सस्नेह जय शिवराय
माझा पहिला लेख....भाग पहिला
गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव
ज्या परंपरेतून,संस्कृतीतून आपल्याला जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं ती जागृत ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरा या अनाधिकाळापासून चालत आलेल्या आहेत. त्यांना ऐतिहासिक परंपरा आहेत. सध्या वाढती असुरक्षितता आणि सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा यामुळे माणूस स्वतःमध्ये गुंतला आहे. पण तो आपल्या संस्कृती, परंपरेशी आजही वेगळा झालेला नाही. आज समाजात लोकांचा सण, उत्सवांकडे कल वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही सण, उत्सवात सहभाग घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढतेय.
पण दुसरी बाजू अशीही आहे कि समाजात फोफावलेल्या राजकारणामुळे परिणामी उद्भवलेल्या वादामुळे सण,उत्सवही त्या त्या पक्षाचे होऊन राहिलेत. परिणामी ठराविक माणसं सोडली तर दर्शनाव्यतिरिक्तN तिथे कुणीही फिरकत नाही. आणि सुज्ञ माणसेही फक्त शिष्टाचार म्हणून त्यात आखडता सहभाग घेतात. सण, उत्सव साजरे जरी होत असले तरी पाहिजे तेवढा प्रतिसाद म्हणजे सर्व समावेशक असा मिळत नाही. हि वास्तुस्तिथी आहे.
आमच्या गावातील हीच परिस्तिथी बदलण्यासाठी गावातील नवयुवक आणि नवयुवतींनी पुढाकार घेऊन "गुडीपाडवा धनसार एक गाव-एक उत्सव" हि संकल्पना साकार करण्याचे ठरवले. आणि सर्व समावेशक प्रतिसाद मिळवा यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. उत्सव हे मनाला आनंद , उभारी देणारे असतात. त्यामुळे ताणतणावाच्या निरसनासाठी मनस्वास्थासाठी अशा उत्सवांची अधिक गरज वाटू लागली आहे. पण ते निपक्षी आणि पारदर्शक असावं.
(क्रमश:)
नितेश पाटील (पालघर,धनसार)
माझा पहिला लेख....भाग दुसरा
गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव
मराठी महिन्यांतील चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून सुरू होणाऱ्या नववर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. असं सांगतात की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. तसेच प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तोच हा दिवस. त्या दिवशी सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या, तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्या प्रदक्षणेवर आधारले गेले आहेत. त्यामुळे ही चंद्र कालगणना आहे. ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. त्यामुळे ती सौर कालगणना आहे. हा दोन्ही कालगणनेत महत्वाचा फरक आहे. सहा ऋतू आणि बारा महिने त्यातील वसंत ऋतूच्या महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा.
वसंतातील चैत्र महिन्यात जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळती, निष्पर्ण झालेले वृक्ष हे चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकीळ आपल्या कंठातून सु-स्वराने गात असते. निसर्गातल्या परिवर्तनाचे, नव चैतन्याचे, नव सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचं हा हि त्या मागचा एक उद्देश आहे.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)
माझा पहिला लेख....भाग तिसरा
गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव
एक गाव एक उत्सव हि संकल्पना अतिशय सुंदर आणि साजेशी पण ती प्रत्यक्षात उतरवणं तेवढच शर्थीच काम. कारण त्यासाठी त्या उत्सवात संपूर्ण गावातील ग्रामास्थांनचा सहभाग असनं अपेक्षित. आणि आताच्या राजकारणमय वातावरणामध्ये ते करणे म्हणजे ..? कारण दूषित वातावरणात श्वास गुदमरत असतो. त्यात संचार करणं सुज्ञ माणूस नेहमी टाळत असतो. आणि हल्ली ती अवकळा साऱ्याच ठिकाणी पसरली आहे. पूर्वी आमच गावं असं नव्हत. सर्व गुण्यागोविंदाने उत्सव साजरे करायचे पण आता गाव एक आणि दुखणं अनेक अशी गत झाली आहे . कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा मीपणा नकळत का होईना येऊ नये. शेवटी व्यक्तिमत्वाचा प्रभाव चांगला अथवा वाईट हा जनमानसात पडतच असतो. परिणामी दुरावा निर्माण होतो. लोकांनीही नजरेआड न करता पारदर्शकता जागृत करायला हवी.पाठीमागे बोलून कोणत्याही गोष्टी साध्य होत नसतात.
आणि आम्ही साऱ्यांनीच ठरवलं होतं परदर्शकतेला प्रथम प्राधान्य. वारंवार चर्चासत्र घेऊन संपर्कात राहायचं. गावातील तरुण पिढीनी ते सार्थ करण्याचं धाडस केलं. कारण गाव कितीही भावनिक दृष्ट्या दूषित झालं तरीही आमच्याच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये एक साम्य असते ते म्हणजे गावातील बहुतांशी ग्रामस्थ हे गावातील राजकारणाला म्हणा, त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला म्हणा,परस्परांतील वादाला म्हणा, कंटाळलेले असतात. त्यांना एका निपक्षीय वर्गाची गरज असते, परदर्शकतेची गरज असते.आणि दुसरं म्हणाल तर आजच्या नवीन पिढीला आपली मराठी संस्कृतीचं दर्शन घडवून देनं, आपली मराठी संस्कृती टिकवणं, गावाची एकात्मता वाढीस लावणे ह्यासाठी हे पाऊल मोलाचं ठरणार होतं.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)
माझा पहिला लेख....भाग चौथा
गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव
|| श्री भवानी माता प्रसन्न ||
धनसार एक गाव एक उत्सव
युवा पिढीने नव्हे ग्रामस्थ धनासर ने आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ,नवीन पिढीच्या संस्कृती दर्शनासाठी , आपली संस्कृती जपण्यासाठी , गावातील एकात्मतेसाठी गुढीपाडवा भव्य शोभायात्रेने करण्याचे निच्छित झाले . आणि त्यामध्ये पारंपारिक पोशाख, लेझीम, पिरॅमिड चाही आवर्जून समावेश होता. त्याचा सराव एक महिना आधीपासून रोज सायंकाळी ६.०० वाजेपासून गावातील भवानी मातेच्या मंदिरात होऊ लागला .
नववर्षाच्या आदल्या दिवशीच्या रात्री गावातील ग्रामस्थ उत्साहाने सुशोभिकरणासाठी मग्न झाले होते.विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व रस्ते रांगोळीने सुशोभीत करण्यात आले. जागोजागी कमानी उभारल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताक्यांचा साज चढवला गेला. आणि पाहता पाहता तो हि दिवस उजाडला ......
लेझीम नृत्यातून शिवसृष्टी साकारण्यात आली होती. त्यात शिवरायांच्या जीवनातील विविध पराक्रमाचे दृश्य दाखवण्यात आले होते. खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे बरेच प्रसंग. सरते शेवटी शोभायात्रा पुन्हा मंदिरात येऊन ती संपली असं जाहीर करण्यात आलं.तदनंतर त्याच पारंपरिक पेहरावात आम्ही एका दुचाकीवर एक युवक आणि एक युवती हातात भगवा ध्वज घेऊन सव्वीस जन धनसारहून पालघर , शिरगाव आणि पुन्हा धनसार अशी दुचाकीचीवरची मिरवणूक पार पाडली. खरोखरच तो उत्साह, जल्लोष भन्नाटच... नववर्षाचे स्वागत करावे तर असे.
सायंकाळी मंदिरात सत्यनारायणाची पूजा संपन्न करून कार्यक्रमाचा शेवट केला गेला. ह्यावरून माझ्या मते एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपण जर निस्वार्थी मनाने कोणताही कार्य करण्यास हाती घेतलं तर परमेश्वरा बरोबरच आपल्या सानिध्यातील जनसमुदाय आपाल्या बरोबर राहत असतो.दरवर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आम्ही हा सण साजरा करतो आणि या पुढेही करत राहणार.आणि विशेष म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनीही या कार्यक्रमाची दखल घेतली होती.
एक गाव एक ऊत्सव
जल्लोष नववर्षाचा.....
मराठी अस्मीतेचा.....
हिंदु संस्कृतीचा.....
सण ऊत्साहाचा......
मराठी मनाचा....
(समाप्त)
नितेश पाटील(पालघर,धनसार)
Watch "Gudipadava dhansar 2015" on YouTube - Gudipadava dhansar 2015: https://youtu.be/N84QGzLiwj4
# नित #
सण उत्साहाचा मराठी मनाचा
नितेश पाटील (पालघर,धनसार)
1 comment:
गतवर्षिप्रमाणे यंदाही जल्लोष......
॥ श्री ॥
॥ जय भवानी प्रसन्न ॥
धनसार एक गाव एक ऊत्सव
🚩जल्लोष नववर्षाचा🚩
🚩मराठी संस्कृतीचा🚩
🚩 मराठी अस्मितेचा🚩
🚩धनसार गावाच्या परंपरेचा🚩
भवानी मातेच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा आमच्या आपल्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने ऊद्या चैत्र शु. प्रतीपदा शके १९३७ शनिवार दिनांक २१ मार्च २०१५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ दिनी नुतन वर्षाची सुरवात भव्य शोभा यात्रेने करण्याचे निश्चित केले आहे. तरी सदर शोभायात्रेस उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
धन्यवाद.
Post a Comment