Sunday, December 17, 2017

आज्जी

तर...
गम्मत अशी झाली, आज मी अंधेरीला चाललो होतो. 9.05 च्या बोरिवली लोकलने मी जाणार होतो. मी तिकीट काढून पालघराला प्लॅटफॉर्म 2 वर थांबलो होतो. त्या आधीची वसई लोकल माझ्या समोर निघून गेली.
मागून आवाज आला, "अरे नितेश भाऊ, कुठे चाललास..?" मी म्हंटल "अंधेरी. अन तू कुठे रे अभि Abhi ..."
"अरे वसईला चाललो..."
" आत्ताच गेली की वसई..! आणि असा वैतागलेला का दिसतोस..??"
"हो ना रे, त्या म्हातारीने सकाळ सकाळ सटकवली यार..!"
"का काय झालं..??"
"चल आधी सँडविच खाऊ चल, तुला सांगतो."
"ये मामा दोन टोस्टेड दे रे"
"अरे काय झालं काय..."
" अरे लगबगीने मी घरून आलो, गाडी पकडायची म्हणून... तसा उशीरच झालेला रे... त्यात सकाळची वेळ, तुला माहीत आहे ना किती रांग असते ती...
"हो ना..."
तोवर मामा हातात प्लेट घेऊन "येलो आपका सँडविच" त्या प्लेट घेतल्या आणि आम्ही खाऊ लागलो.
मी म्हणालो "हा तर पुढे..."
"हा... तर, नशीब मित्र भेटला, गाडीची वेळ झालेली...  त्याला म्हंटल माझं एक वसई रिटर्न काढ... आणि मी वाट पाहत थांबलो... अगदी दोनच मिनिटात एक आज्जी माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या... अरे पोरा इथे नुसताच उभा आहे तर जरा रांगेत उभा राहतोस का..? मला गाडी पकडायची आहे. तोवर मी माझं पटकन एक काम करून येते... मी म्हंटल ठीक आहे. त्यांना तिकीट कुठलं हवं आहे... हे विचारायच्या आत त्या वंटास झाल्या... म्हंटल येतील. पाच मिनिटं निघून गेली, तरी या काही आल्या नाहीत. माझा मित्र मात्र माझं तिकीट घेऊन आला. आणि म्हणाला
"अरे मला म्हंटलस ना तिकीट काढायला ?  मग रांगेत काय करतोस ?" त्याला म्हंटल
" अरे बाबा असं असं झालंय..."
"बरं तू वृद्धसेवा कर... गाडीची वेळ झालंय... मी हा निघालो." आणि तो गेला निघून... आता विंडो जवळ मी पोहोचलोच होतो... मला नंबर सोडता ही येईना... ती स्पीकर बाई पण पण बोलली की गाडी येतेय म्हणून... आणि आली सुद्धा गाडी... पण करणार काय...? आज्जी आल्या तर... शेवटी आता गाडी गेल्यातच जमा... विंडोजवळ पोहचलो आज्जी काही आल्या नाहीत... आणि गाडी सुद्धा निघून गेली..."
" अरेच्चा..!! आजीने थर्ड मारली तर..."
" हो ना यार... इथपर्यंत तर ठीक होतं... पण पुढे ऐक... अरे मी आत प्लॅटफॉर्मवर शिरलो आणि आज्जी माझ्या पुढ्यात... त्याही हातात तिकीट घेऊन... अश्शी सनकली ली न..!! तुला सांगतो... पण काय करणार... पुळका सेवेचा मलाच आला होता ना...!! न ऱ्हाहून मी विचारलंच... आज्जी तुम्हाला तिकीट दुसऱ्याकडून काढायचं होतं, तर तुम्ही मला रांगेत का उभं केलंस...??
"अरं पोरा, ताटकळलास का रे...??"
"नुसता ताटकळलो नाही, तर माझी गाडी सुद्धा निघून गेली..."
"माफ कर पोरा... पण तू दिसला नाही मला... म्हणून मी दुसऱ्याकडून घेतलं तिकीट काढून... पण तू खूप मोठ्ठा होशील हो..."
"बरं म्हंटल, चला आता... आणि आलो निघून.... काय करतो आता..!!"
अरे चिढही आली..., हसूही आलं..., आणि भारी पण वाटलं बघ...."
मी म्हंटल "भारी..!!"
"हो मग, खूप मोठ्ठा होईल असा आशीर्वाद दिलाय बघ आज्जीने... आणि असंही मला मित्र म्हणतात रे... तुझी हाईट खूप छोटी आहे म्हणून... हा हा..."
"चल आली गाडी, नाहीतर ही पण सुटायची....

___नित 9637138031
नितेश पाटील (धनसार,पालघर)

नशा

#नशा
नशा नाही अशी माणसं सापडणे म्हणजे दिव्यच. नशा म्हणजे काय..!! सवयच की... त्यात चांगल्या सवयी आणि वाईट सवयी असे वर्गीकरण आपण करतच असतो. चांगल्या सवयी माणसाला तारतात, त्याचं आयुष्य समृद्ध बनवतात. तर वाईट बुडवतात. वाईट सवयींच्या अति आहारी गेल्यामुळे, सर्वस्व हिरावून  माणसाचं आयुष्य रीतं होऊन जातं. आणि या स्तिथीतील बहुतांशी माणसं दारूच्या आहारी जातात.

झिंग चढवुनी झाले द्रव्य पसार आहे
खच रिकामी बाटल्यांचा बेसुमार आहे

परवा माझा एका मित्र भेटला होता. आईबाबांचा एकुलता एक मुलगा. पैसा अडका काहीच कमी नाही. बाबानेही आपली होती नव्हती तेवढी जमीन विकून बक्कळ रुपये साठवलेले. त्यामुळे काय साहेबांची मज्जा. कामधंदा करायचा नाही. दारात दुचाकी, चारचाकी उभ्या. बुलेटवर सेल्फ मारून उनाडायचं काम जोरात... ब्रांडेड वस्तूंचा भारी नाद. मग कपडे असो, शूज, चप्पल, घड्याळ, इव्हन आंतरवस्त्र देखील. आणि आजकाल तर विदेशी दारूचीही लत जडलेली त्याला. ( आता देशीवर आलाय ) उचे लोग उची पसंद... अशी ख्याती.

आता ते किती दिवस पुरणार ना..!! पाचशे रुपये मागत होता माझ्याकडे... मी पाहतच राहिलो त्याच्याकडे... मी दिले, पण त्याला म्हंटल. भाई तुझ्या इतक्या हाय प्रोफाईल सवयी होत्या. त्यात जर एक आणखीन सवय जडवून घेतली असती ना.., तर हि वेळ तुझ्यावर आली नसती. त्याने म्हंटल "कोणती ?" म्हंटल तुझ्या बंगल्यावर पाण्याची टाकी आहे. आहे ना ? की फक्त ब्रांडेड रिकामी बाटल्यांचाच खच पडला आहे."

"हो, आहे ना..." त्यातून जसं तुझ्या बंगल्यात पाण्याचा पुरवठा होतो, आणि ती टाकी रिकामी होण्याआधी तू त्यात पाणी भरतोस ना..!! त्याचप्रमाणे तिजोरीतही रुपयाची आवक असायला हवी की नको...? नाहीतर ती रिकामीच होणार. आणि तुला फुकट मिरवायची सवय असल्यामुळे.. अर्थात तुझ्या बाप कमाईवर... तुला अंगमेहनत कधी जमलीच नाही. आणि आज असे दुसऱ्यांसमोर हात पुढे करावे लागत आहेत. म्हणूनच मित्रा... शौक कितने भी बडे हो, उन्हे अपने सही कर्मो के सहारे हि बरकरार रखा जा सकता है..."

एक लक्षात घे मित्रा... प्रत्येक गोष्टीला एक हंगाम असतो, आणि त्याचा अंतही अटळ असतो. धन, संपत्ती, ऐश्वर्य त्याला अपवाद नाहीत असं मला वाटत. पण फळ, फुलांचा हंगाम संपून गेल्यावर पुढच्या हंगामाचे लक्ष ठेऊन, माळी जसा  ते फळ देणाऱ्या झाडांना जपत असतो, त्याची मशागत करत असतो. त्याच प्रमाणे माणसाच्या आयुष्यातील चढ उताराना सामोरं जाण्यासाठी, त्याच्या आयुष्यात सदोदित सुकर्माची अहम भूमिका असते. बाकी बघ अजून वेळ गेलेली नाही.

दुनिया बहुत बडी है, फैसले की घडी है...
कर हौंसले बुलंद, आगे जिंदगी पडी है

___नित ९६३७१३८०३१
नितेश पाटील ( धनसार, पालघर)