Monday, June 13, 2016

नकळत्या कर्माची फळ...

●नकळत्या कर्माची फळं...●
        निसर्ग आपल्याला बरेच काही शिकवत असतो. निसर्ग सानिध्यात बरेच... नव्हे सर्वच जीव आश्रित आहेत. आणि त्या सार्यांनाच त्याची अनुभुती येत असते. निसर्गाच्या समवेत जगण्याची मजा औरच... पण आज माणूस इतका प्रगत झाला कि तो त्या निसर्गाला आव्हान देऊ लागला. काँक्रेटच जग उभं करण्यासाठी अगणित झाडांची कत्तल केली जात आहे. आणि त्याचे परिणामही भोगतो आहे पण सुधारेल तो माणूस कसला...
         असो...काही दिवसांपूर्वीच आजोळात काकांच्या घरामागे झाडांच्या साफसुथऱ्या गर्दीत एक शर्थीचे आव्हान पहावयास मिळाले... पपईच्या एका झाडावर दोन गोंडस पक्षी ज्याला आम्ही बुलबुल म्हणतो, रोज येऊन बसत... मागे सतत पाण्याचा निचरा आणि बाकी इतर झाडांची सावली, त्यामुळे तिथे सतत कडकडत्या उन्हातही थंडावा असतो... एकंदरीतच त्यांनी ती जागा हवेशीर आणि माणसाळलेली पाहून आपले घरटे बांधण्याचा निर्णय घेतला.
          आता जागा निवडली ती पपईच्या झाडाच्या थेट शेंड्यावर. म्हणजे कुणाचं तिथे चढणं नाही कि पाहणं नाही असं बुलबुलना वाटलं. रोज थोडं थोडं करून तीन दिवसानंतर घरट्याला घरपण आले. सुरेख असे वाऱ्याने पपईबरोबर हरकत करणारे साजेशे घर. त्यांना माहित होतं इथं माणसांपासून आपल्याला काही धोका नाही. दोघंही तिथे नांदू लागले. चौथ्या दिवशी त्या घरट्यात एक अंड्याची भर झाली. चिमुकला जीव आईच्या गर्भातून जगात आईच्या प्रेमाच्या आवरणात बंदीस्त असूनही निर्धास्त त्या गोजिरवाण्या घरात स्तिथ झाला. दुसऱ्या दिवशी दुसरा, तिसऱ्या दिवशी तिसरा. असं करता दोघांच्या संसारात आणखीन तीन बुलबुलच्या तारा नवे स्वर छेडण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांना फक्त मायेच्या उबेची गरज होती.
        आणि काळाने घात केला. निसर्गाने आपले हात उंचावले. पपईने आकाशाला भिडण्यासाठी एक पाऊल वर उचलले...या जगात कुणीही कुणासाठी थांबत नसतो....राहते घरटे एका कुशीवर वळू लागले...जणू धरीत्रीकडे पाहण्यास ते वळले...नवे स्वर छेडणाऱ्या तारा आपसूकच कंपू लागल्या...  तीन तारातील एक तार छेडली गेली... त्या कंपणाने घरट्यातून ती जमिनीकडे आकर्षित झाली...आपल्या मायेची उब सोडून धरीत्रीच्या चरणी ठप...चा स्वर बोलून विस्कळीत पसरली.... पुन्हा कधीच न उमटण्यासाठी...
       पण वर बुलबुलच्या अंतरीचे, आईच्या आर्ततेचे स्वर टाहो फोडत होते... विस्कटलेल्या स्वरांना संजीवनी देण्याचा अशक्यप्राय प्रयत्न वारंवार करत होते. त्यातच दुसऱ्या दिवशी दुसरे...पुन्हा तोच आक्रोश...काय गुन्हा..., म्हणून त्या ईश्वराला कोसीत होते...विसरले होते...त्या मोहमायेत दुसऱ्याच्या उरावर आपण बस्तान केले आहे...त्याचाही उर भरून येईल...तो हि जगण्याची धडपड करेल...आणि त्या वेळेस आपण असूनही नसल्यासारखे असू... आयुष्याचा खेळ कधी कलाटणी मारून जाईल सांगता येत नाही.
        तात्पर्य :- जगण्याचा अधिकार सार्यांनाच असतो, प्रत्येकाने प्रत्येकाचा मान ठेऊनच जगलं पाहिजे. नकळत झालेल्या कर्माची सुद्धा फळं भोगावीच लागतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपणच ओढवलेली असते. इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

शिक्षण आजचे...

शिक्षण आजचे...
________________________नित
          आज शिक्षण या विषयावर विश्लेशण करणारी सुज्ञ माणसं खूप आहेत.पण ती असली आणि त्यातुन बोध घेणारी सुशीक्षीत माणसं असली तरी ह्या स्पर्धेच्या जगात ही जीवनाची विस्कटलेली घडी आपण व्यवस्थीत करु शकतो ? कुठल्याही पालकांना विचारा कि...
'' किती हा मुलांचा अभ्यास, नाही ..?,
आपल्या वेळी एवढा नव्हता..!! "
"हो, खरं आहे.. पण स्पर्धेत टीकायचं असेल तर करावाच लागणार." हे उत्तर...ते चुकीचं नाहीये म्हणा...पण नेमकि शिक्षण पद्धती कशी असायला हवी यावर विचार करायला हवा. आजचं शिक्षण फक्त स्वतःसाठी आहे.
          पूर्वी शाळांची मारामार असे. शिक्षण सर्वाना सारखं मिळावं म्हणून कितीतरी समाजसुधारकाना समाजाविरुद्ध लढावं लागलं, पण आज परिस्तिथी बदललेली आहे. आज शाळेना उत आलाय. आता शाळा सुरु केल्या आहेत गुंतवणूकदारांनी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत.
       माझी भाची यंदा पाहिलीला गेली. तिची इंग्लिश माध्यमातील इयत्ता पहिलीची पुस्तकं पाहून वाटलं कि हा निरागस लहानसा जीव त्या पुस्तकांचे ओझे कसे सांभाळणार... त्यातील इंग्लिशमधील वाक्यरचना... ती आकडेमोड... सारं त्या जीवा पलीकडचं... तरीही तिला ते ओझं उचलावच लागणार... सकाळी उठून शाळा... शाळेतून आली कि क्लास....क्लास वरून आली कि दोन्हींचे गृहपाठ...झाला भरला दिवस... हा नित्यक्रम चालूच राहणार... आणि दिवसभराच्या शैक्षणिक ज्ञान मिळवण्यासाठी त्या चिमुरडीचे उध्वस्थ झालेले बाळपण...परिणामी होणारी आईवडिलांचीही दगदग...त्या सर्वांचे रुपये आपण शैक्षणिक स्वंस्थाना भरायचे...किती ते सार्यांना माहित आहेच...स्वस्थेचं नाव तसा रुपया...
        भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या ऍडमीनेशनची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते.
      आज समाज्यात जे आयकॉन आहेत त्यांचं ते अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत. कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं. जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गसंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. बहुतांशी मुलांना जास्त पगाराच्या नोकऱ्याही मिळतात पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधलं जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील. आज देश जिथे सुशिक्षित आहे तिथे भ्रष्टाचार आहेच, अनैतिकता, वृद्धाश्रम...काय कमी आहे. काहीच नाही..!! नेमका समाज सुशिक्षित कसा होतो ते काही मला कळलेलं नाही. असो माझंही अज्ञान असेल...
       इतर देशातील शिक्षण धोरणांवर एक लेख माझ्या वाचनात आला होता,  कुठे आठवत नाही पण काही मुद्दे आठवतात. खरं खोट्यापेक्षा मुद्दे महत्वाचे आहेत. सुशिक्षित अज्ञानाचा धोका ओळखून जपानमध्ये मुलांना घोकंपट्टी पेक्षा प्रॅक्टिकलवर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. जर्मनी मुलांना परदर्शकतेच शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत प्रॅक्टिकल चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम सायन्स मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा सायकल प्रेमी देश. ४ वर्षाच्या मुलांना सायकल चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर थेरी कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात. प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार हाच विचार ते देश करतात. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
      रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती.  कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
      रवींद्रनाथ टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते. जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात ! मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
पण ईतर देशातील शिक्षण पद्धती भारतात का वापरली जात नाही ? त्या देशातील ( पेहराव ,भाषा,संस्कृती, model,smart city,bulet train,ईतर ) अनावश्यक म्हणता नाही येणार..!! पण शिक्षण पद्धती का नाही ?

अज्ञान मी
ज्ञानी जग सारे
शिशु वयात थोरपण
बालपण हरवले का रे
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)