Tuesday, March 31, 2015

शिक्षण कि स्पर्धा

जीवन स्पर्धा

सस्नेह जय शिवराय
सर्वच नाही पण बहुतांशी लोकांच हे असचं आहे.
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.आणि आपल्या आयुष्याची सिमाही कमी करत चाललेली आहे पण पुढच्या पिढीचं भविष्य ऊज्वल करण्याची गरज अाहे. हे कळत नाही अशातला भाग नाही पण ते सुधारणार कसं ?
हा प्रश्न कीत्येकांसमोर अनुत्तरीत आहे. पुढील विश्लेशण करणारी सुज्ञ माणसं (unknown त्यांस माझा सलाम) असली आणि त्यातुन बोध घेणारी सुशीक्षीत माणसं असली तरी ह्या स्पर्धेच्या जगात ही जीवनाची विस्कटलेली घडी आपण व्यवस्थीत करु शकतो ?

परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.

Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.

आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.

शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!

खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.
जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...

अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.

शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
पण ईतर देशातील शिक्षण पद्धती भारतात का वापरली जात नाही ?
त्या देशातील ( पेहराव ,भाषा,संस्कृती, model,smart city,bulet train,ईतर ) अनावश्यक म्हणता नाही येणार पण शिक्षण पद्धती का नाही ?
नक्की विचार करा......
#नित#
                                                                                                                                 नितेश पाटील

Sunday, March 15, 2015

गुढीपाडवा......एक गाव एक उत्सव

सस्नेह जय शिवराय

  माझा पहिला लेख....भाग पहिला

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

        ज्या परंपरेतून,संस्कृतीतून आपल्याला जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं ती जागृत ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरा या अनाधिकाळापासून चालत आलेल्या आहेत. त्यांना ऐतिहासिक परंपरा आहेत. सध्या वाढती असुरक्षितता आणि सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा यामुळे माणूस स्वतःमध्ये गुंतला आहे. पण तो आपल्या संस्कृती, परंपरेशी आजही वेगळा झालेला नाही. आज समाजात लोकांचा सण, उत्सवांकडे कल वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही सण, उत्सवात सहभाग घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढतेय. 
          पण दुसरी बाजू अशीही आहे कि समाजात फोफावलेल्या राजकारणामुळे परिणामी उद्भवलेल्या वादामुळे सण,उत्सवही त्या त्या पक्षाचे होऊन राहिलेत. परिणामी ठराविक माणसं सोडली तर दर्शनाव्यतिरिक्तN तिथे कुणीही फिरकत नाही. आणि सुज्ञ माणसेही फक्त शिष्टाचार म्हणून त्यात आखडता सहभाग घेतात. सण, उत्सव साजरे जरी होत असले तरी पाहिजे तेवढा प्रतिसाद म्हणजे सर्व समावेशक असा मिळत नाही. हि वास्तुस्तिथी आहे.
         आमच्या गावातील हीच परिस्तिथी बदलण्यासाठी गावातील नवयुवक आणि नवयुवतींनी पुढाकार घेऊन "गुडीपाडवा धनसार एक गाव-एक उत्सव" हि संकल्पना साकार करण्याचे ठरवले. आणि सर्व समावेशक प्रतिसाद मिळवा यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. उत्सव हे मनाला आनंद , उभारी देणारे असतात. त्यामुळे ताणतणावाच्या निरसनासाठी मनस्वास्थासाठी अशा उत्सवांची अधिक गरज वाटू लागली आहे. पण ते निपक्षी आणि पारदर्शक असावं.
(क्रमश:)
नितेश पाटील (पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग दुसरा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

            मराठी महिन्यांतील चैत्र महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. नव वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारून सुरू होणाऱ्या नववर्षांचे स्वागत केले जाते. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. असं सांगतात की जेव्हा ब्रह्मदेवाने ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी उभारली जाते. तसेच प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांच्या वनवास संपवून अयोध्येला परत आले तोच हा दिवस. त्या दिवशी सर्व अयोध्यावासीयांनी गुढ्या, तोरणं उभारून श्रीरामांच स्वागत केल तो हा दिवस.
        हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारले गेले आहेत. त्यामुळे ही चंद्र कालगणना आहे. ख्रिस्ती महिने किंवा इंग्रजी महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. त्यामुळे ती सौर कालगणना आहे. हा दोन्ही कालगणनेत महत्वाचा फरक आहे. सहा ऋतू आणि बारा महिने त्यातील वसंत ऋतूच्या महिन्यातील पहिला दिवस गुढीपाडवा.
           वसंतातील चैत्र महिन्यात जर आपण सभोवतालच्या सृष्टीचं अवलोकन केलं तर असं लक्षात येत की शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळती, निष्पर्ण झालेले वृक्ष हे चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल लागताच कोकीळ आपल्या कंठातून सु-स्वराने गात असते. निसर्गातल्या परिवर्तनाचे, नव चैतन्याचे, नव सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचं हा हि त्या मागचा एक उद्देश आहे.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग तिसरा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

            एक गाव एक उत्सव हि संकल्पना अतिशय सुंदर आणि साजेशी पण ती प्रत्यक्षात उतरवणं तेवढच शर्थीच काम. कारण त्यासाठी त्या उत्सवात संपूर्ण गावातील ग्रामास्थांनचा  सहभाग असनं अपेक्षित. आणि आताच्या राजकारणमय वातावरणामध्ये ते करणे म्हणजे ..? कारण दूषित वातावरणात श्वास गुदमरत असतो. त्यात संचार करणं सुज्ञ माणूस नेहमी टाळत असतो. आणि हल्ली ती अवकळा साऱ्याच ठिकाणी पसरली आहे. पूर्वी आमच गावं असं नव्हत. सर्व गुण्यागोविंदाने उत्सव साजरे करायचे पण आता गाव एक आणि दुखणं अनेक अशी गत झाली आहे . कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा मीपणा नकळत का होईना येऊ नये. शेवटी व्यक्तिमत्वाचा प्रभाव चांगला अथवा वाईट हा जनमानसात पडतच असतो. परिणामी दुरावा निर्माण होतो. लोकांनीही नजरेआड न करता पारदर्शकता जागृत करायला हवी.पाठीमागे बोलून कोणत्याही गोष्टी साध्य होत नसतात.
       आणि आम्ही साऱ्यांनीच ठरवलं होतं परदर्शकतेला प्रथम प्राधान्य. वारंवार चर्चासत्र घेऊन संपर्कात राहायचं.  गावातील तरुण पिढीनी ते सार्थ करण्याचं धाडस केलं. कारण गाव कितीही भावनिक दृष्ट्या दूषित झालं तरीही आमच्याच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये एक साम्य असते ते म्हणजे गावातील बहुतांशी ग्रामस्थ हे गावातील राजकारणाला म्हणा, त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला म्हणा,परस्परांतील वादाला म्हणा, कंटाळलेले असतात. त्यांना एका निपक्षीय वर्गाची गरज असते, परदर्शकतेची गरज असते.आणि दुसरं म्हणाल तर आजच्या नवीन पिढीला आपली मराठी संस्कृतीचं दर्शन घडवून देनं, आपली मराठी संस्कृती टिकवणं, गावाची एकात्मता वाढीस लावणे ह्यासाठी हे पाऊल मोलाचं ठरणार होतं.
                      आम्ही जसजशी गावातील ग्रामस्थांना आळीआळीमध्ये जाऊन हि संकल्पना सांगू लागलो तसतसा समोरून उत्स्फूर्त प्रतिसाद येऊ लागला. आम्ही काही नियमावली तयार केली होती ती हि आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू लागलो. अर्थातच भव्य शोभायात्रा काढायची म्हणजे खर्चिक बाब आलीच कि ! त्यातही सर्व ग्रामस्थांचा समावेश असावा , कुणीही काश्याप्रकारेही मदत करू शकणार होता. पैशांमार्फात , वस्तुंमार्फत पण तिथे एक अट होती कि कुणीही कितीही मोठी मदत ह्या शोभा यात्रेसाठी केली तरीही त्या व्यक्तीच नाव कुठेही घेतलं जाणार नाही. त्याचा "ग्रामस्थ धनसार" म्हणूनच उल्लेख केला जाईल. हा उत्सव साजरा करताना कुठचीही कमिटी नेमली जाणार नाही. जमा झालेली ऐवज आणि त्याचा जमाखर्च कार्यक्रम संपल्यानंतर तात्काळ घेऊन शिल्लक रकमेची विल्लेवाट लावण्यात येईल. ह्या अटी आम्ही ग्रामस्थांची सभा घेऊन सर्वसहमतीने मान्य केल्या. आता हा उत्सव आमचा नव्हता तर  गावातील सर्व ग्रामस्थांचा होता आणि त्याच्या शीर्षकावर शिक्कामोर्तब झालं.
(क्रमशः)
नितेश पाटील(पालघर,धनसार)

  माझा पहिला लेख....भाग चौथा

गुढीपाडवा धनसार - एक गाव एक उत्सव 

                                 || श्री भवानी माता प्रसन्न ||
                      धनसार एक गाव एक उत्सव
    आयोजक :- ग्रामस्थ धनसार
         युवा पिढीने नव्हे ग्रामस्थ धनासर ने आयोजित केलेल्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ,नवीन पिढीच्या संस्कृती दर्शनासाठी , आपली संस्कृती जपण्यासाठी , गावातील एकात्मतेसाठी गुढीपाडवा भव्य शोभायात्रेने करण्याचे निच्छित झाले . आणि त्यामध्ये पारंपारिक पोशाख, लेझीम, पिरॅमिड चाही आवर्जून समावेश होता. त्याचा सराव एक महिना आधीपासून रोज सायंकाळी ६.०० वाजेपासून गावातील भवानी मातेच्या मंदिरात होऊ लागला .
         नववर्षाच्या आदल्या दिवशीच्या रात्री गावातील ग्रामस्थ उत्साहाने सुशोभिकरणासाठी मग्न झाले होते.विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता. सर्व रस्ते रांगोळीने सुशोभीत करण्यात आले. जागोजागी कमानी उभारल्या गेल्या. रस्त्याच्या दुतर्फा भगव्या पताक्यांचा साज चढवला गेला. आणि पाहता पाहता तो हि दिवस उजाडला ......
 चैत्र शु. प्रतिपदा शके १९३६ दि. ३१ मार्च २०१४ नुतन वर्षारंभ, नविन पहाट , नविन सकाळ .....सकाळी  ५.५० वाजता ग्रामस्थ मंदिरात पारंपारिक वस्त्रामध्ये जमा होऊ लागले. ढोल, टाशा, लेझीम, भगवे पेठे, भगवे झेंडे आणि सारं वातावरण प्रफुल्लीत, उत्साही, आनंदमय, भगवामय होऊन गेलं. मंदिरात गुढी उभारून तिचं ब्राम्हणाच्या हस्ते विधिवत पूजन करून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत सहभागी होणारी बैलगाडीही सज्ज झाली होती. तिलाहि संस्कृतीचा साज चढविला होता.आणि तिच्यावर साकारलेल्या चलचित्रात अभंगात तल्लीन झालेले संत तुकाराम हे खास आकर्षण मोहून टाकणारं होतं. पाहता पाहता गावातील बहुतांशी ग्रामस्थांनी ह्या शोभायात्रेची शोभा 
वाडवली .आणि शिस्तबद्ध पद्धतीने शोभायात्रा पूर्ण गावामध्ये मोठ्या उत्साहात फिरवन्यात आली.ढोल ताश्यांच्या गजरात (ढोल,ताशा वाजवणारे गावातीलच युवक होते) भवानी मातेकी जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या गजरात आसमंत दणाणून गेला.त्यात विशेषकरून महिलांचा पारंपारिक पेहराव, स्वप्नातील पऱ्या चिमुकल्या रुपाने पारंपरिक पेहरावात जणू खाली उतरल्या होत्या आणि लेझिम पिरॅमीड ह्यांनी शोभायात्रेची मजा आणखीन आकर्षक झाली.
            लेझीम नृत्यातून शिवसृष्टी साकारण्यात आली होती. त्यात शिवरायांच्या जीवनातील विविध पराक्रमाचे दृश्य दाखवण्यात आले होते. खानाचा वध, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असे बरेच प्रसंग. सरते शेवटी शोभायात्रा पुन्हा मंदिरात येऊन ती संपली असं जाहीर करण्यात आलं.तदनंतर त्याच पारंपरिक पेहरावात आम्ही एका दुचाकीवर एक युवक आणि एक युवती हातात भगवा ध्वज घेऊन सव्वीस जन धनसारहून पालघर , शिरगाव आणि पुन्हा धनसार अशी दुचाकीचीवरची मिरवणूक पार पाडली. खरोखरच तो उत्साह, जल्लोष भन्नाटच... नववर्षाचे स्वागत करावे तर असे. 
       सायंकाळी मंदिरात सत्यनारायणाची पूजा संपन्न करून कार्यक्रमाचा शेवट केला गेला. ह्यावरून माझ्या मते  एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपण जर निस्वार्थी मनाने कोणताही कार्य करण्यास हाती घेतलं तर परमेश्वरा बरोबरच आपल्या सानिध्यातील जनसमुदाय आपाल्या बरोबर राहत असतो.दरवर्षी त्याच जल्लोषात, उत्साहात आम्ही हा सण साजरा करतो आणि या पुढेही करत राहणार.आणि विशेष म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांनीही या कार्यक्रमाची दखल घेतली होती.
एक गाव एक ऊत्सव
जल्लोष नववर्षाचा.....
मराठी अस्मीतेचा.....
हिंदु संस्कृतीचा.....
सण ऊत्साहाचा......
मराठी मनाचा....
(समाप्त)
नितेश पाटील(पालघर,धनसार)
Watch "Gudipadava dhansar 2015" on YouTube - Gudipadava dhansar 2015: https://youtu.be/N84QGzLiwj4
# नित #
                                              सण उत्साहाचा मराठी मनाचा 
                                                          नितेश पाटील (पालघर,धनसार)