Sunday, March 19, 2017

उदास पाचोळा


उदास पडे तो पाचोळा
वारा संगे घेऊन जाई
आले खोडास अंकुर नवे
काय गुन्हा तो गळून जाई
___सिक्कीम मध्ये दोन प्रोजेक्ट चालू असल्यामुळे मानपुरहुन नामथांग आवागमन करावी लागते. सिक्कीम मध्ये प्रामुख्याने चार जिल्हे आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण सिक्कीम. एक प्रोजेक्ट पश्चिम सिक्कीम मधे तर दुसरा पूर्व सिक्कीम मधे म्हणून प्रवासाची दगदग होते. त्यातच सिक्कीमचा प्रवास म्हणजे शर्थीचं काम. डोंगर, दऱ्या, नद्या, जंगलांनी, डोंगरउतारावर गजबजलेल्या खेड्या, शहरांनी गजबजलेला प्रदेश. सपाट प्रदेशाचा लवेशही नाही. रस्तेही इथे जरा दचकूनच असतात. कधी दरड कोसळेल आणि त्यांच्या जीव गुदमरेल हे त्यांनाही ठाऊक नसतं. त्यात त्यांच्यावर आवागमन करणारी वाहने. वर शे सव्वाशे फूट उंचीच्या झाडांचा डोलारा मिरवत असणारे उंच डोंगर, आणि खाली डोंगरघळीतून फेसाळत वाहणारी तिस्ता.
____ मानपुर ते नामथांग ५३ किलोमीटरचा प्रवास. आम्ही मुक्कामी मानपुर असलो तरी नामथांगला जाण्यासाठी मात्र पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करणे चुकत नाही. कारण हा रस्ता त्यातल्या त्यात सोयीचा. सकाळी कामावर जाण्याची लगबग चालू होते. सात वाजता मानपुर सोडतो. काल वातावरणात गारवा होताच, पण आकाश मात्र अजून ढगांनी वेढलं होतं. काल परवा पाऊस होऊन गेलाच होता. आज काय ती मोकळीक होती. सिक्कीम सोडून मेल्लीचा तिस्ते वरील पंडित जवाहरलाल नेहरू ब्रिज क्रॉस करून पश्चिम बंगाल मधे प्रवेश केला. आणि रेंगपो गँगटोक कडे जाणारी वाट धरली. वाटेत उजव्या हातावर उंच उंच झाडांची गर्द दाटी आणि डाव्या हातावर खाली तिस्तेची खळखळ चालू होती.
____वसंताचं आता काही दिवसातच आगमन होणार म्हणूनच पानगळतीमुळे रस्त्यावर पडलेला उदास पाचोळा वाऱ्याने सैरवैर होत होता. वारा त्याच्या मनाविरुद्ध त्याला वाहून नेत होता.  काही दिवसांपूर्वीच ज्यांनी त्या गगनचुंबी वृक्षांना सौंदर्यवान बनवलं, आज त्याच वृक्षांकडे त्यास राहण्यास जागा नव्हती, म्हणा किव्हा त्यांनी त्याचा त्याग केला होता. कारण परिस्तिथीशी सामना करता येतो, संघर्ष करता येतो पण परिस्तिथी बदलणं तदक्षणी आपल्या हातात नसते. त्यासाठी सुरवातीपासूनच आपला पाया मजबूत असायला हवा. शेवटी सुकली पाने.. ती गळनारच तो निसर्ग नियम आहे, पण पिकलं पान गळतं किव्हा त्याग करतं हे निसर्ग नियमाला अनुसरून नाही. याची जाण त्या वृक्षांस, तत्पूर्वी तो वृक्ष बहारदार बनवणार्यास असायला हवी.... असो... पाचोळा कितीही त्यागी असला तरी त्या वृक्षांस मात्र त्याचं काहीएक घेणंदेण नव्हतं. पण  पाचोळा मात्र मनात एक आस घेऊन अजूनही त्या वृक्षाच्या पायाशी रेंगाळत होता.सुकल्या पानांनी आधीच दडी मारली होती, पण पिकली पाने मात्र त्या गर्द झाडांच्या दाटीत डोंगरउतारावर पांगुन आसुसलेली विखुरली होती. निसर्गसोबतच माणूसही त्याची पुनरावृत्ती करतोय. फरक एवढाच कि पाचोळा गळतो आणि माणूस गाळतो.

___त्या उदास पाचोळ्याचे सल उरात घेऊन साईटवर पोहचलो. दिवस सरला. आणि रोजची सांज आज वेळेआधीच आपले बस्तान मांडू लागली. दिवसभर सूर्य जागा असूनही त्याला काही काळसावळ्या मेघांनी दृष्टीस पडू दिलं नाही. इथलं वातावरण क्षणात बदलतं. जश्या समुद्राच्या लाटा प्रतिक्षण बदलतात. आणि तशीच माणसंही काही.... बरं... सांज लवकर आली खरी पण गारवा कवटाळूनच. त्या उदास पाचोळ्याचा दाह शामविण्याचा तिचा प्रयत्न असावा. पण त्यातूनही आपण या सृष्टीचं काही देणं लागतो हि जाणीव पडत्या वेळेसही त्यांना होती.आणि म्हणूनच त्या निर्दयी वृक्ष मनोऱ्यातून, पायथ्याशी घुटमळणाऱ्या  पाचोळ्याचे, अंतरीच्या यातनांचे बाष्परूप  डोंगरमाथ्यावर सौंदर्याची पखरण करत होते. ज्यांच्या मनात फक्त देणं आणि देणं हीच भावना असते, ते घेण्याचा विचार कधीच करत नाहीत. जसे आईवडील आपल्या मुलांप्रति निस्वार्थी आणि प्रामाणिक असतात. आणि त्यांचीच काही मुलं कर्मदरिद्री, अकृतज्ञ असतात हि शोकांतिका... 
____त्या सौंदर्याचा मेघांनाही लळा लागला.त्या मृदू वाटणाऱ्या सौंदर्यास त्यांनी नभात गळाभेट घेण्यास सुरवात केली. आणि एकवटलेले दुःख अनंत नभातून क्षुष्म धरेवर अश्रू ढाळू लागले. या मायानगरीत गुंतलेल्या जीवाला त्या अश्रूंचा सुगावा लागणं कठीण. आम्ही मात्र साईटवरून काढता पाय घेतला. अंधार बळावयाच्या आत आम्हाला  रेंगपो सिंगताम राष्ट्रीय मार्ग गाठायचा होता. म्हणून शेजारीच असणाऱ्या तिस्ते वरील चार फूट रुंदी आणि जवळपास चारशे फूट लांबीच्या लोखंडी तारांवर टांगत्या असलेल्या पदचारी पुलाचा अवलंब केला. पावसाची रिपरिप वाढली होती. पुलावरून जितक्या वेगाने जाण्याचा प्रयत्न करीत तितकाच तो हेलकावे घेई. त्यातच पाय चिखलातून वर आल्यामुळे लोखंडी प्लेटवरून घसरत होते. अंततः  घाई टाळली आणि भिजणे पसंत केले. शेवटी मृत्यू शेवट असला तरी जपावं लागतंच कि... पुढे अंगावर येणारी चढण पार करून धापा टाकत वर चढलो. काही वेळात बस आली आणि  पुढचा प्रवास चालू झाला.
____या क्षेत्रात नागमोडी चढ उताराचे रस्ते पाहता छोट्या बसेस चालतात.बस मधे बसण्यास जागा नव्हती. पण ड्रायवर काकांनी त्यांच्या शेजारीच जागा करून दिली. रेंगपोला चहा घेण्यासाठी बसने दहा मिनिटांचा थांबा घेतला. चहाची चुस्की घेऊन मेल्लीच्या दिशेने बस निघाली. आता पावसाने मात्र जोर धरला होता. पावसाचे थेंब काचेवर आदळत होते. रस्त्याला बस  दिव्यांचा प्रकाश दाखवत पुढे मार्गक्रमण करीत होती.
____ सकाळी उदास पडलेला पचोळा चिंब भिजून टवटवीत झालेला दिसला. त्याच्या अंतरीचा दाह क्षणात वीज रूपाने चमकून त्या वृक्षांवर यातनांचा टाहो फोडून जाई. त्याची पुनरावृत्ती वारंवार होई. तद्वतच बस डाव्या कुशीवर वळली. त्या भयाण काळोख्या रानात भिजलेले उचं झाडांचे खोड दानवरूपी भासू लागले. नाभातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या भाराने त्या खोडाच्या वजनी लोंबनाऱ्या फांद्या, त्याच्या सावटनाऱ्या अनंत भुजा भासू लागल्या. त्याचे पर्ण जणू अनंत लाळ गाळणाऱ्या लपलपणाऱ्या जीभा भासू लागल्या . मागे असणारे निष्पर्ण वृक्ष त्याच्या जटासम भासू लागले. मधेच पडणारा विजांचा प्रकाश त्याला आणखीनच चेतवून जाई. त्या पिकल्या  पानांचा आक्रोश त्याच्या जिव्हारी लागत असेल का?असा प्रश्न मनात येऊन गेला. अश्या दानवाच्या अधीन असण्यापेक्षा धरेच्या स्वाधीन होणं जर त्यांनी पसंत केलं तर त्यात कहीच वावगं नाही.   
_____बसच्या दिव्याच्या प्रकाशातून जणू परीसाचा स्पर्श होऊन ती पिकली पाने बावनकसी सोन्याप्रमाणे चमकू लागली. भिजल्या काळ्याशार जमिनीच्या उतरनीवर सोन्याची नक्षीदार सेज सजली होती. तरळ अश्रूंच्या ओलाव्याची चमक अधिक आकर्षित होती.  पण असल्या साज शय्येवर मान टाकून निजण्यास आज न कुणास उसंत, न कुणास त्याकडे पाहण्यास वेळ. आयुष्याच्या वाटेवर अशीच सोन्यासारखी माणसं आपल्याला आयुष्य देतात, आपल्या आयुष्यात येतात. आणि आपल्या सुखासाठी त्यागीसुद्धा होतात. आपल्याला त्याची जाणीव असणे गरजेचे आहे. शेवटी निर्जीव सोन्याच्या हव्यासापाई ( ऐश्वर्य )माणूस सोन्यासारखी सजीव माणसे गमावतो याचं दुःख आहे.
असो....
बहर और कहर में एक लब का भी फासला नहीं ।
जिंदगी और मौत कि तो मेरे हात में लगाम नहीं ।
जहर मैने हि बोया था शायद मेरे जिंदगी में...
लाख जखम भी गर दीये तुने, मुझे कुछ शिकवा नही ।

___नित (धनसार,पालघर)
९६३७१३८०३१