Tuesday, July 31, 2018

भेटतेस ना...!!

सखे...
तू नसतांना...
मध्यरात्र उलटून गेलेली,
अंधार बाहेर बसला होता.
माझीच वाट पाहत कदाचित...
तरीही पाऊले बाहेर काढली
अन चालत राहिलो
अंधारचं पांघरून घेतलेल्या
वाटांवर... कारण
या वाटा भेटत असतात
एकमेकांना...
म्हणूनच तर...
अंतहीन असतात,
ही गावं, ही शहरं
तू ही असशील
जोवर, मी आहे
ठाऊक आहे मला
दोन समांतर रूळ
कधीही भेटणार नाहीत
एकमेकांना...
म्हणूनच चढलोय मी,
त्या रुळांवर
निर्धास्त धावणाऱ्या गाडीत.
अंधारातली वाट सोडून...
नेहमीचा आपला दुसरा डब्बा
त्या गाडीतली गर्दी
निर्मनुष्य भासते मला...
त्या गाडीतला गोंधळ
ऐकूच येत नाही
इथे आपली भेट,
होऊच शकते
नेहमीसारखी
आत्ताही
जर ठरवलस तू...
मग... भेटतेस ना..!!
वाट पाहतोय मी.
बघ कुठलं स्टेशन
तुला जवळ करता येईल...
©___नित

Friday, May 4, 2018

रिंगण

#रिंगण
____सॅक कधीची पॅक करून ठेवलेली. नुकताच गजरात एक वाजलेला. बाहेर पडलो. बाहेर किर्र अंधार. नभात मेघ आणि चंद्राचा लपंडाव चालूच होता. पिंपळपानांची सळसळ थांबून पुन्हा जोम घेत होती. दूर वळणावर खांबावर लटकलेला दिवा, अधून मधून प्रकाश दाखवत होता. गल्लीत मागच्या बाजूला कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता. वाड्यात सरपानावर बसलेलं मांजर मधेच म्याव करत होतं. कुडमेढिला उतळीची खुसपुस चालू होती. मधेच कुठूनतरी एखादा बेडूक कुणालातरी आवाज देत होता.
____लपंडाव खेळता खेळता मेघ आता निथळू लागले होते. तितक्यात हलकेच वीज चमकून गेली. भिजलेल्या पिंपळपानावर चंदेरी साज क्षणिक लखलखून गेला. वाघाला क्षणात काही दिसावं आणि त्याचा गुरुर जागा व्हावा तसे मेघ काहीसे गुरारून थांबले. अंधारात निजलेल्या वाटेनी कूस बदलली. आणि मी सॅक पाठीवर टाकून बाईकला सेल्फ मारला. पावसाळ्यात बहरलेल्या कुंपण वृक्षांच्या गर्दीतून, रस्त्याला उजेड दाखवत मी डांबरी रस्त्यावर पोहचलो. वळणावर लटकलेला दिवा आणि गाढ झोपेत असलेलं गाव मागे सोडून पुढे निघालो. एव्हाना गावाची वेस ओलांडली.
____ वाट अजून जागीच होती. तीच तसं माझ्यावर खूपच प्रेम. आजही ती माझ्या सेवेसाठी तत्परच होती. पूर्ण पावसात भिजलेली, म्हणाल तर अगदी धुऊन निथळत असलेली, निर्वाहान, निर्जन अशी. माझ्या पुढे जाण्याने ती पुढे पुढे चमकत जाई आणि मागे म्यान होई. पण काळ ओढवलेले बेडूक, काही सरपटणाऱ्या प्राण्यांचा भार उचलेली, तर पाऊस वाऱ्याने कंठस्थान दिलेला पाचोळा, आपल्या पाठीवर घेतलेली. त्यात कमी म्हणून आपल्या अंगावर मायबाप सरकारच्या कृपेने खड्डे मिरवत निजण्याचे सोंग घेतलेली. आपल्याच तंद्रीत.
____तिची तंद्री तोडण्यासाठीच, पावसाने आपला वेग वाढवला बहुतेक. गाडीच्या लख्ख प्रकाशात समोर पडणारे अगणित थेंब त्या वाटेवर आदळून आपलं अस्तित्व संपवत होते. मात्र ते संपत असतांना, त्या साऱ्यांचा मेळ होऊन वाटेवर एक नितळ परत अस्तित्वात येई. त्या परतीवर पडणारे थेंब अगणित रिंगण तयार करीत. पण त्या थेंबाला त्या रिंगणाची व्याप्ती कळण्याआधीच त्याचे अस्तित्व संपून जाई. जरी ते थेंब त्या रिंगणांच्या केंद्रस्थानी असले तरी... अशी ती अगणित रिंगणे छेडत मी स्टेशनवर पोहचलो.
____पाऊस आता थांबला होता. गाडी येण्यास अजून अवकाश होता. तिकीट काउंटरवर तिकीट घेतले कुर्ला व्हाया दादर, आणि पालघर स्टेशन स्पेशल चहा आणि मिसळपाव हाणला. फलाटावर मुसफिरांची तुरळक गर्दी होती. काही अस्ताव्यस्त लंबी टाकून दिलेले. मग त्यात बाकांवर, तर काही आडोसा शोधून फलाटावर, तर काही पदचारी पुलावर. काही डोळ्यात झोप घेऊन गाडीची वाट बघणारे. आणि विशेष म्हणजे दोन कुत्र्यांच्या टोळ्या होत्या, एक बारा पंधरा असतील. अर्धे एक नंबरवर, तर अर्धे दोन नंबरवर. राहून राहून त्यांचं काय संभाषण चालायचं, त्यांचं त्यांनाच ठाऊक. रेल्वे क्रॉस करायची मात्र हिंमत कुणाकडेही नाही. पळवून पाहिलं पण पुन्हा जैसे थे. शेवटी मीच मागे गेलो.
____इथे थोडी शांतता होती. वटवागळांचे खिदळने स्पष्ट ऐकू येत होते, दिसत होते. त्यांच्या साठी रात्र म्हणजेच दिवस असतो म्हणायचा. पण पिंपळ झाडांच्या शाखांवरचा, दिवसाच्या मानाने काहीसा भार हलका झालेला दिसला, बरं वाटलं. दिवसा इथली दोन्हीही पिंपळाची झाडे उलट्या लटकलेल्या वटवागळांच्या गर्दीने पूर्णतः भरलेली असतात. बऱ्यासश्या निष्पर्ण झालेल्या फांद्या अन त्यांना एकमेकांना खेटून उलटी लटकलेली वटवाघळे. एक अद्भुत नजारा असतो. बऱ्याच उशिराने का असेना पण रूळ समांतर बघत अहमदाबाद पॅसेंजर आली. आणि ते सारं तिथेच सोडून, मी तीत बसून रवाना झालो...
____नित(९६३७१३८०३१)
नितेश पाटील
१५/७/१५

Sunday, December 17, 2017

आज्जी

तर...
गम्मत अशी झाली, आज मी अंधेरीला चाललो होतो. 9.05 च्या बोरिवली लोकलने मी जाणार होतो. मी तिकीट काढून पालघराला प्लॅटफॉर्म 2 वर थांबलो होतो. त्या आधीची वसई लोकल माझ्या समोर निघून गेली.
मागून आवाज आला, "अरे नितेश भाऊ, कुठे चाललास..?" मी म्हंटल "अंधेरी. अन तू कुठे रे अभि Abhi ..."
"अरे वसईला चाललो..."
" आत्ताच गेली की वसई..! आणि असा वैतागलेला का दिसतोस..??"
"हो ना रे, त्या म्हातारीने सकाळ सकाळ सटकवली यार..!"
"का काय झालं..??"
"चल आधी सँडविच खाऊ चल, तुला सांगतो."
"ये मामा दोन टोस्टेड दे रे"
"अरे काय झालं काय..."
" अरे लगबगीने मी घरून आलो, गाडी पकडायची म्हणून... तसा उशीरच झालेला रे... त्यात सकाळची वेळ, तुला माहीत आहे ना किती रांग असते ती...
"हो ना..."
तोवर मामा हातात प्लेट घेऊन "येलो आपका सँडविच" त्या प्लेट घेतल्या आणि आम्ही खाऊ लागलो.
मी म्हणालो "हा तर पुढे..."
"हा... तर, नशीब मित्र भेटला, गाडीची वेळ झालेली...  त्याला म्हंटल माझं एक वसई रिटर्न काढ... आणि मी वाट पाहत थांबलो... अगदी दोनच मिनिटात एक आज्जी माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या... अरे पोरा इथे नुसताच उभा आहे तर जरा रांगेत उभा राहतोस का..? मला गाडी पकडायची आहे. तोवर मी माझं पटकन एक काम करून येते... मी म्हंटल ठीक आहे. त्यांना तिकीट कुठलं हवं आहे... हे विचारायच्या आत त्या वंटास झाल्या... म्हंटल येतील. पाच मिनिटं निघून गेली, तरी या काही आल्या नाहीत. माझा मित्र मात्र माझं तिकीट घेऊन आला. आणि म्हणाला
"अरे मला म्हंटलस ना तिकीट काढायला ?  मग रांगेत काय करतोस ?" त्याला म्हंटल
" अरे बाबा असं असं झालंय..."
"बरं तू वृद्धसेवा कर... गाडीची वेळ झालंय... मी हा निघालो." आणि तो गेला निघून... आता विंडो जवळ मी पोहोचलोच होतो... मला नंबर सोडता ही येईना... ती स्पीकर बाई पण पण बोलली की गाडी येतेय म्हणून... आणि आली सुद्धा गाडी... पण करणार काय...? आज्जी आल्या तर... शेवटी आता गाडी गेल्यातच जमा... विंडोजवळ पोहचलो आज्जी काही आल्या नाहीत... आणि गाडी सुद्धा निघून गेली..."
" अरेच्चा..!! आजीने थर्ड मारली तर..."
" हो ना यार... इथपर्यंत तर ठीक होतं... पण पुढे ऐक... अरे मी आत प्लॅटफॉर्मवर शिरलो आणि आज्जी माझ्या पुढ्यात... त्याही हातात तिकीट घेऊन... अश्शी सनकली ली न..!! तुला सांगतो... पण काय करणार... पुळका सेवेचा मलाच आला होता ना...!! न ऱ्हाहून मी विचारलंच... आज्जी तुम्हाला तिकीट दुसऱ्याकडून काढायचं होतं, तर तुम्ही मला रांगेत का उभं केलंस...??
"अरं पोरा, ताटकळलास का रे...??"
"नुसता ताटकळलो नाही, तर माझी गाडी सुद्धा निघून गेली..."
"माफ कर पोरा... पण तू दिसला नाही मला... म्हणून मी दुसऱ्याकडून घेतलं तिकीट काढून... पण तू खूप मोठ्ठा होशील हो..."
"बरं म्हंटल, चला आता... आणि आलो निघून.... काय करतो आता..!!"
अरे चिढही आली..., हसूही आलं..., आणि भारी पण वाटलं बघ...."
मी म्हंटल "भारी..!!"
"हो मग, खूप मोठ्ठा होईल असा आशीर्वाद दिलाय बघ आज्जीने... आणि असंही मला मित्र म्हणतात रे... तुझी हाईट खूप छोटी आहे म्हणून... हा हा..."
"चल आली गाडी, नाहीतर ही पण सुटायची....

___नित 9637138031
नितेश पाटील (धनसार,पालघर)

नशा

#नशा
नशा नाही अशी माणसं सापडणे म्हणजे दिव्यच. नशा म्हणजे काय..!! सवयच की... त्यात चांगल्या सवयी आणि वाईट सवयी असे वर्गीकरण आपण करतच असतो. चांगल्या सवयी माणसाला तारतात, त्याचं आयुष्य समृद्ध बनवतात. तर वाईट बुडवतात. वाईट सवयींच्या अति आहारी गेल्यामुळे, सर्वस्व हिरावून  माणसाचं आयुष्य रीतं होऊन जातं. आणि या स्तिथीतील बहुतांशी माणसं दारूच्या आहारी जातात.

झिंग चढवुनी झाले द्रव्य पसार आहे
खच रिकामी बाटल्यांचा बेसुमार आहे

परवा माझा एका मित्र भेटला होता. आईबाबांचा एकुलता एक मुलगा. पैसा अडका काहीच कमी नाही. बाबानेही आपली होती नव्हती तेवढी जमीन विकून बक्कळ रुपये साठवलेले. त्यामुळे काय साहेबांची मज्जा. कामधंदा करायचा नाही. दारात दुचाकी, चारचाकी उभ्या. बुलेटवर सेल्फ मारून उनाडायचं काम जोरात... ब्रांडेड वस्तूंचा भारी नाद. मग कपडे असो, शूज, चप्पल, घड्याळ, इव्हन आंतरवस्त्र देखील. आणि आजकाल तर विदेशी दारूचीही लत जडलेली त्याला. ( आता देशीवर आलाय ) उचे लोग उची पसंद... अशी ख्याती.

आता ते किती दिवस पुरणार ना..!! पाचशे रुपये मागत होता माझ्याकडे... मी पाहतच राहिलो त्याच्याकडे... मी दिले, पण त्याला म्हंटल. भाई तुझ्या इतक्या हाय प्रोफाईल सवयी होत्या. त्यात जर एक आणखीन सवय जडवून घेतली असती ना.., तर हि वेळ तुझ्यावर आली नसती. त्याने म्हंटल "कोणती ?" म्हंटल तुझ्या बंगल्यावर पाण्याची टाकी आहे. आहे ना ? की फक्त ब्रांडेड रिकामी बाटल्यांचाच खच पडला आहे."

"हो, आहे ना..." त्यातून जसं तुझ्या बंगल्यात पाण्याचा पुरवठा होतो, आणि ती टाकी रिकामी होण्याआधी तू त्यात पाणी भरतोस ना..!! त्याचप्रमाणे तिजोरीतही रुपयाची आवक असायला हवी की नको...? नाहीतर ती रिकामीच होणार. आणि तुला फुकट मिरवायची सवय असल्यामुळे.. अर्थात तुझ्या बाप कमाईवर... तुला अंगमेहनत कधी जमलीच नाही. आणि आज असे दुसऱ्यांसमोर हात पुढे करावे लागत आहेत. म्हणूनच मित्रा... शौक कितने भी बडे हो, उन्हे अपने सही कर्मो के सहारे हि बरकरार रखा जा सकता है..."

एक लक्षात घे मित्रा... प्रत्येक गोष्टीला एक हंगाम असतो, आणि त्याचा अंतही अटळ असतो. धन, संपत्ती, ऐश्वर्य त्याला अपवाद नाहीत असं मला वाटत. पण फळ, फुलांचा हंगाम संपून गेल्यावर पुढच्या हंगामाचे लक्ष ठेऊन, माळी जसा  ते फळ देणाऱ्या झाडांना जपत असतो, त्याची मशागत करत असतो. त्याच प्रमाणे माणसाच्या आयुष्यातील चढ उताराना सामोरं जाण्यासाठी, त्याच्या आयुष्यात सदोदित सुकर्माची अहम भूमिका असते. बाकी बघ अजून वेळ गेलेली नाही.

दुनिया बहुत बडी है, फैसले की घडी है...
कर हौंसले बुलंद, आगे जिंदगी पडी है

___नित ९६३७१३८०३१
नितेश पाटील ( धनसार, पालघर)

Thursday, November 16, 2017

पसायदान

🚩पसायदान....🚩
मनाला थक्क करणारी निस्पृह विश्वप्रार्थना..

ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त "माऊली" हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.

माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या...जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.

आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.

मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू...

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥

- या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे.

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥

- मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्ती चे लोक आहेत त्यांच्या चा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.

- भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

- जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

- इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर "माणुसकी" हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.

वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

- या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या "नश्वर" गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच "सुख" मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.

चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.

- माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

- जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा  सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

- विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥

- आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.

- जीवन सुखी करणे हे काही Rocket Science  नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका.

येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

- हे विश्वेशराया... हे जगाच्या मायबापा बापा... तू जेव्हा म्हणशील ना कि हे दान दिले.....तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल...

तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्त... ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ९००० ओव्यांचे हे सार आहे... एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगद्माउली ने ८०० वर्षापूर्वी पाहिले. आजतागायत अखंड आळंदी यात्रा चालू आहे, लाखो लोक या भक्तीसागरात बुडून सदैव हरीसेवेत मग्न आहेत.. ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच Internet चा वापर सत्कार्यासाठी करूया.

🙏🏻🙏🏻🙏🏻रामकृष्णहरि🙏🏻🙏🏻🙏🏻

Sunday, September 24, 2017

पावसाचा कहर

आज पावसाने कहरच केला म्हणायचा...
याला कसं जमतं लगेच साठवायला कोण जाणे...
स्वतः रीतं होतो, आम्हाला मात्र भरून पुरतो
नाही म्हणजे विचार वैगरे काही,
की तसली भानगडच नाही ...
आपली आली लहर आणि केला कहर...
तुला समजायला हवं नारे...
वरूनच बरसतोस ना तू...
तुला दिसत नाही असं कसं मानू मी..
लोकांना वेठीस धरनं कसं रे मनावतं तुला
इथे ऐकलं तरी हळहळतो आम्ही...
आणि पुन्हा पुन्हा का करतोस असं
तुझं बरसनं, तुझं गरजनं, तुझी खळखळ
सारंच ऐकतो ना रे आम्ही..
म्हणजे तू मुका तर नाहीच आहे ना...
मग बोल की तुला नेमकं काय हवंय...
वरून खाली पडतांना तुलाही लागत असेल ना रे
पण तुझ्या इतकं आम्ही कसं सहन करणार
तू मिसळतोस रे कश्यातही
आपलंसं करून टाकतोस
पण आमचं तसं नाही ना
आम्ही किती जाती धर्माची माणसं
माणसं असली तरी,
साऱ्यांची तऱ्हा निराळी जाणतोस ना तू
पण अश्या अडचणीच्या वेळी आम्ही
एक होतो हे ही पहिलंच असेल की तू...
सण उत्सवांचे दिवस...
त्यात आज पाच दिवसांचे बाप्पा जाणार
किती धामधूम असते माहितेय ना तुला...
मगआमच्या हक्काचे फटाके तू का वाजवतोस
आमचे मात्र भिजवून ठेवलेस...
त्या धामधुमीतुन शेवट कसा रडवेला होतो
पाहतोस ना तू...
घरात कायमस्वरूपी असला तरी,
हा बाप्पा विसर्जित करतांना
जीव कासावीस होतोच रे आमचा...
तरीही करून आलो विसर्जन
तेही वाजत गाजत
पाहिलंस असेल तू
अरे रस्ते वाहनांसाठी असतात
त्यावरून तूच वाहत होतास
अरे मग आम्ही चालायचं कोठून
हे तुला कळायला हवं ना यार
अरे तुझ्या येण्याचा आम्हाला आनंदच आहे
पण असा अंदाधुंद नकोस ना राजा येऊ
प्रेमाने जग जिंकता येतं रे
हे आम्हाला नाही कळलं
निदान तू तरी समजून घे
तुंबलेलं पाणी दिसत नाही का तुला...
मग तिथे थांबायला हवं की नको
बघ राजा मी तुला सांगायचं काम केलं
आता तूच ठरव बरं का...
____नित
९६३७१३८०३१

नितेश पाटील (धनसार, पालघर)

Sunday, September 3, 2017

पावसाचा कहर

आज पावसाने कहरच केला म्हणायचा...
याला कसं जमतं लगेच साठवायला कोण जाणे...
स्वतः रीतं होतो, आम्हाला मात्र भरून पुरतो
नाही म्हणजे विचार वैगरे काही,
की तसली भानगडच नाही ...
आपली आली लहर आणि केला कहर...
तुला समजायला हवं नारे...
वरूनच बरसतोस ना तू...
तुला दिसत नाही असं कसं मानू मी..
लोकांना वेठीस धरनं कसं रे मनावतं तुला
इथे ऐकलं तरी हळहळतो आम्ही...
आणि पुन्हा पुन्हा का करतोस असं
तुझं बरसनं, तुझं गरजनं, तुझी खळखळ
सारंच ऐकतो ना रे आम्ही..
म्हणजे तू मुका तर नाहीच आहे ना...
मग बोल की तुला नेमकं काय हवंय...
वरून खाली पडतांना तुलाही लागत असेल ना रे
पण तुझ्या इतकं आम्ही कसं सहन करणार
तू मिसळतोस रे कश्यातही
आपलंसं करून टाकतोस
पण आमचं तसं नाही ना
आम्ही किती जाती धर्माची माणसं
माणसं असली तरी,
साऱ्यांची तऱ्हा निराळी जाणतोस ना तू
पण अश्या अडचणीच्या वेळी आम्ही
एक होतो हे ही पहिलंच असेल की तू...
सण उत्सवांचे दिवस...
त्यात आज पाच दिवसांचे बाप्पा जाणार
किती धामधूम असते माहितेय ना तुला...
मगआमच्या हक्काचे फटाके तू का वाजवतोस
आमचे मात्र भिजवून ठेवलेस...
त्या धामधुमीतुन शेवट कसा रडवेला होतो
पाहतोस ना तू...
घरात कायमस्वरूपी असला तरी,
हा बाप्पा विसर्जित करतांना
जीव कासावीस होतोच रे आमचा...
तरीही करून आलो विसर्जन
तेही वाजत गाजत
पाहिलंस असेल तू
अरे रस्ते वाहनांसाठी असतात
त्यावरून तूच वाहत होतास
अरे मग आम्ही चालायचं कोठून
हे तुला कळायला हवं ना यार
अरे तुझ्या येण्याचा आम्हाला आनंदच आहे
पण असा अंदाधुंद नकोस ना राजा येऊ
प्रेमाने जग जिंकता येतं रे
हे आम्हाला नाही कळलं
निदान तू तरी समजून घे
तुंबलेलं पाणी दिसत नाही का तुला...
मग तिथे थांबायला हवं की नको
बघ राजा मी तुला सांगायचं काम केलं
आता तूच ठरव बरं का...
____नित
९६३७१३८०३१

नितेश पाटील (धनसार, पालघर)