Monday, February 22, 2016

गिर्यारोहन (ट्रेक) चे नियम

शिवप्रेमी गडयात्री ट्रेक समूह नियम

🚩 सस्नेह जय शिवराय 🚩
⛳ शिवप्रेमी गडयात्री ⛳
ट्रेक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून आनंदसह माहितीचा स्रोत आहे, धकाधकीच्या जीवनात निसर्गाशी नाते जोडणारा एक उत्तम दुवा आहे, कट्ट्याच्या निमित्ताने हा दुवा जपता येतो, गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो.     चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणा-या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणा-या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक हा समूह निर्माण केला आहे. शिवप्रेमी गड यात्री...
      ट्रेकिंगला जाताना काही नियम कटाक्षाने पाळले पाहिजेत.
* प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा येथे वापर टाळावा वापरल्यास कोठेही फेकून देऊ नयेत.
* मोठ्या आवाजात बोलू नये.
* चालताना झाडांच्या फांद्या तोडू नयेत.
* बिळांमध्ये काठ्या खुपसून आतील वन्य जीवांना त्रास देऊ नये.
* कुणीही चुकीचं वर्तन करू नये.
* टीम लिडरने दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे.
* ट्रेकला जाताना व्यसन करू नये.(मद्यपान,अल्कोहोल,ई.) नाहीच राहवत असेल तर येऊच नये.
* ट्रेकचे निर्धारीत मानचिन्ह असलेल्या कुठल्याही वस्तू ,कपडे शक्यतो ट्रेक व्यतिरिक्त कुठेच वापरू नयेत
* ट्रेकिंगला म्हणून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या सॅकमध्ये फर्स्ट एड बॉक्स (यामध्ये तुम्हाला लागणारी औषधे असावीत), खाण्याचे कोरडे साहित्य (चिवडा, लाडू, ठेपले थोडक्यात ज्या वस्तू टिकू शकतील असे.), प्लॅस्टिक बॅग्ज, साखर, मीठ, छोटी बॅटरी,त्यासाठी आणि कॅमेरा सोबत नेणार असाल तर त्यासाठी लागणारे सेल, पाण्याच्या दोन बाटल्या आणि सर्वात महत्त्वाचं एक कपडय़ाचा जोड,स्लिपर आणि रोप. या सर्व गोष्टी एक प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये व्यवस्थित रॅप करून सॅकमध्ये असावेत. अथवा ज्या समूहाबरोबर आपण जाणार असाल त्यांनी आवश्यक ती साधने, उपकरणे सोबत घेतली आहेत ना याची खातरजमा करून घ्यावी.
* ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे जाताना रुळलेल्या वाटेवरूनच शक्यतोवर जावे. पावसाळ्यात नवीन मार्ग शोधण्याचे साहस करू नये.
* ट्रेकिंगला जाताना ट्रेकिंग पँट, आणि पूर्ण बाहय़ाचा शर्ट घाला. मुलींनीही कॉटनचे कपडे न घालता ओले झाल्यानंतर पटकन वाळू शकतील, असे कपडेच घालावेत. पावसाळ्यात रस्ते निसरडे झालेले असतात. त्यामुळे पायात चांगल्या प्रतीचे सॉक्स आणि ट्रेकिंग शूजच घाला. दागिने घालणे टाळा.
* तुमच्याकडे त्या ठिकाणी चालणारया नेटवर्कचा मोबाईल अवश्य जवळ असणे गरजेचे आहे. ट्रेकला जाण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे तसेच त्यांचा नंबरही सोबत ठेवावा. ट्रेक दरम्यान एखादी अडचण निर्माण झाली तर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
* धबधब्याच्या किंवा एखाद्या नदीच्या पात्रात डुंबायला जाता तेव्हा पाण्याचा अंदाज खूपच महत्त्वाचा असतो. तुम्हांला जर पोहोता येत नसेल तर खोल पाण्यात जाणे टाळा. पाण्यात गेल्यावर वेळेचे भान रहात नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असल्याने पात्रात खोलवर जाणे टाळा. तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस नसेल पण लांबवर पडणा-या पावसामुळे पाण्याची पातळी कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते.
* उंचावरून कोसळणारा धबधबा प्रत्येकालाच आकर्षति करत असतो. पण या धबधब्यांमधून लहान मोठे-दगड येण्याची शक्यता असते. वरून येणारा लहानशा दगडामुळेही इजा होण्याची शक्यता असल्याने अशा धबधब्यांखाली खाली उभे राहणे टाळा.
* पावसाळ्यात धबधब्यांमध्ये रॅपिलग करताना यामध्ये धोका असतो हे लक्षात असू द्या. प्रत्येक रॅपिलग झाल्यावर दोर चेक करायलाच हवा. रॅपिलग करणा-याला हेल्मेट घालणे बंधनकारक असते तो नियम काटेकोरपणे पाळावा.
* निसर्गाचे सौंदर्य कॅम-यामध्ये टिपत असताना वेळेचेही भान असू द्या. एखाद्या अवघड जागी उभे राहून फोटो काढणे, दंगामस्ती करणे टाळावे,तसे करणा-यांना त्यापासून प्रवृत्त करावे.
* ज्या ठिकाणी जाणार आहात तिथल्या स्थानिक गावक-यांची कधीही मदत लागू शकते हे ध्यानात घेऊन त्यांच्याशी सौजन्याने वागा. जर गावाबाहेर किल्ल्यावर तुम्ही जाणार असाल आणि तिथे जर तुम्ही वास्तव्य करणार असाल तेव्हा गावातील काही लोकांचे दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक, तिथल्या पोलिस ठाण्याचा क्रमांक जवळ ठेवा. शक्य झाल्यास तिथल्या एखाद्या गावकऱ्याला तुमच्यासोबत न्या.
* तुमच्या ट्रेकिंगमध्ये एका रात्रीचा मुक्काम असेल तर सोबत कॅरीमॅट, ओडोमॉस, शक्य असेल तर स्लििपग बॅग बाळगा. तसेच रात्रीचा स्वयंपाक झाल्यावर त्या ठिकाणची स्वच्छता अवश्य ठेवा.
* ट्रेकिंगच्या दरम्यान तुमच्याकडे असलेला कचरा, खाद्यपदार्थाची वेष्टणे, फळांची साले, थंड पेयांचे डबे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागद,निरुपयोगी वस्तू इकडेतिकडे फेकू नका. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखा.
* ट्रेक संपल्यानंतर ओले झालेले बूट, सॉक्स काढून ते सोबत असलेल्या पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत आणि पाय कोरडे करून स्लिपर घालाव्यात.
ट्रेकिंगला निघण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली क्षमता ओळखूनच ट्रेकिंगला/फिरायला जाण्याचे ठिकाण निवडावे.
* तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकिंगला जाणार असाल तर आधी एका दिवसाच्याच ट्रेकला जा आणि अनुभवी व्यक्तीं/ ग्रुप्स सोबतच जा. जर मित्रमंडळींच्या ग्रुपबरोबर जाणार असाल तर गावातील स्थानिक व्यक्तीला वाटाडय़ा म्हणून सोबत घ्या.
* ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात तिथले मार्गाची माहिती असावी, सोबत त्या भागाचे नकाशे असावेत. त्यामुळे परतीच्या मार्गात जर काही अडचण आली तर पर्यायी रस्ता वापरता येऊ शकतो.
संग्रहित...
धन्यवाद....
संकलन :- नितेश पाटील (पालघर,धनसार)
मोबाईल नं. ०९६३७१३८०३१
email :- nitesh715@gmail.com

Thursday, February 18, 2016

कन्याकुमारी केरळ सहल २०.११.१५ ते २७.११.१५

 सस्नेह जय शिवराय...                                                                                                नितेश पाटील

कन्याकुमारी केरळ सहल दि. २०.११.२०१५ ते २७.११.२०१५ 
शिवा डेकोरेशन ग्रुप पालघर धनसार...........

     फिरायची उत्सुकता आणि ओढ माझ्या आयुष्यात एक नवी पर्वणीच असते. ईश्वर कृपेने मला नेहमीच बाहेर म्हणजेच महाराष्ट्रात म्हणा, महाराष्ट्राबाहेर म्हणा, कामा निमित्ताने त्याच बरोबर फिरण्याच्या उद्देशाने बाहेर जाण्याचा योग येतच असतो.  मित्राच्या सहकार्याने आणि परमेश्वर कृपेने भारताबाहेर दुबई १२.६.२०१५ ते १६.६.२०१५ जाण्याचाही योग जुळून आला होता त्याबद्दल मी मागच्या ब्लॉग मध्ये लिहिले आहेच.
     असो.... 
आता कन्याकुमारी केरळची सहल. शिवा डेकोरेशन ग्रुप आयोजित. दिवस ठरला होता. कार्यक्रमही पेपरबद्ध झाला होता. अर्थात ती आखणी करण्याचे श्रेय शिवा घरत,अमित माळी, सुदेश मोरे आणि काही प्रमाणात मी अशी चौघांनी केली होती. बाकी सदस्याना त्याची माहिती आणि त्यांच मत जाणूनच. इतर सदस्य म्हणाल तर कल्पेश घरत,(गुरू),शैलेंद्र राऊत,रमेश राऊत,तुषार कारभारी,तृणाल मोरे, आणि लहानगा पियुष घरत असे सुदेश सोडून आम्ही नऊ जण. 
           एकंदरीत सहल अशी होती २०/११ धनसार हुन बोईसर तिथून नागेरकोईल एक्स.ने थेट  एक दिवस नी दोन रात्रीचा प्रवास करून नागेरकोईल २२/११. तिथून कन्याकुमारी. त्याच दिवशी रात्री १०.३० ची रामेश्वरम ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वाजता रामेश्वर. तेथील क्षणचित्रे पाहून पुन्हा ४.३० ची मदुराई साठी ट्रेन पकडून मदुराई संध्याकाळी ७.३० वाजता पोहचून रात्री विश्रांती. सकाळी मीनाक्षी मंदिर पाहून गाडी करून थेकडी. तिथली क्षणचित्रे पाहून एक दिवस वास्तव्य करून पुढच्या दिवशी मुन्नारकडे प्रस्थान. तिथेही क्षणचित्रे पाहून एक दिवस वास्तव्य करून सकाळी कोचिनकडे रवाना. रात्री वास्तव्य आणि सकाळी कोचिन एअरपोर्ट तिथून एअर इंडिया एक्स. विमानाने छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल  एअरपोर्ट  मुंबई पोहचून घरी .अशी सहलीची सांगता..
         ठरल्या प्रमाणे आम्ही निघालो बोईसरकडे. बॅगा असल्यामुळे घरून निघतानाच रिक्षा (मॅजिक) सज्ज केली होती. तुषार तेवढा ट्रेनने येणार होता. ७.२० ची ट्रेन असल्यामुळे आम्ही ५.३० लाच घरून निघालो. रिक्षासमोर श्रीफळ फोडला आणि श्री गणेश स्मरण करून निघालो. रस्त्यात विषय निघाला कि गळ्यात चैन वैगरे नसेल तर चांगलं. दोन दिवस ट्रेनमधील प्रवासात मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवायचं म्हणजे शर्थीचे काम. आणि हि कल्पना सर्वाना आधीच दिली होती.पण आमचे शैलेंद्र राऊत आणि रमेश राऊत यांनी आपल्या गळ्यातील चैनी गळ्यातच घालून आले..!! मग काय ? आता ह्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न आलाच. पण रमेश राऊत यांच्याबद्दल काय सांगावं त्यांनी लगेच सुझाव दिला कि सरावलीत  त्यांच्या ताईकडे ठेवू. त्यांनी त्यांच्या भाच्याला बोलावून त्या सुपूर्द केल्या आणि पुढे निघालो. पोहचलो बोईसर स्टेशनवर.तुषारही पोहचलाच होता.
        आता आतुरतेने वाट बघत होती गाडीची. ती हि अर्धा तास उशिराने धावत होती. आणि आली बाबा एकदाची स्टेशन वर असलेल्या आरक्षण चार्ट नुसार आम्ही बोगीमध्ये चढलो. अरे पण जागेवर गेलो तर तिथे पूर्वीपासूनच प्रवासी बसले होते. आम्ही विचारणा केली असता समजलं कि त्या जागा त्यांच्या नावे आरक्षित होत्या.आम्ही आमचं तिकीट पाहिल्यावर कळलं कि आमची जागा दोन बोगी नंतरच्या बोगीत आरक्षित होती. सांगायचं तात्पर्य इतकच कि हा रेल्वे कर्मचाऱ्यांचा गलथानपणा  प्रवाश्यांसाठी किती त्रासदायक होतो. आपणही दक्ष राहायला हवं. असो जागेवर पोहचलो होतो. सारी आवरा साराव करून सर्वांच्या सॅग व्यवस्थित लाऊन सुस्कारा सोडला आणि निवांत झालो.
      सर्व सावरताना नऊ वाजले होते. आता जेवणाची वेळ. तसं घरूनच रात्रीचं आणि दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण सोबत होतं आमच्या. पाण्याच्या बाटल्यांचे तीन बॉक्स हि सोबतच होत्या. उगाच दगदग नको..!! शेवटी घरचं जेवण ते घरचं..!! दोन दिवस ट्रेनमध्ये सलग प्रवास करायचा म्हंटल्यावर ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजेत. रात्रीच्या जेवणाचं म्हणाल तर चमचमीत मसालेदार चिकन सोबत ग्रेव्ही आणि भात,कांदा,लिम्बु आहाहा...!!! आणि त्याच श्रेय जातं खरंतर प्रिया ताईला. तीने मेहनतीने आम्हा नऊ जणांसाठी स्वयंपाक बनवला होता. इतकी उत्कृष्ट डिश होती कि खताक्षणी सर्वांच्या तोंडातून वाह शब्द बाहेर पडले आणि सर्वांनी मनमुराद, मनसोक्त आस्वाद घेतला. आमच्या बाजूला बसलेलेही अचंबित झाले. सारं उरकून गप्पा आणि पत्त्यांचा खेळ सुरु झाला, तुम्हाला ट्रेनमध्ये जर दोन दिवस सलग काढायचे असतील तर पत्यांची सोबत हवी. आमच्यात पियुष तितका लहान होता पण आमच्याबरोबर हि त्याची तिसरी ट्रिप होती. एक प्रकाशाने जाणवलं कि तो या ट्रिपवर अधिकच उत्साही आणि खुष होता. आपल्या सोबत लहान मुलं असली कि ती जर खुष असतील तर आपल्याही आनंदाला पारावर उरत नाही. अकरा बाराच्या दरम्यान सारे निवांत झोपी गेले. सामानावर लक्ष्य देण्याची जबाबदारी गुरू आणि तृणालने उचलली होती. ट्रेन मध्ये तशी प्रत्येकालाच झोप लागत नाही म्हणा.....
        आम्ही एकाच जागेत झोपलो असलो तरी गाडी मात्र चालत होती तिनं आपला वेगही थोडा जास्तीचा वाढवला होता. तिला इतकं अंतर कापायचे म्हंटल्यावर तिला थांबून चालणारच नव्हतं. वसई,पनवेल,रत्नागिरी मार्गे सकाळी आठच्या सुमारास मडगावला पोहचलो होतो. आता ट्रेनमधला दुसरा दिवस चालू. सकाळ झाली एक एक करून सारे उठले आपापला सकाळचा कार्यक्रम उरकून स्थानापन्न झाले. सकाळ झाली म्हणजे चहा हे काय सूत्र आहे देवच जाणे.!! हल्ली तर काही लोकं ब्रश करायच्या आधी चा घेतात. अस्सल दारुड्या कसा असतो माहित आहे ना.? उठला थेट दारूच्या गुतत्यावर ... सकाळी नाही ,पहाटेच...!!! त्यातलाच काहीसा प्रकार असावा हा. असो मग चहा घेत गोव्याचं रमणीय दृश्य न्याहाळत आम्ही म्हणजे गाडी पुढे सरू लागली, गोव्यात व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा मिळू लागला. आणि सहजिकच आपण जेव्हा बाहेर फिरण्यासाठी निघतो तेव्हा आधी भ्रमण केलेल्या क्षेत्राची आठवण आपसूकच येत असते.आता सकाळ झाली चहा घेतला म्हणजे नास्ता हवा कि नको ? त्याशिवाय का जमणार आहे...? मग काय उघडल्या बॅगा आणि सर्वांनी काहींना काही आणलच होत. परोठे, खाकरा, चिवडा, बिस्कीट,आदी लय झकास काम झालं ना..!! दाबून म्हणतात ना तसा नास्ता केला सार्यांनी... 
 मधेच गाडी खराब झाली (सिग्नल नसल्यामुळे थांबली होती)आम्हाला टाटकळत राहावं लागलं. पण सोबतीला आमचे शैलू मास्तर असल्यामुळे तो हि प्रश्न निकालात निघाला. तसा मास्तर तो शाळेचा आहे पण असले उद्योग करतो तो...
 तोपर्यंत आम्ही म्हणजेच गाडीने काणकोण सोडून कारवार  मार्गे कर्नाटकात प्रवेश केला होता. आता सफर चालू झाली ती परराज्यातली ... गाडी आपल्या वेगात आम्हाला पुढे घेऊन चालत होती. बघता बघता दुपारची जेवणाची वेळ येऊन ठेपली.लागलीच डबे काढले. मेनू होता कर्दीचा खिमा आणि दाताल फ्राय....मेजवानीच..!! रेटून हाणलं मग ट्रेनमध्येच फेरफटका...!! नाहीतर जिथे गाडी थांबेल तिथे उतरायचं आणि क्लिक मारायचे.
            दोन वाजले होते. आता गाडीने मंगळुरू मागे टाकून केरळात प्रवेश केला होता. काही जण झोपीही गेले म्हणा.. आम्हाला कसली येतंय झोप..?? आम्ही आपलं धुंडालायचो इथून तिकडे अन तिकडून इकडे. केरळ आणि नारळाच्या झाडाचं अतूट नातं असावं. रस्त्याच्या दुतर्फा फक्त आणि फक्त नरळींचच साम्राज्य...इच्छा तर होणारच ना नारळपाणी प्यायची..?? पण संभ्रमात राहू नका. केरळमध्ये एकाही थांब्यावर नारळ पाणीवाला नव्हता. काय पॉलिसी असेल कुणास ठाऊक.?? मग काय चहा जिंदाबाद. एक चुस्की मारली कि काम फत्ते.... पण वेळ कसा निघून गेला कळलं नाही. आता रात्रीचं जेवण मात्र आम्हाला मागवावं लागणार होत. पुऱ्या आणि चपात्या होत्या काय ती भाजीची तेवढी सोय करायची होती. रेल्वे पँट्रीच्या बाजूलाच बोगी असल्यामुळे फार काही दगदग नव्हती. आम्ही अंडाकडी मागवली आणि केली सुरवात . दुसरं कामच काय म्हणा..?? खाना, पिना, सोना.पिना म्हणजे पाणी ,चहा बरं का ? नाहीतर भलतंच समजाल. पावणे नऊच्या सुमारास त्रिशुर पोहचली बाबा गाडी. माणसांची वर्दळ चालू. काही कॉलेजच्या युवती असतील थेट आमच्या बाजूच्या कम्पार्टमेंट मध्ये येऊन बसल्या सोट त्यांच्या शिक्षिका. काय बोलायच्या काही एक समजायचं नाही. त्यांच्या भाषेत गाणी गुणगुणत होत्या. आणि इथं आमच्या मुलांची चलबिचल. एका म्हणतो मी राहील जागा आणि दुसरा म्हणतो मी. थिरुअनंतपुरमला उतरल्या त्या सार्याजणी आणि आमचे वीर आणि आम्हीही गाढ झोपी गेलो.कधी नागेरकॉईल आलं आणि गाडी कधी खाली झाली कुणालाही काही कळलं नाही. आमच्या शेजारी जे होते त्यांनी उठवलं.म्हंटलं उठ जाव आखरी स्टेशन आ गया. तेव्हा उठून धावपळ केली आणि उतरलो. पण तिथे पँट्रीतलं समान उतरवून नंतरच गाडी तिथून जाते. म्हणून अवकाश होता. सारे तिथेच फ्रेश झाले आणि निघाले. 
          आता पुढच्या प्रवासा साठी एका गाडीची गरज होती. स्टेशन बाहेर जाऊन ती सुनिश्चित केली.आणि सारे बसलो. सॅग टपावर आणि आम्ही खाली.नागेरकॉईल ते कन्याकुमारी अवघ्या पंचवीस मिनिटांचा रस्ता. रस्ता एकदम टापटीप. वातावरण ढगाळ होतं, पाऊस आताच धरतीला हर्षुन गेला होता,अनायासे हवेत गारवा हि खेळ खेळत होता. पहाटेच्या समयी बाहेरच वातावरण मनमोहक दृष्टीस येत होतं. ते दृश्य डोळ्यात साठवत आम्ही कन्याकुमारीत कधी पोहचलो कळलं सुद्धा नाही. आमची गाडी एका प्रशस्थ अश्या हॉटेलपाशी येऊन थांबली. श्रीदेवी हॉटेल. कन्याकुमारी स्टेशन आणि बीच दोहोंच्या अगदी मधोमध स्तिथ. अगदी पायी चालत गेलं तर पाच मिनिटांच्या अंतरावर असं हॉटेल. कुठल्याही समूहामध्ये एक म्होरक्या असतो तसा आमच्यात म्हणाल तर शिवा घरत. त्यांनी जाऊन दोन खोल्या निश्चित केल्या. गाडी माघारी घालवली. कारण आता गाडीची गरज नव्हती. सारी क्षणचित्रे अगदी हाकेच्या अंतरावर. आम्हीही काय जाऊन त्या आमच्या सॅग रूममध्ये कोंडल्या आणि निघालो सूर्यदर्शन घेण्यासाठी चौपाटीवर. ढगाळ वातावरण आणि हलकी बुंदबुंदी चालू असल्याल्यामुळे ते काही शक्य झालं नाही. पण तरीही बीच मात्र माणसांनी खचाखच भरलेला होता. आम्हीही त्यात सामील झालो. सकाळ झाली म्हंटल्यावर चहा हवाच कि नको..?? सूर्य जरी दिसत नसला तरी सकाळ अंधारात राहत नाही, याला म्हणतात तेज..सूर्यतेज..!! अथांग सागर एक नव्हे त्रिवेणी सगरांचा संगम, जमलेला आतुर जनसमुदाय या सार्यांना जरी टांगत ठेवलं असलं तरी सकाळ झाली होती आठ वाजले होते. हुडहुडी पळविण्यासाठी चहाच्या चुस्कीची गरज होती. समोरच एका सायकलवर चहाची किटली घेऊन पन्नाशीतील एक काका चहा विकत होते. आम्ही साऱ्यांनीच चहा घेतला. अगदी अप्रतिम असा. एक नंबर... तसा चहा आम्हाला पूर्ण सहलीत कुठेच प्यायला मिळाला नाही हे मात्र खर.सुर्रर्रर्रर्रर्र के पीयो...!! इथे आम्हाला एक चहाचे रुपये माफ झाले. आमचे तात्पुरती ड्रायवर शिवा घरत याना ती सवलत होती.

          पुढचा कार्यक्रम असा होता कि हाटेलवर जाऊन अंघोळी करून मग समुद्रातील स्वामी विवेकानंद स्मारक, 133 ft तिरुवल्लूवर पुतळा जेथे स्तिथ आहे तिथे बोटीने जाणे आणि मग त्रिवेणी संगम जेथे अरबी सागर, हिंदी महासागर,बंगालचा उपसागर यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो.पण त्या त्रिवेणी संगमात यथेच्छ चिंब झालेला जनसमुदाय डुबकी मारताना पाहून आम्हालाही मोह आवारात आला नाही. त्या गराव्यातहि मनमोहक होऊन आम्हीही सम्मिलित


झालो आणि धुंद होऊन गेलो. पियुष तेवढा आमच्याबरोबर आला नाही. पण खूप उत्साही होता. दोन दिवसाचा सलग प्रवास करूनही हा आमचा छोटा वीर उत्साहित आणि प्रसन्न म्हणजे आमची जमेची बाजू.त्रिवेणी संगमात आमचा घुडगूस आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अमित तटावर तल्लीन होता. आम्हचं स्वागत भव्य उसळणाऱ्या लाटांनी होत होत. त्यातच समोर साठी पार केलेला म्हातारा माणूस थरथरत्या अंगानी हातात चाळण घेऊन सामुद्रसंपत्ती मोती शोधण्याचा प्रयत्नात डुबकी मारून काही काळ पाण्याखाली स्थिरावत अदृश्य होत होते. मग वर येऊन चाळणीतल्या वाळूत एखादा मोती आहे का नाही ते पडताळून पाहायचे. नसेल तर पुन्हा तेच... त्यांची ती धडपड वारंवार चालु होती.एक धागा सुखाचा अशीच काहीशी धडपड. पण आपल्या जिद्दीवर, कर्तृत्वावर....असो
        एखाद तास आम्ही त्या समुद्रमिलनात आंघोळी करून बाहेर पडलो. पण तीन समुद्राचं पाणी असूनही ते खारटच लागत होतं बरं..!! आता ट्रेनमधून नाराळीची झाडं पाहून नारळपाण्यापासून वंचित असलेले आम्ही नारळ वाला पाहून.. आम्हाला ते पिण्याचा मोह आवरता आला नाही. तदनंतर थेट आम्ही हॉटेलकडे मोर्चा वळवला. फ्रेश होऊन पुन्हा विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा पाहण्यासाठी बोटीत जाण्यासाठी तिकीट खिडकीपाशी गेलो. लांब रांग होती. तिकीट काढून आम्ही जेथे पासशे माणसं मावत असतील अश्या एका बंद गाभाऱ्यात शिरलो. तिथून एका बोटीत बसतील एवढीच माणसं मोजून सोडली जात होती. मग काय इंतजार....चौथ्या बोटीत आमचा नंबर आला आणि बोटीत बसून स्वामी विवेकानंद स्मारकपाशी आम्हाला उतरवलं तितेही तिकीट काढल्यानंतरच प्रवेश आहे.
         अप्रतिम असं स्मारक एकात्मता आणि पावित्र्य यांचे अनुपम प्रतिक , कन्याकुमारीचे  शीला स्मारक आहे. तसेच ते भारताच्या एकात्मतेचे आणि आकांक्षेचे दर्शन आहे.  भारताच्या प्राचीन स्थापत्य कलेचा मनोहर संगम आहे. ते पाहून आमी सारे दंग राहिलो. भारत वासियांनी केलेल्या कामाचे, आकांक्षांचे , योगदानाचे ते प्रतिक आहे. विवकानंद स्मारक हे कन्याकुमारी  येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे . हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे. विवेकानंद स्मारक समितीने  इ.स. १९७० स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते.पण या स्माराकांबरोबरच त्या महापुराषाना प्रतिमेत बंदिस्त न करता त्यांच्या शौर्य बलिदानाचे धडे युवा पिढीला मिळावेत त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.त्रिवेणी संगमाच्या त्या स्मारकावरावरून ते अवर्णनीय दृश्य पाहताना आम्ही सारेच भारावून गेलो.ते क्षण अमितने आपल्या कॅमेर्यात बंधिस्त केले.विशेष म्हणजे आमच्या सोबत पियुषहि उत्साहित होता. पावसाची बुंदाबुंदी चालू होती.
       तदनंतर आम्ही बोटीत बसून शेजारीच असलेल्या तिरूवल्लुवर राजाची भव्य अशी १३३ फुट प्रतिमा आहे जी स्टैच्यू ऑफ लिबर्टी प्रतिमा लक्षात ठेऊन जवळपास पाच हजार मूर्तिकरांनी अथक परिश्रम करून उभी केली आहे. त्या कुशल कारीगिरीचा नमुना डोळ्यात साठवताना नजर थक्क होऊन जाते. जवळून तो पुतळा कॅमेऱ्यात कैद होणं शक्य नाही. पण तेथून विवेकानंदांचं स्मारक मात्र अप्रतिम नजरेस पडते.

        पुढे जेवण अपोटोतून काही क्षण विश्रांती आणि नंतर संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही चौपाटीवर गेलो. पण ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यास्त काही नजरेस पडणार नाही हे कळून चुकलं होतो. तत्पूर्वी मत्सालय पाहिलं. जेथे नाना प्रकारचे दुर्मिळ अप्रतिम मासे काचेच्या भांड्यात कैद आहेत. त्यानंतर काय तर...चौपाटीची मजा..तिथे एक गम्मत घडली. सार्वजनिक ठिकाणी तृतीय पंथी नाहीत अशी जागा क्वचितच सापडेल पण ते नक्की तृतीय पंथी असतात का हा संशोधनाचा विषय आहे. ते असे काही मागे लागतात कि जणू एखादा भुंगा फुलांवर पराग कनांसाठी गुणगुणत असतो. जोपर्यत त्याला ते प्राप्त होत नाही तोपर्यंत तो काही हातात हटत नाही. पण आमचेही वीर जरा अवलीच..!! त्यांना त्याच्या समवेत फोटो काढण्याचा मोह मात्र आवरता आला नाही. तदनंतर शॉपिंग, जेवण  आणि हॉटेल सोडून कन्याकुमारी रेल्वेस्थानकाकडे रवाना झालो.
          आमच्या सहलीची तिसरी रात्रही रेल्वेच्या २२६२२ CAPE RMM EXP. च्या डब्यात पूर्वनिर्धारित होती. रात्री १० वाजता ट्रेन रामेश्वरकडे रवाना होणार होती तत्पुर्वी स्टेशनवर पोहचलो. ढगांचा प्रचंड गडगडाट, पाऊस नव्हता पण विजेच्या प्रकाशात आसमंत वारंवार उजळून निघत होतं. मनात एक भीती होतीच कि जर पावसाने गोंधळ घातला तर सहलीची मौज निघून जाईल. त्याच विचारात आम्ही ट्रेनमध्ये स्थानापन्न नव्हे झोपी गेलो. रात्री २ च्या आसपास पावसाने धुमाकूळ घातलाच. खिडकीतून येणारे पावसाचे थेंब गारव्यात शहारून सोडत होते. ते शहारने चालूच असताना पाम्बन ब्रिज क्रॉस करून रामेश्वरम ला सकाळी सहा वाजता पोहचलो. आणि सुखावलोही कारण पाऊस तितका नव्हता.
        पवित्र तीर्थक्षेत्र चार धामातील एक धाम रामेश्वर पण कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी कशी, र्हुदयातील भगवंत राहिला र्हुदयात उपाशी ह्या गीताशी शब्दशः सहमत मी अन कदाचित माझे मित्रही. त्या ईश्वराने निर्मिलेली , प्रत्यक्षात वास्तव्य केलेली स्थळे पाहण्याचा मानस. बाकी आपल्या आचरनातच ईश्वर असतो असा माझा ठाम विश्वास आहे. स्टेशन बाहेर पडताच एक रूम घेऊन तिथे फ्रेश झालो आणि निघालो  भ्रमंतीसाठी . हॉटेल बाहेरच गाडी होती पण ती काही आम्ही घेतली नाही. व्यवहार जमला पाहिजे ना हो..!! आणि आमचे साहेब त्यात पटाईत व्यावहारिक भाषेत माणसाला कश्या प्रकारे जाग्यावर आणायचं हे त्यांना चांगलच ठाऊक...
शेवटी बाहेर चहा घेऊन आम्ही तवेरा करून निघालो. अतिशय मनमिळाऊ माणूस होता ड्रायवर . आणि त्यांना  पर्यटकांना काय दाखवायचं हे चांगल माहित असत. तसे काही अपवाद वगळता कुणी गैरव्यवहार करीत नाही.
       सकाळी ८ च्या दरम्यान आम्ही क्षणचित्रे पाहण्यास  सुरवात केली. रामेश्वर मध्ये मंदिरं भरपूर आहेत अगदि मंदिरांचे शहर असा उल्लेख केला तरी चालेल. प्रथमतः आम्ही श्री राम पादुका तीर्थ पाहण्यास गेलो जिथे श्री रामाने वास्तव्य केल होतं असं स्थानिक लोकांच म्हणन आहे. तदनंतर हनुमान मंदिर, राम कुंड, पाण्यात तरंगणारे दगड जे सेतू बांधण्यासाठी वापरन्यात आले होते.ते पाहत पाहत जात असताना आमची गाडी रोडच्या कडेला विसावली.

       एक पवित्र स्थान जेथे तुमची छाती गर्वाने आणि अभिमानाने भरून येते. त्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यास आम्ही तत्त्पर होतो.भारताचे अकरावे राष्ट्रपती,लोकांचे राष्ट्रपती, पद्मभूषण,पद्मविभूषण,भारतरत्न सन्मानित,विज्ञानाचे परम भोक्ते, थोर वैज्ञानिक, युवकांना सदैव प्रेरणा देणारे, ज्यांच्या भारताच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे ते...डॉ.अबुल पाकीर जैनुलाबदीन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम  यांना जिथे भारतीय इतमामात आदरांजली  दिली गेली ते ठिकाण.जेथे एक देशभक्त धरनिमातेची चादर ओढून निवांत निद्रिस्त आहे. धन्य जाहलो. त्यांच्याबद्दल मी काय लिहावं. सद्यस्तीथ फार अशी वर्दळ नसते. सरकारी कर्मचारी (पोलीस) मात्र पहार्यास आहेत.पण स्मारकाचे काम चालू आहे.
      त्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आम्ही  पाम्बन ब्रिज कडे रवाना झालो. रामेश्वर हे भारताच्या मुख्य भूमीपासून तुटलेलं बेट. आणि त्याला जोडणारा दुवा म्हणजेच पाम्बन ब्रिज. चारशे वर्षापूर्वी इथे दगडाचा पूल होता जो कृष्णप्पनायकन राजाने बांधला होता पण त्याचा निभाव सागरी लाटांपुडे लागला नाही.. तदनंतर इंग्रज काळात एका जर्मन इंजिनियरच्या सहाय्याने इथे रेल्वे पूल बांधला गेला. ह्या पुलाची लांबी आहे  २३४० मीटर. अभूतपूर्व आणि शर्थीच काम. हा पूल मधून सागरी जहाजांच्या आवागमनासाठी खुला केला जातो. अप्रतिम इंजीनियरिंग चा हा नमुना आहे. त्या पुलाखालून दक्षिणेकडून उत्तरेस सागराचे पाणी वाहताना दिसते. हा सागर असूनही नदी असल्याचा भास होतो.अर्थात हे पाहण्यासाठी त्याच्या शेजारीच असलेला राष्ट्रीय महामार्ग ४९ तोही पूल कुशल कारीगारीचा उत्तम नमुना आहे. हा पूल २ ऑक्टोंबर १९८८ रोजी पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या हस्ते नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्या पुलावरून जी आम्ही निसर्गाची भव्यता अनुभवली ती भूतो न भविष्यती.आणि आमच्या पियुषला कुठलीही कारीगिरी म्हंटली म्हणजे मेजवानीच.




       तद्नंतर रामसेतू पाहण्यासाठी आम्ही त्या दिशेने रवाना झालो. रामेश्वर द्वीप आणि श्रीलंकेतील मन्नार द्वीप यांना यांना जोडणारा. तेथिल सध्यस्तीथ अवषेश पाहता सागरी भूमिगत पूल असावा असा काहींसा कयास तर प्रभू श्री रामभक्त वानर सेनेने बांधलेला रामसेतू असे भिन्न मतप्रवाह आहेत. हा सेतू  ४८ किलोमीटर लांबीचा आहे आजही येथे उथळ पाण्यामुळे सागरी लाटांच अस्तित्व असतं. ज्या आपल्याला इथे पूल असल्याची ग्वाही देतात. हा पूल सागराच्या वर स्तिथ होता. पण १४८० साली आलेल्या सागरी वादळाने तो उध्वस्त झाल्याचे सांगितले जाते. त्या पुलापर्यंत जाण्यासाठी  बसेस आहेत. ज्या खास वाळूच्या रस्त्यातून सफर करतात.
     तिथून माघारी फिरून आम्ही  रामेश्वर स्तिथ डॉ. अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानी पोहचलो जिथे त्यांच्या आयुष्याची सफर आणि त्यात अथक परिश्रमाने, देशभक्तीने प्रेरित होऊन मिळवलेली ऐवज जी सन्मान चिन्हाने ओतप्रोत भरलेली संग्रहित केली आहे ते पाहण्यासाठी आम्ही गेलो. ते स्मारक पाहून आम्ही सारेच थक्क झालो. देशाच्या सेवेसाठी त्यांना गौरान्वित केलेल्या सार्याच क्षणाची क्षणचित्रे आणि स्मृतीचिन्ह तिथे सजविले आहेत.आमच्याबरोबरच आमचा लहानगा पियुष ज्याला वैज्ञानिक क्षेत्रात लहानपणापासूनच अधिक रुची आहे. सारेच भारावून गेलो.
       नंतर जेवण करून आम्ही हॉटेलवर आलो. इथे मात्र इतकी मस्ती केली कि सारे पोट दुखोस्तोवर हसले. ते आमचे आहेत ना..!! रमेश राउत...एखाद मुद्दा असा काही रंगवतात कि विचारूच नका... एक हसवणारं व्यक्तिमत्व. असो आता पुढचा प्रवास होता.RMM TPTY Exp. 16780 ने जी संध्याकाळी ४.२८ ला रामेश्वर हून सुटते त्या अनारक्षित ट्रेनने आम्ही मदुराई कडे रवाना झालो. पुन्हा त्याच ब्रिजचे ते भव्य रूप न्याहाळत  पाम्बन ब्रिज पार करून रामेश्वरम मागे
 
टाकत आम्ही पुडे सरत होतो. तिरुपती अति प्रजन्य वृष्टीमुळे  पाण्याखाली होती. म्हणूनच ट्रेन इतकी खाली होती. निवांत सफर झाली. आमचं नशीब मात्र आमच्यावर मेहरबान होत. आम्ही जिथे जयायचो तिथे या तर पाऊस पडून गेलेला असायचा नाहीतर आम्ही तिथून निघाल्यावर पडायचा. ते निसर्गाच रूप भुरळ पडणारं होतं. मंडपम ते परमकुडी हा प्रवास आमच्या सार्यांच्याच सदैव स्मरणात राहील. इथे जे आम्ही ट्रेनमधून मोर पहिले जे मोजता न येण्यासारखे. काय तो नजारा होता..!! जिथे पहावं तिथे रस्त्याच्या दुतर्फा मोरच मोर....वल्लाह..!!! दिल खुश हो गया... ते सौंदर्य डोळ्यात आणि र्हुदयात साठवून आम्ही सहाच्या सुमारास मदुराई ला पोहचलो.
       विश्व प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर असलेले हे शहर. या शहरास प्राचीन मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. लागलीच स्टेशन च्या बाहेर निघून रात्री राहण्याची सोय आणि पुढच्या म्हणजेच थेकडी , मुन्नार आणि कोचीन साठी जाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मी आणि साहेब एका हमाल काकांबरोबर बाहेर पडलो. खरतर त्यांनीच आम्हाला नेलं. पण कुठल्याही व्यवहारात निपूण असलेले आमचे साहेब( शिवा घरत ) सोबतीला होते म्हणजे काळजी कसली...? स्टेशन च्या बाहेर पूर्वेस रस्ता ओलांडून सरकारमान्य सूर्या टूर आणि travals मध्ये . तिथे चर्चा करून आजची आणि पुढल्या तीन दिवसाची राहण्याची आणि गाडीची सोय ( तवेरा ) करून घेतली. आणि आंम्ही सारे हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि बाहेर पडलो . मीनाक्षी मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी. आमच्या राहत्या ठिकाणाहून अवघ्या पाच मिनिटांवर मंदिर होते. एकंदरीत बाहेरचा परिसर गजबजलेला दुकानच दुकानं....काहीही घ्या म्हणजे विकत बर का..??

      चला मंदिराकडे वळूया. १६ व्या शतकात बांधलेलं दक्षिण भारतीय वास्तू  शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल  हे मंदिर. शिवशंकराची भार्या पार्वती म्हणजेच मीनाक्षी हि त्या मंदिरात देवस्थानी आहे.या मंदिराचे तब्बल १६० फुट उंचीचे चार खालून वरपर्यंत अनेक देवतांचे, राक्षसांचे रेखीव भव्य पुतळ्यांनी ते मडलेले असे प्रवेशद्वार आहेत. जे मंदिराचे खास आकर्षण आहे. मंदिराच्या आतील स्तंभ मंडपातील अनेक स्तंभ देवी मीनाक्षी (पार्वती) आणि सुन्दरेश्वर (महादेव) यांच्या विवाह दृश्याने शिल्प बद्ध आहेत. जवळजवळ ९८० च्या आसपास हे स्तंभ सुंदरतेच्या बाबतीत ओतप्रोत परिपूर्ण आहेत. मंदिराच्या मधोमध स्वर्ण कमळ स्तिथ पवित्र तलाव आहे. जो जवळ जवळ १६० x १२० फुट असावा.प्रत्येक दिवशी इथे हजारो भक्त आणि कलेचे पुजारी भेट देत असतात.
         रात्री आठ वाजता आम्ही मंदिरात दर्शानासाठी गेलो. आम्ही काही झालं तरी मुंबैवले गेलो मोठ्या ऐटीत ३/४ वर तसे आता सारेच घालतात म्हणा...!!!  पण तसले चोचले त्या मंदिरात नाही चालत ..!! आणि खरं आहे. मी बाहेर कsaही वावरत असलो तरी आपल्या संस्कृतीची आपल्याला जान मला असायला हवी. कुठेही कसही वावरायचं हि लक्षणं ठीक नाहीत. प्रत्येक ठिकाणी नियम असायला हवेत असे नाही. माझेही काही स्वतःचे नियम असायला हवेत.असो हे झाले माझे मत..मग काय जे पूर्ण कपड्यानिशी होते ते आत आणि आम्ही बाहेर..!! 
          बाकीचे मग सकाळी दर्शन घेऊन आम्ही ठरल्या वेळेत थेकडी साठी रवाना झालो. वाटेत मस्त चहा नाश्ता करून वाट वळनाची काही डोंगरांची संग करत आम्ही दुपारी दोनच्या आसपास थेकडीला विश्राम गृहा पाशी येऊन थडकलो. आधीच हॉटेल आरक्षित असल्यामुळे काही त्रास झाला नाही. पण लगातार चार तासाच्या प्रवासात सारे पेंगले मात्र होते.
      सारे फ्रेश होऊन मग जेवण केलं. आणि निघालो प्रथम अजेंड्यावर अभयारण्याचे प्रवेश द्वार तिकीट काढायचे असते. तिथून आत असलेल्या नदीत बोटीच्या तिकिटांसाठी वेगळी खिडकी मग तिथून पुढचा बोटीतला प्रवास आणि आपण एका नामांकित अभयारण्याच्या निसर्ग सानिध्यात वावरू शकतो ते हि बंधनात.बोंबला``!! पण जागा पूर्ण आरक्षित झाल्यामुळे
तिकीट काही मिळाल नाही. दुसर्या दिवशी सकाळी लवकर येऊन ते बुक करावं लागणार होतं. तिथून काहीसे नाराज होऊन आम्ही हत्तींची सवारी पाहायला गेलो. इथे हत्तींबरोबर फोटो, हत्तीवर सफर, हत्तीला खाऊ घालणे वगैरे अनेक प्रकार होते. कार्यक्रमाची वेळ आणि प्रकारानुसार माणशी साडेतीनशे ते १२०० असे दर होते. हत्तीही अतिशय देखणे होते.पण आमच्यापैकी कुणालाटी सैर करावी अशी वाटली नाही. अगदी पियुषलाही...!!
     पुढे आम्ही मसाल्याचे पदार्थ असणाऱ्या वाडीत जाण्याचा निर्णय घेतला आणि पोहचलोही. तशी पाहण्यासारखी ठिकाणे फार अश दूर  अंतरावर नाहीयेत. बऱ्याच एकर मध्ये हि पसरलेली वाडी. इथे पर माणसी १०० रु  सोबत एक माहिती देण्यासाठी  गाईड हि येतो.
तो आपल्याला सार्या वनस्पतीची अगदी सविस्तर माहिती देतो. मसाल्याचे हरेक पदार्थ त्या वाडीत लावले होते. खाली कॉफीच उत्पादन काडणारी प्रक्रिया आणि त्या मशनिरीची त्याने आम्हास सविस्तर माहिती दिली. सार्यात अप्रूव्ह वाटलं ते वेळची आणि लिंबूच एकंदरीत माहिती दृष्टीने हे ठिकाण ठीक वाटलं...
      तदनंतर गेलो कत्थकअली पाहण्यासाठी. खरतर फार उत्सुकता होती पण तितकासा आनंद तिथेही मिळाला नाही. त्यांच्या संस्कृतीचा भाग असला तरी तो आपल्याला रुचत नाही एका विशिष्ठ वेळेनंतर आपण निरस होत जातो. त्यांची कला, सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव ज्यात पूर्ण गोष्ट दडलेली असते ती आपल्याला समजन महत्वाच असतं अन्यथा व्यर्थ आहे. त्यांच्या कलेला दाद द्यायला हवी त्यात दुमत नाहीये.
      केरळ ,केळी आणि नारळ याचं अतूट नात आहे. इथे केळ्यांचा वेफर खूप प्रसिद्ध आहे. त्याची आणि इतर काही खरेदी करण्यात आम्ही व्यस्त होतो. रात्रीचे आठ वाजले असतील लक्ष एका रांगेकडे गेलं. बर ती राशनची वा इतर कसलीही रांग नव्हती तर चक्क दारूची विकत घेणाऱ्यांची रांग होती पण लाजा सोडलेले.... दारुडे नाही म्हणता येणार पण शौकीन म्हणायला हरकत नाही. "शौक बहुत बडी चीज होती है क्या करे" ....असो.... मग जेवण करून झोपी गेलो . सकाळी लवकर उठून तिकीट काढायचे होते.
       सकाळी सहा वाजता मी आणि साहेब गेलो. खाली उतरलो आणि तिकिट घराकडे गेलो. तिकिट विक्री सुरु झाली व वाहने हलु लागली. एकदाचे तिकिट मिळाले. साडेसातच्या फेरीची तिकिटे मिळाली होती. दहाला दुसरी फेरी होती, पण इतक्या उशीरा बोटीने जाण्यात मजा नाही. नदी काठी प्राणी सकाळी आढळतात व दिवस चढु लागताच ते आत जंगलात गायब होतात. तसे साडे सातच्या फेरीलाही गायबच होते. शिवाय सकाळपासुन उठुन बसलेले आणि चहा न बाहेर पडलेले आम्ही रिकाम्या पोटी, अंघोळही केलेली नाही असे तिथे ताटकळणे शक्य नव्हते. जंगलाचे आवार पाहुन एक दोन प्राणी सोडले तर नजरेस काही पडल नाही. निराश होऊन परतलो. हॉटेलवर फ्रेश होऊन मुन्नार कडे रवाना झालो.
       केरळमध्ये पाहण्यासारखे खूप काही आहे. पण मला जर कुणी विचारले की केरळात पाहण्यासारखे काय आहे? तर मी सांगेन - 'केरळ'. प्रसिद्ध वा प्रेक्षणिय स्थळांबरोबरच रस्त्याने जाताना वाटेत दिसणारे निसर्गाचे रूप पाहणे हे निश्चितच एक अनुभव आहे. प्रत्येक वळणावर नवे चित्र. म्हणुनच थेकडी ते मुन्नार हा पाच तासाचा प्रवास मला एखाद्या पर्वणीसारखा वाटला. डोंगर दर्या आणि वळणाचे रस्ते असल्याने सार्यांनीच निसर्ग सौदर्य हर्ष मनाने डोळ्यात साठवले काही अपवाद वगळता... आणि मुख्य म्हणजे लांबच्या लांब पसरलेले चहाचे मळे. एका शिस्तीत आणि लयबद्ध पद्धतीने डोंगर दर्यात वसले होते.
        आम्ही दुपारी साडे तीनच्या सुमारास पोहचलो. गारवा तसा कमीच होता. पण आपल महाबळेश्वर कैक पटीने चांगल आहे हे मुद्दामहून नमूद करावस वाटत.म्हणूनच इथे काही स्थळे पहाण्याचे आम्ही टाळले. चहाचे मळे सोडले तर बाकी वेगळ असं काही नाही. नंतर आम्ही आधीच बुक असलेल्या हॉटेलचा ताबा घेतला. आणि फ्रेश होऊन मार्केट मध्ये गेलो. इथे चॉकलेट बाकी झकास मिळतात.पुन्हा तीच रात्र,तीच मस्ती. आज आद्यचा वाढदिवस कल्पेश (गुरूचा) मुलगा. तो आम्ही मुन्नारमध्ये हॉटेलवर साजरा केला. केक गुरु आणि पियुषने मिळून कापला. तेवढी धमाल केली बाबा मुन्नारला..!! सकाळी एक दोन पॉईंट करून कोचिनकडे मार्गस्थ झालो.

       तारीख २६.११.२०१५ आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस. कोचिन तसे  गजबजलेले शहर.अरबी सागर किनार्यावर स्थित असलेले शहर आणि इतिहासाची पार्श्वभूमी असलेले अप्tरतिम बंदर. येथील शिपयार्ड पाहण्यासारखे आहे.संध्याकाळी सहाच्या सुमारास आम्ही तिथे पोहचलो. तदनंतर थेट कोचीनआंतरराष्ट्रीय विमानातला शेजारी हॉटेल मध्ये खोली घेऊन फ्रेश झालो. जेवण वैगरे उरकले आणि सारेच खुश होते आमची सहल आनंदाने,अति उल्हासवर्धक आणि सुखरूप पार पडली होती.सर्वजन आतुरतेने उद्याची पहाट कधी होईल याची वाट पाहत होते. आमच्यातल्या काहींनी विमानाचा प्रवास पूर्वी केला होतं तर काही अगदी नवीन होते.
    खरतर आम्ही मुद्दामहून विमानाचा प्रवास हा परतीच्या दिवशी ठेवला होता. सकाळी ६.२० ची फ्लाईट असल्यामुळे आम्हाला दोन तास आधीच विमानतळावर जान अपेक्षित होते. आणी योगायोगाने कोचीन आणि मुंबई दोन्होही ठिकाणी आमचं प्रस्थान आणि आगमन आंतरराष्ट्रीय टर्मिनल वरच होते.२७ तारखेची पाहट सर्व आवरून आम्ही रिक्षा करून विमानतळावर ४.२० ला पोहचलो. पूर्णपणे सौरउर्जेच्या वापर करून कामकाज करणारे पहिले विमानतळ बनण्याचा मान केरळमधील कोचीन विमानतळाने हस्तगत केला आहे.चेक इन करून बॅगा लगेज बेल्टवर रवाना केल्या आणि आम्ही मध्ये एन्ट्री केली.आता प्रतीक्षा.. चहा कॉफी आणि फोटोचा कार्यक्रम चालू होता. विमाणात पहिल्यांदाच बसनार म्हणुन काहींना कमालीची ऊत्सुकता होती.शेवटी उत्सुकता संपली गेट उघडला. आम्हाला बसने विमानापाशी नेण्यात आले.
       समोरच ऐअर इंडिया एक्स्प्रेस IX-402 आमच्या प्रतीक्षेत उभे होते. शेवटी आम्ही मुंबईकर. काय टाप त्याची आम्हाला सोडून जायची....तिथेही फोटो शेषन करून आम्ही आत प्रवेश केला. हवाई सुंदरीने आम्हाचं स्वागत केलं. खरतर त्या हवाई सुंदरींना इच्छा नसतानाही काही वेळेस आपल्याशी बळजबरीने हसावं लागतं .शेवटी ते क्षेत्रच असं आहे कि पर्याय नाही.  जेंव्हा विमान उड्डान घेतं तेंव्हा एवढ मोठे धुड आकाशात कसं झेप घेत ह्याचे मला आजही राहून राहून आश्चर्य वाटतं. उड्डानानंतर लगेच आपल्या ओळखिच्या जागा शोधून काढण्याचा खेळ खेळला जातो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघणेही एन्जोय करायला हवं.तीन जागा खिडकीजवळ जागा मिळाल्या होत्या. ढगांच्या मधून जाताना अजूनही मन ढग पकडून ठेवायचा प्रयत्न करते. कधीतरी दुरवर नुसता ढगांचा समुद्र असतो, निळ आकाश, ढग आणि आपण एवढच. नदीची वळण दिसतात.
        त्या अवकाशात भ्रमण करत असताना मुंबई कधी आली हे सुद्धा कळल नाही. अवघ्या दोन तासात कोचीन ते मुंबई.आणि जातेवेळेस दोन दिवस......आणि पोहचलो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई...

बाॅंबेला मुंबई आणि मुंबईच्या विमानतळाला छत्रपति शिवाजी नाव देऊन महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेउन बाळासाहेबांनी शिवभक्त असल्याची खरी ओळख दिली.. प्रत्येकाला छत्रपति शिवाजी हे नाव आदराने घ्यावच लागत..! नुसतं शिवाजी नाही..छत्रपति शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ!!!!
आधुनिक सुविधांचे जागतिक दर्जाचे टी २ टर्मिनल आणि त्याला महाराजांचं नाव.कीती अभिमानाची गोष्ट. पण ते कार्यान्वित झाल्याला आता वर्ष दिड वर्ष उलटले. टर्मिनलने अनेक पुरस्कार मिळविले.
     आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागची भूमिका परदेशातून महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवणार्‍या प्रत्येकाला हा महाराष्ट्र कोणाचा आहे याची जाण व्हावी व महाराजांना सलाम करूनच महाराष्ट्रात पाऊल टाकावे, हिआहे.  
     विमानातून उतरले की एक पासपोर्टवर शिक्का लागला की थेट गमन बग्गेज क्लेम कडे. तिकडेही बरेचवेळा तात्कळत रहावे लागते. बेल्ट वरून बॅग उचलण्याची धड्पड चालू असते. एकदा ती हातात आली की मग प्रवास संपला. प्रवास संपला की पुन्हा एक उदासिनता निर्माण होते. पण आमचा उत्साह होताच पालघर जे गाठायचे होते. पुन्हा रिक्षा आणि रेल्वेचा प्रवास .....
       एकंदरीतच सहल एकदम भन्नाट झाली.....
शिवा डेकोरेशन ग्रुप पालघर, धनसार 
नितेश पाटील (पालघर,धनसार)
९६३७१३८०३१