Friday, February 12, 2016

सलाम


सलाम

का हळहळतो माणूस
शूर वीरांप्रती
ते शौर्य तसे असते...
ध्यास एकच मनी
रक्षण सिमेचे
ती जिद्द तशी असते...
शान राखण्याची
तिरंगा जपण्याची
रक्त सळसळत असते...
हिम पर्वताच्या कुशीत
उणे तापमान जरी
जाणीव फक्त असते...
शत्रू संपवण्याची
विना ऑक्सिजन
ज्योत तेवत ठेवण्याची
माणसात एकटा पडतो इथे माणूस
जिथे बर्फा खेरीज
न कसलं अस्तीत्व
तिथे सामर्थ्य एकट्याच...
रक्षीतो आपणासी निर्जन राहून
बंध राष्ट्र भक्तीचे
वेड देश प्रेमाचे..
साथ काळाची असते
काळच घात करतो
धवल बर्फाचा पर्वत
अचानक कोपतो
कवेत घेतो
राष्ट्रभक्तांस
काय गुन्हा ??
तो इतका निर्दयी होतो
जो भोगतो त्यालाच जवळ घेतो
पांघरून बर्फाच त्यांस देतो
तरीही हारत नाही
संघर्ष करतो
एका जिद्दीनं, उर्मीनं
पण दैवापुढे नाही चालत काही
खुजे ठरतो आपणही
भारत मातेचा सच्चा सुपुत्र
लाख मरणे मागे टाकून
शेवटी शहीद होतो...
सलाम त्या संघर्षास...
सलाम त्या वीर मरणास...
सलाम त्या धरणी पुत्रांस...
सलाम त्या मरून जगणाऱ्या शूरांस
सलाम, सलाम आणि सलाम.....
जय हिंद....
नितेश पाटील(पालघर,धनसार)

Thursday, February 11, 2016

पोटनिवडणुका..

पोटनिवडणूक

         निवडणूक खरा हा राजकारणी लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न, त्या काळात सारेच पोटतिडकीने मी कसा श्रेष्ठ, माझा पक्ष कसा श्रेष्ठ, काहींची खोटी, काहींची खरी आश्वासने आणि खर सांगायचं ना तर या कलयुगात खरच समाजकल्याणासाठी सारेच राजकारणी इतका अमाप रुपया उधळतात का हो...?? असो आणि बरच काही...
       पण शक्यतो माणूस आपलं मत पक्ष बघून दान अथवा विकत देत असतो. निवडणुकीत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वापेक्षा त्यामागे असणाऱ्या पक्षाला जास्त प्राधान्य देतात. यात संमिश्र असा प्रतिसाद असतो हे हि मान्य. एक पक्षाप्रति असणारे कट्टर ज्यांची बांधिलकी पक्ष श्रेष्ठींशी असते. दुसरे जे आपल्या भागातील कार्यकर्त्यांशी निगडित असतात. तिसरे जे उभा असलेला माणूस तो ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचे राज्यातील, देशातील स्थान आणि त्यानुसार आपल्या प्रभागातील विकासकामांना अनुसरून मत दान करतात पण हा वर्ग मोजकाच असतो. चौथे जाहिरातीवर भुळणारे, वेळेवर पलटी खाणारे, रुपये खाणारे. आता ह्या दोन्हीही खायच्या वस्तू नाहीयेत.पण राजकारणात खातात. या दोन्हींना जो मला शब्द वापरावा वाटतो तो म्हणजे माती खाणे.
        निवडणूक देश पातळीची असो वा राज्य पातळीची त्या निवडणुकीत शासनाचा खर्च आणि प्रत्येक उमेदवाराचा प्रचाराचा खर्च याचा सारासार अंदाज काढला तर त्या खर्चाने किती उपेक्षित गावं आणि गोरगरीब लोकांच कल्याण होईल हो..?? पण हा विचार करण्यास कुणास वेळ नसावा. आणि जे उमेदवार करोडो, अब्जावधीचा खर्च निवडून येण्यासाठी वयक्तिक किंव्हा पक्ष म्हणून करतात. ते आपल्या वयक्तिक जीवनात समाज कल्याणासाठी किती खर्च करतात..?? आणि निवडून आल्यावर किती योजना आपल्या प्रभागात राबवून त्या पूर्णत्वास नेतात...??  असे बरेच प्रश्न माझ्यासमोर अजूनही अनुत्तरीतच आहेत.
        आणि सरकारं योजना राबवत नाहीत अशातला भागच नाहीये. काही पुऱ्या होतात. पण पुष्कळ योजना असतात त्या कागदावर राहतात किंव्हा अर्धवट खितपत पडतात. याला जबाबदार निश्चितच सामान्य माणूस नाही. तो बिचारा आपल्या कामातच व्यस्त असतो. फोफावलेल्या भ्रष्टाचाराला तोंड देत. पण तुम्ही तर वसा घेतलाय ना..?? समाज कल्याणाचा मग का हि परिस्तिथी आहे..??  आणि कुठल्याही कामात सफेद पैसा आणि काळा पैसा याशिवाय कामच होत नाही..आणि दोष जनतेला.तुम्ही लाच देता म्हणून... तिथे जनता काय करणार..?? हे तर असं झालं कि दारूबंदी करायची आणि दारूच्या कंपन्या फुल फार्मात चालू..(सेल फॉर महाराष्ट्रा ओन्ली अस असतं ना ते लिहिलेलं) कसं शक्य होणार ? आधी दारूचे धंदे बंद करा नंतर दारू बंदी.  ती करायचीही गरज नाही आपोआपच होईल.
         सांगायचं तात्पर्य इतकच आहे निवडणुकीची उलाढाल जर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी असेल तर ह्या पोटनिवडणुका कशाला हव्यात..?? असही जर शेवटी पक्ष्याच्या अखत्यारीत सारं येत असेल तर कायद्यात बदल करायला हवा. एखाद्या खासदार,आमदारचं अकस्मात निधन होत असेल तर तो ज्या पक्षाचा असेल त्याच पक्षातील त्या प्रभागातील जो कालावधी शिल्लक राहिला असेल तोपर्यंत एक कार्यकर्ता स्थानापन्न करावा. आणि इतर पक्षांनी त्यांना सहमती द्यावी. शेवटी जनतेचा कौल ज्या पक्षाकडे होता तोही तडीस जाणार नाही. आणि कोट्यवधींचा खर्च तुम्हाला करायचाच असेल तर आपल्या देशात गोरगरीबांची कमी नाहीये. तुम्हा सर्वांच्याच राजकारणाचा तो परिणाम आहे. एक सुधारण्याची संधीही मिळेल...
     खरंतर या बाबतीत माझा अभ्यास नाहीये. पण पोटनिवडणूक घेऊन नाहक खर्चात पडण्यापेक्षा ती टाळलेली बरी. आणि हल्ली निवडणूक आली म्हणजे गावागावात जे हेवेदावे होतात ते पाहवत नाही. आणि त्याचा परिणाम गावातील सण उत्सवांवर पडत असतो. हा अमुक पक्षाचा, तो अमुक पक्षाचा, हे माणसांपर्यंत ठीक आहे हो ..!! आता सणउत्सवातही त्याचं प्राबल्य वाढलेलं दिसतं. परिणामी सारंच ओस पडू लागलं. याला जबाबदार कोण..???
     मला जे प्रामाणिकपणे वाटलं ते मी व्यक्त केलं. आता मधेच व्यक्त होण्यावरही गदा आणली होती ते हि मला ज्ञात आहे तरीही....
....नितेश पाटील (पालघर,धनसार)

Sunday, February 7, 2016

न मागताही होईल मतदान तेव्हा

न मागता होईल मतदान जेव्हा ...!!!

येते मतदान जेव्हा जेव्हा ..!!!
असंख्य प्रश्नांचा डोंगर उभा राहतो...
आयुष्य माझे भयाण काळी रात्र...
रोजच जगणे तेच मरणे माझे...
अशा काळोख्या रात्री अचानक...
उल्कांचा वर्षाव चालू होतो...
उजेड काही क्षणापूर्तीचे
अवचित देऊन जातो
मी धुंडत राहतो त्याला
तो लुप्त होतो...
काय कुणाशी साटेलोटे ...?
संग कुणाशी बांधतो...?
दिसतो काही क्षण
मग तो विरून जातो...
लुप्त होण्याआधी
मजकडे मागून जातो..
मी नकार देतो..!!
फकीर मी
काय मागतो मजकडे..?
राजा भोज असूनही
का पसरले हात तुझे..?
देऊनही माझे मत तू विसरलास मला..!!
पाच वर्षांनी पोस्टरवर दाखवतो तोंड मला..
का न आली कधी कीव माझी तुला..?
त्याच त्याच यातना
रोज मी सहन करतो...
ऊन पावसात निवारा शोधत फिरतो...
उकिरड्यावर उष्टावली वेचत हिंडतो...
गरिबीची लक्तरे अंगावर फाटलेली..
साऱ्यांचा नाथ
का मी अनाथ आहे..?
नतद्रष्ट लोकांनी टाकलेली
का मी कात आहे..?
जातोस पायदळी तुडवून
मी सहन केले..
काय थट्टा लावलेय
मी कोण आहे..?
असतील मंत्री संत्री मला काय त्याचे..
त्यांना फौजफाटा ?
माझी वणवण आहे..
उधळतोस संपत्ती कोणाची आहे..?
करोडो अब्जावधींची धनदौलत तुमची
भुकबळी, गरीबी तशीच.?
सामान्य माणूस अजूनही पिसतो..?
योजनेंचे इमले राहिले कागदांवर
लाल, निळ्या कागदांनी केले मतांतर
घोषणांचा नुसता गडगडाट आहे
राजरोज पार्टयांचा सुळसुळाट आहे
बाटल्या बकऱ्यांचा रोज मान आहे
भविष्य देशाचे ज्यांच्या हाती
अंशतः त्यांनीच केली बर्बाद पिढी आहे
जनहितार्थ असे केले असेल काही
विचार तुलाच ..!!
का ते पुरेसे आहे..?
स्वातंत्रेत्तोर सरली कैक वर्ष तरी
हेळसांड जनाची का अजुन आहे.?
पण आता नागरीक सुजाण आहे
भुलथापना लागणार ती चपराक आहे
विकला जाणार नाही तो सज्ञान आहे
उधळतोस दौलत तू जी वारेमाप
आली कुठून..?
पुढे येणार कुठून..?
त्यास माहित आहे...
विनियोग करशील तू सत्तेचा जेव्हा
न मागताही मिळेल ...
मत तुला तेव्हा...
वाट मी आजही पाहतो त्या दिनाची
न मागतही होईल मतदान जेव्हा....!!!!
न मागतही होईल मतदान जेव्हा....!!!!
......नितेश पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१

गिर्यारोहण (ट्रेक) नियम

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

🚩 सस्नेह जय शिवराय 🚩
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री...
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. मुलींनीही कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
संग्रहित...
धन्यवाद....
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com

Thursday, February 4, 2016

लगबग चाकरमान्यांची

लगबग चाकरमान्यांची
दिनरात असते चालू हो
काय ठेवलंय नशिबी वाढून
कुणास ते ठाऊक हो हो हो...
  माझ्या देवा  तु रे ..२
अपार मेहनत करतो तो
शर्थीने तो जगतो रे
प्रपंचात गुंतुनी असा
स्वतःसही विसरतो रे रे रे
  माझ्या देवा तु रे..२
संसाराची वेस केवढी
तेवढ्यातच जगतो तो
आणिक नसे काही ठाऊक
पोरांबाळात रमतो रे रे रे...
माझ्या देवा तु रे..२
अशिक्षित असूनही त्याने
शिकविले आपल्या लेकांस
उतारवयात परवड झाली
टकमक पाहतो रस्त्यास हो हो हो
माझ्या देवा तु ..२
मुलं असूनही वांझ झाला
काय दोष द्यावा कुणा
तिळतीळ करुनी मीच जमवली
मीच माझी चिता म्हणा हो हो हो
माझ्या देवा तु ..२
नाही कुणाचे कुणी इथे
मी सार्यांचा न माझा कुणी
आईबाप सोडून जगी या
तु हि माझा कसा नाही
माझ्या देवा तु रे ..२
विश्व केवढे मी कणभर नसे
काय माझे अस्तीत्व हो
ताऱ्यांच्या पंगतीत बसलो
का पाहील मज कुणी हो...

कर्तव्य...

सस्नेह जय शिवराय

        माझे जगात काहीच नसताना मी जे काही मिळविण्याचा प्रयत्न करत असतो ते मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार. तो तर चुकणार नाही. पण ज्या मायापित्यांनी आपल्याला अथक परिश्रमातून, संघर्ष करून, संघर्ष करण्याच्या लायकीचे बनवले.आपल्याला आपल्या पायावर उभं केलं. या निसर्गानेही आपल्याला भरभरून दिल.आज त्यांचीच हेळसांड झालेली समाजात आपल्याला पाहायला मिळते.
        पण एक लक्षात घेतलं पाहिजे जमीन कितीही सुपीक असली, बीज कितीही दर्जेदार असलं तरी त्या शेतकऱ्याचे अथक परिश्रम, त्याने केलेली मशागत, आणि निसर्गाची असलेली पूरक अशी साथ हे विसरता कामा नये .ते बीज जमिनीतून बाहेर येण्यापर्यंतचा आणि बहरण्यापर्यंतचा जो संघर्ष असतो त्या संघर्षाची जान फक्त त्या मायरूपी पालकांस असते. ते जीवाच्या आकांताने त्यावर फुंकर घालत असतात. त्याला ते एक विश्व बहाल करत असतात.
         पण आज बऱ्याच जणांना त्यांची कदर उरलेली नाही. अश्यानी एकदा आपल्या आजूबाजूला आवर्जून पहावं. ज्यांचे आईवडील नाहीत त्या अनाथांच्या जीवनात एकदा झाकून पहावं त्यांनी काय गमावलय आणि तुम्ही काय मिळवलंय याची अनुभूती येईल..
        पहावं जाऊन ते माणसांनी फुलवलेले बगीचे जे एका लयीत शिस्तबद्ध पद्धतीने बहरून जनमानसात प्रतिक्षण नवचैतन्य निर्माण करत असतात.
       पाहावे ते निसर्ग सानिध्यात वाढलेले अस्तव्यस्त अफाट उंचीचे, गर्द दाटीचे भयाण जंगल. डोळ्यास सुखावत असले, आपणास पोषक असले तरी माणसं सहजासहजी तिकडे फिरकत नाहीत.
       पहावं त्या दुष्काळ ग्रस्त भागात जाऊन... निसर्ग जेव्हा रुसतो तेव्हा काय परिस्तिथी निर्माण होते. आणि आजही काय भोग भोगावे लागतात.
        म्हणूनच माणसांनी माणसा सारखे माणसात राहावे. आपाल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे कि आपल्याला जन्म देणाऱ्या आणि ज्या निसर्ग सानिध्यात आपण वाढतो त्याची कदर आपण केली पाहिजे.
.....नितेश पाटील ( धनसार)
९६३७१३८०३१

Friday, January 29, 2016

सुख-दुःखे

सस्नेह जय शिवराय....................
.................................................नितेश पाटील
       
  सुख-दुःखे
मीच ठेवीले भक्तिरूप अनंत
    प्रार्थनेतून एकाच ठायी नित्य
       सुखदुःख येती जे माझीया कर्मे
            तैसे निरंतर बळ मज देत राही....
         माणूस म्हंटला कि सुख-दुःखे आलीच. त्याशिवाय त्याच जीवनच नाही.पण माणूस त्याच्या अधीन जास्त जात असल्यामुळे, आणि नात्यांच्या बंधनात वाहवत जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या जगण्यावर होत असतो. पण एक लक्षात घेतलं तर कळेल कि सुखात सारेच सहभागी असतात. पण दुःखात मात्र मोजकेच असतात. म्हणजेच गंध हवा असतो..!! पण आवडीचा असेल तर... अशी गत असते...
         तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती ऋतूप्रमाणे आहेत. ती सुख-दु:खे आपल्या इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती खवळून, चवताळून, अती उत्साहित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. म्हणजेच मर्यादेत राहिलं पाहिजे. ज्याने मर्यादा पाळली त्याचा समाजात सन्मान होत असतो हा इतिहास आहे.
         विश्व म्हणजे काय..?? ते कोणी निर्मीले..?? या प्रश्नांची उत्तर निःसंशय भिन्न आढळतील. याचाच अर्थ माणसांचे विचार भिन्न असतात. आणि त्यामुळेच सुखदुःखाची परिभाषाही वेगवेगळी असते. त्यानुसारच माणूस झगडत असतो. स्वतःजवळ असलेल्या, मिळवलेल्या ज्ञानाने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
          काही वेळेस त्याला आपल्या तत्वानुसार मित्र, नातेवाईक किंव्हा इतर कुणाशीही झगडावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. शेवटी हे विश्व मायाजाल आहे. ज्ञान एका विशिष्ट स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधीविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. काही झालं तरी प्रत्येकाला बंधनं हि असतातच. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील तो भाग वेगळा.
         मनासारखे कुणालाच जगता येत नसते. परिस्तिथीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. ईश्वर कुठे असेल तर तो आपल्या भक्तीने, प्रार्थनेने, आचरणाने एका जागी आपणच स्तिथ केलेला असतो. आता ते आचरण ती भक्ती आणि प्रार्थना कोणी कुठे कशाप्रकारे साठवलंय अथवा नाही हे ज्याचं त्याला अवगत असतं. तो त्या जागी पोहचल्यावर निश्चितच तुम्हाला संघर्ष करण्याचं बळ ती देत असते. तसेच समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणूनच केवळ ज्ञान व भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करू शकतो ....
https://niteshpatil715.blogspot.com
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१