◆●स्मशानातील तारुण्य...●◆
सस्नेह जय शिवराय
स्मशान शांतता आता स्मशानातही राहिलेली नाही. हल्ली ते नवयुवकांसाठी ( अर्थातच बिघडवलेल्या ) मद्यवेसन आणि धुम्रपान करण्याचे अड्डे झाले आहेत. पूर्वी गावात मित्रांचे कट्टे असायचे. आळी आळी मध्ये लहान थोर एकत्र बसत. तिथे गप्पा रंगायच्या, थोरांबद्दल आदरयुक्त भीती असे. पण काळ बदलत असतो. या संघनक युगात माणूस मोबाईलच्या अधिक आहारी गेल्यामुळे आज कट्टे तर नाहीसे झालेच पण काही अंशी नवीन पिढी दिशाहीन झाल्याची दिसून येते. काही गावातील स्मशानांचही अड्ड्यात रुपांतर झालं हि खेदाची गोष्ट आहे. स्मार्ट फोनच्या जमान्यात मोबाईल स्मार्ट आले पण माणसं स्मार्ट होणं काही अंशी बंद झालं.
माझी वाचन करायची नेहमीची निवांत, एकांत जागा. रोज नाही पण कधी वेळ मिळेल तेव्हा. गावापासून काही अंतरावर… स्मशान… जरी घर भूतांचं असलं (असं म्हणतात) तरी आज त्यानाही तिथे मानवत नाही…तासा दोन तासात कुणीतरी फिरकतच…तसं माणसाने नेहमी तत्पर असावं. या कलयुगात कधी बोलावणं येईल सांगता येत नाही. सवय करून ठेवलेली बरी…म्हणून हे इथे येणं… बाकी काय…असो
पण या जागेचा हल्ली दुरुपयोग होतोय हे मात्र खरं…मी नेहमी पाहत असतो…14-15 वर्षाची, एन कॉलेजच्या वयात आलेली कोवळी पण उनाड मुलं भर उन्हात अंगाचा दाह होत असताना सिगारेटचा दम मारण्यासाठी इथे येतात आणि तिळ तीळ आपलं आयुष्य जाळून निघून जातात. राजरोज संध्याकाळी पार्ट्या (अर्थात त्यांच्याच रुपयाने) बेझीजक करत असतात. रिकाम्या बाटल्या आणि कचरा तिथेच टाकून पसार होतात, आणि सकाळी दुसरी मुलं येऊन त्याच बाटल्या फोडण्याचे काम करतात. काय संस्कार आहेत नाही आपले..?? हे थांबवावे कसे हे काही मला कळलेले नाही अजून...
पण त्यांना पाहून काही ओळी सुचल्यात त्या सादर करतो....
◆◆स्मशानातील तारुण्य◆◆
स्मशान म्हणते...
माझेही आले दिवस चांगले, जे केव्हा नव्हते...
ढुंकूनही पाहत नव्हतं कुणी, रात्री तर मुळीच नाही...
हल्ली येतात इथे दिवसा, रात्रीही...
एन कॉलेजातली कोवळी उनाड मुलं..
गावतलीच आपल्या.. नसतात बाहेरची...
तारुण्य गहाण ठेवण्यास माझ्यापाशी
कुणी लावला हा छंद त्यांना माझा,
बाटल्यांचा, त्या फुकन्यांचा, कर्कश कानठळ्यांचा...
त्या एकांतात बाटलीचा संग...
दिवसागणिक आयुष्यात गळी पडणारे,
त्या बाटलीतील मद्य...
त्या मद्याने माणसापासून लांब,
जवळजवळ नाहीसा झालेला तो माणूस...
तोल सावरत नाचू पाहणारे, अर्थीवरचे ते तारुण्य...
हातात आयुष्याची विझत चाललेली सिगारेट...
तिला तेवत ठेवण्याचा प्रयत्न...
त्या प्रयत्नात ते झरत जमिनीवर विखुरलेलं, दूरवर हवेत अदृश्य झालेलं आयुष्य...
नव्या पिढीची एक बाजू हि अशी स्मशानात पोहचलेली...मरण्याआधीच...
झिंग रात्रभर चढलेली...
नव्हे आयुष्य मावळणारी...
हे तारुण्य बहाल केलंय त्यांनी मला...
अन मी ते स्वीकारलाय...
माझं कामच आहे ते...
निकामी झालेले देह जाळून टाकण्याचं...
ह्या तारुण्याला विस्तवाची गरज नाही...
ते जळतं आपल्या कर्माने...
आणि जाळतही असतं दुसऱ्याला...
आपल्या मित्रांना, आपल्या आप्तांना
न जाळताही जिवंतपणी...
असो... पण आज माझी मजा आहे...
कुठे ते सरणावरचे मुडदे...
अन कुठे हे चालत आलेलं तारुण्य...
*...नित*
याचा अर्थ असा होतो का… चुकीची माध्यमं, आणि चुकीच्या संस्कारांनी आपण आपली पुढची पिढी नासवतोय. समाज कुठेतरी मागे पडला…संस्कार कुठेतरी मागे पडले… आणि शिक्षण मागे म्हणता नाही येणार… जास्त झालाय. आज घरात आईवडिलांचं आपल्या मुलांसमोर आचरण कसं आहे त्या पद्धतीनेच मुलं समाजात वावरत असतात. हे नाकारता येणार नाही. आणि बाकी चुकीचा पायंडा पडणारी काही माध्यमेही आहेतच…वाईट गोष्टींचं अनुकरण माणूस लवकर करत असतो.म्हणून मोठ्याने लहाण्यांनसमोर माणसात वागलं पाहिजे…
पण तुम्हाला एक सांगू का ? या तरूनपिढीची जी काही वाट लागली आहे त्याला कारणीभूत आपल्याच समाजातील काही श्रीमंत आणि राजकारणी आहेत याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुम्ही आज लग्नसमारंभ घ्या त्यात भर मांडवात मद्यपाणाचं काउंटर आणि बाकी ज्यांना समोर जमत नाही त्यांना अंधारात सोय... सोय म्हणजे काय सांगायची गरज नाही... राजकारणी लोकांच तर विचारूच नका, पार्ट्याच पार्ट्या.... श्रीमंतांना दाखवायचं असतं आणि राजकारण्यांना साधायचं असतं. आणि आमचा त्यासाठी उपयोग केला जातो हे हि आम्हाला कळत नाही. आपल्या पुढच्या पिढीसमोर कसले संस्कार आपण ठेवताओत याची जाणीव आपल्याला असू नये...आणि हे जर असं होत असेल तर त्या तरुणांना तरी काय दोष द्यावा..??
एकदा का गोष्टी हाताबाहेर गेल्या कि त्या आपण काय देवही सावरू शकत नाही
फुटले मोती तुटले मन । साधू न शके विधाता ।।
हे उगाच साधू संतांनी लिहून ठेवलेलं नाही. पशूला चामड्याच्या लगाम घालता येतो पण माणसाला असले लगाम घालता येत नाहीत, बुद्धी हा माणसाचा लगाम आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागत नाही तो मनुष्य नाही. मान्य अभिव्यक्ती स्वातंत्रयानुसार तुम्हाला स्वछंद वावरण्याचा अधिकार आहे पण तसं वावरत असताना जर समाजास हानी पोहचत असेल तर ती अभिव्यक्ती सोडा पण तुम्हाला माणूस म्हणवून घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. आणि माणसं काय मिरवू पाहतात हेच मला कळत नाही. एक नाशिवंत देह सोडून काय आहे तुमचं या विश्वात ..? सारं काही क्षणभंगुर आहे. पण या जगात माणसाने आपलं स्थान ओळखून त्या पद्धतीचं आचरण केलं पाहिजे....
नितेश पाटील(धनसार,पालघर)
No comments:
Post a Comment