Friday, April 15, 2016

मंदिर-पेहराव-बंदी

====मंदिर-पेहराव-बंदी++++
        प्रत्येक जागेचे एक पावित्र्य आहे मग ते मंदिर, मस्जिद, चर्च अथवा कोणत्याही धर्माचे असू दे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वागावे कि तेथे बंधन घालण्याची गरजच पडू नये.
        आपण वैदिक संस्कृती जपणारे लोक आहोत. तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात दर्शनाला येताना तुम्ही काय कपडे घालून येता या पेक्षा तुमचे मन इथे शांत होतंय का ? विचलित तर होत नाही ना ? मन:शांती मिळतिये का ? भगवंत दर्शनाची आस लागतीये का ? हे पाहणे गरजेचे आहे.
      आपली भारतीय पोशाख - मग ते मराठी, बंगाली, पंजाबी असू किव्हा आणखीन कुठली, खूप चांगली होती. अंग झाकून जाणारी. आता ती फारशी तशी उरली नाही. असो काळानुसार सारं बदलत असतं.
       पण सांगायचा मुद्दा असा आहे कि ऑफिस मध्ये ड्रेस कोड चालतो, शाळेत चालतो, असे बरेच विभाग आहेत तिचे पेहराव हा पूर्व निर्धारित असतो. तर मग मंदिरात का नको ? नसेल जमत तर जाऊ नये. प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच कि...भगवंत. मंदिर काही पिकनिक ची जागा नाही. त्या उद्देशाने तिचे जाणेही चुकीचे आहे. कुठे काय करावं याची जाण ज्याची त्याला असायला हवी.
         पण मंदिर हि भगवंताविषयी व जीवनाविषयी चिंतन करण्याची जागा आहे. तिथे वर्षानुवर्षापासून भक्तगणांनी आपल्या पारंपारीक, सांस्कृतिक, निस्सीम, भाबड्या भक्तीने एक अदृश्य शक्ती स्थापित केलेली आहे. जी त्यांना जगण्याचं सामर्थ्य देत असते. तिथे त्यांचं मन विचलित होईल असं कुणी वागू नये.
      देवाधर्माच्या गोष्टी तरी व्यक्तिगत स्वातंत्र्यातून सोडाव्यात. देवदर्शनाला जाताना काय हरकत आहे जर आपल्या परंपरागत पोशाखात जावे लागले तर ? मनोरंजनाची स्थळं आणि सार्वजनिक स्थळं यात गफलत का करावी ? त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर मी बेडरूम मध्ये जसा वावरतो तसा ओटीवर वावरू शकत नाही. शेवटी काही गोष्टीना मर्यादा असतात. त्या स्वतःवर ओढवून घेऊ नये इतकचं...
       सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या भारतवर्षात आपण राहतो. तिथली संस्कृती जपणे आपले कर्तव्य आहे. आता समाज उच्चशिक्षित झाल्याकारणे काही रूढी, परंपरा भुलचट वाटत असतील. पण सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात पारंपरिक पेहरावात जाणे यात काय वावगं असू शकतं ? उगाच विरोध करायचा म्हणून कोणी करू नये. हा एक प्रश्न सोडला तर त्या व्यतिरिक्त सारे प्रश्न निकालात निघाले अस नाही.
         आणि ईश्वर देवघरात, मंदीरात किव्हा अन्यत्र असा कुठेच नाही. त्याला जिथे तुम्ही शक्तिरुप दिलं तिथे तो निश्चितच आहे. तुम्ही त्याची भक्ती कोणत्या प्रकारे करता, तुमचं आचरण काय यावर सारं काही अवलंबून असतं. आज त्या ईश्वरनिगडीत काही गोष्टींवरून रान उठवलं जातं, आणि त्यात सामान्य माणसं भरकटली जातात हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ह्रुदयात ईश्वर आहे तो आधी जणाला पाहिजे, जोपासला पाहिजे. त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे तरच तुम्ही माणूस म्हणून श्रेष्ठ व्हाल...अन्यथा सारं व्यर्थ आहे.
.....नितेश पाटील (धनसार,पालघर)

No comments: