Saturday, July 8, 2017

नयचे काठंला

नयसे काठं काठंला
बाया चालल्या घराला
राधा पायते पाण्याला
पाणि वायते नयला

राधा थांबली काठंला
पाही झुरते जीवाला
नय सांगते राधेला
पाणि तुझे का डोळ्याला

अशी एकली सांजेला
का तू थांबली काठंला
रात माघारी फिरली
जाय माघारी घराला

कंठ राधेचा दाटला
बांध वर्साचा फुटला
धनी लाडाचा दादला
गेला सागरी कामाला

धरी मासोळी जाळाला
देई भाकर पोटाला
गेला मागच्या फेरीला
नाही अजून वळला

नय चालली भेटाया
कुशी सागरा शोधाया
तुझा दादला हुंगाया
तारू वेचून आणाया

कशी येईल परती
वाट एकेरी नयला
चल जोडीनं सागरा
येते मी गं संगतीला

सूर्य जातो गं अस्ताला
रात जागते भेटीला
चांद राहतो साक्षीला
जग आपले जोडीला

भार वाहून नेते मी
काय साधून वायते
पाणि गेले जे सागरू
का परतूनी मिळते

आस तुला गं धन्याची
माझी नाही गं सोईची
कालचक्राची माया ही
दान कोरिले ललाटी

नाही दिसत लिव्हिले
कोन पुसील दाखले
जा परतूनी माघारी
वाट दाविल श्रीहरी

राणी राजाची लाडकी
माय जगाची जानकी
कर्मे वनात भोगीले
साथ वियोग पाहिले

राणी राजाची लाडकी
माय जगाची जानकी
कर्मे वनात भोगीले
साथ वियोग पाहिले

देवादीका नै सुटले
भोग कर्माचे दाखले
काय हिशेब तैला तो
हाडा मासांची माणसे
___नित (९६३७१३८०३१)
नितेश पाटील (धनसार, पालघर)