Sunday, May 29, 2016

अद्वैत...

*●●अद्वैत●●*
________________________नित
      द्वैत म्हणजे अज्ञान, रूढी, भेदभाव ,दारिद्र्य दुबळेपणा, भ्याडपणा. आणि समाज अजूनही त्याच्या अधीन आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण ह्या द्वैतातून अजून समाज का बाहेर आला नाही. आज माणूस चंद्रा, मंगळावर गेला तरी हे द्वैत का नाहीसा करू शकला नाही. साहित्यातील सर्वात जुने विश्वात प्रथम स्थानी असणाऱ्या वेदांपासून ते आजपर्यंतच्या तमाम अद्वैत पुरस्कृत साहित्याचा, साधनांचा मानवी जीवनावर तितकासा अद्वैतरुपी प्रभाव का पडू शकला नाही. मान्य मतभिन्नता असते पण ती जतन करत असताना समाजाचा विचार न करता स्वतःचा विचार, म्हणजेच स्वतःला जे पटेल तेच मांडण्याचा आणि विशेष म्हणजे रुजवण्याचा प्रयत्न केला असावा का. हे आणि असे बरेच प्रश्न मला आज पाडतायेत. याला कारणीभूत अज्ञान आहे हे मी जाणतो. पण अज्ञान हे महत्वाचं कारण असलं तरी सुशिक्षित अज्ञान या परिस्तिथीस (द्वैत) जास्त कारणीभूत आहे असं मला वाटतं.
          अद्वैताची परिभाषा सोपी आहे. आपणास येणाऱ्या सुखदुःखाच्या अनुभवावरून दुसऱ्याच्या सुखदुःखाची कल्पना येणे. म्हणजे एक प्रकारे अद्वैत. जे विरळ झालंय...
अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे, अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. जो आज अप्रत्यक्ष रीतीने केला जातो... मोठ्या प्रमाणात....
अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे अद्वैत म्हणजे अनुभूती.... आज बहुतांशी चर्चेचीच गुऱ्हाळं चालतात. अनुभूती फक्त स्वतःसाठी.....समाजासाठी नाही....
कुणीही दुःखी असू नये, कुणीही भुकेला असू नये.  असे म्हणणारे सारेच आहेत पण त्यासाठी झटणारे आणि आपापल्या परीने प्रत्यक्ष त्या परिस्तिशी एकरूप होऊन कार्य करणारे कितीसे आहेत....हाही प्रश्न आहेच
          या सृष्टीचं आपण निरक्षण करा. मेघ सारे पाणी देऊन टाकतात. त्यांनी थांबा घ्यावा अशी ठिकाणं माणसांनीच नाहीशी करून टाकलीत तो भाग वेगळा... झाडे, फुल त्यांचा गंध, फळे देऊन टाकतात. पण आम्हाला त्याचं सोयर सुतक नाही आम्ही त्यांना कापण्यात पटाईत झालोत, आम्हाला काँक्रेटिकरण जे करायचं आहे....नद्या ओलावा देतात, सूर्य आपले तेज, चंद्र आपली शीतलता, आकाशातील सारे तारे सर्वांसाठी आहेत, हि हवा सर्वांसाठी आहे आज माणसाला काय कमी आहे सृष्टीने किती फुकट दिलंय. पण मला माझं पाहिलं पाहिजे... हि जमीन सर्वांसाठी होती पण माणसाने तिचा तुकडा अलग केला आणि माझी म्हणू लागला... हरकत नाही हो... जो तो आपापल्या परीने जगत असतो... पण मानासमांसात तेढ निर्माण करणं, जाती-धर्माच्या नावाखाली अज्ञान पसरवणे हे चुकीचं आहे. हे सुशिक्षित अज्ञान पिटाळून लावलं पाहिजे.
*अद्वैत...*
गंध फुले देऊन जाती
मेघ सारे पाणी
मीच माझे जपत राहिलो
नसताना काही

वेद, पुराणे, साहित्य
गाती अद्वैताचे गोडवे
सज्ञान असतील वाचक
जड द्वैताचे पारडे

तूच जाणावें अद्वैत
लेका शिकवावे
नाही येणे कुणाचे
आता वसुंधरेवरी...
*...नित*
     आणि अद्वैत म्हणजे मरण हि आहे. स्वतः मेल्याशिवाय परमेश्वराचे दर्शन होत नाही. खरे खोटे मला माहित नाही पण साधू संतांची वाणी आहे. बरं स्वतः मरणे  म्हणजे प्रत्यक्षात मरणे नाही....स्वतःचा अहंकार कमी करणे, स्वतःची पूजा कमी करणे. जे आहे सर्वांसमवेत जगणे. गौतम बुद्धांनी स्वतःला मालवून टाकले तेव्हा त्यांना सर्व चराचराला प्रेम देता आले. अद्वैताचा उच्चार म्हणजे स्वतःच्या स्वार्थी सुखावर निखारा ठेवणे आणि शक्य होत नसेल तर उगाच भूलथापा मारू नये.
तुकाराम महाराजांची ओवी आहे
तुका म्हणे व्हावी प्राणांसवें तुटी ।
नाहीतर गोष्टी बोलू नये ।।
       या भारत वर्षात आजपर्यंत सतत अद्वैताचा डंका वाजत आला पण आजही बहुतांशी समाज असा आहे जिथे कुणी ढुंकूनही बघत नाही. आज अब्जावधी वर्षापासून साधू ,संत, ऋषिमुनींनी अद्वैताची शिकवण दिली ती व्यर्थच आहे आणि म्हणूनच आज भारतात जाती धर्मांच्या भिंती अधिकच बळकट झाल्या आहेत.
जाळीन मी भेद। येथे प्रमाण तो वेद
अशी तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली आहे.
साने गुरुजींनीही म्हंटल आहे
भाकरीचा तुकडा ओठात ठेऊन जमणार नाही तो पोटात जायला हवा तरच शरीर सुदृढ व सतेज होईल. थोर वचने कृतीत उतरतील तेव्हाच समाज सुखी व आरोग्यसंप्पन होईल. हल्ली दिखाऊ वृत्तीला उत आलाय. आणि जो तो शर्यतीत गुरफटलाय.
           हे खरं आहे कि आता संत होणे नाही. पण माणसाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या जगाचं भलं व्हावं असं कुणाला वाटत असेल तर ते आई वडील, संत आणि भगवंत.... आता या घोर कलयुगात संत आणि भगवंत अवतरणे म्हणजे सोपं काम नाही. पण आईवडील या पृथ्वीवर होते, आहेत आणि असतीलही. प्रत्येक आईवडिलांनी अद्वैत जाणून ते आपल्या मुलांना आचरणात आणायला शिकवलं पाहिजे. फक्त शर्यतीत भाग घेणं आणि जिंकणं म्हणजे आयुष्य नाही. समाजात द्वैत फोफावत असेल तर त्याचे चटके उशिरा का होईना पण सर्वानाच बसतील.
अद्वैत कल्पना प्रकाशे । तेचि क्षणी द्वैत नासे । द्वैता सरिसी निरसे। सबळ कल्पना । । ७ -५ -३७ । ।
...दासबोध
अद्वैत कल्पना जेव्हा उगम पावते त्या क्षणी द्वैत नाहिसे होते .त्याच वेळेस सबळ कल्पना म्हणजे अशुध्द कल्पना नाहिशा होतात .
*प्रेरणेतून....*
*...नितेशपाटील(धनसार,पालघर)*

Friday, May 27, 2016

स्मशानातील तारुण्य...

◆●स्मशानातील तारुण्य...●◆
सस्नेह जय शिवराय

             स्मशान शांतता आता स्मशानातही राहिलेली नाही. हल्ली ते नवयुवकांसाठी ( अर्थातच बिघडवलेल्या ) मद्यवेसन आणि धुम्रपान करण्याचे अड्डे झाले आहेत. पूर्वी गावात मित्रांचे कट्टे असायचे. आळी आळी मध्ये लहान थोर एकत्र बसत. तिथे गप्पा रंगायच्या, थोरांबद्दल आदरयुक्त भीती असे. पण काळ बदलत असतो. या संघनक युगात माणूस मोबाईलच्या अधिक आहारी गेल्यामुळे आज कट्टे तर नाहीसे झालेच पण काही अंशी नवीन पिढी दिशाहीन झाल्याची दिसून येते. काही गावातील स्मशानांचही अड्ड्यात रुपांतर झालं हि खेदाची गोष्ट आहे. स्मार्ट फोनच्या जमान्यात मोबाईल स्मार्ट आले पण माणसं स्मार्ट होणं काही अंशी बंद झालं.
          माझी वाचन करायची नेहमीची निवांत, एकांत जागा. रोज नाही पण कधी वेळ मिळेल तेव्हा. गावापासून काही अंतरावर… स्मशान… जरी घर भूतांचं असलं (असं म्हणतात) तरी आज त्यानाही तिथे मानवत नाही…तासा दोन तासात कुणीतरी फिरकतच…तसं माणसाने नेहमी तत्पर असावं. या कलयुगात कधी बोलावणं येईल सांगता येत नाही. सवय करून ठेवलेली बरी…म्हणून हे इथे येणं… बाकी काय…असो
         पण या जागेचा हल्ली दुरुपयोग होतोय हे मात्र खरं…मी नेहमी पाहत असतो…14-15 वर्षाची, एन कॉलेजच्या वयात आलेली कोवळी पण उनाड मुलं भर उन्हात अंगाचा दाह होत असताना सिगारेटचा दम मारण्यासाठी इथे येतात आणि तिळ तीळ आपलं आयुष्य जाळून निघून जातात. राजरोज संध्याकाळी पार्ट्या (अर्थात त्यांच्याच रुपयाने) बेझीजक करत असतात. रिकाम्या बाटल्या आणि कचरा तिथेच टाकून पसार होतात, आणि सकाळी दुसरी मुलं येऊन त्याच बाटल्या फोडण्याचे काम करतात. काय संस्कार आहेत नाही आपले..?? हे थांबवावे कसे हे काही मला कळलेले नाही अजून...
          पण त्यांना पाहून काही ओळी सुचल्यात त्या सादर करतो....
◆◆स्मशानातील तारुण्य◆◆
स्मशान म्हणते...
माझेही आले दिवस चांगले, जे केव्हा नव्हते...
ढुंकूनही पाहत नव्हतं कुणी, रात्री तर मुळीच नाही...
हल्ली येतात इथे दिवसा, रात्रीही...
एन कॉलेजातली कोवळी उनाड मुलं..
गावतलीच आपल्या.. नसतात बाहेरची...
तारुण्य गहाण ठेवण्यास माझ्यापाशी
कुणी लावला हा छंद त्यांना माझा,
बाटल्यांचा, त्या फुकन्यांचा, कर्कश कानठळ्यांचा...
त्या एकांतात बाटलीचा संग...
दिवसागणिक आयुष्यात गळी पडणारे,
त्या बाटलीतील मद्य...
त्या मद्याने माणसापासून लांब,
जवळजवळ नाहीसा झालेला तो माणूस...
तोल सावरत नाचू पाहणारे, अर्थीवरचे ते तारुण्य...
हातात आयुष्याची विझत चाललेली सिगारेट...
तिला तेवत ठेवण्याचा प्रयत्न...
त्या प्रयत्नात ते झरत जमिनीवर विखुरलेलं, दूरवर हवेत अदृश्य झालेलं आयुष्य...
नव्या पिढीची एक बाजू हि अशी स्मशानात पोहचलेली...मरण्याआधीच...
झिंग रात्रभर चढलेली...
नव्हे आयुष्य मावळणारी...
हे तारुण्य बहाल केलंय त्यांनी मला...
अन मी ते स्वीकारलाय...
माझं कामच आहे ते...
निकामी झालेले देह जाळून टाकण्याचं...
ह्या तारुण्याला विस्तवाची गरज नाही...
ते जळतं आपल्या कर्माने...
आणि जाळतही असतं दुसऱ्याला...
आपल्या मित्रांना, आपल्या आप्तांना
न जाळताही जिवंतपणी...
असो... पण आज माझी मजा आहे...
कुठे ते सरणावरचे मुडदे...
अन कुठे हे चालत आलेलं तारुण्य...
*...नित*
           याचा अर्थ असा होतो का… चुकीची माध्यमं, आणि चुकीच्या संस्कारांनी आपण आपली पुढची पिढी नासवतोय. समाज कुठेतरी मागे पडला…संस्कार कुठेतरी मागे पडले… आणि शिक्षण मागे म्हणता नाही येणार… जास्त झालाय. आज घरात आईवडिलांचं आपल्या मुलांसमोर आचरण कसं आहे त्या पद्धतीनेच मुलं समाजात वावरत असतात. हे नाकारता येणार नाही. आणि बाकी चुकीचा पायंडा पडणारी काही माध्यमेही आहेतच…वाईट गोष्टींचं अनुकरण माणूस लवकर करत असतो.म्हणून मोठ्याने लहाण्यांनसमोर माणसात वागलं पाहिजे…
         पण तुम्हाला एक सांगू का ? या तरूनपिढीची जी काही वाट लागली आहे त्याला कारणीभूत आपल्याच समाजातील काही श्रीमंत आणि राजकारणी आहेत याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. तुम्ही आज लग्नसमारंभ घ्या त्यात भर मांडवात मद्यपाणाचं काउंटर आणि बाकी ज्यांना समोर जमत नाही त्यांना अंधारात सोय... सोय म्हणजे काय सांगायची गरज नाही... राजकारणी लोकांच तर विचारूच नका, पार्ट्याच पार्ट्या.... श्रीमंतांना दाखवायचं असतं आणि राजकारण्यांना साधायचं असतं. आणि आमचा त्यासाठी उपयोग केला जातो हे हि आम्हाला कळत नाही. आपल्या पुढच्या पिढीसमोर कसले संस्कार आपण ठेवताओत याची जाणीव आपल्याला असू नये...आणि हे जर असं होत असेल तर त्या तरुणांना तरी काय दोष द्यावा..??
        एकदा का गोष्टी हाताबाहेर गेल्या कि त्या आपण काय देवही सावरू शकत नाही
        फुटले मोती तुटले मन । साधू न शके विधाता ।।
     हे उगाच साधू संतांनी लिहून ठेवलेलं नाही. पशूला चामड्याच्या लगाम घालता येतो पण माणसाला असले लगाम घालता येत नाहीत, बुद्धी हा माणसाचा लगाम आहे. मनुष्य हा विचाराने वागतो. जो विचाराने वागत नाही तो मनुष्य नाही. मान्य अभिव्यक्ती स्वातंत्रयानुसार तुम्हाला स्वछंद वावरण्याचा अधिकार आहे पण तसं वावरत असताना जर समाजास हानी पोहचत असेल तर ती अभिव्यक्ती सोडा पण तुम्हाला माणूस म्हणवून घेण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. आणि माणसं काय मिरवू पाहतात हेच मला कळत नाही. एक नाशिवंत देह सोडून काय आहे तुमचं या विश्वात ..? सारं काही क्षणभंगुर आहे. पण या जगात माणसाने आपलं स्थान ओळखून त्या पद्धतीचं आचरण केलं पाहिजे....
नितेश पाटील(धनसार,पालघर)

Friday, May 13, 2016

आपलं असतं का काही

#आपलं_असतं_का_काही
          ज्याप्रमाणे युद्ध म्हंटले कि त्यात बलिदान हे आलेच. एका मागून एक बलिदानाची शृंखला चालूच असते. त्याचप्रमाणे मनातील विचारांच्या युद्धात आपण आपल्याच (मिळवलेल्या) विचारांचे बलिदान प्रतिक्षण देत असतो जाणतेपणाने किव्हा नकळत...सांगायचा मुद्दा असा कि आपल्या मनात प्रतिदिन हजारोंच्या संख्येने विचार चालू असतात. ते सारेच विचार आपण प्रत्यक्षात उतरत नाहीत, उतरवू शकत नाही.
          त्यात असही होतं जर एखादा नवीन मुद्दा उपस्थित होतो तेव्हा त्या अनुषंगाने त्या दिशेने आपले विचार प्रवाहित होतात.आणि जुने विचार हवा होतात किव्हा शमून जातात. एकंदरीतच असं लक्षात येते कि माणसांच्या विचारांची वृद्धी होत असते आणि अंतही...
           पण माणूस स्वतःच्या विचाराने जगत नसतो. अर्थात तो आता हे मान्य करणार नाही. मुळात तो जन्मालाच स्वच्छ आणि निर्मळ पाण्याप्रमाणे आलेला असतो. त्याच्या बुद्धीला ज्ञानरूपी विचारांची भेसळ हि दिवसागणिक हळूहळू होत जाते. "पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिले वैसा" या उक्तीप्रमाणे सारं काही घडत जातं.
          या विश्वात विचार जन्मास आले कसे ते मला माहित नाही पण त्या विचारांच्या आधारावर आणि बांधणीवरच हे जग स्तिथ आहे. त्या विचारांच्या निर्मात्याचा मी कृतज्ञापूर्वक आभारी आहे. प्रत्येकजण त्या विचारांच चांगलं, वाईट भांडवल करून व्यक्त होत असतो. आणि त्या विचारांना आपलं समजत असतो. पण ते विचार मुळातच आपले नसतात. जर आपले असते तर सारे आपल्या आज्ञेत राहिले असते.
         आणि हेही एक सत्य आहे कि मनातील विचार हे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे असतात, त्यांना अंत नाही. पण मनात विचारांच्या लाटा उसळत असतील, उत्पन्न होत असतील तर त्या लाटा उत्पन्न करणाऱ्या शक्तीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे.
...नित