Friday, May 4, 2018

रिंगण

#रिंगण
____सॅक कधीची पॅक करून ठेवलेली. नुकताच गजरात एक वाजलेला. बाहेर पडलो. बाहेर किर्र अंधार. नभात मेघ आणि चंद्राचा लपंडाव चालूच होता. पिंपळपानांची सळसळ थांबून पुन्हा जोम घेत होती. दूर वळणावर खांबावर लटकलेला दिवा, अधून मधून प्रकाश दाखवत होता. गल्लीत मागच्या बाजूला कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता. वाड्यात सरपानावर बसलेलं मांजर मधेच म्याव करत होतं. कुडमेढिला उतळीची खुसपुस चालू होती. मधेच कुठूनतरी एखादा बेडूक कुणालातरी आवाज देत होता.
____लपंडाव खेळता खेळता मेघ आता निथळू लागले होते. तितक्यात हलकेच वीज चमकून गेली. भिजलेल्या पिंपळपानावर चंदेरी साज क्षणिक लखलखून गेला. वाघाला क्षणात काही दिसावं आणि त्याचा गुरुर जागा व्हावा तसे मेघ काहीसे गुरारून थांबले. अंधारात निजलेल्या वाटेनी कूस बदलली. आणि मी सॅक पाठीवर टाकून बाईकला सेल्फ मारला. पावसाळ्यात बहरलेल्या कुंपण वृक्षांच्या गर्दीतून, रस्त्याला उजेड दाखवत मी डांबरी रस्त्यावर पोहचलो. वळणावर लटकलेला दिवा आणि गाढ झोपेत असलेलं गाव मागे सोडून पुढे निघालो. एव्हाना गावाची वेस ओलांडली.
____ वाट अजून जागीच होती. तीच तसं माझ्यावर खूपच प्रेम. आजही ती माझ्या सेवेसाठी तत्परच होती. पूर्ण पावसात भिजलेली, म्हणाल तर अगदी धुऊन निथळत असलेली, निर्वाहान, निर्जन अशी. माझ्या पुढे जाण्याने ती पुढे पुढे चमकत जाई आणि मागे म्यान होई. पण काळ ओढवलेले बेडूक, काही सरपटणाऱ्या प्राण्यांचा भार उचलेली, तर पाऊस वाऱ्याने कंठस्थान दिलेला पाचोळा, आपल्या पाठीवर घेतलेली. त्यात कमी म्हणून आपल्या अंगावर मायबाप सरकारच्या कृपेने खड्डे मिरवत निजण्याचे सोंग घेतलेली. आपल्याच तंद्रीत.
____तिची तंद्री तोडण्यासाठीच, पावसाने आपला वेग वाढवला बहुतेक. गाडीच्या लख्ख प्रकाशात समोर पडणारे अगणित थेंब त्या वाटेवर आदळून आपलं अस्तित्व संपवत होते. मात्र ते संपत असतांना, त्या साऱ्यांचा मेळ होऊन वाटेवर एक नितळ परत अस्तित्वात येई. त्या परतीवर पडणारे थेंब अगणित रिंगण तयार करीत. पण त्या थेंबाला त्या रिंगणाची व्याप्ती कळण्याआधीच त्याचे अस्तित्व संपून जाई. जरी ते थेंब त्या रिंगणांच्या केंद्रस्थानी असले तरी... अशी ती अगणित रिंगणे छेडत मी स्टेशनवर पोहचलो.
____पाऊस आता थांबला होता. गाडी येण्यास अजून अवकाश होता. तिकीट काउंटरवर तिकीट घेतले कुर्ला व्हाया दादर, आणि पालघर स्टेशन स्पेशल चहा आणि मिसळपाव हाणला. फलाटावर मुसफिरांची तुरळक गर्दी होती. काही अस्ताव्यस्त लंबी टाकून दिलेले. मग त्यात बाकांवर, तर काही आडोसा शोधून फलाटावर, तर काही पदचारी पुलावर. काही डोळ्यात झोप घेऊन गाडीची वाट बघणारे. आणि विशेष म्हणजे दोन कुत्र्यांच्या टोळ्या होत्या, एक बारा पंधरा असतील. अर्धे एक नंबरवर, तर अर्धे दोन नंबरवर. राहून राहून त्यांचं काय संभाषण चालायचं, त्यांचं त्यांनाच ठाऊक. रेल्वे क्रॉस करायची मात्र हिंमत कुणाकडेही नाही. पळवून पाहिलं पण पुन्हा जैसे थे. शेवटी मीच मागे गेलो.
____इथे थोडी शांतता होती. वटवागळांचे खिदळने स्पष्ट ऐकू येत होते, दिसत होते. त्यांच्या साठी रात्र म्हणजेच दिवस असतो म्हणायचा. पण पिंपळ झाडांच्या शाखांवरचा, दिवसाच्या मानाने काहीसा भार हलका झालेला दिसला, बरं वाटलं. दिवसा इथली दोन्हीही पिंपळाची झाडे उलट्या लटकलेल्या वटवागळांच्या गर्दीने पूर्णतः भरलेली असतात. बऱ्यासश्या निष्पर्ण झालेल्या फांद्या अन त्यांना एकमेकांना खेटून उलटी लटकलेली वटवाघळे. एक अद्भुत नजारा असतो. बऱ्याच उशिराने का असेना पण रूळ समांतर बघत अहमदाबाद पॅसेंजर आली. आणि ते सारं तिथेच सोडून, मी तीत बसून रवाना झालो...
____नित(९६३७१३८०३१)
नितेश पाटील
१५/७/१५

No comments: