Sunday, December 17, 2017

नशा

#नशा
नशा नाही अशी माणसं सापडणे म्हणजे दिव्यच. नशा म्हणजे काय..!! सवयच की... त्यात चांगल्या सवयी आणि वाईट सवयी असे वर्गीकरण आपण करतच असतो. चांगल्या सवयी माणसाला तारतात, त्याचं आयुष्य समृद्ध बनवतात. तर वाईट बुडवतात. वाईट सवयींच्या अति आहारी गेल्यामुळे, सर्वस्व हिरावून  माणसाचं आयुष्य रीतं होऊन जातं. आणि या स्तिथीतील बहुतांशी माणसं दारूच्या आहारी जातात.

झिंग चढवुनी झाले द्रव्य पसार आहे
खच रिकामी बाटल्यांचा बेसुमार आहे

परवा माझा एका मित्र भेटला होता. आईबाबांचा एकुलता एक मुलगा. पैसा अडका काहीच कमी नाही. बाबानेही आपली होती नव्हती तेवढी जमीन विकून बक्कळ रुपये साठवलेले. त्यामुळे काय साहेबांची मज्जा. कामधंदा करायचा नाही. दारात दुचाकी, चारचाकी उभ्या. बुलेटवर सेल्फ मारून उनाडायचं काम जोरात... ब्रांडेड वस्तूंचा भारी नाद. मग कपडे असो, शूज, चप्पल, घड्याळ, इव्हन आंतरवस्त्र देखील. आणि आजकाल तर विदेशी दारूचीही लत जडलेली त्याला. ( आता देशीवर आलाय ) उचे लोग उची पसंद... अशी ख्याती.

आता ते किती दिवस पुरणार ना..!! पाचशे रुपये मागत होता माझ्याकडे... मी पाहतच राहिलो त्याच्याकडे... मी दिले, पण त्याला म्हंटल. भाई तुझ्या इतक्या हाय प्रोफाईल सवयी होत्या. त्यात जर एक आणखीन सवय जडवून घेतली असती ना.., तर हि वेळ तुझ्यावर आली नसती. त्याने म्हंटल "कोणती ?" म्हंटल तुझ्या बंगल्यावर पाण्याची टाकी आहे. आहे ना ? की फक्त ब्रांडेड रिकामी बाटल्यांचाच खच पडला आहे."

"हो, आहे ना..." त्यातून जसं तुझ्या बंगल्यात पाण्याचा पुरवठा होतो, आणि ती टाकी रिकामी होण्याआधी तू त्यात पाणी भरतोस ना..!! त्याचप्रमाणे तिजोरीतही रुपयाची आवक असायला हवी की नको...? नाहीतर ती रिकामीच होणार. आणि तुला फुकट मिरवायची सवय असल्यामुळे.. अर्थात तुझ्या बाप कमाईवर... तुला अंगमेहनत कधी जमलीच नाही. आणि आज असे दुसऱ्यांसमोर हात पुढे करावे लागत आहेत. म्हणूनच मित्रा... शौक कितने भी बडे हो, उन्हे अपने सही कर्मो के सहारे हि बरकरार रखा जा सकता है..."

एक लक्षात घे मित्रा... प्रत्येक गोष्टीला एक हंगाम असतो, आणि त्याचा अंतही अटळ असतो. धन, संपत्ती, ऐश्वर्य त्याला अपवाद नाहीत असं मला वाटत. पण फळ, फुलांचा हंगाम संपून गेल्यावर पुढच्या हंगामाचे लक्ष ठेऊन, माळी जसा  ते फळ देणाऱ्या झाडांना जपत असतो, त्याची मशागत करत असतो. त्याच प्रमाणे माणसाच्या आयुष्यातील चढ उताराना सामोरं जाण्यासाठी, त्याच्या आयुष्यात सदोदित सुकर्माची अहम भूमिका असते. बाकी बघ अजून वेळ गेलेली नाही.

दुनिया बहुत बडी है, फैसले की घडी है...
कर हौंसले बुलंद, आगे जिंदगी पडी है

___नित ९६३७१३८०३१
नितेश पाटील ( धनसार, पालघर)

No comments: