Saturday, May 27, 2017

सफर दार्जिलिंगची

 सस्नेह जय शिवराय
​____बेत आखला आणि तो पूर्णत्वास गेला की मन प्रसन्न होते. आपल्या लेखी असणाऱ्या सुखाची अनुभूती काही काळापुरता आपल्या सोबत असते, यथावकाश त्या सुखाचे महत्व आपसूकच कमी होत जाते. आणि आपण दुसरे सुख शोधण्यात व्यस्त होतो हि शृंखला निरंतर चालू असते. वाटांचा प्रवास करतांना आपण एकाच वाटेवर एकाच ठिकाणी जसे स्थित राहत नाही ती जागा बदलत जातो तसा मनुष्य स्वभाव हि आहे. त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात आपण स्पर्श केलेले पाणी त्या ठिकाणी आपले बनून राहत नाही आणि पुन्हा तेच पाणी आपल्याला कधीच मिळत नाही पण वाहत राहणे हा नदीचा स्वभाव आहे. एकूणच त्यातून मिळणाऱ्या प्रासंगिक, नैसर्गिक आठवणींचा ठेवा आपण नित जपतो आणि जगतोही.
मृगजळ आहे सुख, 
सुखदुःखाची दोस्ती गहिरी, 
समाधान घेऊनी जो हिंडतो , 
सुख त्याच्याच राही पदरी.
ज्या वृत्तीने आपण समाधानाची व्याख्या करतो त्यावर आपल्या आयुष्यातील सुखदुःखाचे आयुष्य अवलंबून असते हे नाकारता येणार नाही.
____२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिवस. आम्ही बेत आखला होता. दार्जिलिंग भ्रमण करण्याचा आणि प्रथमतः पहाटेच टायगर हिल पोहचून सूर्योदयाच्या साक्षीने तिरंगा फडकविण्याचा. तदनंतर जवळपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा.
____रात्रीचा प्रवास तसा मला नवा नाही.त्यात आपल्या वेळेची आणि रुपयांचीही बचत होते. ट्रेकिंग साठी आम्ही नेहमीच रात्री घरून निघणे पसंत करतो. म्हणजे पहाटेच शिखर चढण्यास सुरवात करता येते आणि वेळ असेल तर तत्पूर्वी एक दोन तास आरामही करता येतो. तशी हि ट्रेक नसली तर इतर गोष्टी लक्षात घेऊन आम्ही रात्रीच निघणार होतो. रात्रीचे दिसणारे मनोरम दृश्य तुम्हाला दिवसा प्रकाशात मोजता येत नाही आणि ते दिसतही नाही.अंधाराचे जाळे वसुंधरेवर पसरलेले असले तरी ती त्या अंधारात चांद ताऱ्यांच्या साक्षीने मनमुराद जगत असते.माणूस ज्या प्रमाणे दिवसाच्या प्रखर उजेडात जे पाहू शकतो त्याहून कैक पटीने आपल्या अंतरातील स्वप्नशिखरे मिटल्या डोळ्यांनी जास्त पाहतो, ती पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटत असतो. बंद डोळ्यांच्या अंधारात तो त्याच्या अंतिम ध्येय्यपर्यंत अगदी सहज पोहचतो. प्रत्यक्षात प्रकाशात दिसणारी वाट काही अंतरानंतर धूसर दिसु लागते व नाहीशी होते. अर्थात ती नसते असं नाही परंतु दिसत नाही.पण बंद डोळ्यातील अंधारातील वाटही अगदी सहज शेवटपर्यंत दिसते.म्हणजेच माणूस हा बंद डोळ्यांनी जगतो आणि उघड्या डोळ्यांनी संघर्ष करतो.तो संघर्ष मग इतका वाढतो कि रात्रीही डोळे बंद होण्यास धजावत नाही. बंद डोळ्यांच्या वाटाही मग धूसर दिसून शेष होऊन जातात. असो...
___तर २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. आम्ही आज सिक्कीम मधे कामानिमित्त राहत आहोत. त्या रौद्रसुंदर प्रदेशात(रौद्रसुंदर शब्दाचे विश्लेषण पुढे करेलच) आमचे बस्तान अडीच महिन्यांपासून पश्चिम बंगालच्या सीमेवर दार्जिलिंग पासून अवघ्या साठ किमी अंतरावर सिक्कीममधील मानपूर गावात तिस्ता उपनदीच्या किनाऱ्यावर आम्हास मांडावे लागले. वितभर पोटासाठी माणूस नित पळत असतो. जगण्याच्या नादात जगणे विसरत संघर्ष करत असतो. प्रपंचाचा डोलारा सोबत घेऊन तथाकथित जीवन जगत असतो. 
मोहमायेच्या पिंजरा, 
हा जीव उगा गुंतला, 
पुसून सारे ललाटीचे, 
पुन्हा चालव तू कुंचला
म्हणत परमेश्वराला साद घालत असतो. पण 
सताड मोकळ्या दाही, तरी मी गुंतलो एकाकी
अशी आपली गत असते. असो...
____ येत्या २६ जानेवारीला दार्जिलिंच्या टायगर हिल वरून सूर्योदय पाहून निसर्गाची अभूतपूर्व किमया या डोळ्यांना इतर साऱ्या प्रापंचिक सुखदुःखाचा विसर पाडून स्वर्गानुभूतीचा अनुभव देईल, असे एका बंगाली बाबाने म्हंटल्यापासून ओढ आणखीनच वाढली होती.
___आणि रात्र उजाडली. २५ जानेवारी २०१७. तो सूर्योदयाचा अद्भुत क्षण कधी न देखलेल्या डोळ्यांना, अंतरातील नाविन्य पाहू पाहणाऱ्या हावरट जीवाला दाखवण्यापासून चुकू नये म्हणून रात्रभर न झोपताच पहाटे तीन वाजता इथून प्रस्थान करण्याचे नक्की झाले. आता या गुलाबी थंडीलाही लाजवेल अश्या थंडीत रात्र काढायची तर शेकोटी शिवाय दुसरा पर्याय नव्हता, अंगणात शेकोटी पेटवली आणि चर्चेचा फड रंगला. देशात तिरंग्यासाठी दिलेल्या आहुत्यांचे, त्या आहुत्यांतून पूर्णत्वास गेलेल्या, काही अपूर्ण यज्ञाचे, आजही या क्षणी झटणाऱ्या त्या तमाम ज्ञात अज्ञात वीर देशप्रेमींचे स्मरण करून आपण या देशासाठी काय करू शकतो यावर चर्चा सुरु झाली.
____चर्चा वस्तुस्थीतीशी जेव्हा निगडित असते तेव्हा त्या चर्चेला अधिकच रंग चढतो. जेव्हा ती चर्चा स्वतःची निगडित असते तेव्हा ती व्यापक होते.आपण या भारतभूमीचे रहिवाशी आहोत आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असलाच पाहिजे, पण हे तेव्हा कळतं जेव्हा आपण आपल्या देहबुद्धिवर चढलेली प्रापंचिक धूळ झटकून देशातील वैविधतेनें नटलेल्या रंगांचे वस्त्र परिधान करून देशात, समाजात वावरतो. तसे तर आपण आपल्या प्रपंचात जरी गुंतलो तरी देशातील बदलत्या ऋतूंचे चांगले वाईट भोग आपसूकच आपल्या वाट्याला येत असतात, त्यातून सुटका होत नाही.आपण स्वतःचे जीवन सुखी व्हावे म्हणून संघर्ष करतो पण आपल्या सर्वांच्या जीवनात सौख्य नांदावे म्हणून लाखो लोक जिवाच्या आकांताने झटत आहेत, हि जाणीव आपल्याला असायलाच हवी.
____माणसाच्या देहात विभिन्न अंग आहेत आणि त्याला ठेवलेलं नाव हि त्याची ओळख आहे. मी नितेश म्हणजे माझा देह नाही. विविध अंगाची द्वेषविरहीत सलोख्याने नांदणारी प्रतिकृती म्हणजे देह. त्यात माझं असं काहीच नाही. प्रत्येक अंगाचं नाव वेगवेगळे आहे, कार्य वेगवेगळे आहे. एका अंगाला इजा झाली तर त्याची झळ पूर्ण शरीराला सोसावी लागते. घाव जिव्हारी लागला तर पूर्ण देहाचं नुकसान होतं. साध्या नखाला इजा झाली तरीही. त्याचप्रमाने देश जरी वैविधतेनें नटलेला असला तरी, त्या देशातील प्रत्येक प्राणिमात्र हा भारतीय धाग्याने जोडलेला आहे. त्याचा पसारा मोठा असल्यामुळे त्याला झालेल्या इजेची झळ आपल्यापर्यंत उशिरा का होईना पण पोहचतेच.म्हणून ते नाते दृढ, अतूट आहे. या नात्याने तिचा अवमान होईल, तिला इजा होईल असं आचरण माणुसकीला शोभणारे नाही. 
___आज बहुतांशी लोकांचे देशप्रेम फक्त निगडित काही वेळेपुरता उचंबळून येते.तदनंतर जो तो आपापल्या मार्गाने भ्रमण करतो. आता देशप्रेमाची व्याख्या प्रत्येका लेखी वेगळी असते हा हि भाग आहेच. स्वार्थी माणसे देश तर सोडा पण वेळीस आप्तजनांसही कानाडोळा करतात, जन्मदेत्या मायबापासही विसरतात तिथे देशप्रेम ते कसले ? याची कारणेही बरीसची आहेत... परिस्तिथीची झुंज म्हणा, भ्रष्टाचाराने पोखरलेली राजनीती म्हणा, विसाव्या शतकातील रोषणाई म्हणा, त्या रोषणाईत अंधारात बुडत चाललेली तरुण पिढी म्हणा, किव्हा या आणि बऱ्याच अशा  सगळ्यात गुरफटून "मी" च्या अधीन झालेला माणूस म्हणा. देशहितार्थ सामाजिक गोष्टीचं भान ठेवायला आणि पाळायला सध्या वेळच नसेल का ? नसेल बहुदा... कि काही अंशी लोकांनीच ते व्रत घेतले आहे याकडे चर्चेचा ओघ वळला.
____ आपल्या देशाला फार वर्षापूर्वीपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक परंपरेचा वारसा आहे. बऱ्याच प्रभोधनात्मक गोष्टी आपण ऐकतो त्याचप्रमाणे देश घडविण्यासाठी दिलेल्या आहुत्यांचे प्रसंग वीरांनी जगले, जगत आहेत ते आपण फक्त ऎकतो. अशा गोष्टींचे नुसते स्मरण नव्हे तर आचरण व्हावे म्हणून पूर्वी एक मौखिक परंपरा होती आजही आहे. कि माणसाला एखादी गोष्ट कथा रूपाने सांगितली तर ती गोष्ट त्याच्या कायम लक्षात राहते आणि तो त्यातून बोधही घ्यायचा.पण आज फार फार वर्षांपूर्वी म्हंटल कि त्याला निश्चितच कालगणनेची जाणीव नाही आणि सर्व साधारण समाजाला त्याची आवश्यकता नाही.कारण त्यांचे जीवन गतिमान आहे.पण काळाच्या ओघात घडलेल्या घटना आणि घडत असलेल्या घटना यांचा परस्परांशी संबंध असतो हे विसरता येत नाही. आज माणूस नाविन्याचा मोहात पडला आहे.त्यातून त्याच्या वाट्याला अमृतच यावे अशी त्याची अपेक्षा आहे जी व्यर्थ आहे.असो... "नाविन्य समुद्रमंथनापरी, प्रगटे विषामृत दोन्ही, निळकंठ नाही या जगी, प्राशन करावे ते जाणूनी."
___सच्चा देशप्रेमी कुठल्याही परिस्तिथीत देशावर असलेले प्रेम तसूभरही ढळू देत नाही. त्याची मूर्तिमंत उदाहरणे इतिहासात आणि आज सीमेवर लढणाऱ्या सैनीकांत ओतप्रोत भरलेले दिसते. तेवढा मोठा घास नाही तर निदान आपल्या परीने आपण देशाहितार्थ देशाचे संविधान आणि कायदे यांचे पालन केले तरी देशवजा आपलीही आपण सेवा करूच शकतो. 
___आता हेच बघा ना प्रजासत्ताक दिवस म्हणजे काय तर २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकास एका मताचा अधिकार मिळाला आणि मतांच्या आधारानेच प्रजेची सत्ता निर्माण केली गेली. स्वातंत्र्यापूर्वी भारतात विभागलेली राजेशाही होती. विविध स्वतंत्र संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतरही जवळपास ५६० संस्थाने अस्तित्वात होती. नंतर ती भारतात विलीन केली गेली तो भाग वेगळा. पण भारतभूमी एकसंध केव्हा होती आणि तदनंतर भारतवासीयांचे ऐक्य नसल्यामुळे तिचे किती तुकडे झाले हा इतिहास असला तरी आज परिस्तिथी वेगळी नाही. नाहीतर भारतात इतके पक्ष उदयास आले नसते. आपल्याला लहानपणीच शाळेत शिकवले जायचे, एक लाकडाची काठी तोडू शकतो पण काठ्यांचा भारा तोडता येत नाही. आज संघणक युगात ती शिक्षा लोप पावली. भारतात पूर्वी राजेशाही होती आणि "राजा' राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, म्हणजे वंशपरंपरा होती आजही प्रमाण कमी असेल पण फारसा फरक नाही. भारतात प्रजासत्ताक दिनापासून नेत्यांचा जन्म झाला. नेते मतांच्या पेटीतून निर्माण होऊ लागले.
___ आज मतदान प्रक्रियेत देशाचा खर्च आणि शक्ती अमाप खर्ची होत असली तरी आज मतदान कोणत्या प्रकारे आणि किती टक्के होते हे सांगायची गरज नाही. प्रजासत्ताक आणि देशभक्ती या मिरवण्याच्या गोष्टी नाहीत. त्यात प्रत्येकाचा स्वनियंत्रित कायद्यान्वये सक्रिय सहभाग असायला हवा. प्रथम कर्तव्य म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.ज्याला दान या शब्दाचा अर्थ कळला ते मत दान करतात बाकी स्वतःला सुज्ञ समजणारे नागरिक मतदान न करता पिकनिकला निघून जातात आणि अशिक्षित लोकांचा फायदा भ्रष्ट नेते घेतात.असं असेल तर "भारतीय" शब्दाची व्याख्या काय हा प्रश्न पडतो. जर आपण मतदान करत नसाल तर भारतीय व्यवस्थेला दोष देण्याचा अधिकार आपल्याला नाही. स्वतःला भारतीय समजण्याचा नव्हे, मी तर म्हणेन भारतात राहण्याचाच अधिकार नाही. हा आता तसं कायद्यात नमूद नाहीये म्हणा. *"देशाभिमान नसेल उरी, आचरणात नसेल सिद्धता, परोपकाराची नसेल जाणीव, तर मिरावण्यात कसली धन्यता"* प्रजासत्ताक दिवस फक्त साजरा करूनच नव्हे तर आपल्या देशाचे संविधान आचरणात आणून तो चिरायू केला पाहिजे.
___आमची चर्चा काही संपत नव्हती.रात्रीचे दोन कधी वाजले ते सुद्धा कळलं नाही. एव्हाना दोन्ही गाड्या आमच्या सध्या राहत्या झुग्गीजवळ येऊन पोहचल्या आणि आमच्या चर्चेत खंड पडला. चुलीवर चहा ठेवला आणि फ्रेश झालो. घोट घोट चहा घेऊन आम्ही तेरा जण आणि ड्रॉयवर दादा मिळून पंधरा जण चांदण्या रात्रीत पहाटे तीन वाजता निद्रिस्त शिखराच्या कुशीतून, नदीच्या वरच्या बाजूने, निसर्गाशी झुंजाणाऱ्या वाटांना गाड्यांच्या दोन डोळ्यांनी प्रकाश दाखवत दार्जिलिंगच्या दिशेने निघालो.

____आपल्या जीवनात माणूस आयुष्याच्या असंख्य वाटांचा प्रवास करतो. काही खडतर, काही सौम्य, काही जीवघेण्या, तर काही मृतही. त्या वाटेने प्रवास करतो तो स्वतःच्या मतलबासाठी. आणि वाटा ठाम उभ्या असतात ते आपले धेय्य पूर्णत्वास नेण्यासाठी. फक्त आपली त्या वाटा ओळखून त्यावर चालण्याची तयारी असायला हवी. आपण ज्या वाटेने प्रवास करतो त्या वाटांनी आजवर काय भोगलय याचा विचार सुद्धा आपण करायला हवा, म्हणजे आपला प्रवास आपल्याला त्या मानाने सोपा वाटू लागतो. "धेय्य पूर्तीच्या वाटा अनेक, वाटांचे दुःख कोण जाणतो,नवाजली जातात फुले गोमटी, काटेरी झुडूप कोण मागतो"
___प्रत्यक्षातील वाटाही तशाच निसर्गाशी झुंजत असतात.आणि निसर्गाशी झुंजणाऱ्या वाटेवर माणूस संघर्ष करतो. सर्वात जास्त संघर्ष करावा लागतो तो शिखर गाठणाऱ्या वाटांवर. त्यात पाऊसकाळी दिवस असले की मग तर विचारूच नका... आताच तीन दिवसांपूर्वी पाऊस पडून गेला होता त्यामुळेच हवेत गारवा वाढला होता. पावसाचे सत्र मात्र आत्ताच संपले होते. त्यामुळे पावसाळ्यात कोसळलेल्या दारडींचे अवशेष अजूनही रस्त्यांवर जागोजागी दिसत होते. डांबरी पट्टे पुसून गेले होते.पण आताही वरून कधी दरड कोसळेल याचा नेम नव्हता. दोन तीन दिवसात आजही मेल्ली ते जोरथांग रस्ता दरड कोसळून बंद होतोच, म्हणून मनात काहीशी भीती होती. अंधारासोबत धूळ आणि धुळीचेच अस्तित्व रस्त्यांवर घोंघावत होते. त्या धुळीतून वाट काढत आमची गाडी आम्हास घेऊन वीस मिनिटांत मेल्ली चेकपोस्ट वर पोहचली. " सघर्ष कुणाला चुकतो बळेच का कोणी रुसतो, खोडी करेल जेव्हा त्याची सर्प तेव्हाच डसतो "
___पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या दोन राज्यांच्या सीमेवर तिस्ता नदीच्या अलीकडे हि चेकपोष्ट आहे. पोलिसांचा जगता पहारा तिथे होता. पहाटेचा बिगुल वाजला होता. फाटकाची रस्सी थंडीमुळे रस्त्याशेजारी गाडलेल्या गजाला वेटाळून गच्च बसली होती. तिला टांगलेला काटाही तिच्या अधीन होता. आमच्या दोन्ही गाड्या एका मागोमाग थांबल्या. काचा खाली गेल्या ड्रायवर दादा खाली उतरले आणि सरकारी काज उरकून गाडीत बसले. गाडीने त्या फाटकाच्या काट्याकडे विस्फरतेने पाहताच रस्सीने निद्रावस्था सोडून आपली जागा सोडली आणि काटा उंच हवेत गेला. पुढे चांदण्यात पंडित जवाहरलाल नेहरू ब्रिज आमच्या प्रतीक्षेत एकाकी उभा होता. उजव्या हातावर हिरव्या गार बांबूचा कळप वाऱ्याने हेलकावे देत होता.सारेच बांबू तिस्तेचे पाणी पिऊन जणू भरले होते. दोन्ही हातात मावणार नाहीत इतक्या जाडीचे बांबू मी पहिल्यांदाच पहिले.  तिस्ता खळखळून पुलाखालून उजव्या हातावर ब्रह्मपुत्रेच्या दिशेने धावत होती. तिला पार करून आम्ही तिच्या सोबतच शिलिगुडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. "संपेल रात्र म्हणुनी अजून दाट होते, गच्च बिलगून थंडीला मग पहाट होते."
___आम्ही एव्हाना पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला होता. इथले रस्ते त्या मानाने चांगले आहेत. सहा किलोमीटर चालून यू टर्न घेतला. आमच्या गाड्या तीस्ता बाजारात शिरल्या. पहाटेचे पावणे चार वाजले होते. दिवसभराच्या पायपीटीने थकलेला बाजार पहाटेच्या साखरझोपेत शांत पहुडला होता. बाजारातील कुत्रे मात्र ती शांतता भंग करीत होते, त्यातुन वाट काढत आम्ही लोखंडी पुलावरून दार्जिलिंगच्या दिशेने रवाना झालो. साध्या वळणाच्या वाटा सोडून आता आमच्या गाड्या वरच्या दिशेने कूच करू लागल्या. दाट उंच झाडांनी वाटा घेरल्या होत्या.मिट्ट अंधारात नागमोडी, अंगावर येणाऱ्या, चढणीच्या वाटा गाडीच्या डोळ्यांनी प्रकाशात उजळून निघत. त्या पाहताना हृदयाचे ठोके मात्र तिव्र गतीने वाढत होते. ती वर चढत जाणारी वाट पाहून गाडीचा मात्र वेग मंदावला होता. "उंच शिखरांचा नाद सांगा कोणास नसतो, थकून जातात वाटा तिथे श्वासही कोंडतो"
___ताशी १०/१५ च्या दरम्यानच गाडी चालत होती. जसा डोंगरमाथा जवळ येऊ लागला तसा वाटेचा विळखा मात्र अधिकच घट्ट होऊ लागला. पाहिला युटर्न संपत नाही तोवर दुसरा. वाटेत गाडीचे पाय घसरू नयेत म्हणून डांबरी वर खडीचा मारा केला आहे.  रस्त्याच्या एकतर्फा दरीच्या बाजूने बचावासाठी दोन फुटांची हिरव्या सफेद रंगांचे पट्टे असलेली भिंत आणि सुचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल त्या वाटेचे सौंदर्य आणखीनच खुलवते. या वाटांवर गाडी चालवणारा त्यात माहीर असला पाहिजे अन्यथा... दुचाकी तर या वाटेने शक्यतो न नेलेलीच बरी. कारण चढण जरा अतीच आहे. तशा या भागात दुचाकि फार कमीच पाहायला मिळतात.
____आताशी पहिला टप्पा पार झाला म्हणायला हरकत नव्हती. पण चढण अजून संपलेली नव्हती. आमची एक गाडी अजूनही मागेच राहिली होती. हो नाय करता आम्ही वर थांबून त्यांची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. झाडांची गर्दी काहीशी कमी झाली होती. चतुर्दशीचा चंद्र अगदी जवळ भासत होता. आकाशातील तारे मात्र धूसर दिसत होते. दार्जिलिंग अजूनही सोळा किलोमीटर लांब होते. आमच्या गाडीची पावले रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. आणि आम्ही आमची पावले उचलून गाडीतून बाहेर निघालो. थंडी काय असते हे आम्हाला तिथे जाणवू लागलं. आम्ही सारेच बाहेर लटलट काफु लागलो. पुन्हा गाडीत बसावं तोच मागून दुसरी गाडी आली. ती सुद्धा तिथेच बाजूला रुळली. जर थंडीला इथे आताच घाबरणार असाल तर वर काय होईल असा प्रश्न ड्रायवर दादांनी केला आणि सोबत घेऊन रस्त्याच्या पलीकडे घेऊन गेले. पहाटे लोकं गाढ झोपेत असताना हि पृथ्वी, हे अनंत आकाश, हा अभेद्य निसर्ग कसा जगतो हे बघा म्हणून रस्त्याच्या उजवीकडे हात उंचावला. आम्हीही त्या दिशेने पहिले, सर्यांचेच डोळे विस्फरले. अंगाचा कंप क्षणात नाहीसा झाला.

____समोरील दृश्य मनमोहक होते. समुद्र सपाटीपासून ४३००फूट उंचीवर हिमशीखरांच्या रांगेत खालच्या बाजूला असणारे सिक्कीममधील नाम्ची शहर. आम्ही पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगच्या डोंगररांगावरून  पहाटेच्या प्रहरी त्याचं सौंदर्य न्याहाळत होतो. तेथील चारधाम क्षेत्री स्थित शिवशंभुची ६० फूट उंच प्रतिमा रात्रीच्या सजावटी प्रकाशने उजळून दिसत होती.
____पहाटेच्या गारव्यात आकाश चतुर्दशी चंद्रकोरीच्या मध्यान्ही डोके ठेऊन ओस पांघरून निवांत झोपला होता. नकळत त्याच्या आकाशातील तारे चांदण्या या पृथ्वीच्या मोहात पडून डोंगरांच्या कुशीत अवतरल्या होत्या. पौष महिन्याच्या अखेरीस हेमंत ऋतूचा मोह त्यांना अनावर झाला होता. पूर्वषाढा नक्षत्रानेही खाली धाव घेतली होती. त्या साऱ्यात तो नक्षत्र उठून दिसत होता. धरती आनंदाने मदाहोश झाली होती.आनंदाश्रूंने तिचे अंग अंग चिंब झाले  होते. अनंतकाय नभातील आकाशगंगा जणू धर्तीवर अवतरली होती. शुक्रताऱ्याचे तेज आणखीनच प्रखर झाले होते. त्या तेजात श्री शिवशंकराची प्रतिमा पहाटेचे स्नान करत होती. (हिमालयावर साक्षात भागवान शंकरांचा वास असून त्या तपोभूमीत अनेक सिद्ध महापुरूष तपश्चर्या करीत आहेत , असा तेथील रहिवाशांचा ठाम विश्वास आहे. हिमालयावर साक्षात भगवान शंकर वास करत आहेत हि कल्पना पुराण कालापासून चालत आलेली आहे. परंतु ती एक पुराणकथा म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले तरी त्या तपोभूमीत अनेक सिद्धपुरुषांचा वास आहे हि गोष्ट दुर्लक्षित करता येणार नाही. नाम्ची बद्दल पुढे लिखाणात येईलच...) आणि हे असं असताना मात्र आकाश गाढ निद्रेत निद्रिस्त होते.
पहाटेच्या गारव्यात
कसा झोपला निवांत
चंद्र उशाला घेऊनी
नभ ओस पांघरूनी...
चतुर्दशी चंद्रकोर
उशी दिसे तुझी थोर
अंग राहीले झाकूनी
डोई प्रकाश देऊनी...
नकळत तुझ्या आले
तारे चांदण्या पळाले
ऋतू हेमंता मोहुनी
कुशी डोंगरा भुलुनी...
पूर्वाषाढा घेई धाव
दिसे नक्षत्र उठाव
भुमी आनंदे हर्षुनी
चिंब भिजली अश्रूंनी...
अनंतकाय नभात
आकाशगंगा प्रेमात
आली तुला सोडुनी
रात जागते धरणी...
गंगा जटाततून वाहे
चंद्र डोईवर साहे
शिव भोळा भंडारी
निघे शुक्रात न्हाऊनी...
झाली उदयाची वेळ
अस्त स्नेहांचा मेळ
बघ एकदा जागूनी
रोज खेळती रंगुनी...
____सूर्य उदयाची वेळ जवळ आली असताना आम्हाला तिथे फार वेळ देणं उचित नव्हतं. कारण क्षणभर जरी उशीर झाला तर पुन्हा ती वेळ येण्यासाठी चोवीस तास वाट पाहावी लागणार होती. आणि आम्हास  परवडणार नव्हतं. आम्ही इच्छा नसतानाही तिथून निघण्याचा निर्णय घेतला. आता हेच बघा ना !! काटा गजराचा बारावर, पुन्हा बारा तासांनी. आजचा वार, सात दिवसांनी. आजची तारीख, एका महीन्यांनी. आजचा महीना, एका वर्षानी. आजचे वर्ष, पुन्हा कधीच नाही. येईल पण केव्हा एक हजार वर्षांनी, तेही ३०१७. तोपर्यंत आपण असणार का.!! नाही. मग कशाला उगा मोलाचे क्षण वाया घालवायचे. असो....
_____पाऊले गाडीत म्यान केली, आणि गाडीची पाऊले चालू लागली. चढण अजून संपली नव्हती. पुन्हा तोच थरार चालु झाला. गाडी पाहिच्याच गिअर वर चालत होती. पहाटेच्या चार वाजता आम्ही लापचू गावात पोहचलो अजून चढण बाकीच होती. शिखरं सहजासहजी गाठता येत नाहीत म्हणा !! पण हे जरा अतीच होतं, नाही !!

_____आम्ही आमची पाऊले गाडीत म्यान केली, आणि गाडीची पाऊले चालू लागली. चढण अजून संपली नव्हती. पुन्हा तोच थरार चालु झाला. गाडी पाहिच्याच गिअर वर चालत होती. पहाटेच्या चार वाजता आम्ही लापचू गावात पोहचलो अजून चढण बाकीच होती. शिखरं सहजासहजी गाठता येत नाहीत म्हणा !! पण हे जरा अतीच होतं.

___मंद गतीने गाडीने दार्जिलिंगची वेस ओलांडली आणि आत प्रवेश केला. पहाटेचा प्रहर...  हवेतील मदमस्त करणारा गारवा... इथेच घर त्याचं... त्यांनी आम्हा साऱ्यांनाच पूर्णतः जखडले. गाडीच्या काचा बंद असूनही त्याने आपली जागा सोडली नाही. अर्थात आम्हीही सोडू शकत नव्हतो. निसर्गाची सुसंगती म्हणजेच आयुष्य... आपण जगतो ती केवळ माया... या तत्वाशी मी तरी एकनिष्ठ आहे. निसर्गाचे नयनरम्य सौंदर्य ज्याला न्याहाळता येते, त्याला अन्य कुणाच्या सोबतीची गरज असतेच असे नाही. सुख-दुःखं हे मायेच्या विश्वात अग्रस्थानी आहे.आणि आत्मिक समाधान हे निसर्ग सानिध्यात सर्वोच्च स्थानी आहे.

घर करी राही येथे
कसा गारवा निवांत
बिनगाडी घोड्याविन
वाऱ्यासंगे तो वनात

नको मायेचा पिंजरा
बिन पहाऱ्याची कैद
संग तुझा वाटे गार
मन गुंतले तुझ्यात

दम लागतो गाडीला
जीव काकुळती येतो
बळ तुझे मला दे रे
मी विनंती करितो

सुख दुःखाची गणिते
मी आजवर मांडिली
तुझे पाहता हे रूप 
आज सारीच मोडिली

मन भरून पावलो
येता तुझ्या सानिध्यात
उंची पायी असे तुझ्या
समाधान अंगणात
___नित


____एव्हाना आम्ही समुद्रसपाटीपासून जवळपास सात हजार फूट उंचीवर असणाऱ्या शिखरांवर पोहचलो होतो. निसर्ग सौंदर्यात आपलं एक अढळ स्थान असलेल्या, पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील मध्य हिमालय पर्वत शृंखलेत असलेल्या, थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच दार्जिलिंगला पोहचलो होतो.  आमच्या गाडीने आता टायगर हिलची वाट धरली. दार्जिलिंग मधील टायगर हिलचं इथे येणाऱ्या सर्वच पर्यटकांना कमालीचं आकर्षण आहे. आणि का नसावं..!! इथून जो कोणी सूर्योदय पहिला त्यास कल्पनेतील स्वर्ग इथे प्रत्यक्षात सूर्योदयाच्या  वेळी वास्तव्य करतो याची प्रचिती येते.आकाशी तळपणारा तेजकुंभ आपण अगदी आपल्या समोर, खालच्या दिशेने उदयास येत असतो. आपल्याला पाहण्यासाठी त्याला त्याची मान उंचावी लागते.

___म्हणूनच इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची पाऊले पहाटेच्या प्रहरी टायगर हिलच्या वाटेने वळतात.दार्जिलिंग पर्यटनाची सुरवातच मुळात टायगर हिल पासून होते.  पहाटेचे पाच वाजले होते. पहाटेचा प्रहर असल्याने डोंगरउतारावरील घरे ओस पांघरून अजून गाढ निद्रिस्त होती. अंधाराने आपले पाश सैल करण्यास सुरवात केली होती. वाटेला गरम कपड्यांत ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत पर्यटकांची गर्दी उत्सुकतेने वर चढत होती. सोबतच दार्जिलिंच्या चहांच्या मळ्यातील चहापत्ती गरम पाण्यात एक मादक सुगंध पसरवत वरच्या दिशेने मार्गक्रमण करीत होती.

____ एकंदरीतच एवढ्या थंडीत सात हजार फूट उंचीवर सूर्योदय पाहण्यासाठी, पहाटेच्या प्रहरी येणाऱ्या गाड्यांची आणि माणसांची रीघ पाहून काही ओळी सुचल्या त्या अशा...

___सूर्यबापा
सूर्यबापा जेथे राही
दऱ्या डोंगराची खाई
वाटा जाती वळणाच्या
चढ अंगावर येई

रीघ लागली गाड्यांची
बघ माणसांची घाई
हिव अंगात भरला
वारा गातो गं अंगाई

पात बांबूचे हालते
दात करारा वाजती
घोट वावलीचा कोणी
चहा घोटभर घेती

आस तुझ्या दर्शनाची
मला लागे सूर्यबापा
यावे तुम्ही लवकरी
देया थंडीला हो पापा...
___नित

____दार्जिलिंग मधील टायगर हिल वर, सूर्योदय पाहण्यासाठी जवळपास दोन हजार पर्यटक मावतील इतकी आसनव्यवस्था सज्जतेच काम अपूर्ण अवस्थेत, पण चालू  आहे. तिथेच माणसं दाटीवाटीने जमा होत होती. चौबाजूला अंधार असला तरी आकाशी चतुर्दशीची चंद्रकोर मात्र उठावदार दिसत होती. चांदण्या टवकारून त्यास पाहत होत्या. जसजशी सूर्योदयाची वेळ जवळ येऊ लागली तसे चंद्राचे तेज कमी होऊ लागले. क्षितिजावर एक केशरी छटा पसरली. क्षितिजा जवळ असलेली चंद्रकोर मागे सरू लागली. 

____क्षितिजावर अंधाराने जखडलेल्या आकाशाने मोकळा श्वास घेण्यास सुरवात केली.अनंत सागराप्रमाणेच पसरलेल्या अथांग पर्वतरांगांवर ओस पांघरून बसली होती. ती मात्र अजून धरित्रीला कवटाळून बसली होती. क्षणागणिक ते निसर्ग सौंदर्य बहरत चालले होते. ओस ओसरू लागली. साक्षात खंडोबाचे रूप निसर्गाने रेखाटले होते. केशरी वस्त्र परिधान करून भाळी भंडारा लावलेला...माथी निळ्या रंगाचा पेठा..पेठ्यावर डाव्या बाजूला चतुर्दशीचा चंद्र शोभत होता... आता धरित्रीलाही जाग आली. तिने पांघरलेली ओस मोकळी झाली... दरी खोऱ्यांत वारा खेळू लागला... जणू असंख्य उदबत्त्या आणि धूप खंडोबाच्या चरणी सुलगवल्या आणि त्यांचा धूर त्या तेजस्वी छबिला कुरवाळू लागला....ते रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक मोबाईल पुढे सरसावले होते.

___खंडेराया
डोळा भरून पाहिले
रूप साजरे देवाचे
पौष चतुर्दशी दिनी
शिवरात्रीच्या पहाटे

वस्त्र केशरी तेजाचे
भाळी भंडारा लाविला
निळ्या गगनाचा पेठा
डोई चंद्र तो खोविला

ऐसें रूप पाहे धरा
ती आळस झटकून
दिवा बत्तीची वेळ
पाही रूप निरखून

जेजुरीचा खंडेराया
आला आला गं भेटीला
धर्ती माता म्हणे देवा
नित जपावे सृष्टीला
___नित

 ____सूर्य धरित्रीच्या आड असला, तरी तो आता इतका जवळ आला की, त्याच्या परिसीमेतील अंधार त्याने पळवून लावला. अंधारातून मुक्त झालेल्या धरेवर नजर फिरली. दक्षिणेस उंच ठेंगण्या, दूरवर न संपणाऱ्या पर्वतरंगांचेच अस्तित्व होते. कंच हिरवा भरजरी शालू ल्यायलेली धरती, सकाळ प्रहरी सुर्यास ओवाळण्यासाठी आतुर होती. तोच दक्षिणेस सर्वांच्या माना वळल्या. एक अद्भुत लावण्यांचा साज तिथे चढला होता. थंडीने थरथरनाऱ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते रोमांच धर्तीच्या अनोख्या लावण्य रूपाच्या स्वागतार्ह अंगावर उभे होते. सुर्यतेजाची गाथा तो अदृश्य असतानाही किती ओजस्वी आहे याचे जाण करून देणारे होते.

____धरती आणि अग्नीच्या समागमातून भयाण ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की, अनंत आकाशाला जणू गवसणी घालणाऱ्या पर्वतरांगा, या धरित्रीच्या अंगाखांद्यावर शांत होऊन स्थित झाल्या. त्यातून असंख्य डोंगर- दऱ्या, कातळकडे, चिरे यांनी व्यापलेल्या असंख्य पर्वत शृंखलाच तयार झाल्या. त्यातील काहींनी इतकी उंची गाठली की, सतत हिम वृष्टीत न्हाऊन निघण्याचं सौभाग्य त्यांस प्राप्त झाले. आणि तिथेच हिमालयाची उत्पत्ती झाली. 

____त्याच हिमालयाच्या कुशीत कैलासी श्री भोलेबाबा शिव शंकराचे वसतिस्थान असल्याचीही मान्यता आहे. अर्थात हे प्रत्येकास पटेल असे नाही. परंतू याच हिम पर्वतांच्या कुशीत बसून कितीतरी थोर महापुरुषांनी तप साधना करून ही भूमी पवित्र केली आहे, हे नाकारता येणार नाही. शेवटी कोणत्याही जातीधर्मांची प्रार्थना स्थळे असोत, तिथे ईश्वर आहे ही साशंकता असली, तरी प्रतिदिन लोकांच्या प्रार्थनेतून तेथे एक अदृश्य शक्ती तिथे निर्माण होत असते. आणि संकटसमयी ती आपल्याला त्या संकटास सामना करण्याचे बळ देत असते. भौगोलिक दृष्ट्या पाहता जसा गृत्वाकर्षणाचा नियम आहे. तसाच आपल्या आयुष्यातही आकर्षणाचा  नियम अस्तित्वात आहे हे विसरता कामा नये. म्हणून कोणत्याही प्रार्थना स्थळांकडे माझा पाहण्याचा दृष्टीकोन हा शक्तीदाता म्हणूनच आणि आदरयुक्त असला पाहिजे.असो...
____तर दक्षिणेस वळलेल्या माना तिथेच खिळल्या. दूरवर हिमशिखराच्या शृंखला दृष्टीस पडत होत्या. त्यात मुकुटमणी शोभावा तसा सूर्य तेजात न्हाहून निघालेला माथा अगदी बावनकशी सोन्यात मडलेला, प्रत्यक्ष सोन्याचेही अलंकारिक सौंदर्य फिके पडावे असा देखणा दिसत होता. यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी होती ती म्हणजे... सूर्य प्रत्यक्ष दिसत नसला तरी त्या हिमशिखरांनी इतकी उंची गाठली होती की सूर्य तेजाचे कोवळे सोनेरी ऊन, त्यास न्हाऊ घालत होते. आणि त्या सोनेरी किरणांचा अभिषेक होत असतांना, त्याचे विविध पैलू आमच्या नजरेला सुखावत होते. त्याच्या सर्वांगातून सोनेरी झळाळी निथळत होती.
____ पलीकडील दर्यांचे सुरुंग पेरत...  उंचच उंच हिमशिखरे... सोनेरी झळालीने सजलेल्या... ढगांच्या राजसभेत...  डौलाने विराजित होती... आकाशातील नुकताच जागा झालेला... अथांग नीलिमा लोलुपतेन त्या दृश्यावर वाकला होता. त्या सोनेरी चैतन्याने सारं आसमंत मोहरले होते. काही क्षणातच ते सौंदर्य फिके पडू लागले. पूर्वेस डोंगर वस्तीतून सूर्य नारायण उदयास येऊ लागले. सूर्यमालेतील सारेच ज्याच्या सभोवती उत्कट प्रेमभावणेने मोहित होऊन अनादी अनंत काळापासून अविरत चकरा घालत आहेत. ऐसा तो भास्कर या धरित्रीच्या प्रेमात पडावा, आणि आपले तेज म्यान करून डोंगर कुशीत निद्रिस्त व्हावा. रात्रीच्या शीतल विश्रांतीनंतर, नुकताच जसा उदयोन्मुख व्हावा.
_____असे ते सोज्वळ रूप आमच्या दृष्टीस पडू लागले. रात्रीस ताबा घेतलेल्या, तारे-चांदण्यांनी त्या तेजकुंभाचे स्वागत करून आपली जागा सोडली.संदिग्धतेच्या सांत्वनास येण्यासाठी रात्रीच्या प्रतीक्षेत ते आकाशात विलीन झाले. चंद्रानेही झोपेचं सोंग घेतलं आणि तो अदृश्य झाला. गारवा मात्र आम्हास अजून
धरून होता. इतकं प्रेम कसं कुणी कुणावर करू शकतं..!! त्याच्या स्पर्शाने लटलटणारे देह मात्र त्यांस न जुमानता, सुर्योदयाचे ते रमणीय दृष्य पाहण्यात मशगुल होते. सूर्य क्षण प्रतिक्षण वरच्या दिशेने सरकत होता.


____गाडी खालच्या दिशेने भरभर उतरली. ती थेट बतासिया लूप गार्डनच्या गेटबाहेर थांबली. आम्ही गेटमधून आत शिरलो. तोच या गार्डनच्या अगदी मधोमध स्वातंत्र सेनानी स्मारक दृष्टीस पडले. आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जी आंदोलनं झाली. त्यात येथील स्थानिक धारातीर्थी पडलेल्या गोरखा सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक उभारले आहे. १९९५ साली या स्मरकाचं उदघाटन केलं गेलं. या स्मारकाची उंची जवळपास ३५ते ३६ फूट आहे. त्यावर शाहिद झालेल्या सैनिकांची नावे आणि तारखा कोरलेल्या आहेत. त्या स्मारकाच्या बाजूलाच नऊ फूट उंचीची गोरखा स्वतंत्र सैनिकाची पितळेची अप्रतिम प्रतिमा उभारलेली आहे. त्या सोबतच शेजारी आपला राष्ट्रध्वज मनाने फडकत होता. तिचे आम्ही सारेच नतमस्तक झालो. आज २६ जानेवारीच्या दिवशी आम्हास ज्यांनी ज्यांनी या देशासाठी आपले रुधिर सांडले त्या प्रितर्थ्य साकारलेल्या स्मारकाच्या दालनात उभे राहून त्या पवित्र स्मृतींना मानवंदना देण्याचा योग आला. धन्य जाहलो.
____अगदी त्याच्या मागेच आकाशाला गवसणी घालणारा बर्फाच्छादित माथा, ज्याचा टायगर हिल वरून सोनेरी किरणांनी अभिषेक होताना पहिला होता. आता त्यावर दुग्धाभिषेक होतांना दिसत होता. आमचं आहोभाग्य की आज वातावरण स्वच्छ असल्या कारणे आम्हास एव्हरेस्ट आणि कंचनजंघा ही दोन्हीही शिखरं येथून दिसत होती. त्यात अगदी स्वच्छ आणि नेटके दिसणारे शिखर म्हणजे कंचनजंघा. समुद्रसपाटीपासून जवळपास २८००० फूट उंचीवर स्थित, हिमपर्वत श्रुखलेतील दार्जिलिंग पासून ७४ किलोमीटर अंतरावरील, सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवरील नेपाळच्या हद्दीती हे शिखर स्थित आहे. ते मनोरम दृश्य आमच्या नजरेस सुखावत होते.
___या गार्डनचं आणखीन एक आकर्षण म्हणजे इथे दार्जिलिंग मधील पर्यटकांचं आकर्षण असलेली अनोखि टॉय ट्रेन आपल्याला इथे डोंगरघाटातून प्रवास करण्यासाठी सज्ज असताना आपणास पहावयास मिळते. १९२१ मध्ये साडे सात हजार फूट उंचीवर जवळपास ७० किमी लांबीचा हा डोंगर घाटातून  निर्माण केलेला हा रेल्वेमार्ग म्हणजे इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. पण त्या ७० किमी लांबीतील सर्वात मोहक असे स्थळ असेल तर ते बतासिया लूप गार्डन म्हणायला हरकत नाही. जिथे हा रेल्वेमार्ग अगदी आठ आकाराच्या कोशात फिरून वरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. इथेच एक छोटचा बाजारही भरत असतो. ज्यात आपण स्थानिक कलाकुसरीचे सामानही खरेदी करू शकतो.
____इथे इतक्या उंचीव दार्जिलिंगमध्ये उन्हाळ्यातसुद्धा हवा थंड आणि सुख देणारी असते. इथून डोंगरउतारावर सतत कटिंग करून निगा राखलेले चहाचे मळे दार्जिलिंगाच्या सौंदर्यात आणखीन भर टाकतात. जणू हिरवे गलीचेच डोंगरउतारावर अंथरलेले आपणास भासतात आणि त्याची आपल्याला भुरळ पडते. अनेक वृक्षांनी सजलेल्या टेकड्या दूरदूर आपणास सुखावत असतात. त्यामुळेच निसर्ग सौंदर्याची आवड असलेल्या प्रत्येकांसाठी हे नंदनवनच आहे. आम्हीही इथे मनोसक्त आनंद घेऊन खालच्या दिशेने मार्गस्थ झालो. दार्जिलिंग पर्यटनासाठी सवडीने येण्याची गरज आहे हे मात्र नमूद करावेसे वाटते.
धन्यवाद
नितेश पाटील (९६३७१३८०३१)