Tuesday, April 26, 2016

पाणी वाचवा दोन महिने ?

पाणी वाचवा दोन महिने ?

     एक म्हण प्रचलित आहे. "आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार ?"  परिस्तिथी आज वेगळी नाही.
आज महाराष्ट्राच वैभव म्हणावं तर साडेतीनशे मैल लांबीची पर्वत शृंखला सह्याद्री. जिथे शिवछत्रपतींनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं. त्यावेळी निष्ठावंत माणसे होती हे राजांचं वैभव होतं. आज परिस्तिथी वेगळी आहे. त्या सह्याद्रीच्या कुशीत उगम होणाऱ्या नद्यांनी महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम केला आणि करत आहेत. निसर्गाचं चक्र थोडंस विस्कळीत झालंय हे मान्य..!! पण त्याला जबाबदार कोण ? माणूसच ना ?
       पूर्वी महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या तुलनेत किती होती ? आज माणसं वाढली पण निसर्ग तोच आहे ? पैकी कमी झाला आहे. तो निसर्ग वाढविण्यासाठी, निदान जसा आहे तसा ठेवण्यासाठी माणसांनी किती प्रमाणात प्रयत्न केला ? आज सुशिक्षित, अत्याधुनिक माणसाने निसर्गाची कदर किती केली ? कोंक्रेटच निर्जीव,कृत्रिम जंगल उभं करण्यासाठी किती सजीव जंगलांची/झाडांची कत्तल केली ? त्या कोंक्रेटच्या जंगलामुळे वाढत्या प्रदूर्षणास जबाबदार कोण ? या दुष्काळास जबाबदार कोण ? या साऱ्यांचं उत्तर म्हणजे निश्चितच माणसात लपलेला स्वस्वार्थ. स्वार्थापाई बहुतांशी माणसं दिसत असूनही आंधळी झालीत हे नाकारता येणार नाही.
       वाढत्या लोकसंख्येचा विचार केला असता पावसाचं पाणी आणि नद्यांच्या पाण्याचं योग्य व्यवस्थापन झाल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाल्यावाचून राहणार नाही. आज एकंदरीत विचार करता दुष्काळी क्षेत्रात सरकार, सामाजिक संस्था, व इतरही अशी बरीच माध्यमं आहेत जी आपापल्या परीने दुष्काळग्रस्तांना मदत करते. ते उल्लेखनीय आहेच. पण आजही महाराष्ट्रात ज्या भागात पावसाळ्यात नद्यांचं पाणी ओसंडून वाहत जाते आणि समुद्रास मिळते. ते पाणी तहानलेल्या नद्यांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग अजून का तयार झालेला नाही..? दुष्काळी भागात फक्त आणि फक्त पाण्याची गरज असूनही नद्या जोडण्याचा प्रकल्प अजून हाती का घेतला गेला नाही..? असे बरेच प्रश्न मनात घर करून जातात...
       पाणी वाचवा, पाणी जिरवा, निसर्ग वाचवा, झाडे लावा या घोषणा अजूनही प्रखरतेने फक्त मार्च आणि मे महिन्यातच का दिल्या जातात. उर्वरित महिन्यांत त्याचा विचार तितक्या प्रखरतेने केला जात नाही. आभाळ फाटल्यावर ढिगळ लावत सुटण्यात काय अर्थ आहे.निश्चितच या साऱ्यांचा विचार करण्याची आज गरज आहे. पण वेळीस सावरेल तो माणूस कसला ?
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)९६३७१३८०३१

Friday, April 15, 2016

मंदिर-पेहराव-बंदी

====मंदिर-पेहराव-बंदी++++
        प्रत्येक जागेचे एक पावित्र्य आहे मग ते मंदिर, मस्जिद, चर्च अथवा कोणत्याही धर्माचे असू दे सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असे वागावे कि तेथे बंधन घालण्याची गरजच पडू नये.
        आपण वैदिक संस्कृती जपणारे लोक आहोत. तीर्थक्षेत्री अथवा मंदिरात दर्शनाला येताना तुम्ही काय कपडे घालून येता या पेक्षा तुमचे मन इथे शांत होतंय का ? विचलित तर होत नाही ना ? मन:शांती मिळतिये का ? भगवंत दर्शनाची आस लागतीये का ? हे पाहणे गरजेचे आहे.
      आपली भारतीय पोशाख - मग ते मराठी, बंगाली, पंजाबी असू किव्हा आणखीन कुठली, खूप चांगली होती. अंग झाकून जाणारी. आता ती फारशी तशी उरली नाही. असो काळानुसार सारं बदलत असतं.
       पण सांगायचा मुद्दा असा आहे कि ऑफिस मध्ये ड्रेस कोड चालतो, शाळेत चालतो, असे बरेच विभाग आहेत तिचे पेहराव हा पूर्व निर्धारित असतो. तर मग मंदिरात का नको ? नसेल जमत तर जाऊ नये. प्रत्येकाच्या ह्रुदयात असतोच कि...भगवंत. मंदिर काही पिकनिक ची जागा नाही. त्या उद्देशाने तिचे जाणेही चुकीचे आहे. कुठे काय करावं याची जाण ज्याची त्याला असायला हवी.
         पण मंदिर हि भगवंताविषयी व जीवनाविषयी चिंतन करण्याची जागा आहे. तिथे वर्षानुवर्षापासून भक्तगणांनी आपल्या पारंपारीक, सांस्कृतिक, निस्सीम, भाबड्या भक्तीने एक अदृश्य शक्ती स्थापित केलेली आहे. जी त्यांना जगण्याचं सामर्थ्य देत असते. तिथे त्यांचं मन विचलित होईल असं कुणी वागू नये.
      देवाधर्माच्या गोष्टी तरी व्यक्तिगत स्वातंत्र्यातून सोडाव्यात. देवदर्शनाला जाताना काय हरकत आहे जर आपल्या परंपरागत पोशाखात जावे लागले तर ? मनोरंजनाची स्थळं आणि सार्वजनिक स्थळं यात गफलत का करावी ? त्याही पुढे जाऊन म्हणायचं झालं तर मी बेडरूम मध्ये जसा वावरतो तसा ओटीवर वावरू शकत नाही. शेवटी काही गोष्टीना मर्यादा असतात. त्या स्वतःवर ओढवून घेऊ नये इतकचं...
       सर्वात महत्वाचं आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्या भारतवर्षात आपण राहतो. तिथली संस्कृती जपणे आपले कर्तव्य आहे. आता समाज उच्चशिक्षित झाल्याकारणे काही रूढी, परंपरा भुलचट वाटत असतील. पण सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात पारंपरिक पेहरावात जाणे यात काय वावगं असू शकतं ? उगाच विरोध करायचा म्हणून कोणी करू नये. हा एक प्रश्न सोडला तर त्या व्यतिरिक्त सारे प्रश्न निकालात निघाले अस नाही.
         आणि ईश्वर देवघरात, मंदीरात किव्हा अन्यत्र असा कुठेच नाही. त्याला जिथे तुम्ही शक्तिरुप दिलं तिथे तो निश्चितच आहे. तुम्ही त्याची भक्ती कोणत्या प्रकारे करता, तुमचं आचरण काय यावर सारं काही अवलंबून असतं. आज त्या ईश्वरनिगडीत काही गोष्टींवरून रान उठवलं जातं, आणि त्यात सामान्य माणसं भरकटली जातात हे चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ह्रुदयात ईश्वर आहे तो आधी जणाला पाहिजे, जोपासला पाहिजे. त्या पद्धतीच आचरण केलं पाहिजे तरच तुम्ही माणूस म्हणून श्रेष्ठ व्हाल...अन्यथा सारं व्यर्थ आहे.
.....नितेश पाटील (धनसार,पालघर)

Thursday, April 14, 2016

खारीचा वाटा

खारीचा वाटा
काळ बदलतोय, वेळ बदलतेय
जागृत होतोय, माणसातला माणूस
पुन्हा त्याच ओघाने, माणुसकीच्या दिशेने
अंधार पुसत चालला, स्वयंप्रकाशी माणूस...
...नित
         प्रत्येक माणसात माणूस दडलेला आहे. सध्या बहुतांशी माणसं स्वतःमध्ये गुंतल्यामुळे त्यांना त्याच भान राहिलेलं नाही. पण मीपणा सोडून जगणारीही माणसं भरपूर आहेत. जे स्वतःबरोबर इतरांचाही विचार करतात, वेळीस आपलं सर्वस्व झोकून देतात.... त्यात निदान आपला खारीचा वाटा तरी असायला हवा. शेवटी कितीही ऐश्वर्य कमावलं तरी ते इथेच राहणार. सोबत नेता येणार नाही आणि परतूनही कोणी येत नाही.
          आजची परिस्तिथी जरा वेगळीच दिसते. पूर्वी माणसं जगण्यासाठी कमवायची, आता कमावण्यासाठी जगतात. माणूस आजकाल आपल्या मिळकती पेक्षा जास्त खर्च करतो. त्यामुळे तो त्याच्याच दुनियेत मशगुल असतो. दुसऱ्याच हित-अहीत, सुख-दुःख जरी जाणत असला तरी परिस्तिथी पुढे त्याला काही जमत नाही. पण त्यातूनही समाजहितासाठी आपण काहीतरी करावं हि भावना जोपासणारीही माणसं आहेत.      स्वतःसाठी तर सारेच जगतात थोडंस का होईना इतरांसाठी जगून पहावं. आपलाही हातभार सत्कर्मासाठी खारीच्या वाट्याइतका तरी लागावा. जेणेकरून माणसांच्या पंगतीत आपल्याला बसता येईल. असो....
          तर खारीचा वाटा म्हणजे नेमके काय? रामायणात खारीची कथा आपण वाचतो. सेतू पूल बांधत असताना दगड उचलू न शकणारी खार मातीत लोळून अंगाला माखलेली माती पुलाजवळ आणून टाकत असते व आपल्या क्षमतेनुसार श्रमदान करत असते. तिचे श्रम पाहून भारावून गेलेले श्रीराम आपली तीन बोटे तिच्या पाठीवर फिरवतात. ती बोटे आजही आपण खारीच्या पाठीवर पाहतो. सद्गुरूंचा कृपाहस्त आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप अशीच कायम पाठीवर राहते. फक्त आपण प्रयास करायला हवे.
...नित
नितेश पाटील (धनसार,पालघर)

Tuesday, April 12, 2016

झाडे वाचवा

झाडं वाचवा
         माणसात आणि झाडांत काय फरक आहे. मुळात झाडं आहेत म्हणून माणसं आहेत. पण किती माणसं तसा विचार करतात ? कमीच...  आज माणूस माणसाचा विचार करत नाही तो झाडाचा काय करणार म्हणा ?  आज शहरात नवनिर्माण करण्यासाठी रस्त्यांवरील झाडे मोठया संख्येने तोडली जातात. शहरापर्यंत ठीक होतं पण शहरातील उपनगरातही हे प्रमाण भयंकर वाढलंय. काही गोष्टींना मर्यादा असते. तिचं उल्लंघन केलं कि सारं असूनही नसल्यासारखी परिस्तिथी निर्माण होते. कृत्रिम आणि नैसर्गिक यात उच्च प्रतीची तफावत असते हे विसरून चालणार नाही. निसर्गाने जे आपल्याला भरभरून मोफत दिलंय त्याचा मोबदला देता येत नसेल तर निदान ते टिकवायची तरी आपली द्यानत असली पाहिजे.
        सुशोभीकरण, रस्ते, शहरी विकास या साऱ्यांची गरज असली तरीही त्यापेक्षा जास्त झाडांची गरज आहे हे माहित असूनही माणसं अशी का वागत असावीत याचं उत्तर मला काही सापडत नाही. म्हणजे माहित असते विहीर कोरडी पडली आहे... तरी त्यात उडी घ्यायची. पण म्हणून काय नुकसान विहिरीचं होनार आहे का ? आपलंच होईल. त्याआधी त्या विहिरीत पाणी कसं जमा होईल याचाही विचार करायाला हवा. वृक्षतोडीची भरपाई करणेही गरजेचे आहे.
           निसर्गाचा जर आपण हळू हळू का होईना... लचका तोडत गेलात तर पुढे ओढवणारी परिस्तिथी खूप भयंकर असेल. आपल्या दृष्टीने आपण दोन, चार झाडं तोडत असू पण एकंदरीत जर विचार केला तर सर्यांमिळून किती झाडं तोडली जातात आणि वृक्षारोपण किती होते. हा हि विचार करणे गरजेचे आहे.
         आणि एक बरं आहे. झाडांना भावना असल्या तरी त्या मूक आहेत. तात्काळ प्रतिकारात्मक शक्ती त्यांच्याकडे नाही. ते कधी ईर्षा धरत नाही..!! झाडांप्रतिही नाही न् आपल्या प्रतीहि नाही.
समजा त्यांनीही ठरवलं...
आपण माणूस म्हणवणाऱ्यांसारखं वागायचं तर...?
त्यांनीही बंड करून संप पुकारला तर...?
प्राणवायूची निर्मिती थांबवली तर...?
सारीच फुले दुर्गंधी झाली तर...?
सारीच फळे विषारी झाली तर...?
       अशा कैक प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे तुम्ही आम्ही सारेच सजीवगण निर्जीव म्हणून पडतील नाही...? आणि एकंदरीत साऱ्यांनीच विचार करायला हवा कि आज जे सृष्टीचं कालचक्र  बिघडलं आहे त्याला कारणीभूत कोण ?
विनामूल्य दिले आम्हां निसर्गाने
टिकवू निदान ते जगण्यासाठी
संकल्प वृक्षारोपणाचा घेऊ हाती
समतोल सृष्टीचा राखण्यासाठी
...नित
नितेश पाटील(धनसार,पालघर)