Tuesday, September 27, 2016

सिक्कीमच्या अशाही वाटा...

सिक्कीमच्या अशाही वाटा..
_______________________नित

नियतीने सुरुंग पेरावे
मी त्याच दिशेने जावे
वाटेतल्या धोंड्याना
तरी, मी का दोष द्यावे

​प्रवासाचा तिसरा दिवस रविवार 25 सप्टेंबरची पहाट. मी जरी तेवढ्यातच घुटमळत असलो तरी गाडीने मात्र मला दीड तास उशिरा का होईना, पश्चिम बंगाल मधील, शिलिगुडी शहरातील न्यू जलपाईगुडी स्टेशनला, सकाळी पाच वाजता पोहचवले. मुसळधार पाऊस स्वागतासाठी सज्ज होता. त्याचे अंग चोरत प्रतिक्षालाय गाठले. फ्रेश होऊन चहाची चुस्की घेतली आणि सात वाजता बाहेर पडलो.

पश्चिम बंगाल मधून सिक्कीमची राजधानी असलेल्या गँगटोक साठी प्रस्थान करणाऱ्या गाडीत बसलो.  इथून पुढचा प्रवास दाट डोंगरघाटातून असल्यामुळे इथून ट्रेनचा प्रवास नसून चाराचाकीने करावा लागणार होता. १० नं राष्ट्रीय महामार्गाची सोबत करून, तिथून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मेल्ली गावापाशी असलेली सिक्कीमची बॉर्डर गाठली. तसा दीड तासाचा रस्ता.

या रस्त्याची खासियत म्हणाल तर उजव्या हातावर खोल दरीत गँगटोक हुन येणारी सिक्कीमची प्रसिद्ध तिस्ता नदी जी त्या डोंगर घाटांच्या दरीतून मनमौजी, मस्तीत वाहताना दिसते.जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जात पश्चिम बंगाल मधून ब्रह्मपुत्रेला मिळते. जागोजागी मनमोहक दृश्य निर्माण करते.ते दृश्य न्याहाळत प्रवासाची मजा द्विगुणित होते.या नदीच्या पात्रावर रियांग जवळ हॅंड्रो इलेक्टीकॅल प्रोजेक्ट हि कार्यान्वित आहे. सिक्कीमची जीवनदायिनी म्हणूनही तिला संबोधले जाते.

उजव्या हातावर जितकी खोल दरी आहे. तितकिच डाव्या हातावर उंच डोंगररांग अखंडित स्तिथ आहे. उंच उंच वृक्षांनी सजलेले घनदाट जंगल तिचे सौंदर्य आणखीन खुलवते. हि झाली जमेची बाजू पण पावसाळ्यात हे सौंदर्य अधिक खुलत असले तरी, ते सौंदर्य न्याहाळताना पाषाणातील पाषाण हृदयाला कधी पाझर फुटेल आणि पाषाणासकट पुढ्यात येईल याचाही नेम नसतो. मेल्ली पर्यँत जाताना एक दोन ठिकाणी त्याचा प्रत्ययहि आला.

वाट वळणाची, चढ उताराची,
उंच झाडांची गर्दी,त्यात पावसाची वर्दी,
दरी खोऱ्यातून वाहे,बघा सरितेचे पाणी,
निर्मित विद्युत लहरी,जाते गंगेच्या घरी,
खाईत जेवढ्या खस्ता,तेवढी हसते तिस्ता,
जीवनदायिनी सिक्कीमची,जाते शोधत रस्ता,
सौंदर्य तिचे अफाट,डोंगर दाऱ्यांमधी,
खुलुन दिसते भलतेच, बघा प्रजन्य वर्षामधी.

मेल्लीला साडे नऊला पोहचून गाडी बदलली. प्रवास होता नदी क्रॉस करून जोरथान्ग कडे. तो हि प्रवास जोरथान्ग कडून येणाऱ्या रंगीत नदीच्या सोबतीने. हि नदी मेल्लीला तिस्ता नदीत समर्पित होते.रंगीत नदी म्हणजेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमची सीमारेषा. नदीच्या पलीकडे सिक्कीम चेकपोस्ट वर सर्वांचे ओळखपत्र पडताळले. पावसाची रिपरिप चालू होती. काही अंतर पार केल्यावरच हा रस्ता नियोजित ठिकाणी पोहचवेल कि नाही या शंकेची पाल मनात चुकचुकली.

महाकाय पहाडावरून जागोजागी दरडी कोसळलेल्या.  कमी अधिक प्रमाणात कोसळत होत्या. दगडी आणि मातीने रस्त्यात पार चिखल झालेला.जागोजागी रस्त्यावर दरडींचे ढीग होते. त्या गाडीत जीव मुठीत घेऊन बसलो होतो.गाडीचा ड्रायवर मात्र समोर कमी आणि खिडकीतून बाहेर वर डोंगर उतारीवर जास्त लक्ष देऊन होता. अखेर गाडी अश्या टप्प्यावर येऊन उभी राहिली जिथे भर रस्त्यात चिखलाचा जवळ जवळ एक फूट खच पडलेला.

पाषाण उरावर, सौंदर्य राज करतो,
हिरवे रान नभात,मेघ खेळवतो,
वरूण राजा हर्षुन,शिडकाव प्रेमाचा करतो,
पाषाणाला भेदून, माणूस वाट करतो,
दृष्ट लागते कोणाची, का काळ घात करतो,
पाझरत्या हृदयाचा, बांध तुटून पढतो,
जीव मुठीत घेऊन, चाकरमानी लढतो,
चंद्रावर गेला माणूस, निसर्गापुढे हरतो,
पुन्हा उठतो पुन्हा लढतो, पुन्हा पुन्हा तो हरतो.

पावसाची बुंदबंदी चालूच होती. पुढे एक ट्रक पास झाला आणि आमचीही गाडी पुढे सरसावली, वीसएक मीटर चालून गाडी तिथेच रुळली. पूढसा रस्ता बहुतेक तिला नकोसा झाला. पुढे नेण्याच्या प्रयत्नात ती आणखीनच फसली. त्या गाडीच्या रुपाने आमचं आयुष्यच तिथे फसलं होतं. वरून येणारे पाणी कधी आपल्या सोबत दरड घेऊन येईल याचा नेम नाही. मागे जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. मागे गाड्यांची रीघ होती.शेवटचा पर्याय म्हणून त्या चिखलात गाडीला धक्का मारण्यासाठी आम्ही सारेच उतरलो. तरी काही वळेना.अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर गाडी तीस मीटर पुढे सरकून त्यातल्या त्यात कमी चिखल रस्त्यावर गाडी बाहेर निघाली होती.आम्ही पावसाने कमी आणि घामाने अंग जास्त भिजले होते.

तसेच चिखल माखल्या पायाने गाडीत बसलो आणि पुढचा काहीसा त्याच मोलाचा रास्ता कमी करण्याच्या दिशेने गाडी मार्गस्थ झाली. विशेष म्हणजे जागोजागी सिक्कीम शासनाचे jcb होते पण कळलं कि रविवारची सुट्टी मनवण्यात प्रशासन दंग आहे. त्यांना जनहितापेक्षा स्वहित जास्त महत्वाचं वाटत असावं... आणि चाकरमान्यांना नोकरीची चिंता.

ड्रॉयवरला विचारलं तर म्हणाला हा आयुष्याचा जुगार आम्हाला पावसाळ्यात दिवसातून आठ दहा वेळा खेळवाच लागतो. त्यात आतापर्यंत तरी आम्हीच जिंकत आलोत. पुढे त्या निसर्गाची इच्छा... एव्हाना आम्ही जोरथान्गला पोहचलो आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
...नितेश पाटील

Tuesday, September 6, 2016

संत तुकाराम डेकोरेशन

शिवा डेकोरेशन

​#शिवा_डेकोरेशन_ग्रुप_धनसार_पालघर
प्रो. शिवनाथ घरत

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यामागची लोकमान्य टिळकांची भूमिका तेव्हा त्या परिस्तिथीला रास्त होती. आज बाप्पाची होणारी विटंबना पाहून मन खिन्न होते. त्यातूनच काही मंडळे सुशोभीकरण, विविध स्पर्धा, चलचित्र सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. शिवा डेकोरेशन ग्रुप धनसार गत वीस वर्षापासून, आणि त्या समूहात मी गत पंधरा वर्षापासून अखंडित दरवर्षी दोन महिन्याच्या अथक परिश्रमातून   आठ ते दहा ठिकाणी चलचित्र सजावट साकार करून गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने समाजास एक सुसंदेश देण्याचा प्रयत्न करत असतो.(समूह महत्वाचा)
त्यातूनच आम्ही साकारलेले चलचित्र १

#संत_तुकाराम

संत तुकोबारायांचे जीवन म्हणजे सतत, अनंत, अथांग विठ्ठलभक्ती आणि ती केवळ अंत:करणात व वाणीत नव्हे, तर कृतीतूनही ते व्यक्त करणारे. त्यांच्या काही अभंगांच्या एकेका चरणावरूनही एक समृद्ध आशय आपल्यासमोर येतो. संत कुणालाही होता येत नाही. त्यासाठी जगाने दिलेला विषाचा प्याला हसतमुख प्राशन करावा लागतो. त्यातून येणारी गरळ सुद्धा समाजहिताची, इश्वरनिष्ठ असणे गरजेचे आहे. आणि तुकोबा म्हणजे संतश्रेष्ठ.

‘जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दु:खलेश।।

तुका म्हणे तोची संत। सोशि जगाचे आघात।।

महापुरे झाडे जाती। तेथे लव्हाळे वाचती।।

ऐसी कळवळयाची जाति। करी लाभाविण प्रीती।।

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।

शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।

आणि त्यांचा हाच मानवतावाद सत्ताधाऱ्यांच्या वचनी पडणे अवघड होते, म्हणूनच सत्ताधाऱ्यांच्या ननेतृत्वाखाली तुकोबारायांना त्यांच्या अभंगाच्या गाथा नदीत बुडविण्याची आज्ञा झाली. पण तुकोबांचे अभंग म्हणजे ज्याचा भंग होत नाही असे अविनाशी तत्व. वाणी म्हणजे सरस्वती, हि विद्या व ज्ञानाची देवता. आणि ज्ञान हे कधीच नष्ट होत नाही, म्हणूनच इंद्रायणीने तुकाराम महाराजांची अभंग गाथा तेरा दिवसात जशी च्या तशी तुकोबांना सुपूर्द केली. तेच दृश्य चलचित्राच्या माध्यमातून साकारले आहे.

जो होई विठ्ठलाचा, तोचि होय विठ्ठल
पाचवा वेद, अभंगवाणी तुकीयाची
भागवत धर्माचा तो कळस
...नित

नितेश पाटील ( धनसार,पालघर)

Sunday, September 4, 2016

बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया...

शेष काही घटिका
       लगबग वाढली आता
येतील बाप्पा आज
       उद्या चतुर्थीचा सोहळा

...नित