Friday, January 29, 2016

सुख-दुःखे

सस्नेह जय शिवराय....................
.................................................नितेश पाटील
       
  सुख-दुःखे
मीच ठेवीले भक्तिरूप अनंत
    प्रार्थनेतून एकाच ठायी नित्य
       सुखदुःख येती जे माझीया कर्मे
            तैसे निरंतर बळ मज देत राही....
         माणूस म्हंटला कि सुख-दुःखे आलीच. त्याशिवाय त्याच जीवनच नाही.पण माणूस त्याच्या अधीन जास्त जात असल्यामुळे, आणि नात्यांच्या बंधनात वाहवत जात असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या जगण्यावर होत असतो. पण एक लक्षात घेतलं तर कळेल कि सुखात सारेच सहभागी असतात. पण दुःखात मात्र मोजकेच असतात. म्हणजेच गंध हवा असतो..!! पण आवडीचा असेल तर... अशी गत असते...
         तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदु:खे आहेत ती ऋतूप्रमाणे आहेत. ती सुख-दु:खे आपल्या इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती खवळून, चवताळून, अती उत्साहित न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. म्हणजेच मर्यादेत राहिलं पाहिजे. ज्याने मर्यादा पाळली त्याचा समाजात सन्मान होत असतो हा इतिहास आहे.
         विश्व म्हणजे काय..?? ते कोणी निर्मीले..?? या प्रश्नांची उत्तर निःसंशय भिन्न आढळतील. याचाच अर्थ माणसांचे विचार भिन्न असतात. आणि त्यामुळेच सुखदुःखाची परिभाषाही वेगवेगळी असते. त्यानुसारच माणूस झगडत असतो. स्वतःजवळ असलेल्या, मिळवलेल्या ज्ञानाने स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
          काही वेळेस त्याला आपल्या तत्वानुसार मित्र, नातेवाईक किंव्हा इतर कुणाशीही झगडावे लागले तरी त्याने त्याच्या नियतकर्मापासून ढळू नये. शेवटी हे विश्व मायाजाल आहे. ज्ञान एका विशिष्ट स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधीविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. काही झालं तरी प्रत्येकाला बंधनं हि असतातच. त्याचे प्रकार वेगवेगळे असतील तो भाग वेगळा.
         मनासारखे कुणालाच जगता येत नसते. परिस्तिथीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजेच अध्यात्म. ईश्वर कुठे असेल तर तो आपल्या भक्तीने, प्रार्थनेने, आचरणाने एका जागी आपणच स्तिथ केलेला असतो. आता ते आचरण ती भक्ती आणि प्रार्थना कोणी कुठे कशाप्रकारे साठवलंय अथवा नाही हे ज्याचं त्याला अवगत असतं. तो त्या जागी पोहचल्यावर निश्चितच तुम्हाला संघर्ष करण्याचं बळ ती देत असते. तसेच समस्या नष्ट करणारे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान. म्हणूनच केवळ ज्ञान व भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वत:ला मुक्त करू शकतो ....
https://niteshpatil715.blogspot.com
.......नितेश पाटील
९६३७१३८०३१

Monday, January 25, 2016

आदर्श विरांचे

सस्नेह जय शिवराय….........

..........नितेश पाटील
#शिवप्रेमीगडयात्री
          या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे.काही अंशी जरी सोडले तरी. माणसातला माणूस विरळ झालाय. जसं करावं तसं भरावं म्हणतात ते योग्यच आहे.
          जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा, ती झुंज, तो एकांत आणि त्यात बहरुन जाणं हे अनुभवायला हवं. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात खोलवर रोवलेली आहेत.आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे. सर्वांची आवड वेगवेगळी असते यात दुमत नाहीच आहे.
         त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे "श्री शिवछत्रपती शिवराय" आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले "निष्ठावंत मावळे". बाकी माझी गणती कशातही नाही.
        आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि आपण कानाडोळा करतो.(काही अपवाद वगळता) जोपर्यंत आपल्या वाट्याला ती 'झळ' येत नाही तोपर्यंत आपण मुकाट्याने ते बघत असतो. फार तर हळहळत असतो. काही वेळेस इच्छा असूनही काही करता येत नाही तो भाग वेगळा. पण आज स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष सरूनही ही पारस्तिथी का निर्माण व्हावी हा चिंतनाचा विषय आहे. हे स्वतंत्र नव्हे. आजही सामान्य जनता वेठीस धरली जातेय. दडपणाखाली जगतेय. आपसूकच भीती हि आलीच. याला जबाबदार कोण..???? मीच का ???
         महाराज्यांच्या कीर्तीचे सारेच गुणगान करतात आणि कारावयासही हवे. पण त्या किर्तिमागचा संघर्ष आपण बाजूला सारतो का..?? नसेलही पण त्या संघर्षातून मी काय धडे घेतो हा हि महत्वाचा प्रश्न आहे. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा.
         शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत...१.आपण जन्माला का आलो..? २. आपण करतो काय..?? ३. आणि करायला पाहिजे काय...??? या तीन प्रश्नांची उत्तरं मला सापडली म्हणजे मी माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार मला आपसूकच येईल.
           शेवटी दाखवणं,भासवणं वेगळं आणि आदर्श आत्मसात करून त्या प्रकारच आचरण करणं वेगळं. त्या तीन प्रश्नांच्या उत्तरातच माझं भवितव्य दडलेलं आहे हे हि एक निरंतर सत्य आहे.
      बरं हे माझं वयक्तिक मत आहे. आणि आपली मतं इतरांवर लादू नये. पण ती इतरांना कळावी या मताचा मी आहे.
            खीळ बसुनी म्यान व्हावे
                 नाही बोथट शौर्य तयांचे...
                     जगणे सोडून काय गातोस
                           घे निष्ठा नि आदर्श तयांचे....
........नितेश पाटील
        ९६३७१३८०३१

Saturday, January 23, 2016

झिजणे

।। सस्नेह जय शिवराय  ।।                                                             नितेश पाटील

झिजने

       आयुष्य गमतीदार असतं. कुणी स्वतःच्या विश्वात दंग असतो.कुणी दुसऱ्याच्या विश्वात आपलं सुख शोधण्यात दंग असतो.असे फार कमीच असतात म्हणा..!!! पण एक धडपड असते आपली किंमत उमजण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची, या माया नगरीत आपलं अस्तित्व शोधण्याची...
       नाना प्रकारचे अनुभव प्रतिक्षण आपल्याला येत असतात. त्यातून काय घ्यावं नि काय नाही हा जरी सर्वस्वी आपला प्रश्न असला तरी एखाद्या विचाराधीन आपण वाहवत जात असतो.वाहवत जात असताना त्यामागचा संघर्ष, वस्तुस्तिथी आपण लक्षात घेतली पाहिजे. आज भासवणाऱ्यांची या दुनीयेत कमी नाही. आजचा समाज हा दिखाउपणाच्या आभासी जगात वावरत आहे. आणि त्याचीच किंमत तो यथावकाश का असेना पण मोजत असतो.
         माणसाची किंमत हि निश्चितच त्याच्या दिसण्यावर नसते. असेलही पण ती किती काळ...??? एखादा माणूस आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी ओतप्रोत वाहून देतो. त्याच्या नशीबी काय येतं..? जो आयुष्यभर खस्ता खातो त्याचा वापर फक्त चवीसाठी व्हावा..!! पण दोष कुणाला द्यावा..? पण एक लक्षात घेतलं पाहिजे आजवरचा इतिहास पाहता चव घेणारे नामशेष होतात आणि देणारे निरंतर स्मरणात राहतात.त्यांची चव कण कण खण्याऱ्याच्या ह्रुदयात वास करत असते अगदी त्याने न दाखवलं तरीही....
         स्वयंपाक घरातील भाजी कापण्याचा पाट ज्याप्रमाणे स्वतःवर असंख्य असे वार झेलत झिजत असतो. त्या झिजण्यात आपण कुणालातरी सुख देतोय. आपला अंश न अंश सत्कर्मी लागतोय हीच भावना असावी. पण त्या वार करणाऱ्या हत्यारास त्याची कीव येत नाही. त्याचे तेज धारदार हत्यार असंख्य यातनांचा भडीमार जरी करत असले तरी तो हा कि सु करत नाही.
        खऱ्या अर्थाने आयुष्याची झीज होणं तेच काय हे..?? आता तुम्ही म्हणाल निर्जीव वस्तू ती...पण झाडं निर्जीव नसतात. त्या झाडांचा तुम्ही तुमच्या सोईनुसार खून करायचा. खून केल्यानंतर त्या मृत देहासही नष्ट होईस्तोवर तुडवत बसायचं. असा काय गुन्हा हो त्याचा..???
      सांगायचं तात्पर्य इतकंच. जे झिजतात आपल्यासाठी त्यांना विसरू तर नयेच पण त्यांचा वापर स्वस्वार्थासाठी करू नये. भमट्यांची दुनिया फार कमी जे दुसऱ्यासाठी जगतात....

      जिवंतपणी खून माझा
             मृत्यू पश्चात न अंत ...
               वाहिले सर्वस्व तुला 
                काय गुन्हा मी झिजतो .... 

........नितेश पाटील
९६३७१३८०३१

Friday, January 22, 2016

व्यथा शाळेतल्या मुलांची

कुणी वेळ देतं का वेळ...!!!
रस्त्याला दिसतंय का कुणी..??
जे आम्हाला स्पर्धेच्या जगात, आमच्या शाळेत सोडेल....
नको नको बरं...!!!
शाळेत घरी सारं तेच. शाळा, क्लास पुरता वैताग आणून सोडलाय..!!!
शाळेत जावं तर त्या स्पर्धा, शिक्षण, ते डे ,लिखाण काम...
घरी जावं तर होमवर्क, क्लास..च्यामारी नोकरी परवडेल हो ....
आमचा कुणी विचार करत नसेल का हो..???
आमचे भविष्य उज्वल करण्याची धडपड असेल....
पण आमचं बालपण चिरडलं जातंय नाही वाटत तुम्हाला...???
दिवसभर आईबाबा राबतात तशीच आमचीही गत...
बघा जमलं तर आमचाही विचार करा..!!
......नितेश पाटील

Monday, January 11, 2016

रतनगड शिवप्रेमीगडयात्री

सस्नेह जय शिवराय                                                                       नितेश पाटील ९६३७१३८०३१
                                                                                                     nitesh715@gmail.com           
रतनगड पद भ्रमंती ट्रेक १.२.३ जानेवारी २०१६

         वर्ष कालच सरले...काय उरले....
                  कोण जगले... कोण उरले....
            खरंतर हा चिंतनाचा विषय आहे. या धावपळीच्या जगात ना कुणाला जगायला वेळ आहे ना कुणाला उरायला..!! स्पर्धेपाई आयुष्य गमावून बसलेत सारे. माणसातला माणूस विरळ झालाय.असो जसं करावं तसं भरावं म्हणतात ते योग्यच आहे.पण जगायचा निखळ आनंद घ्यायचा असेल तर माणसाने सह्याद्रीच्या पर्वतरागांचा कणखरपणा, सौम्यपणा अनुभवायला हवा. आपल्याला निसर्ग अगदी भरभरून देत असतो. त्या निसर्गाची बीजं सह्याद्रीच्या पठारात रोवलेली आहेत.आणि सह्याद्रीचा कल्पवृक्ष आजही तिथे खंबीरपणे उभा आहे.
             त्या सह्याद्रीवर अधिराज्य गाजवणारे "श्री शिवछत्रपती शिवराय" आणि स्वराज्यासाठी मरणास तत्पर असलेले "निष्ठावंत मावळे".बाकी माझी गणती कशातही नाही. आज माणूस म्हणवून घेण्याचीही लाज वाटावी अशी काही दुष्कृत्ये घडतात. आणि आपण कानाडोळा करतो. जोपर्यंत आपल्या वाट्याला ती 'झळ' येत नाही तोपर्यंत आपण मुकाट्याने ते बघत असतो. महाराज्यांच्या कीर्तीचे गुणगान करतो. पण त्या किर्तिमागचा संघर्ष मात्र आपण बाजूला ठेवतो. संघर्ष सारेच करतात हो..!!! पण तो स्वस्वार्थासाठी नसावा. शिवचरित्रातून काही शिकायचं असेल तर तीन प्रश्न स्वतःला विचारायला हवेत...१.आपण जन्माला का आलो..? २. आपण करतो काय..?? ३. आणि करायला पाहिजे काय...??? या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडली म्हणजे माणूस म्हणवून घेण्याचा आणि स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार आपसूकच येईल... आणि त्याच उत्तरात आपलं भवितव्य दडलेलं आहे हे हि एक निरंतर सत्य आहे.
  
  शोध तयाचा घेईन मी...
   सार्थकी जीवन लावीन मी...
   सह्याद्रीच्या सुप्त मनात...
   काय दडलंय पाहीन मी...
                .....नीतेश पाटील
असो......विषय भरकटत चालला बहुतेक...!!!! आपण मुद्यावर येऊ.
        रतनगडाला भेट देऊन तुम्ही सह्याद्रीचे कातळकडे, त्याचं रांगडं रूप, त्याचा राकटपणा अनुभवू शकता. अहमदनगरच्या पश्चिमेस अकोले तालुक्याच्या डोंगरदर्यानी समृद्ध असलेल्या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्गरत्नांमध्ये हा किल्ला वसलेला आहे.
          मागे भीमाशंकर आणि हरिशश्चंद्र गडावरील डोंगरयात्री समूहाबरोबर केलेला पदभ्रमंतीचा अनुभव मी ब्लॉगरुपाने सादर केला आहे. आता रतनगडाच्या पदभ्रमंतीचा खडतर पण उत्साहवर्धक असा प्रवास शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.
         हरिशश्चंद्र गडानंतर पुढचा ट्रेक रतनगड. तसा उत्साह हा होताच ..!!! आणि त्याचबरोबर आमच्या सोबत येणाऱ्यांची संख्याही वाढली होती. तत्पूर्वी रायगड महोत्सवही जवळ येऊन ठेपला होता. माहितीनुसार २५ डिसेंबर पासून कार्यक्रम चालू होणार अशी बातमी होती. जेव्हा आम्हाला रतनगड ट्रेकची तारीख कळली तेव्हा आमच्या पालघर समूहात थोडी द्विधा परिस्तिथी निर्माण झाली होती. तारीख होती १,२,३ जानेवारी २०१६ . साहजिकच रतनगड किंव्हा रायगड यापैकी एकाचीच निवड करावी लागणार होती. डोंगरयात्री समूहाशी चर्चा करून आम्ही सारेजण एका चर्चासत्रात बसून रतनगड ट्रेक ला जाण्याचा निर्णय घेतला...आता वेध लागले होते बरं..!! कोण येणार, कसे येणार आणि खर्च काय या साऱ्या चर्चेचं गुऱ्हाळ चालूच होतं.
          आम्ही जेव्हा हरिशश्चंद्र गडावरून परतीचा प्रवास केला तेव्हाच ठरवलं होत कि आम्ही धनसारहून गाडी करून पायथ्याशी पोहचणार आणि मुंबाईवाले मुंबईहून. दोन वेळेची दगदग पाहता हा निर्णय घेतला होता.१५ डिसेंबर २०१५ या दिवशी गाडीवरूनच काही शाब्दिक वाद समूहात निर्माण झाला. चूक कोणाची होती हा मुद्दा महत्वाचा असला तरी त्याचा परिणाम इतर सदस्यांवर अथवा समूहावर पडता कामा नये. वादग्रस्त मुद्दे कटाक्षाने टाळले पाहिजेत. समूह संचालक माणसं जोडण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात वादग्रस्त मुद्दे उपस्तीथ करून आपण आपल्या मजाकमस्तीची चरणसीमा गाठून विकोपाला नेऊ नये. पण आपण आत्मपरीक्षण केलं तर कळेल कि कुठलाही माणूस वादग्रस्त मुद्याकडे आणखीन जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मग तो वाद शिगेला पोहचतो. आणि आम्ही समूहात अगदी नवखे असल्यामुळे (दोन ट्रेक ने माणूस अनुभवी होत नाही) सुदेशने आम्हा सार्यांनाच म्हणजे पालघर समूहात जे होते त्यांना समूहातून बाहेर काढलं. त्याच आम्ही साऱ्यांनीच समर्थन केलं. तसं करतांना डोंगरयात्री समूहाच्या जुन्या, जाणत्या, अनुभवी ट्रेकर्स सुजाताईस (सुजाता शिरगावकर ) कल्पना दिली होती कि कितीही वाद झाले तरी पालघर समूह डोंगरयात्री समूहासोबतच ट्रेक करेल. 
        वाद हा शेवटी वादच..!! त्याने कुणाचाही भलं होत नाही. तो नको इतकीच आमची प्रांजळ इच्छा होती.त्यानंतर आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत वैयक्तिक त्यांच्या संपर्कात राहीलो पण शेवटी त्यांनी ट्रेक रद्द झाल्याचं कळवलं. आमची तयारी चालूच होती. रायगड जाणे रद्द करून आम्ही रतानगडाची सैर करण्याचं ठरवलं होतं आणि आम्ही ती कुठल्याही परिस्थिती करणार हे निश्चित होतं...


        संघर्ष कुणाचा , बळी कुणाचा......
        फांद्यांच्या संघर्ष, वणवा रानाचा...
        जळती मशाली, कडे पठारी......
        शिवतेज तळपते, प्रकाशते सह्याद्री
        मशाल सह्याद्रीची, निष्ठा मावळ्यांची ....
        स्वराज्य तुझे, ठेव जान त्याची....
                   ............नितेश पाटील
        भिंतीवरील कागदाप्रमाणे पृथ्वी आणखीन एका वर्षाने लहान झाली होती. नवीन वर्षाची सुरवात आणि रतनगड पदभ्रमंतीचा दौरा... तो सुखद प्रवास अनुभवन्यासाठी आम्ही हो नाही करता करता रसद घेऊन १८ जण सुसज्ज झालो. डोंगरयात्रींची अनुभवी टीम यावेळेस आमच्या सोबत नव्हती हे कुठेतरी मनाला बोचत होतं. पण घेतला वसा सोडता येत नाही तशीच काहीशी गत आमची होती. त्यातच परेशचा(स्वामी) भाऊ जेजेला आजारामुळे भरती होता. त्याचही अगदी निघायच्या वेळेस रद्द झालं होतं. ट्रेक करणं सोपं काम नसतं त्याला अनुभवाची जोड लागते. पण अमुल आणि सुशांत असल्यामुळे काहीस हायसं वाटलं. ( डोंगरयात्रीचे जुने सदस्य) दोन तवेरा आणि आम्ही ड्रायवर पकडून वीस जण. रतनगडाची काहीच कल्पना नव्हती. अगदी रस्ताही माहित नव्हता. फक्त रतनवाडीस जाऊन वर जात येत इतकं काय ते ठाऊक......

                  घेतला वसा सोडू नये ....
                            पाठ फिरवून जाऊ नये....
                                     संघर्षा विन जीवन नाही...
                                               संधी मिळते सोडू नये...
                                              ..............नितेश पाटील 

              आम्ही धनसारहून अकरा साडे अकराच्या दरम्यान 'आई भवानीचे' दर्शन घेऊन 'महाराजांना वंदन' आणि 'गणपती बाप्पा मोरयाचा' गजर करून  रतनवाडीकडे रवाना झालो. आम्ही निवांत आणि आम्हाला वाहून नेण्याचं चोख काम ड्रायवर दादा राकेश आणि प्रदीप यांच्या हातात होतं.आम्हीही मागे टाकलेल्या ट्रेकचा उजाळा करत, गुलाबी थंडीचा आस्वाद घेत एका ओढीने गाडीत बसलो होतो. रस्ता म्हणाल तर पालघर, वाडा, खोडाला, घोटी, भांडरदारा मार्गे रतनवाडी पोहचणार होतो. वेळ रात्रीची होती. आम्ही खोडाला पार करून आठेक किलोमीटर पुढे असू. रात्रीचे दीड वाजले होते. कड्याक्याची थंडी, वाडा ते घोटी भयाण जंगल, एकेरी सुनसान मार्ग, नागमोडी वळणांचा, एका बाजूस खोल दरी, गाड्यांची वर्दळ तर सोडाच पण साधी एकही गाडी रस्त्याने फिरकत नव्हती. दूरवर वस्तीही नजरेस पडत नव्हती. अश्या भयाण काळोख्या रात्री भर रस्त्यात एक "बाई"....!!!! हो एक "बाई" डोईवर पदर, नाकात साजेशी नथ, चमचमणारी साडी एका लयीत रस्त्याच्या कडेला नजरेस पडली... आम्ही सारे अचंबित झालो. आणि कयास बांधू लागलो. विशेष म्हणजे त्या बाईने अश्या सुनसान रस्त्यावर गाडी येत असताना पाहून मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही.....

          तो विषय धरूनच आता चहाच्या चुस्कीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही घोटी सोडून पुढे जिथे भांडरदारा जाण्यासाठी घोटी-सिन्नर मार्ग सोडावा लागतो तिथे पावने तीनच्या सुमारास पोहचलो. रात्रभर सारखा प्रवास करायचा म्हंटल्यावर अधून मधून "चहा" तर हवाच... त्यात गुलाबी थंडी असली कि काही औरच मजा...!!! दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला लागल्या.सारे उतरले. अंगात हुडहुडी होती. त्या बाईला पाहून काही प्रमाणात कमी झाली होती म्हणा..!! पण चर्चा मात्र तीच तुम्ही पहिली का अन तुम्ही पहिली का ?? साऱ्यांनीच पहिली म्हंटल्यावर ते भूत नसावं हे मात्र निश्चित झालं पण एकट्याला दिसली असती तर त्यालाही वेड्यातच काढलं असतं. त्यात श्यामला दिसली नव्हती म्हंटल अरे बाबा तुझे 'ग्रह' चांगले म्हणून तुला नाही दिसली आमचे नबळे म्हणून आम्हाला दिसली...बाकी काय म्हणणार..??? असो... चहा बनवण्यासाठी अमोलने घरून आणलेली हिरवीगार गवताची जुडी (गवतीचहा) दिली आणि "फक्कड चहा" बनवून घेतला सोबत पारले जी अहाहा..!!! काय आस्वाद होता. गुलाबी थंडी... हातात चहाचा वाफाळत असलेला सुगंधी कप.... वरून पारले जी ....क्या बात..?? दिल खुश झाला भाई....
          त्याची चव जिभेवर तशीच ठेऊन पुढे आमचे चालक भांडरदारा , रतनवाडीकडे रवाना झाले. घोटी पासून भंडारदरा(शेंडी) २५ किमी तर भंडारदरा(शेंडी) पासून रतनवाडी २२ किमी अंतरावर आहे. पुढे आमच्या गाड्या भांडरदारा धरणाच्या वेशीवर शेंडी गावात येऊन थांबल्या. रस्त्याची गफलत होऊ नये म्हणून आम्ही तिथे असणाऱ्या एका रखवालदारास विचारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण अस होतं कि रतनवाडीस जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तिथून दोन रस्ते जातात एक भांडरदारा धरणाजवळून मुतखेळ मार्गे रतनवाडी हा मार्ग जवळचा. आणि दुसरा भांडरदारा धरणाला पूर्ण वळसा घालून पांजरे ,सांप्रद मार्गे रतनवाडी हा मार्ग लांबचा म्हणाल तर दुप्पट.. पण त्या रखवालदाराच्या अनाडी पणामुळे त्यानी आम्हाला दुसरा मार्ग सुचवला. बरं आम्हाला माहित नसल्यामुळे आम्हीही गाड्या त्याच मार्गे वळवल्या. भंडारदर्‍याच्या खोर्‍यात अखेरचे गाव घाटघर आहे. घाटघर साधारण शेंडीपासून २६ कि.मी. आहे. त्याच्या अलिकडे ४ कि.मी.वर साम्रदचा फाटा आहे. आणि रस्त्यात तशी वस्ती कमी. रात्रीची वेळ.. कुणी माणूसही दिसत नव्हता शेवटी एक जीपवाला नजरेस पडला त्याला विचारून आम्ही सांप्रद मार्गे वळलो. कारण हा रस्ता सरळ घाटघर डॅम कडे जातो.

       साम्रद गावातूनही रतनगडाकडे जाणारी पायवाट आहे.साधारण दीड दोन तासात 'रतनगडच्या खुटय़ाला' वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. डावीकडे खोल दऱ्या आपले लक्षवेधून घेतात. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर पायर्‍या लागतात. या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला त्रंबक दरवाजा आहे. या दमछाक करणार्‍या मार्गानेही आपण गडामधे प्रवेश करतो.
अखेरीस सारं काही निपटून आम्ही रतन वाडीत पहाटे साडे पाचच्या सुमारास पोहचलो.अमृतेश्वर मंदिरापाशी. आणि हुश्श केलं. खरंतर त्या रखवालदाराची चीड येऊन राहिली होती. एक तास आमचा वाया गेला होता. थंडीनेही पहाटे समयी शिखर गाठलं होतं. हुडहूडत गाड्यावरच्या बॅगा काढल्या तोपर्यंत वर राहायची सोय आहे कि नाही, दुसऱ्या दिवशी खाली उतरल्यानंतर जेवणाची सोय हे सारं काही चौकशी करून नक्की केलं वरही जेवणाची सोय होऊ शकते शनिवारी, रविवारी दोन दिवस.पण आम्ही रसद घेऊन आलो होतो म्हणून काही काळजी नव्हतीच.

     आता अमृतेश्वर देवस्थान ने विसाव्यासाठी बनवलेल्या शेड मध्ये अंग टाकून सकाळ होईपर्यंत निवांत थंडीचा आस्वाद घेत विश्रांती घेतली.
सातच्या ठोक्याला सारे उठले. शरीरशुद्धी करून चहाचा घोट घेतला. राशन जे एका गोनीत होतं ते आपापसात वाटून घेतलं, सुशांतने त्याची सॅग खाली करून त्यात जवळपास तीस किलोच्या आसपास समान भरलं. अनुभवी ट्रेकर्स म्हणून आम्हीही ते भरू दिलं. तदनंतर ओळख परेड.अमृतेश्वराच दर्शन उद्या येऊन करणार होतो. सारे एका वर्तुळाकार कक्षेत आले अमूलने मार्ग दर्शन करून ओळखिस प्रारंभ केला. आम्ही सारे नवीन असल्यामुळे वाटेकरू सोबत घेण्याचे ठरविले आणि घेतलेही. सोपान झडे हे ट्रेकर्सना वाट दाखवतात त्यांचे दुसरे बंधू नाथू झडे (मो.नं. 8308037394) हे गडावर शनीवार,रविवार दोन दिवस चहा पाणी जेवणाचं छोटेखानी गुहेत उपहार गृह चालवितात आणि तिसरे भाऊ रामदास झडे ( मो.नं.9325325463)हे पायथ्याशी रतन वाडीत उपहार गृह चालवितात .सांगायचं म्हणजे कसलीही गैरसोय नाही.....

           आता आपण ओळख परेड कडे वळू. "१...निकेत राऊत-नांदगाव, अजय भोईर-धनसार,अतुल घरत-धनसार, अंकुर राऊत-धनसार, श्याम पाटील-धनसार, गणेश घरत-सफाळे, सुशांत देसले-खरेकूरण, चेतन राऊत-धनसार, निनाद पाटील-नांदगाव, राकेश भोईर-धनसार, सुदेश मोरे-धनसार, अमुल पाटील-वगुळसार, अखिलेश मोरे-धनसार, आशितोष मोरे-वाशी, जतीन मोरे-धनसार, सिद्धार्थ मोरे-धनसार, अमोल राऊत-धनसार, अन मी नितेश पाटील-धनसार सोबत वाट दाखविण्यासाठी सोपान झडे-रतन वाडी" असे आम्ही १९जण गडावर चढण्यास सज्ज झालो. सर्वात पुढे सोपान मामांसोबत सुदेश आणि अंकुर...अन शेवटी अमोल आणि अमुल बाकी आमचा मधला कार्यक्रम...
     ८.४५ च्या सुमारास आम्ही गावातून पुढे गावाची वेस ओलांडून रानवाटा पायदळी तुडवत चालू लागलो. समृद्ध अश्या गिरीकुहरामधे वसलेल्या अनेक दुर्गरत्नांमधे रतनगड उठून दिसत होता. खडकाला आरपार भगदाड असलेले ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले ते नजरेस पडत होते. रतन गडाचा खुटाही खिळून बसलेला दिसत होता. भंडारदर्‍याच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पहाणे आनंददायी आहे. हा आनंद लुटण्यासाठी मी माझ्या आयुष्यातली तिसरी आणि रतन गडच्या पहिल्या ट्रेकसाठी सज्ज आणि उत्सुक होतो. अर्थात रतनगड आपली कसोटी पहाण्यात कसलीही कसूर करणार नाही हे जाणूनच होतो. पण इच्छा, शारिरीक क्षमता, सोबत असणाऱ्या मित्रांची साथ आणि सारं नियोजन व्यवस्थीत केल्यास रतनगडाची भेट चिरकाल स्मरणात राहील अशीच असणार यात काही शंका नव्हती. प्रवरेच्या डाव्या अंगाने आम्ही ते सौंदर्य डोळ्यात साठवत पुढे सरत एक दहा मिनिटातच नदी पार करून उजव्या अंगाला गेलो. पाठ बांधाऱ्याच काम चालू असल्यामुळे प्रवरा नदीच्या ओढ्यातील पाणी अडवले आहे याच ओढ्याला पार करून त्याच्या शेजारून आमचा ट्रेक चालू झाला. वरून राजाची यंदा कृपा तशी कमीच झाली त्याचेच पडसाद उमटलेले दिसले. आता वरुण राजाची कृपा कि आपली ते हि सांगणं कठीणच आहे म्हणा असो .....

             गडाच्या वाटेवर काही ठिकाणी दगडावर वर जाण्याच्या दिशेने "बाणाचे चिन्ह" दिसून येतात. त्यामुळे गडयात्रींची वाट सोईस्कर होते. थोडा वेळ अजून चालल्यावर मुख्य ओढ्याला अजून एक ओढा येऊन मिळतो या ठिकाणाहून सरळ जाणाऱ्या वाटेने वर चढावे उजवीकडची वाट पकडू नये. सरळ वाटेने वर जाताना थोडी दमझाक होते कारण चढण अंगावरची आहे. परंतु नीट चालल्यास साधारण २०-२५ मिनिटात एक छोट पठार लागत. आणि आपण गडाच्या मध्यात पोहोचल्याचा आभास होतो.आम्ही रमत गंमत इथवर उत्सहात चढलो होतो. आता वेळ होती नाश्त्याची. "ब्रेड, बटर आणि जाम.." पदभ्रमंतीत सर्वात सोईस्कर नास्ता....१० चा ठोका पडला होता. शरीरशुद्धीने आधीच रिकामी उदर आणि त्यातच गडवाट... सारेच कावले होते.सार्यांनी नाश्ता केला सोबत अतुलने आणलेल्या कोथिंबीर वड्यांचा सार्यांनी आस्वाद घेऊन तोंडभरून तृप्त मनाने कौतुक केलं. बहुउतांशी नवखे ट्रेकर्स असल्यामुळे इथे एक अनुचित प्रकार घडला. काय तो सांगत नाही..!!!! पण पुढच्या वेळेस त्याची खबरदारी घ्यावी असं आश्वस्त केलं. इथे थोडावेळ आराम करून परत मार्गस्थ व्हायचं होतं. तितक्यात सुरुंग लाऊन पाषाण फोडावा तसा आवाज आसमंतात, सह्याद्रीच्या कातळकड्यात घुमू लागला. आम्ही सारे सैरवैर होऊन पाहू लागलो. तोच समोरच गडाच्या वरच्या बाजूने "दरड" कोसळून खाली येताना दिसली. आणि सह्याद्रीच्या दरीत मातीचा धुराळा हवेत सोडून काही क्षणातच विरून गेली. त्यात आम्ही पठारावर होतो हे आमचं नशीब..!!! एक कधीही न पाहिलेली अनुभूती आम्हा सर्वाना आली. पुढे आम्ही वरच्या प्रवासासाठी मार्गस्थ झालो.
          

     पुढची वाट गर्द झाडींची, दगडी गोट्यांची सांगड घालून करवायची होती. सुशांतची सॅग आलटून पालटून वर चढवताना दमछाक होत होती. पण रसद वर नेणं गरजेचं होतं. बाकी पर्याय नव्हता. सुशांत कानदुखीने त्रस्त होता. त्याला ते ओझं घेऊन वर चढणं तितकसं परवडणारं नव्हतं. श्याम आणि सुदेशने ते काम केलं.एक १५ ते २० मिनीटं पुढे गेल्यावर सरळ मार्गावर एक उजव्या अंगाला फाटा फुटतो तो "रतनगडाचा" रस्ता. समोर जाणारी वाट "हरिशश्चंद्र" गडाकडे जाते. इथे वाट चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दाट उंच झाडांचं जंगल असल्यामुळे बाहेरच काहीच नजरेस पडत नाही. वनविभागाचा फलक आहे पण वारा पावसाची झळ पोहचून पार गंजून गेला आहे. आणि काही नकट्या अक्षर वीरांनी, संस्कारहीन भुलचटानी त्यावर आपल्या मर्तीका कोरल्या आहेत. हे जे कोणी दळभद्री असतात त्यांच्या प्रियसिना "सार्वजनिक मालमत्ता" घोषित करायला हवी...!!! मोकळा द्रीघ श्वास घेत, कधी धापा टाकत तर कधी क्षणभर विश्रांतीचे क्षण मोजत पुढे मार्गस्थ होत होतो. मजल दरमजल करत पुढे सरकत होतो. सोबत संगमनेर कॉलेजची मुलं, मुली ट्रेनींग साठी सोबतीला (सॅग) काहीही न घेता गडाची वाट चढत होते.खरतर त्यांना रिकामी पाहून हेवाही वाटत होता आणि हि अशी कसली ट्रेनिंग हा प्रश्नही मनात घर करत होता. दमछाक करत, मधेच थांबत आम्ही शिढीपाशी पोहचलो.
समोरचं दृश्य मनात धडकी भरणारं होतं. "तीस फुटाची पहिली शिढी, दुसरीही तेवढीच असावी, तिसरी बारा फुटाशी
लगभग". तीन शिड्या पार केल्या कि तुम्ही गडावर पोहचले थेट गणेश दरवाज्यातून पुढे जाता येत. पण आमचा LV आणि काही जण अजूनही शिढीपाशी पोहचले नव्हते. गणेशला थोडासा त्रास जाणवत होता. साहजिकच ती चढण पार करण म्हणजे सोपं काम नव्हतं. तिथे कुणालाही त्रास होऊ शकतो. काही वेळाने तेही सारे आले आणि आम्ही एक एक करून शिड्यांच्या पायऱ्या चढून गणेश दरवाजा ओलांडला. गणेश दरवाज्यात गणेशाची सुंदर शिल्पे दिसतात आणि समोर वसलेला अथांग भांडरदारा आणि गाव पाहून पूर्ण थकवा निघून जातो.गणेश दरवाज्यातून वर चढताना काही कातळ कड्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्या पाहून त्या शूरांस वंदन केल्याखेरीज पुढे जाता येत नाही. ते "शौर्य" तुम्ही आम्ही काय वंदाव.... जेथे आपली चढण्याची दमछाक निघते तिथे हे अविश्वसनीय पण अढळ असं "शौर्य" त्या वीरांनी पेरून ठेवलंय त्यांना "मानाचा मुजरा".


 गडावर माणसं फार नाही पण बर्यापैकीच होती. गडावर तीन गुहा आहेत यातील दोन वापरात आहेत. एका गुहेत "रत्नाबाईच" मंदिर आहे. "कळसूबाई", "रत्नाबाई" आणि "कात्राबाई" या तीन बहीणी होत्या. या तीन बहीणींचे वास्तव्य या तीन डोंगरांवर होते. म्हणून हे तीनही डोंगर त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा या परिसरातील लोकमानसांमध्ये रुजलेली आहे. बाकी आई जगदंबाच जाणे....
          
      दुसऱ्या गुहेत नाथू मामाचं छोटेखानी उपहार गृह आहे पोहचता क्षणी मामांन कडून लिम्बु सरबताच रसपान केलं आणि तीसऱ्या गुहेला लोखंडी ग्रील लावले आहेत. या गुहेत साधारण पंचवीस ते तीस लोक झोपू शकतात. म्हणजेच आमच्या पूर्वजांनी आमची नैसर्गिक पंचतारांकित सोय करून ठेवली होती म्हणायची..!!
आम्ही तिथेच आमचं बस्तान मांडल. तिथून दिसणारा देखावा नयनात मावत नव्हता. ते सह्याद्रीच मनाला भुरळ पडणार सुशोभीत दृश्य न्याहाळण्यात सारे असे काही धुंद झाले जणू "स्वर्गातील अप्सराच" तिथे अवतरीत झाली आहे. डाव्या अंगाला उतुंग अस कळसूबाईच शिखर, उजव्या अंगाला आजोबाची पर्वतरांग, समोर खाली भव्य असा भांडरदारा, त्याच्या शेजारी वसलेली कौलारू घर, त्याच्या पाण्यात दिसणारा "पर्वतांनी नेसलेला हिरवागार शालु" , वरून नभाची छबी आणि त्याच्या वर पाठरावरती लावलेल्या पवनचक्क्या जणू वारा घालत होत्या. साधारण चारशे वर्षं जुना असा हा गड "छत्रपतींच्या" आवडत्या गडांपैकी एक का होता याची प्रचीती येथे येते.नायनात ते "सौंदर्य" साठवल्यानंतर क्लिक मारायला सऱ्यांचेच मोबाईल पुढे सरसावले त्यात "शंभराची नोट" (माझा मोबाईल, ती गम्मत भीमाशंकर ब्लॉग मधे वाचायला मिळेल)हि मागे राहिली नाही म्हणा....!!!!
जेवणाची वेळ झाली होती. एकचा ठोका पार होऊन पुढे अर्ध्यावर गेला होता. मग फ्रेश होऊन सार्यांनी
आपापले डबे काढून पोटपूजा केली, काही वेळ विश्रांती आणि साडे तीनच्या दरम्यान गड भ्रमतींसाठी निघालो.आम्हाला गड दाखविण्यासाठी खडा न खडा माहिती असलेली झडे मामांची अवघ्या दहा वर्षाची मुलं सज्ज होती.एकाच नाव "वसंत". आताच्या वसंताप्रमाणेच आगाऊ अवेळी


उधळणारा. दुसऱ्याच नाव "शिवलिंग". खरंतर या नावातच भोळेपणा आहे. आणि त्याला साजेसा असा तो. ते दोघंही पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे... गुहेतून खाली उतरून उजव्या अंगाला प्रमुख दरवाजा आहे. त्या दरवाज्यावर आपल्याला अंजनी सुताची शिल्पे व ईतर देवतांची शिल्पे पहावयास मिळतात. या दरवाज्याला हनुमान दरवाजा म्हणूनही संभोधले जाते त्यातून वर गेलात कि गडावर वास्तव्यासाठी असलेल्या जुन्या भग्न इमारतींचे काही अवशेष दिसून येतात.
पूर्वेस खाली कडेलोट पॉईंट आहे जिथे पूर्वी पाणी साठविण्यासाठी चार फूट अर्धवर्तुळाकार खंदक खोदले आहे. समोरच भव्य असा कुलंग गड, अलंग गड ,आजोबाचा डोंगर त्या पर्वत रांगा पाहून थक्क व्हायला होतं.
पाषाणाचा साज चढलेले उंच खोल असे नक्षीदार कडे जी आजोबाची भिंत म्हणून ओळखली जाते. ती निसर्गाची किमया पाहून आपलं अस्तित्व काय ..?? हा प्रश्न मनात तरळून जातो.आणि उत्तर येतं "शून्य" केवळ "शून्य"..!!
तिथूनच पश्चिमेस पाहिलं कि "राणीचा हुडा" (भग्न बुरूज) नजरेस पडतो. त्या टेहाळणी बुरुजावरुन तुम्ही सकळ
सह्याद्रीच रुपडं डोळ्यात साठवू शकता.तिथून उजव्या अंगाला खाली उतरले कि तीन पाण्याचे टाके आहेत. वरून गढूळ दिसणार पण आत नितळ आणि शीत असं पाणि त्यामध्ये आहे. हे पाणी पिण्याजोगं नाही.मग पुढे आम्ही कूच करतो "चोर दरवाज्याकडे". या दरवाज्याचे वैशिष्ठ म्हणजे यातून उंबरा ओलांडला कि थेट हजार फूट खाली दरीत. जेथे खाली बघण्याची आपली हिम्मत होत नाही तेथे मावळ्यांनी शौर्य गाजवलं आहे. ते स्मरताना अंग पूर्णतः शहारून जातं.
पुढे रात्री जेवणासाठी लागणारं सरपान गोळा करत जिथे पाण्याचे बारा टाके आहेत त्या दिशेने कूच केली.
काही रिकामी तर काही पाण्याने भरलेले असे. पुढेच एक "अंधार कोथडीत" पाण्याचे टाके आहेत. अंधार कोठी व त्यातील पाणी हे अतिशय मधुर असून पिण्यास योग्य आहे. पण हाती मोबाईलच्या उजेडात त्या आखूड जागेतून आत शिरताना मनातील भीती आणि उत्सुकता यात उत्सुकतेपोटी आत शिरण्याचं बळ प्राप्त होते.
विशेष म्हणजे त्या आखूड जागेतून चटकन मागे फिरणं शक्य होत नाही .आपण कल्पनाही करू शकत नाही त्या पद्धतीचे ते तळे निर्मीले आहे. जसे काही अवाढव्य अश्या उंच पाषाण हृदयी पर्वताचे उदर. त्यात असंख्य झऱ्यांचा स्रोत वर्षानुवर्षे आजातायगत चालू आहे आणि प्राणिजनांची तहान भागवत आहे.
आता नेढे पार करून आम्ही कल्याण दरवाज्यापाशी पोहचणार होतो.
तत्पूर्वी गडाच्या पश्चिमेकडील कात्राबाईच्या डोंगराचे कातळकडे, सांधण दरी,सांप्रद गाव पाहून भान हरपून जाते. आणि तोंडातून शब्द नकळत बाहेर पडतात "अप्रतिम" "केवळ अप्रतिम"..!! निसर्गाच्या सौंदर्येपुढे कुणीही लुब्ध होईल असं ते निसर्गरम्य दृश्य. ज्याला सह्याद्रीच वेड आहे तो इथे ठार वेडा झाल्याखेरीज राहूच शकत नाही...तेथुन काही अंतरावरच रस्त्याच्या शेजारीच आम्हाला शिवलिंगाने शिवलिंग दाखवली त्याचं दर्शन घेऊन नेढ्याकडे चालू लागतो. इथेही अंगावरची चढण आहे .नेठे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. रतनगड, मदनगड, राजगड, कन्हेरगड अशा काही मोजक्याच किल्ल्यांना "नेढे" आहे.त्या बोगद्यात तुम्ही उभे राहिले कि वाऱ्याचा थरार आणि रूप तुम्हाला अनुभवायला मिळेल.जर पाय घट्ट रोवले नाहीत तर...आता जशी समाजात काही माणसं हवेत उडतात आणि हवा संपली कि दिसेनाशी होतात तशी हवा आपल्याला उडवण्यासाठी तिथे प्रतिक्षण तत्पर असते...
      समोरच डाव्या हातावर "रतन गडाचा खुंटा", त्याच्यामागे कळसूबाईच शिखर आणि खाली अभेद्य असा कल्याण दरवाजा. नेढेतून खाली उतरताना थोडी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
मागून सुसाट येणारा वारा आपली परीक्षा बघत असतो. आपणास परतीच्या मार्गासाठी यथेच्छ ढकलत असतो.त्याच्याशी संग जोडून आम्ही "कल्याण दरवाज्यापाशी" पोहचलो.
यालाच साम्रद,कोकण किंवा त्रिम्बक दरवाजा असेही म्हणतात. पूर्ण पाषाणात कोरलेल्या कतलपायऱ्या
या कातळकोरीव पायर्‍यांबरोबरच कातळात कोरलेला अविश्वसनीय दरवाजा आहे. या प्रवेशदारात पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. अर्थात देवडय़ा, दरवाजा आणि पायर्‍या या सर्व कातळात कोरुन तयार केलेल्या आहेत. खरतर हे सारं तुम्ही डोळ्यात साठवू शकता. त्यासाठी शब्द तोकडे पडतात. त्याचं मूल्यमापन हि अशक्य आहे. सांगायचं झालं तर सह्याद्रीची तुलना नाहीच....
आता गडावरील शेवटचं ठिकाण म्हणजे प्रवरेचा उगम. आमचे छोटे वाटाडे वाट दाखवत पुढे आणि आम्ही आमच्या डोईच्या वर उंच गवतात त्यांच्या मागे प्रवरेच्या उगम स्थानी पोहचलो.कमी प्रजन्यवृष्टी मुळे पाण्याचा हलकाचा झरा चालू होता. येथील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्याजोगं आहे. अतिशय थंड आणि स्वच्छ. एकंदरीत पाहता गडावर एप्रिल पर्यंत पुरेल इतकं पाणी आहे. बाजूलाच शिवाची पिंड आहे तिचं दर्शन घेऊन आम्ही सारे गुहेत परतलो. मावळतीची वेळ येऊन ठेपली होती.नभात केशरी रंग उधळला होता.त्यातच आमचे शिवप्रेमी मावळे हातात भगवा ध्वज घेऊन ती क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद करत होती.
त्या मंत्रमुग्ध वातावरणात आम्ही गुहेत चूल मांडली.सूर्य नारायणाने आपल्या परंपरेनुसार वर्षा वर्षानुसार सुरु
असलेले त्याचे मंगलकार्य आज हि यथेच्छ पार पाडत धरणी माईची रजा घेतली. एक दिवसाचाचा संसार सह्याद्रीच्या कुशीत आम्ही थाटला होता. गडावर इतरही शिवप्रेमी आपापली राहण्याची सोय करू लागले होते. शेफ अशितोषणे सार्यांना कामं वाटून दिली. जेवण बनवण्याची जय्यत तयारी सुरु झाली. मी हि "मशाल" बनवण्यात गुंग झालो. माणूस हा मिश्राहारी प्राणी असला तरी माणसाला मांसाहार करण्यात जास्त रस असतो हे नाकारता येणार नाही. ज्याने त्याची चव चाखली तो खासकरून बाहेर पडला कि ....असो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे शेळी कितीही भुकेली असली तरी शहाकारीच खाणार. आणि वाघ कितीही भुकेला असला तरी मांसाहारच. दीड महिना उपाशी राहिला तरी रक्तच.... माणसाचं तसं नाही. त्याला दोन्हीपण चालतात. असो तर मेनू होता भात आणि सुके बोंबील. आशुने चटपटीत भाजी बनवली होती. मशाली पेटून उठल्या होत्या. त्यातच समोरचं दृश्य मनाला भुरळ पडणार होतं. हवेत गारवा होता पण थंडी मात्र तितकी नव्हती.रतनवाडी आणि शेजारच्या गावातील टीमटीमनारे दिवे गावाची वेस दाखवत होते. तारे, चांदण्या नभाची शोभा वाढवत होते. प्रवरेच्या पाण्यात त्याची छबी उमटली होती. आणि आम्ही टीमटीमनाऱ्या नयनांनी ते सौंदर्य ह्रुदयात साठवत होतो.खरंतर खऱ्या अर्थाने जगत होतो.
           माझा आणि अतुलचा मार्गशिष असल्यामुळे आमची डिश नाथू मामांच्या उपहार गृहातून घेतली.वरण, भात, भाजी, तांदळाची हातभाकरी, ठेचा अप्रतिम जेवण. बाकी सर्यानीही बोंबलाची भाजी, भाजलेले सुके बोंबील, भात यावर ताव मारून आपली क्षुधा मनमुराद भागवली. मग कॅम्प फायर आणि सुरेल गाण्यांची मैफिल सजली. "महाराष्ट्र गीताने" सुशांतने मैफिलीला सुरवात केली. जतीन, अखिलने कांगोचा ताबा घेतला आणि बाकी साऱ्यांनीच त्यांना साथ दिली आणि त्या सुरेल मैफिलीने सारा परिसर हर्षुन गीतमग्न झाला.नंतर काही गुफेमध्ये तर काही बाहेर झोपी गेले.

     सकाळ झाली काल अस्त झालेला सूर्य आज पुन्हा नवं आशेचे सकारात्मक किरण सोबत घेऊन येणार.काल उधळलेला केशरी रंग आजही आसमंती त्याच रुबाबात उधळला सारे मिनमिनते दिवे शांत झाले. आम्ही एका आतुरतेने सूर्य नारायणाची वाट पाहू लागलो.गडद असलेला केशरी रंग वितळू लागला अन आजोबाच्या भिंतीवरून डोंगराआडून सोनेरी सिंहासनावर सोनपिवळ्या ज्वाला घेऊन रवी आसमंती झळकला. दाही दिशा
प्रकाशित झाल्या. काय ते तेज, का तो रुबाब, जणू..
 कोंदणात सह्याद्रीच्या
 शिवसूर्य जन्माला
 केशरी छटा आसमंती 
  दाही धुंद प्रकाशाल्या    
.......नितेश पाटील                                                       

हे असे संस्मरणीय क्षण ह्रुदयात साठवून आज रतन गडास वंदन करून परतीचा प्रवास साधायचा होता. तत्पूर्वी शरीरशुद्धी, मामाच्या उपहारगृहातील फक्कड चहा आणि आशुने बनविलेले अप्रतिम पॊहे यांचा आस्वाद घेऊन, आलो त्याच मार्गाने परतीचा प्रवास.सारं आटपताना दहा वाजले. खाली उतरतानाही सोबत वसंत आणि शिवलिंग होते. आम्ही निघायच्या आधी काही ट्रेकर्स गडावर पोहचले होते. तशी शनिवार रविवार वर्दळ
चालूच असते गडावर. आजकाल लोकांचा ओढा या दिशेने वाढलेला दिसतो. पण त्याचा गैर वापर कुणी करू
नये इतकंच वाटत. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आपण त्यापुढे आपलं सर्वस्व बहाल करण्या इतपत. सौंदर्याचे, प्रेमाचे अन प्रेमजीवनाचे धडे गिरवायचे ते त्याच्याकडून. तो कोणत्याच गोष्टींचा गर्व बाळगत नाही, जे आहे ते इतरांत वाटून टाकायचं, त्याला फक्त द्यायचं माहित आहे. पण त्याच्याही मर्यादा काही तो आखून आहेच. नाहीतर माणूस नावाचा प्राणी लुट करयाला तत्परच असतो म्हणा... असो....
सोबत बऱ्याच अविस्मरणीय आठवणी घेऊन खाली उतरत होतो. गाण्यांचे सुरेल सूर घुमवत रस्त्याने वेळीस थांबून नाचत गात सारे गावाच्या वेशीवर प्रवरेच्या
बंदीस्त पात्रात डुबकी मारण्यास सज्ज झाले. गार पाण्याची तमा न बाळगता साऱ्यांनीच इथे अंघोळी केल्या. . कळत नाही असा माणूस या पृथ्वीतलावर नाही. खयायचं तर सार्यांनाच कळतं. मग कुठे काय करायचं याच भान सार्यांनाच असायला हवं......
खाली जाऊन अमृतेश्वराच दर्शन जे घ्यायचं होतं. पण इथेही एक अनुचित प्रकार घडला. आपण ट्रेक करताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. साऱ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. काही गोष्टी ज्याच्या त्यालाच कळायला हव्यात
अर्धाच्या सुमारास खाली पोहचलो. ड्रायवर दादाची भेट घेतली आणि आधी सॅग वर बांधून घेतल्या मग दर्शनास गेलो. "अमृतेश्वराच हेमाडपंथी मंदिर" कलाकुसरीचा अनोखा नमुना. रतनवाडीमधे हे अद्भुत मंदिर आपल्याला पहायला मिळते. त्याआधी पहिले दृष्टीस पडते पुष्कर्मी तीर्थ. याच्या चौबाजूनी सतरा छोट्या नक्षीदार देवळांची निर्मिती केलेली आहे चारही दिशांना चार आणि दर्शानीस एक त्यात वेगवेगळे देवांच्या मुर्त्या स्तिथ आहेत. मधोमध आसपास पंचवीस फूट खोलवर पाणी दिसते. मंदिराच्या परिसरातली हि "पुष्कर्णी तिर्थ" कायम लक्षात राहन्यासारखी. अमृतेश्वर मंदिराच्या प्रथम दर्शनी दोन नंदी एका मागोमाग स्तिथ आहेत. अप्रतिम कलाकृती असलेलं हे मंदिर वेगवेगळ्या शिल्पानी सुशोभित आहे. गाभार्यात पाच फूट खोल खाली अमृतेश्वराची पिंड आहे, सभामंडपात सहा नक्षीदार खांबांची अप्रतिम कलाकृती पहावयास मिळते. झांज राजांनी १२ नद्याच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर. रतनवाडी ह्या गावी एक अतिशय सुंदर असे हेमाड पंथी शंकराचे मंदीर स्तिथ आहे.
आमची हि पहिलीच ट्रेक अगदी सुरळीत आणि धमाल मजेत पार पडली होती. मागील ट्रेकपेक्षा या ट्रेकचा उत्साह वेगळाच आणि आनंददायी होता. डोंगरयात्री समूह असता तर मजा द्विगुणित झाली असती. पण असो नाही त्याला तुम्ही काय करणार ना ? पुढच्या फेरी जाऊ कि सोबतीनं... पण तोवर निरंतर ग्रुपला काहीतरी नाव देणं गरजेचं होतं. आणि सर्वानुमते रतन गडाच्या पायथ्याशी अमृतेश्वराच्या साक्षीने "शिवप्रेमी गडयात्री" असं आमच्या समूहाचं नामकरण झालं.
तदनंतर रामदास मामांच्या घरी गावरान चविष्ट जेवणाचा (गडावर होतं त्याच पद्धतीच)आस्वाद घेऊन अडीच वाजता परतीची वाट धरली. यावेळेस मात्र "भांडरदारा धरणाजवळून" निघालो जो जवळचा मार्ग आहे. धरणापाशी थांबून काही क्लिक मारले आणि मागे सोडलेल्या गडावरच्या आठवणी आणि पुढच्या ट्रेक समंधीत चर्चा करत सव्वा सहाच्या सुमारास चहाची चुस्की घेण्यासाठी खोडाळ्यात थांबलो. तिथेच सार्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं. पहिलाच ट्रेक असला तरी सारे निसर्गाचे ते सौंदर्य आणि चमत्कारिक रूप जेंव्हा पाहण्यास मिळते तेंव्हा स्वतःचे भान कसे हरपून जाते हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. तदनंतर लागलीच ट्रेकसाठी झालेला खर्च आणि शिल्लक रुपये याची विल्हेवाट करून ट्रेक संप्पन झाल्याचं घोषित करून पुन्हा परतीचा मार्ग धरून सुखरूप घरी पोहचले. पण सह्याद्रीची झिंग मात्र तशीच होती आणि निरंतर रहावी हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
जगावं त्या धुंदीत मी
शिवप्रभूंच्या सह्याद्रीत
विनवीतो जगदंबेस मी
शिवरायांचा आश्रीत.....
.............नितेश पाटील 


आपला अभिप्राय नक्की कळवा....
|| जय शिवराय ||
आपल्याला रतन गड पर्यटनाला लाख लाख शुभेच्छा
◆◆◆नितेश पाटील,धनसार,पालघर ९६३७१३८०३१◆◆◆Email :- nitesh715@gmail.com