचलो.समुहातील काहीजन (एकुण१७)छत्रपती शिवाजी टर्मीनलाच जमले होते.काही पुढच्या स्थानकावरुन बसनार होते आम्हाला १२.३० शेवटच्या कर्जत लोकलने जायचे होते.
आम्ही टकळत लोकलची वाट बघत होतो तितक्यात एक २५शीतील नवतरुण जोडपं आमच्याजवळ येऊन ऊभं राहीलं आता माणसाचा स्वभाव कसा हे सांगायची गरज नाही.अन् मधेच एकजन बरळला की  एक आली तिही प्रोटक्शन घेऊन .तो त्या व्यक्तीचा दोष नाहीये.कस असतं ना आपण छान स्वयंपाक बनवला आणि त्यात जर मिठच नसेल तर त्या जेवनाला काही चव असेल का ? तुम्ही फक्त मिठ खाऊ शकत नाही, पण ते चवीसाठी हव असतं त्यातलाच हा प्रकार.असो.......
लोकल येताच आम्ही लगबगीने बसलो लोकल चालु होताच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि निघालो
लोकलमधे आम्हाला सोडायला आलेली ४०शीतील एक व्यक्ती ( प्रशांत म्हात्रे)आमचं तोंड गोड करण्यासाठी चक्क काजुकतरी घेऊन आलेले. आम्हा सर्वाना प्रवासासाठी शुभेच्छा देऊन ते दादरला उतरले. चर्चासत्रात तिन कसे वाजले कळले नाही.आणि पहाटे ३ वाजता कर्जतला लोकल येऊन पोहचली.सारे जण ऊतरलो पाहता पाहता ४१जणाचां समुह तयार झाला.विषेश म्हणजे आमच्यात ७ वर्षाची चिमुकली आर्या होती. मनात विचार आला ही ईवलासी चिमुकली कशी बरं चढनार? हिच्या आईबाबानी का बरं आणलं असावं हिला? मुसळधार पाऊस चालु होता. मनात शंका आली ३४४५ फुट हया महाकाय अभयारण्यातुन पावसात कसं जाता येईल.पण डोंगरयात्री समुहातील जुनेजानते फार खुष होते. कारण त्याना माहीत होतं भिमाशंकर पदभ्रमण करीत गाठायचा असेल तर  असेल तर पावसाशिवाय त्रासदायकच.चढताना मलाही तोच अणुभव आला.
काही वेळ तिथेच रेल्वेस्थानकावर रेंगाळत राहीलो नंतर स्थानकाबाहेर निघतो तोच ४०७ टेम्पो आमच्या स्वागतासाठी सज्ज होता. मग काय! बॅगा टाकल्या वर अण् बसलो सारेजण रात्रभर जागल्यामुळे डोळे थकले होते.खांडस गावात कधी पोहचलो ते ही कळलं नाही.एक ते दिड तास लागला असेल कर्जत ते खांडस ४० किलोमिटर अंतर आहे. नंतर आम्ही भिमाशंकरच्या पायथ्याशी खांडस गावात पोहचलो.तेव्हा पाऊस थांबला होता.
आम्ही सकाळ होईपर्यंत विसाव्यासाठी मारुतीच्या मंदिरात थाबलो. हे मारुतीरावांच एक बरं आहे तुम्हाला क्वचीत असं गाव सापडेल जीथे ह्यांच मंदिर नसेल.सर्वांनी आपापली सोय करून माना टाकल्या .झोप येण तितकं सोपं नव्हत कारण  झोप लागते ना लागते तोच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला पण आवाजात भिन्नता होती .काही वेळाने कळल कि हे आपल्यातलेच महाभाग आहेत ते घोरत होते सर्वांची टोन अलग अलग .आता ते नैसर्गिक आहे त्याला काय करणार .पण झोपमोड झाली हे मात्र खर. सकाळच्या प्रहरी पाऊस मात्र पुन्हा नाचु लागला होता. काही वेळाने मात्र त्यानेही आटपतं घेतलं. आणि बाहेर पडलो तोच समोर धुक्यात आपला चेहरा लपवून ठेवलेला महाकाय पर्वत दृस्तीस पडला. हिरवा गालीछा अंथरलेला,पांढरया शुभ्र झरयानी मडलेला,ढगांच पांघरुन घेतलेला. भिमाशंकर पर्वत.
शरीर शुद्धी आणि चहाची चुस्की घेऊन निघण्याच्या तयारीत होतो. समोरच
निसर्गरम्य दृश्य ,डोंगरावरून वाहणारे ते झरे .तितक्यात एकाने सेल्फी स्टिक काढली हल्ली ती एक फॅशनच झालय एकाणे तर त्याबाबतीत कळसच केला होता मृतदेहाला स्मशानात नेत असताना एका हातात मृतदेह एका हाताने सेल्फी काढून पाठवलेली .काय म्हणव आता ...असो तर हे भाई सकाळ सकाळ त्या सेल्फी स्टिक ने सेल्फी काडण्याच्या तयारीत आणि मोबाईल निसटला ना त्यातून  ! मग काय फुटला डिस्प्ले .झालं दिवसाची सुरवात हि अशी ..नंतर ७ च्या ठोक्याला आम्हची रिंगण बनवून ओळख परेड झाली.
वृंदावन करावडे (कुर्ला) दादानी मार्गदर्शन केलं .त्यांच्याबद्दल सांगाव तर हि भीमाशंकर पहाडावर चाडण्याची त्यांची १५० वी वेळ . मला वाटतं यातच सार काही आलं . आणि आम्ही त्यांच्याबरोबर पदभ्रमण करत वर जाणे म्हणजे आमचं भाग्यच . रूट लीडर साठी निलेश ठाकूर (बंड्या)आणि शेवटचे स्वयंसेवक (LV) प्रविण हांडे आणि मधल्या स्वयंसेवकासाठी अनिल आगाव ,अनिकेत कोळंबे, परेश राऊत ( स्वामी),आणि महिलांच्या लीडर होत्या सुजा ताई  त्याचं म्हणाल तर सर्वात जुन्या (१९ वर्षे) ट्रेकर. त्यांचही कौतुक कराव तितकं कमीच आहे. सर्वाना सूचित करण्यात आलं कि येथील किंवा अन्य कोणत्याही जंगलात काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत. मोठ्या आवाजात बोलू नये,चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत, बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.सर्वात महत्वाच म्हणजे कुणीही चुकीचं वर्तन करताना आढळल तर त्याला लागलीच बसने खाली पाठवण्यात येईल..........

   आम्ही काहीजणअगदीच नवखे होते पण तसं मरगळलेल कुणी दिसलं नाही सर्वांचा उत्साह शिगेला होता
वर चडन्यास सुरवात केली आम्ही पालाघरकर मात्र वर चढतानाही आणि उतरतानाही रूट लीडर सोबत पुढेच होतो खांडस गावातून पुलापर्यंत पोहोचण्यास १५ -२० मिनिटे लागली. पुलाजवळ पोहोचाल्य्वर उजवीकडे जो रस्ता जातो तो गणेश घाट नि आम्ही सरळ शिडी घाटाच्या रस्त्याने निघालो .शिडी घाटाच्या सुरुवातीस एक मोठी विहीर लागते तिथून उजविकडे पाहिले की सुंदर लोभनिय असा पदरगड़ दृस्टिस पडतो
विहीर ओलांडली नि पावसाची रिपरिप थोडी वाढली . काही जण पावसाळी चिलखते घालून होते. मीही त्यांच्यातील एक.जुने ट्रैकर मात्र पावसाचा आनंद लुटत होते. थोडीशी चढण पार केल्यावर एक ओढा लागतो. जुलैला एवढा पाऊस नसून सुद्धाओढ्याला चांगलाच वेग होता . भीमाशंकर ट्रेकची हीच खासियत असावी .तिथे चहा व नास्त्याची सोय आहे.तिथेच अंघोळ व नसता तिथेच करून पुढे निघणार होतो . आमच्या/आपल्या समुहतील (आमच्या आणि आपल्या ह्या दोन शब्दांवरहि फार चर्चा झाली होती)एक वृद्ध म्हणता नाही येणार पण आम्हा सर्वांपेक्षा निच्छित मोठे(50वर्ष) होते ते त्या ओढयातुन दगडीतून वरखाली होत एखाद्या झाडाच्या ठोकळ्या प्रमाणे वाहत आले. आणि तोच प्रयोग एका 25शीतील तरुणाने केला त्याला जमल नाही.मलाही जमल नसतं त्यांचा उत्साह पहन्यासारखा होता मी  तर पाण्यात ही उतरलो नव्हतो मनात थोडी चलबिचल होतीच भिजलो थंडी वाजली तर चाडणार कस. पूढे गेल्यानंतर मात्र भिजणं रूचकर वाटू लागलं.ब्रेड बटर  जाम आणि चहा  मस्तपैकी हाणला आणि निघालो पदभ्रमण व गिरिभ्रमण करणाऱ्यांचा तर हा स्वर्गच आहे. या परिसरात तयार झालेल्या पाऊलवाटांनी फिरण्यातच खरी मजा आहे.
.शिडीच्या आधी रस्ता थोडा जबराटच( सिधी चडण  ) आहे म्हणा.पावसाने दडी मारल्यामुळे  ईथे पोहचता पोहचता दमछाक निघाली . अखेर पोहचलो शिडी घाटाच्या शिडीपाशी
.तसा दीड फुट रुंदीचा जिनाच म्हणावा लागेल पण एका वेळी एकाच जन चडू शकत होता थोडी हरकत हि करत होती शिडी .पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारा जागा येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी .येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते . एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि   आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे पण खाली काही दिसत नव्हते  दिसले ते  सगळे धुरकट ! असो तर विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे .हि शिडी त्याहीपेक्षा सांभाळूनच चढावे लागते .ती काही फिक्स नाहीये.  हि शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत अशी चढाई येते जिथे दोरीने चढावे लागते वृंदावन काका पुढे जाऊन रस्सी खाली टाकतात. रस्सी पकडून चढण्यात काय ती औरच मजा हा आता रस्सीचा हात सुटला म्हणजे संपला खेळ. तो भाग वेगळा असो. पुढे  परत एक धबधबा ! तिथे मात्र भरभरून भिजलो  …. येथे एक उदास झाड दिसेल नि या झाडाच्या मागे धुक्यात पदरगड लपला  असावा.इथल्या बहुतांशी झाडांना शेवाळ बाजलेल. ते धुक आणि पावसामुळे .आता पुढे एका मोठे  ठिगळ ओलांडून जावं लागतं ते करून हुश्श कारेस्तोपर्यंत दुसरा एक अॅनाकोंडासारखा आ वासून उभा असतो . याचे वैशिष्ट्य असे कि हा नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा . पहिला टप्पा पार केल्यावर आपणास दोन दगडाच्या मधुन वाकुन  उजव्या  बाजुला वळायचं असतं.पहिला ठिगळ तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या ठिगळ च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत . व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच .
उभा राहू शकतो . तसेच याच्या उजव्या बाजूस धबधबा आहे.ही दोन ठिगळं  आपण उत्तम रित्या पार केलीत कि शिढी घाटाचा हत्ती गेला म्हणून समजा . कारण पुढे साधी चढण आहे नि थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे मिळते. ईथे एक चहाची टपरी आहे .मंदिराकडे जातांना शिडी घाटने आल्यास आपणास सरळ टपरी लागेल .पुढे रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना खरोखर अभयारण्यात आल्याचा अनुभव येतो . वाटेत पडलेली झाडे लागतात ,चिखल रस्त्याच्या दोन्ही बाजुला महाकाय असं दाट जंगल.या ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात . कारण म्हणजे पाऊस नि धुके .

भिमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे कळते. शिगरेटचा धुरही त्यात दिसनार नाही असं धुक्याचं साम्राज्य असतं.अखेर १च्या सुमारास आम्ही तळ्यापर्यंत पोहोचलो. तळ्याचं जरी नाव हणुमान तळं असलं तरी आजुबाजुचा परीसर विचीत्र लोकांनी घान करुन टाकलेला कुठे पाय टाकावा तेही कळत नव्हतं .शेवटी तिथे फिरण्याचा मोह टाळला आणि आम्ही समुहातील बाकी सर्व येइपर्यंत वाट पाहीली. सारे जमा झाले आणि ईवलीशी आर्याही उत्साहत वर चडली होती विषेश म्हणजे ति स्वःता पायी चालुन वर आली होती कुणालाही तिने स्वःताला ऊचलुन दिल नाही सारयानीच तिचं कोडकौतुक केलं.ईथुन धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटत होते. तळ्यापासून १५ मिनिटात आपण भीमाशंकर मंदिराच्या गेट पाशी आणि १० मि.पायथ्याशी  पोहचतो कारण मंदिर हे खाली आहे .पायरया उतरून खाली जावे लागते.उजव्या हाताला मंदिर , डाव्या हाताला अखिल मुंबई कामगार डबेवाले धर्मशाळा (१९३८)आमची राहण्याची सोय होती.तिथे आम्ही फ्रेश झालो पेटपुजा केली सर्वानी आपापली जेवनाची सोय घरुनच केली होती.नंतर निघालो नागफनी पाॅईट कडे.ह्या पाॅइंटच म्हणाल तर त्या डोंगराचा आकार नागाच्या फन्यासारखा आहे.  
 




नागफणीच्या रस्त्यावरील हनुमान तळे, सीतारामबाबांचा मठ आणि हनुमान मंदिर, तेथून काहीशा अवघड वाटेने चढून गेल्यास नागफणी हे भीमाशंकरचे सर्वोच्च शिखर लागते. येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटते. त्या माळराणातुन वर येणारा हवेचा दबाव  प्रचंड असतो काही वेळा तो ईतका प्रचंड  असतो की रुपयाच नाणं देखील खाली जात नाही.महाराष्ट्रात कळसुबाई शिखरानंतर ह्याचा नंबर लागतो.तिथे जाउन खाली पाहील की कळतं आपण खाली कोणत्या लेवलला रेंगाळत असतो.मी तर म्हणेन त्या कँडी क्रशच्या लेवल पार करण्यापेक्षा सृष्टीने दिलेल्या जीवंत नैसर्गीक लेवल पार करण्यात आपलं आयुष्य खर्ची घातलं तर तुम्हाला नक्कीच परमसुखाचा आनंद होईल.रोजच्या धकाधकीच्या शहरी जीवनाचा उबग आलेल्यांना तर हा परिसर म्हणजे नंदनवनच वाटावा, यात काहीच आश्‍चर्य नाही. पावसाळ्यात धुक्‍याच्या तरल पडद्याआडून हळूच डोकावणारी वृक्षवल्लरी क्षणार्धात शहरी शीण आणि ताणतणाव घालवून टाकते.पण ईथे मात्र सेल्फी काढण्याचा प्रयत्न करु नये. नाहीतर सेल्फी स्टीक वर आणि आपण खाली.तिथुन परत येताना धुकं आणखीन दाट आणि मुसळधार पाऊसही सुरु झाला. त्याचा स्वछंद आस्वाद घेत आम्ही धर्मशाळेत परतलो.ताजेतवाने होउन छान अंताक्षरीचा कार्यक्रम झाला,९ च्या सुमारास दर्शनासाठी गेलो.

मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. दर्शन इथेही तसच गाभारयात पोहचतो न पोहचतो तोच बाहेर ढकळलं जातं.ईश्वराचाही धंदा झाला आहे.विना टॅक्सची कमाई तीही बेहिशोबी.असो पण देव देवळात नाही तर अंतरी शोधावा...
दर्शन झालं आणि मग धर्मशाळेत जाऊन मस्त पोटपुजा केली आणि पहुडलो.ईथेही झोपेचा बट्याबोळच झाला.आम्ही खोलीत दहाजण होतो त्यातील चारजण घोरणारे वाघ.... रात्र काही फळाला आली नाही.
सकाळी धुकं अधीकच दाट झालेलं फ्रेश होउन चहा,शिरा घेउन निघालो परतीच्या प्रवासाला बैल घाटा मार्गे नांदगावकडे निघालो. हा तसा ऊतरायला सोपा घाट काही अंतर धबधब्याच्या मार्गातून जावं लागतं तितकाच काय तो अवघड.

पावसाची रीपरीप चालुच होती म्हणुन पर्स बॅगेतच ठेवला आणि रस्त्याला खर्चासाठी म्हणुन शंभरची नोट बाहेर ठेवली. कुठं ठेऊ मनात विचार आला नी ती मी मोबाईलच्या बॅक कव्हरच्या मधे ठेवली बॅकव्हर पारदर्शक असल्यामुळे फोटो क्लिक करताना ती दिसत होती.खाली ऊतरेपर्यंत क्लिक करण्याआधी शंभरकडे बघा,फोटो काडायचा असेल तर शंभरची नोट कुठे आहे वैगरे,वैगरे.आता ती आठवण म्हणुन सांभाळुन ठेवावी लागनार एवडं मात्र निश्चित. वर प्रवेशद्वारापाशी सारेजण एकत्र जमलो.रूट लीडर आणि LV च्या नावाची घोषणा करण्यात आली.शंभरची नोट फोटो काढण्यासाठी सज्ज होतीच .प्रवेशद्वारापाशी फोटो सेशन  करून पुढे निघालो.खाली उतरताना मात्र रमत जमत गाणी बोलत उतरत होतो


तोच मधेच शुभांगी ताईचा ( आर्या ची आई ) पाय घसरला आणि त्या पडल्या. त्यांचा पाय मुरगळला  त्यांना उठताच येईना.ताईचा जरी पाय मुरगळला होता पण वेदना मात्र त्या चिमुरडीला झाल्या होत्या.  पुडे जात असलेली आर्या थांबली आणि रडायला लागली ती गपच होईना तिची आई तिला सांगत होती कि मला लागलेलं नाहीये तरीही ती गप होईना.तिच्या आईच्या प्रती असलेलं प्रेम ती चिमुरडी हिरमसून व्यक्त करत होती.सुदेश कडे मुव्चा स्प्रे होता तो मारल्यानंतर त्याना काहीसा आराम मिळाला .आणि प्रवास पूर्ववत झाला. मग मात्र आम्ही पुढे रूट लीडर सोबत गेलो.मध्यंतरी एक चहाची टपरी लागते तिथे चहा नस्त आणि १०० ची नोट .तुम्ही समजला असलाच. पुढे परतीचा प्रवास आणि पायथ्याची पोहचलो. मागे वळून पाहिलं तर विश्वास बसाला नाही एवडा महाकाय असा पर्वत मी चढून सुखारोप खाली उतरलोय. हुश्श करून सुस्कारा सोडला आणि काही वेळ न्याहाळत राहिलो.पुडे काय नांदगाव ....

गावात एक बंधारा ओसंडून वाहत होता त्या वाहणाऱ्या पाण्यात  मनसोक्त आंघोळी केल्या आणि निघालो मामाच्या घरी. ते डोंगरयात्री ग्रुपचे चौकट मामा .तिथेच जेवणाची व्यवस्था होती .फ्रेश होऊन जेवण केलं .अप्रतिम जेवण ,खासकरून ठेचा ..
   मग काय पुन्हा ४०७ आणि निघालो पण यावेळी अंताक्षरी जोडीला होती .त्यातील खरी जुगलबंदी म्हणावी तर जाहिरातींवरील गाणी .कुणालाही हसू आवरत नव्हत . ते निरमा ,फेना......अररररर
शेवटी पोहचलो कर्जत मग काय ६.४२ ची छत्रपती शिवाजी टर्मिनल लोकल .गर्दी मजबूत होती पण चढलो आणि जागा हि पकडली लोकलमध्ये सारेजण एकत्र आलो आणि जे नवीन होते त्यांना वृंदावन दादांनी अभिप्राय देण्यास सांगितले. साऱ्यांचा अभिप्राय म्हणजे अविस्मरणीय अनुभव.  सारेजण उत्साहात होतो, खूप मजा आली, खरं सांगायचं तर डोंगरयात्री समूहाच नियोजन सुरेख ,सुंदर, शिस्तबद्ध असं होतं त्यामुळेच खरतर हा प्रवास नटखट, रुचकर,आणि मजेशीर झाला. डोंगरयात्री समूहातील प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव मनाला भाऊन गेला. त्या सर्वांचे आभार मानावे तितकेच थोडे आहेत.इतक्या लहान वयात पदभ्रमण करीत भीमाशंकर चढून आल्याबद्दल  तिचा सत्कार करण्यात आला..
         मग काय जो तो आपापल्या मार्गाने घरी . पण ह्या दोन दिवसाची भ्रमंती आयुष्यभर लक्षात राहील .कस असत काही क्षण आपण फक्त अनुभवू शकतो ते शब्दात व्यक्त करता येत नाही .पण सृष्टीने आपल्या पुढ्यात भरपूर वाढून ठेवलंय ते फक्त पाहण्याची गरज आहे .

        @ नित
                                                                                                 नितेश पाटील 
                                                                                                 ९६३७१३८०३१
                                                                                                GOOGLE :- niteshpatil715