Tuesday, November 17, 2015

बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन

बाळासाहेब ठाकरे
१७ नोव्हेंबर २०१५ बाळासाहेबांचा तिसरा स्मृतिदिन.....
भावपूर्ण आदरांजली....
लाखो हिंदूंच्या मनावर अधिराज्य करणारे हिंदुहृदयसम्राट संपूर्ण जनसमुदायाला सोडून अनंतात विलीन झाले तो दिवस. (१७ नोव्हेंबर२०१२) त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि राहतील. संग्रहित असं बरच आहे, शब्द अपुरे पडतील. मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना सार्थकतेचा आनंद होतो. पण, दुर्दैवानं लाचारीचं व्यसन लागलेले काही लोक मातीच्या ममतेहून सत्तेची महती महान मानायला लागतात. अशा वेळी कोणालाही सत्तेची स्वप्नं पडू लागतात. महाराष्ट्राची नेमकी हीच अवस्था झालेली असताना मातीच्या उद्धारासाठी सज्ज झालेल्या बाळ केशव ठाकरे नावाच्या तरुणाची एक गगनभेदी गर्जना महाराष्ट्राच्या मनावर आणि भारताच्या कानावर आदळली. उपर्‍यांची दादागिरी नष्ट झाली आणि महाराष्ट्र जागा झाला.प्रबोधनाची परंपरा असणार्‍या घरात, त्यांचा जन्म झाला. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला. मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम चपराक लगावली.महाराष्ट्रात निर्माण झालेले,मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी त्यांनी १९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईत अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचं शिवतीर्थात रूपांतर झालं.शिवतीर्थावरून बाळासाहेब महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे जनतेचे, राजकीय नेत्यांचे, पत्रकारांचे, अभ्यासकांचे लक्ष ते हयात होते तोपर्यंत अखंड पाहण्यास मिळालं.शिवसैनिकांची जणू ती पंढरीच होती नि आहे.वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य.शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र ऐका ओढीने पाहत होता.महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच. बॉम्बे चे मुंबई असे नामकरण झाले ते हि त्यांच्यामुळेच.असे कैक निर्णय त्यांनी महाराष्ट्र हिताचे घेतले.जातीपातींचे राजकारण, कुटील राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेबानी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी ओळखून ते विचार आपल्या वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे  अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. त्यांनी असंख्य नेते घडविले.स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची सत्ताकारणाची पद्धतही खास त्यांचीच.अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे होते.मराठी असंतोषाचा उद्घोष व मराठी अस्मितेचा जयघोष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात दोनच गोष्टी अखंडपणे तेवत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक, प्रेरणादायी असे वक्तृत्व व विचार.बाळासाहेबांनी त्यांच्या वडिलांना एक प्रश्न विचारला होता. श्रीमंती म्हणजे काय ? तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या दारात जाऊन घरात आलेल्या लोकांच्या चपलांचे जोड दाखवुन म्हणाले होते, बाळ जितके हे जोड तुझ्या दारात जास्त तितका तू श्रीमंत. आणि पुरी हयात बाळासाहेबांनी माणसं कमावली. त्यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या माणसाचं मूल्यांकन जगात कुणाला करता येणार नाही. इतका श्रींमंत माणूस ...
संग्रहित....
शब्द नाही उरले
काय वर्णू तुम्हा मी
सुन्न झाल्या दाही
भरल्या अश्रूंनी
विचारांच सोनं
शिवतीर्थ मैदान
तेवत राहील ज्योत
सदैव माझ्या अंतरात
.....नितेश पाटील
साहेब गेले त्या दिवशी केलेली श्रीनिवास चितळे काकांनी केलेली कविता खाली दिली आहे ,बाळासाहेब या व्यक्ती विषयी आमच्या या भावना होत्या आणि आहेत .
महाराष्ट्राचे तेज आज ते तेजाला भेटे
अंधाराची घार अवदसा ,घिरट्या की घेते !
चराचराची वीज संपली जरी आपोआप ,
अशी कशी या बाळi लागे आज काळझोप !
तेजावरर्ती ओरखडा का उठे काजळीचा
आज समावे सुपुत्र जणू की कुशीत धरतीच्या !
मशालीचा तो पोत जळे तो जिथे अहोरात्र
धूम्र पाहुनी गळून गेली क्षितिजाची गात्र !
उचंबळावा जनसागर हि ऐकून ती वाणी
मुका जाहल्या वीरा पाहुनी नयनी ते पाणी !
गंभीर झाली अरबी अर्णवा ,तुझीच ती लाट
तुझ्या किनारी आज रेखीसी कशी मसणवाट!
इमारतीवर रविकिरणांचा का न दिसे साज
काळोखीचा तवंग पसरे जणू तेथे आज !
जिथे गाजली सभा तयाची लाखा लाखाची
तिथे लोटली धाड आज परी काक गिधाडांची !
सह्याद्रीच्या विराट देही भरला थरकाप
सिंहगडाचे शिखर डळमळे का आपोआप !
रायगडावर मान ठेवूनी महाराष्ट्र माता
कृष्णा गोदा उर बडवुनी जणू रडती आता !
१७.११.२०१५

Sunday, November 15, 2015

चिंतन

#चिंतन
            बऱ्याच वेळा कसं होत कि आपल्याला सांगणारे अनेक जण असतात पण सारेच आपल्या हिताचं सांगतीलच अस नाही. मुळात दुसऱ्याला सांगण्यापूर्वी ते आपल्याला माहित असावं.जे काही दुसऱ्याला सांगायचं आहे ते समोरच्याला समजलं पाहिजे अथवा त्याला समजेल अश्या भाषेत आपण प्रस्तुत केलं पाहिजे.ते त्याच्या हिताचं असलं पाहिजे.नाहीतर चर्चेच्या ओघात एखादा विषय निघतो आणि तो आपल्या स्मरणात राहतो प्रसंगी आपण तो समोरच्याला सांगत सुटतो पण त्यामागचं मूल्यांकन आपण आधी करायला हवं नंतरच तो विषय इतरांसमोर मांडावा.
     आपण एक दाणा पेरला कि तो हजारो दाणे परत करतो. निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत, इतरांना आपण काय सांगत आहोत ,दुःख, राग , द्वेष पेरत असू तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल.आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काही शंकाच नाही.
      आणि एकणारही नेभळट नसावा बरं.एकणाऱ्या मध्येही एक वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो आणि सोडून देत असतो.त्याला काही घेणं देणं नसत तुम्ही काहीही म्हणा हिताचं अथवा अहिताचं .तो सांगणाऱ्याला मूर्ख समजत असतो.असे किती सांगणारे आले ....मला सारं कळतं... मुळात त्याला काहीच कळत नसतं.... आणि खरं सांगायचं तर अश्या लोकांची संख्याही भलतीच वाढलय.
      दुसरा वर्ग असा असतो सांगण्याऱ्याच ऐकत असतो इतरांना बोलून दाखवत असतो. पण का कुणास ठाऊक तो चिंतन करीत नाही.समोरचा बोलतोय ते योग्य, अयोग्य काही तपासून पाहत नाही. विसंबून राहतो. अरे पण किती काळ विसंबून राहणार तुझं हित ,अहित तुला कळायला नको ? आज अश्या लोकांचा फायदा घेणाऱ्या टोळ्याच आपल्याला समाजात वावरताना जागोजागी दिसतील. जस लहान मुलांच्या हातातील बाहुल्यांची जशी अवस्था असते काहीशी त्याच प्रकारची अवस्था ह्या वर्गाची असते.
     तिसरा वर्ग असा असतो जो समोरच्याच ऐकत असतो ,मनात त्याचं चिंतन करत असतो. आपल्याजवळ आलेल्या विचारांच मूल्यांकन आपण आजवर कमावलेल्या ज्ञानप्रकाशत करून पाहतो. तो कधीही वाद घालीत बसत नाहीत. तो सत्याचा शोध घेतो. ज्याला सत्याची प्राप्ती झाली आहे असा मनुष्य अंतर्यामी शांत होऊन जातो. अहंकारी माणसे वादासाठी निमित्त शोधत असतात.
अनेकदा वाद घालण्याचे मुद्दे अत्यंत क्षुल्लक असतात, पण त्यामुळे मनाचे संतुलन ढळते. दिवसेंदिवस अहंकार परिपुष्ट होत राहतो.अनेकदा आपले मत दुसऱ्यावर लादण्यासाठी माणसे वाद घालीत बसतात, पण हे वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण नाही. माणसाने प्रत्येकाची भूमिका समजावून घ्यावी. भिन्न भिन्न विचार प्रवाह या विकासाच्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. वैचारिक मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे......आज माणूस बौद्धिकदृष्ट्या आश्चर्यकारक प्रगत होतो आहे. पण मानसिकदृष्ट्या त्याचे खूप पतन होते आहे.सुखसंवादामध्ये हितासाठी बोलले जाते. अनेक विचारांची फुले एकत्र करून सद्भावांचा गुच्छ तयार केला जातो. माणसाने बोलणे सुधारण्यापेक्षा वागणे सुधाराले पाहिजे.ज्यांचे आचरण मंगल आहे ती माणसे कधी वादात पडत नाहीत.
         प्रत्यक्ष आचरणात काही नसते, पण बौद्धिक अभ्यास खूप झालेला असतो असा माणूस ज्ञानाच्या अहंकाराने वाद घालून स्वत:चे नुकसान करून घेतो.त्याला तुम्ही उत्तम श्रोता कसं म्हणाल. चर्चेच्या ओघात वाहवत न जाता तिच्या मुळाशी पोहचण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला पाहिजे.नंतरच त्या गोष्टीच समर्थन आपण करायला हवं....
शेवटी चिंतन महत्वाचं....
.........नितेश पाटील
१५.११.१५
९६३७१३८०३१